Indian Agriculture : सोनवणे सरांची शेतीमध्येही शिस्त

निळकंठ दिनकर सोनवणे यांनी महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकाची नोकरी सांभाळून नंदगाव (ता.जि. जळगाव) येथील वडिलोपार्जित शेती चांगली फुलविली आहे.
Banana Orchard
Banana Orchard Agrowon

success story : जळगाव शहरापासून सुमारे २६ किलोमीटरवर नंदगाव शिवार आहे. काळी कसदार, मध्यम प्रकारची जमीन असलेला हा पट्टा केळी (banana), पपई (Papaya), कांदा (Onion) आणि भाजीपाला (Vegetable) उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. निळकंठ सोनवणे यांची वडिलोपार्जित ३५ एकर शेती आहे.

शेतीमध्ये सहा कूपनलिका असून, केळी मुख्य पीक आहे. केळी उत्पादनासोबत बाजारपेठेचा अंदाज घेत मका, पपई, भाजीपाल्याची लागवड असते. निळकंठ हे धरणगाव (जि. जळगाव) येथील प.रा. हायस्कूल सोसायटी संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कनिष्ठ शाखेत सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

महाविद्यालयात विद्यार्थी घडवितानाच शेतीशी त्यांनी नाळ कायम ठेवली आहे. लहान बंधू अविनाश यांना अलीकडे रेल्वेमध्ये नोकरी मिळाली आहे. त्यांचीही शेतीच्या व्यवस्थापनासाठी मदत होते.

अडचणींवर मात ः

निळकंठ सोनवणे यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेताना घरच्या शेतीमधील राबता कायम ठेवला. सुट्टीच्या दिवशी किंवा निकड लक्षात घेऊन ते वडिलांना शेतीकामात मदत करायचे. त्या वेळी केळी आणि हंगामी पिकांची लागवड असायची.

महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी जळगाव शहरात नूतन मराठा महाविद्यालयात घेतले. पुढे धरणगाव येथे महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. सध्या त्यांचे वास्तव्य जळगाव शहरात आहे. तेथून धरणगाव येथे ये-जा करतात.

Banana Orchard
Banana Rate : खानदेशात केळी दर स्थिर

नोकरीला रुजू झाल्यानंतरही निळकंठ यांनी शेतीकडे दुर्लक्ष केले नाही. आठवड्यातील सुट्टीच्या दिवशी गावी शेतावर मुक्काम करतात. लहान बंधू अविनाश यांची देखील शेती नियोजनात मदत होते. नोकरीला रुजू होईपर्यंत निळकंठ यांची निम्मीच शेती ओलिताखाली होती.

परंतु मागील आठ वर्षांत त्यांनी संपूर्ण शेती ओलिताखाली आणली. शेतात जलवाहिन्यांचे जाळे तयार केले. आजघडीला इतरांची सुमारे दहा एकर शेती भाडेतत्वावर करतात.

सध्या दैनंदिन शेती नियोजनात वडील दिनकर हे मार्गदर्शक म्हणून काम पाहतात. शेतीच्या व्यवस्थापनासाठी चार सालगडी, ट्रॅक्टर, सहा कूपनलिका, बैलजोडी अशी यंत्रणा आहे. सुधारित तंत्राने पीक व्यवस्थापनावर त्यांचा भर आहे.

केळीचे दर्जेदार उत्पादन ः

सोनवणे यांची ३५ एकरांवर उतिसंवर्धित केळी रोपांची लागवडकरून ठिबक सिंचन केले आहे. नोव्हेंबरमध्ये पाच बाय सहा फूट या अंतरावर केळी लागवड केली आहे. पिकाला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या बरोबरीने बारमाही जिवामृत दिले जाते.

सोनवणे यांच्याकडे म्हशी, गीर गाय, बैलजोडी आहे. त्यामुळे शेतीला पुरेसे शेणखत उपलब्ध होते. केळी पिकात दरवर्षी थंडी, अति तापमान व वादळ, गारपिटीने नुकसान होते. पण यातून सावरून त्यांनी केळी पिकात सातत्य ठेवले आहे. बागा, बांध स्वच्छ ठेवण्यावर भर दिला आहे. केळीमध्ये वेलवर्गीय आंतरपिके टाळली आहेत.

योग्य व्यवस्थापनातून त्यांना एका झाडापासून सरासरी उत्पादन १८ ते २० किलो वजनाचा घड मिळतो. मागील तीन वर्षांत सरासरी ११०० रुपये प्रति क्विंटलचा दर जागेवर मिळाला आहे. कुठल्या काळात केळीची काढणी असावी, याचे नियोजन वर्षभरापूर्वीच केले जाते, त्यानुसार लागवडीचे नियोजन असते.

मक्याचे किफायतशीर उत्पादन ः

करार पद्धतीने घेतलेल्या दहा एकरांवर रब्बी हंगामात मका लागवड केली जाते. योग्य जातीची निवड, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि वेळेवर कीड, रोग नियंत्रणाचा अवलंब केला जातो. पिकाला जिवामृताची मात्रा दिली जाते. पिकाला ठिबक सिंचन केले आहे.

कीड नियंत्रणासाठी सापळा पिकाची लागवड केली आहे. पीक वाढीच्या टप्प्यात कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन व्यवस्थापन केले जाते. मक्याचे एकरी सरासरी ३० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.

मक्यास मागील तीन वर्षे जागेवर सरासरी १७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. मक्याचा काही चारा ते गावातील गोशाळेला दान म्हणून देतात, काही चारा स्वतःच्या जनावरांसाठी ठेवतात.

वांगी लागवड ः

निळकंठ सोनावणे यांनी यंदा एक एकरात लहान काटेरी वांग्याची लागवड केली आहे. पिकास पॉलिमल्चिंगचा वापर केला आहे. यामुळे तणनियंत्रणास मदत झाली. सेंद्रिय पद्धतीने त्यांनी पीक व्यवस्थापन ठेवले आहे. कीड नियंत्रणासाठी चिकट सापळ्यांचा उपयोग केला आहे.

सेंद्रिय कीडनाशकांच्या वापरावर भर दिला. सध्या वांग्याची विक्री जळगाव आणि परिसरातील बाजारपेठेत सुरू आहे. १५ किलोस २५० रुपये दर मिळाला आहे.

बाजाराचा अंदाज घेऊन मार्च महिन्यात पाच एकरांवर पपईची लागवड केली जाते. या पिकातून चांगला नफाही मिळतो. पिकांसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना निळकंठ सोनवणे ३० टक्के रासायनिक आणि ७० टक्के सेंद्रिय खताचा वापर करतात.

यामुळे उत्पादन खर्चात बचत होते. केळी पिकातून खर्च वजा जाता एकरी साठ हजार रुपये आणि मक्यातून एकरी ३२ हजार रुपये निव्वळ नफा मिळतो.

Banana Orchard
Soybean Market : ब्राझील विक्रमी सोयाबीन, मका निर्यात करणार

जमीन सुपीकतेकडे लक्ष

केळी, मका लागवड करताना जमीन सुपीकतेवर सोनवणे यांनी भर दिला आहे. सेंद्रिय कर्ब वाढीसाठी प्रयत्नशील आहेत. यासाठी पीक फेरपालटीवर भर आहे. केळीसाठी मूग, हरभरा पिकाचे बेवड राखतात.

घरच्या जनावरांचे शेणखत तसेच गरजेनुसार इतर शेतकऱ्यांकडून शेणखत विकत घेतले जाते. केळी, मका पिकाचे अवशेष जाळत नाहीत. काढणी झाल्यावर सर्व अवशेष रोटाव्हेटरने जमिनीत गाडले जातात.

शेतीच्या नोंदी महत्त्वाच्या...

१) बाजारपेठेचा अंदाज घेत केळी, मका, पपई लागवडीवर भर.

२) ‘अॅग्रोवन’मधील तज्ज्ञांचे सल्ले तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथेतून पीक व्यवस्थापनात बदल. ३) केळी, पपई, मका विक्रीसाठी थेट व्यापाऱ्यांशी संपर्क.

४) पीक नियोजन, खर्च, उत्पादन, उत्पन्न, गरजा, प्रयोगांच्या नोंदी.

५) नफ्यातून शेतीसाठी आवश्यक तंत्रज्ञान, यंत्रणेमध्ये गुंतवणूक.

६) पीक व्यवस्थापन, उत्पादनातील सुसूत्रतेवर भर.

संपर्क : निळकंठ सोनवणे ः ७७७५८७७१७६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com