Agriculture Pump : युवकाने तयार केले कृषी पंपासाठी स्मूथ स्टार्टर

Agriculture Technology : श्री छत्रपती संभाजीनगर येथील कुलदीप वाघ या इलेक्ट्रॉनिक्स विषयातील युवकाने कृषिपंपाचे कार्य सुरळीत चालविणारे स्मूथ स्टार्टर नावाचे उपकरण विकसित केले आहे. विविध वैशिष्ट्यांनी युक्त हे उपकरण शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. त्याच्या पेटंटसाठीही कुलदीप यांनी नोंदणी केली आहे.
Agriculture Pump starter
Agriculture Pump starterAgrowon

Success Story : शेती सिंचित करण्यामध्ये कृषिपंपाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. पंप नादुरुस्त झाल्यास तो वेळेवर दुरुस्त करून पुन्हा सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. पंप आणि त्याचा स्टार्टर चोरीला गेला, तर मग सिंचनाचं घोडं अडलंच म्हणून समजा.

तशा घटना वारंवार घडतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. शेतकऱ्यांची ही समस्या व नड छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्य असलेल्या कुलदीप दिलीप वाघ या युवकाने ओळखली.

जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड खु. हे त्याचे मूळ गाव आहे. शेतकरी कुटुंबातील या युवकाने कृषिपंपाचे कार्य सुरळीत चालविण्याच्या दृष्टीने ‘स्मूथ स्टार्टर’ हे उपकरण (डिव्हाइस) तयार केले आहे.

...असे केले ‘स्मूथ स्टार्टर’ विकसित

कुलदीपची घरची दीड एकर शेती आहे. त्याचे वडील ऑफसेट (प्रिंटिंग) व्यवसायात आहेत. कुलदीपने ‘इलेक्ट्रॉनिक्स’ विषयात ‘एमएस्सी’ची पदवी घेतली. त्यानंतर (२०१४) इलेक्ट्रॉनिक्स उद्योगातील कंपन्यांमध्ये चार वर्षे नोकरीचा अनुभव घेतला. मात्र नोकरदार होण्यापेक्षा आपल्यातील बुद्धिकौशल्याचा उपयोग करून स्वतःच काही तंत्रज्ञान निर्मिती करावी, असे कुलदीपला वाटत होते.

त्यामुळे नोकरीचा राजीनामा देऊन त्याने संशोधनात लक्ष घातले. वडील दिलीपराव व मामा शहादेव चेपटे यांची महत्त्वाची मदत यामध्ये झाली. मामांचे कृषिपंप दुरुस्तीचे केंद्र होते. त्यामुळे येथे येणाऱ्या शेतकऱ्यांच्या नेमक्या अडचणी कुलदीपला माहीत व्हायच्या. या समस्यांवर नेमके पर्याय काय असायला हवेत याबाबत मामा- भाचे यांच्यात चर्चा व्हायची.

त्यातूनच कुलदीपला आपल्या कार्याची दिशा मिळाली. बाजारातील कृषिपंप, त्यांचे मार्केट, शेतकरी वापरत असलेले स्टार्टर याविषयी कुलदीपने सविस्तर अभ्यास केला. त्यातून स्मूथ स्टार्टर तंत्रज्ञानाचा जन्म झाला.

या उपकरणासोबत त्याने एका आयटी क्षेत्रातील कंपनीकडून आपल्या गरजेनुसार मोबाइल ॲपही विकसित करून घेतले आहे. ‘देवांश टेक्नॉलॉजी’ नावाने ते ‘डाउनलोड’ करावे लागते. त्यास ‘लॉग इन’ केल्यानंतर पासवर्ड द्यावा लागतो. त्यामुळे स्टार्टरचे सर्व नियंत्रण शेतकऱ्याच्या हाती येते.

Agriculture Pump starter
Agriculture Technology : तंत्रज्ञान वापराचे स्वागत, पण...

...असे आहे स्टार्टरचे तंत्रज्ञान

हे उपकरण तीन ते साडेसात एचपी आणि दहा ते १२ एचपी क्षमता अशा दोन प्रकारांच्या पंपासाठी तयार करण्यात आले आहे. पहिल्या प्रकारासाठी सुमारे १० हजार रुपये तर दुसऱ्या प्रकारासाठी १५ हजार रुपये खर्च येतो. या उपकरणात थॅरिस्टर तंत्रज्ञान वापरले आहे.

सर्वसाधारणपणे पंप सुरू झाल्यानंतर त्याला हिसके बसण्याचे प्रकार पाहण्यास मिळतात. मात्र या उपकरणात ‘आरपीएम’ नियंत्रित राहत असल्यामुळे कोणताही हिसका न बसता पंप हळुवार सुरू होतो. अनेक वेळा काही उपकरणांचे बेअरिंग, बुशिंग जाण्याचे प्रकारही घडतात.

तसे काही या उपकरणात घडल्यास ते सुरू न होता बिघाड झाल्याचे सांगते. मोटर जळण्याचे प्रमाणही कमी होते. उपकरण ॲप व्यतिरिक्त बटणांद्वारे (मॅन्युअली) देखील वापरता येते.

वैशिष्ट्ये व सुविधा

-ॲपमध्ये पंप किती वाजता व किती वेळ सुरू ठेवायचा, कधी बंद करायचा यासाठी ‘टायमर’ची सुविधा आहे.

-वीजपुरवठा, पुरेसे व्होल्टेज, फेज स्टेट्स, पंपाची स्थिती आदींचीही माहितीही मोबाइलवर उपलब्ध होते.

-उपकरणाला ‘एलसीडी डिस्प्ले’ दिला आहे. तापमान नियंत्रणासाठी छोटा फॅन आहे.

-शेतातील अनेक उपकरणे चोरीस गेल्याचे अनुभव शेतकऱ्यांना येतात. त्या अनुषंगाने पंपाला वीजपुरवठा करणारी केबल कोणी कापली किंवा त्यात छेडछाड केली, तसेच पंप किंवा स्टार्टर चोरीस गेला, तर मोबाईलवर तसा तत्काळ संदेश किंवा ॲलर्ट मिळतो.

ॲपमधील संबंधित बटण लाल रंगाचे होऊन रिंग वाजते. या यंत्रात जीपीएस सिस्टीम बसविली असल्याने पंपाची चोरी झाल्यास त्याचा ठावठिकाणा शोधता येतो. त्यासाठी उपकरणाला काही काळासाठी बॅटरी बॅकअपही दिला आहे.

-अतिरिक्त सुविधा म्हणून वायरलेस सेन्सरही दिला आहे. त्यातून जमिनीचा ओलावा, तापमान, ठिबकचा व्हॉल्व्ह सुरू किंवा बंद करणे या बाबी समजणे वा कार्यान्वित करता येणार आहेत.

या सेन्सरची क्षमता दीड किलोमीटर क्षेत्रापुरती मर्यादित आहे. उपकरणासोबत ही सुविधा घेण्याचे बंधन नाही. गरजेनुसार शेतकऱ्यांना त्याचा वापर करता येईल.

-एखाद्या शेतकऱ्याकडे एकापेक्षा जास्त पंप असतील तरीही एकाच ‘ॲप्लिकेशन’ सर्व पंपांसाठी स्मूथ स्टार्टरचा वापर करता येतो. कोणत्या विहिरीवरील पंपाशी जोडणी झाली आहे, त्यावरून तसे नावही देण्याची सुविधा आहे.

-फोर जी तंत्रज्ञानाची जोड दिली आहे.

यंत्राची यशस्विता

उपकरण तयार केल्यानंतर पाच ते सहा शेतकऱ्यांकडे तसेच पंप हाउसमध्ये या उपकरणाच्या चाचण्या घेतल्या आहेत. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री परिसरातील तीन ते चार गावांतील ३० शेतकऱ्यांनी हे उपकरण घेतले आहे. जवळपास दीड वर्षापासून त्याची कुठली तक्रार आली नसल्याचे कुलदीप सांगतात.

ऑनलाइन क्षेत्रातील कंपनीकडेही त्याची नोंदणी केल्याने पंधरा ते वीस हजार उपकरणांची मागणी झाली आहे. शक्य तेवढ्याच ‘ऑर्डर्स’ स्वीकारून त्या थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न असल्याचे व भविष्यात उपकरणात अजून बदल करणे शक्य असल्याचे कुलदीप सांगतो.

मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याच्या दृष्टीने तेवढे भांडवल उभारणीचे प्रयत्नही सुरू केले आहेत. या उपकरणाचे मुंबई येथील संबंधित सरकारी कार्यालयाकडे पेटंट फाइल केले आहे. त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

संपर्क - कुलदीप वाघ, ९०२८३०७८३०

Agriculture Pump starter
Bio-Tech International Conference : बायोटेक्नॉलॉजी फॉर बेटर टुमारो विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद
सुमारे वीस वर्षांपासून कृषिपंप दुरुस्ती व्यवसायात आहे. कुलदीपचा नवे तंत्र विकसित करण्याचा ध्यास पाहून कृषिपंप वापरातील अडचणी, स्टार्टरचे विषय समजावून सांगितले. दोन वर्षांपासून माझ्या माध्यमातून शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचा लाभ दिला आहे.
शहादेव चेपटे (कुलदीप वाघ यांचे मामा) रामगव्हाण, जि. जालना ९९२२१९८४६६

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com