

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड लपाली गाव (ता. मोताळा) दहा वर्षांपूर्वीचे फारसे परिचित नव्हते. सर्वसाधारण स्वरूपाची जमीन व पावसावर आधारित इथली पीकपद्धती होती. पण नेतृत्व, लोकसहभाग आणि प्रशासनाची साथ मिळाली तर एखाद्या गावाचे चित्र कसे हां हां म्हणता बदलता येऊ शकते हे सिंदखेड गावाने करून दाखवले आहे.
लोकसहभागातून जलसंधारण
सिंदखेड गावचे वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही कामांत असणारा लोकसहभाग. गावचे युवा सरपंच विनोद कदम यांच्या हाकेला ओ देणारी तरुणाई या बदलाची खरे तर साक्षीदार आहे. गावची पाणीटंचाई दूर करण्यासाठी लोकसहभागातून जलसंधारणाची ८० हजार घनमीटर कामे करण्यात आली. यात १५ हजार घनमीटर हे श्रमदान व ६५ हजार घनमीटर यंत्राच्या साह्याने झाले आहे. सुमारे २० हजार घनमीटर क्षमतेचे सिमेंट बांध उभे राहिले. आता गावच्या शिवारात तब्बल एक लाख घनमीटर काम झाले आहे. याचा फायदा म्हणजे पावसाळ्यात एक-दोन पाऊस होताच पाणी पातळी वाढण्यास सुरुवात होते. उपचार केलेल्या सर्व ठिकाणी जलस्रोत भरून वाहू लागतात. प्रत्येक पावसात काही कोटी लिटर पाणी मुरते. दोन-तीन पावसांमध्ये कोरड्या विहिरी तुडुंब भरण्यास सुरुवात होते.
वृक्ष व माती संवर्धन
पर्यावरण संवर्धन व समृद्धीसाठी व पुढील पिढीला सुरक्षित, शाश्वत शेती देण्यासाठी गावाने विविध झाडे व गवताळ कुरणांचे महत्त्व जाणले. त्यातून शिवारात मारवेलची २५०० रोपे, पवना सात हजार आणि डोंगरी गवताची दहा हजार रोपे तयार केली. गावशिवारातील उजाड जमिनींवर १० हजार वृक्षांची लागवड केली. जमिनीची धूप थांबावी व मातीचे संरक्षण व्हावे या उद्देशाने देशी गवताची नर्सरी करण्यात आली. झाडांना पाणी देण्यासाठी स्वतंत्र पाइपलाइन केली आहे.
शेती झाली बागायती
सन २०१८ पासून गावाने प्रगतीची खरी वाट धरली. जलसंधारणाची कामांसोबतच २२ शेततळी खोदण्यात आले. केलेल्या कामांचे परिणाम पुढे दिसू लागले. गावची ४१० हेक्टर शेती असून सुरवातीला सात ते आठ हेक्टरपर्यंतच सिंचनाची सोय होती. आज ही क्षमता वाढून १२० हेक्टरवर सिंचनाची सोय झाली आहे. शेतकऱ्यांना दोन पिके घेणे शक्य झाले आहे. विहिरींना अधिक काळापर्यंत पाणी उपलब्ध राहत असल्याने बागायती कपाशी किंवा मे महिन्यात ‘प्री-मॉन्सून’ कपाशीचे नियोजन करणे शक्य झाले आहे. शिवाय १०० टक्के शेतकऱ्यांकडे ठिबकची सोय उपलब्ध आहे. जमीन साधारण असतानाही गावात कपाशीची एकरी सरासरी उत्पादकता आठ क्विंटलपर्यंत पोहोचली आहे. पूर्वी शेती आणि शेतमजुरी हाच उत्पन्नाचा मुख्य स्रोत होता. पण आता बदल दिसू लागला आहे. शेतीसोबतच दुग्ध व्यवसाय उभा राहत आहे. दुधाळ जनावरांची संख्या २०० पेक्षा अधिक झाली आहे. दररोज २०० लिटरपर्यंत दूध संकलन होते. खानदेशातील एका डेअरीने संकलन केंद्रही सुरू केले आहे.
सिंदखेड गाव- विकासकामे दृष्टिक्षेपात
जलसंधारणाची कामे झाल्याने दरवर्षी पाणीपातळी वाढत आहे. त्याची शास्त्रशुद्ध नोंद ठेवली जाते. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून त्याचा अहवाल तयार केला जातो.
झालेली प्रमुख कामे
माती नाला बांध
गॅबियन बंधारा
दगडी बांध
सीसीटी व डीप सीसीटी
कंटूर बांध
कंपार्टमेंट बांध
शेततळे
विकासकामे
ग्रामपंचायतीला ‘आयएसओ’ दर्जा
प्रशिक्षण केंद्र
संपूर्ण शाळा डिजिटल, शाळेच्या पटसंख्येत वाढ, शाळेच्या तीन खोल्यांचे बांधकाम,
सिमेंट काँक्रीटचे रस्ते
नवी अंगणवाडी इमारत
सुसज्ज अभ्यासिका
स्मशानभूमी दुरुस्ती
सांडपाणी व्यवस्थापन
संपूर्ण गावात भूमिगत नाल्या
जनावरांना पाण्यासाठी दोन हौदांची निर्मिती.
गौरवपूर्ण कामगिरी
‘पाणी फाउंडेशन वॉटर कप’ स्पर्धेत राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक
कृषी विभाग तसेच जिल्हा, तालुका स्तरावर स्मार्ट ग्राम
कोविड लसीकरण तालुक्यात प्रथम
ई- ग्राम तालुक्यात प्रथम
ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट तालुक्यातील एकमेव गाव
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शाळा योजनेत समाविष्ट जिल्ह्यांतील तीन गावांपैकी एक गाव
उद्दिष्ट
विविध कंपन्यांच्या ‘सीएसआर फंडा’तून ग्रामविकासासाठी निधी उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे.
रोजगार संधी निर्माण करणे, गाव १०० टक्के सौर ऊर्जेवर आणण्यासाठी प्रयत्न, बायोगॅस प्रकल्प, तसेच गाडगेबाबा ग्रामस्वच्छता स्पर्धेत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक अशी उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.