
Youth Agricultural Business : यवतमाळ जिल्ह्यात पुसद या तालुका ठिकाणापासून नऊ किलोमीटरवर वेणी गाव (Veni Village) आहे. गावशिवारात पूर्वी चारशे- पाचशे एकरांवर उन्हाळी भुईमूग घेतला जायचा.
आता मजुरांअभावी क्षेत्र कमी झाले आहे. मल्चिंग-ठिबकच वापर करून सुमारे २५० एकरांवर भाजीपाला (Vegetable) होतो. पुसद उमरखेड भागात विक्री होते.
गटबांधणी व व्यवसाय
नगदी पिके घेण्यावर भर असलेल्या वेणी गावातील युवकांनी एकत्र येत श्री संत खप्ती शेतकरी पुरुष गटाची स्थापना २००९ मध्ये केली. त्या वेळी अध्यक्ष सतीश वाशिमकर होते. सध्या जगदेवराव टेमकर अध्यक्ष आहेत.
श्याम कोंडबा आराडे हे सचिव तर सदस्यांमध्ये रवींद्र सुभाष पुंड, आशिष महेश भोणे, अरविंद कानडे, अमोल भोणे, संदीप भोणे, प्रमोद वाशीमकर, शंकर खोंड आदींसह १८ जणांचा समावेश आहे. सन २०१५ मध्ये ‘आत्मा’अंतर्गत गटाची नोंदणी झाली.
कृषी विभागांतर्गत आयोजित कार्यशाळांना गटातील सदस्यांनी उपस्थिती लावली. दरम्यान जागतिक बँकेच्या अर्थसाह्यातून महाराष्ट्र स्पर्धात्मक कृषी विकास प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली. त्याचा लाभ घेत गटाने मिनी डाळ मिल उद्योगाची उभारणी करण्याचा निर्णय घेतला.
एक लाख १५ हजार रुपयांच्या प्रकल्पासाठी ४० हजार रुपयांचे अनुदान मिळाले. सन २०१६ मध्ये व्यवसाय कार्यान्वित झाला. तीन हॉर्सपॉवर क्षमतेची ‘सिंगल रोलर यंत्रणा’ या ठिकाणी आहे. गटाचे सदस्य रवींद्र पुंड यांनी १६ बाय १२ फूट जागा त्यासाठी पाचशे रुपये प्रति महिना दराने भाडेतत्त्वावर दिली आहे.
...असा आहे प्रक्रिया व्यवसाय
पंचक्रोशीतील १० किलोमीटर अंतरावरील १२ खेड्यांमधील शेतकऱ्यांना तूर, हरभरा डाळ निर्मिती करून दिली जाते. त्यासाठी क्विंटलला ५०० रुपये, तर गहू, ज्वारी, स्वच्छता करून देण्यासाठी क्विंटलला १०० रुपये शुल्क आकारले जाते.
पुसद व अन्य गावांतील शेतकरीही प्रक्रियेसाठी या ठिकाणी आपला माल आणतात. फेब्रुवारी ते ३० मेपर्यंत हा हंगाम चालतो. या संपूर्ण काळात पाचशे क्विंटल तुरीवर प्रक्रिया होते. यंत्रणेची क्षमता दिवसाला १८ क्विंटल आहे.
भागीदारीत डाळ मिल
काही शेतकरी गट व कंपन्यांना उद्योग उभारल्यानंतर तो पुढे चालविणे कठीण होते. असे काही उद्योग श्री संत खप्ती शेतकरी गटाच्या सदस्यांनी भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी घेतले आहेत. त्यामध्ये अनसिंग (वाशीम)पासून नऊ किलोमीटरवरील वारला येथील माऊली शेतकरी बचत गटाचा डाळ मिल उद्योगाचा समावेश आहे.
या ठिकाणी ४५० क्विंटल तुरीवर प्रक्रिया होते. वैजनाथ वडकुटे येथील जबाबदारी सांभाळतात. महागाव (यवतमाळ) तालुक्यातील काळी दौलत खान येथील शिवार मिनी डाळ मिल देखील ५० टक्के भागीदारीत चालविण्यात येते.
ओम कोदुटवार यांच्याकडे त्याची जबाबदारी आहे. गुंज येथे गटाचे भागीदारीत डाळ मिल युनिट क्रमांक दोन सुरू आहे. शुभम टेमकर येथील व्यवस्थापन पाहतात. अशाप्रकारे गटाने व्यवसाय विस्तार केला आहे.
सेंद्रिय शेती
कृषी परंपरागत सेंद्रिय शेती योजनेअंतर्गत ५० एकर ‘क्लस्टर’साठी अनुदानात्मक योजना आहे. त्यासाठी गटातील शेतकऱ्यांनी कृषी क्रांती सेंद्रिय गटाची बांधणी केली आहे. त्याचे अध्यक्ष अरविंद कानडे आहेत. त्या माध्यमातून सुमारे ५० एकरांत सेंद्रिय शेती केली जाते.
यात ४७ शेतकरी कार्यरत आहेत. सरासरी दीडशे क्विंटल तुरीची खरेदी हंगामात या शेतकऱ्यांकडून केली जाते. त्यांना बाजारभावांपेक्षा क्विंटलला दोनशे रुपये अधिक दिले जातात.
त्यामुळे शेतकऱ्यांचा कल गटाला पुरवठा करण्याकडे आहे. शिवाय गावस्तरावर खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांचा वाहतुकीवरील खर्चही वाचतो.
चारशेवर ग्राहक जोडले
कृषी विभागाकडून आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाद्वारे सुरुवातीला सेंद्रिय शेतीमालाची विक्री करण्यात आली. त्यातून ४०० ग्राहक जोडले आहेत.त्यांना तूर, मूग, हरभरा डाळ व गहूआदींची विक्री होते.
बाजारभावापेक्षा दहा रुपये अधिक दर मिळवण्याची त्यातून संधी असते. दरवर्षी सरासरी ६० क्विंटल तूरडाळ व २५० क्विंटल प्रतवारी केलेला गहू अशी उलाढाल होते.
शेतकरी कंपनी व सापळ्यांची निर्मिती
गटाचे कार्य सुरू आहेच. पण एक पाऊल पुढे टाकून आता संत खप्ती शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापनाही २०२० मध्ये झाली आहे. त्याचे १०५ भागधारक तर १३ संचालक आहेत. प्रति एक हजार रुपये अशी ‘शेअर’ची किंमत आहे.
कंपनीच्या माध्यमातून किडींच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे तयार करण्याचे काम होते. यासाठी लागणारे पिवळे शीट सूरत (गुजरात) येथून तर गोंद पुणे येथून घाऊक दरात खरेदी केला जातो. दिवसाला सुमारे दोन हजार सापळ्यांचे उत्पादन होते.
१२ बाय ११ सेंटिमीटर त्याचा आकार आहे. १७० रुपये प्रति १० कार्डसचे बंडल असा त्याचा दर आहे. सध्या हे काम ‘मॅन्युअली’ होते. येत्या काळात यांत्रिकीकरण केले जाणार आहे. औरंगाबाद भागातील भाजीपाला उत्पादकांकडून या सापळ्यांना मागणी आहे. त्यांना वर्षाला सुमारे सहा हजार सापळ्यांचा पुरवठा होतो.
तर वर्षाला एकूण ३० हजारांपर्यंत विक्री होते. येत्या काळात नीम तेल व पावडर निर्मिती सुरू करण्याचा कंपनीचा मानस आहे. गट व कंपनी अशी एकूण वार्षिक उलाढाल ३६ लाखांपर्यंत नेत व्यवसायवृध्दीकडे वाटचाल केली आहे.
ग्राम बीजोत्पादनातून समृद्धी
ग्राम बीजोत्पादन हा देखील गटाचा एक उपक्रम आहे. त्याद्वारे १०० एकर सोयाबीन तर ६० एकरांवर गहू, हरभरा घेतला जातो. सरकारी बियाणे कंपनीसाठी हा कार्यक्रम राबवण्यात येतो. तीन महिन्यांतील दरांची सरासरी काढून १८ टक्के वाढीव दर व बोनस असा परतावा कंपनीकडून मिळतो.
त्यामुळे बीजोत्पादनात सहा वर्षांपासून सातत्य आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतूनही गटातील शेतकऱ्यांना प्रोत्साहनात्मक रक्कम मिळते.
प्रकल्पात सहभागी शेतकऱ्यांची संख्या २० पर्यंत आहे. गटातील सुमारे १०० शेतकऱ्यांनी ‘स्मार्ट कॉटन’ प्रकल्पातही भाग घेतला आहे. त्यातून उत्पादनाचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.
रवींद्र पुंड, ९७६७१७१०६६, (संचालक, श्री संत खप्ती शेतकरी पुरुष गट)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.