Maharashtra Farming: नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यातील शहा गावात शेखर चांगदेव जाधव यांनी २००४ मध्ये अंजीर या फळाचा धाडसी प्रयोग केला. तो यशस्वी झाला. दहा वर्षांनी बाग काढावी लागली. मात्र पुन्हा २०२६ मध्ये दीड एकरात लागवड केली. आव्हाने, संकटांशी झुंजत, विक्री व्यवस्था निर्मिती यातील कष्टांच्या सीमा पार करीत जाधव कुटुंबाने या पिकात उल्लेखनीय नाव व ओळख निर्माण केली सर्व खर्च पेलले.अर्थकारणाला उंची दिली. .नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील शहा येथील शेखर जाधव कुटुंबाची सुमारे १८ एकर शेती आहे. दोन दशकांपूर्वी त्यांचे वडील चांगदेव विठ्ठल जाधव ऊस, कांदा, गहू आणि सोयाबीन अशी पिके घेत. दिवसभर शेतात राबायचं, मात्र निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारातील दरांची अनिश्चिततेमुळे हाती अपेक्षित काहीच पडत नव्हतं. वडील वयोमानानुसार थकल्यानंतर मोठा मुलगा शेखर यांच्याकडे शेतीची जबाबदारी आली..धाकटा मुलगा शरद नाशिक येथे व्यवसाय करू लागले. दरम्यान, पारंपरिक पिकांवर अवलंबून राहून प्रगती होणार नाही. वेगळे, धाडसी प्रयोग केले पाहिजेत असे शेतीची स्वतंत्र जबाबदारी स्वीकारलेल्या शेखर यांना वाटू लागले. प्रवाहाविरुद्ध जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. दरम्यान, मित्र परिवारातील काही सदस्य बारामती (जि. पुणे) येथे अंजिराची रोपे घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी काही रोपे माझ्यासाठीही घेऊन या. पिकाचा प्रयोग तरी करून पाहू असे शेखर म्हणाले. मात्र यापूर्वी या भागात हे पीक कोणी घेतले नसल्याने धोका पत्करणे योग्य राहणार नाही असे सांगून वडिलांनी विरोध केला. अनेकांनी विविध शंकाही उपस्थित केल्या. पण शेखर आपल्या विचारांवर ठाम राहिले व त्यांनी प्रयोगाचे धाडसी पाऊल उचलले..Fig Farming : नियोजनबद्ध व्यवस्थापनातून दर्जेदार अंजीर उत्पादनासाठी प्रयत्न.धाडसी प्रयोगाचा श्रीगणेशासन २००४ मध्ये एक एकरात लागवड केली. सूक्ष्मसिंचनाची जोड दिली. अनुभवाचा अभाव असल्याने पीक व्यवस्थापनात अनेक अडचणी आल्या. मात्र शेखर यांनी प्रयोगशील अंजीर उत्पादकांचे अनुभव, शास्त्रीय शिफारशी अभ्यासून वाटचाल सुरू ठेवली. अनुभव व ज्ञानाच्या जोरावर झाडांना गोड फळे लगडू लागली. मोठ्या कष्टातून शेखर यांनी आपल्या अंजिरांना बाजारपेठही तयार केली. बघता बघता दहा वर्षे लोटली. सन २०१४ पर्यंत एकरी १० टनांपर्यंतची उत्पादकता गाठली..पुन्हा नवी सुरुवातएक एकराच्या अंजीर बागेत सागाचे आंतरपीक घेतले होते. मात्र दोन्ही पिकांचे व्यवस्थापन व ताळमेळ साधताना अंजीर बागेच्या नुकसानीला सामोरे जावे लागले. शेखर निराश झाले. खचले. दहा वर्षे जोपासलेल्या बागेतून यापुढे उत्पादन मिळणार नव्हते. परंतु इतकी वर्षे उत्पादन व उत्पन्न या दोन्ही अंगांनी यश मिळाले असल्याने शेखर यांनी पुन्हा हिंमत दाखवली. सन २०१६ मध्ये नव्याने दीड एकरात अंजिराची लागवड करण्यासाठी ते पुढे सरसावले. पुन्हा एकदा निश्चय, धाडसाला वाट मोकळी झाली. मागील त्रुटी, अनुभव व अवगत झालेली मास्टरी यातून शेखर यांनी या पिकातून पुन्हा एकदा आर्थिक स्थैर्याकडे वाटचाल केली..विक्री व्यवस्थेतील कष्टांचेही योगदानउत्पादनाच्या अंगाने शेखर यांनी अंजीर बाग यशस्वी केली. परंतु विक्री व्यवस्था उभी करण्यासाठी देखील त्यांनी विशेष परिश्रम केले. त्यामुळेच खऱ्या अर्थाने हे पीक यशस्वी झाले. सुरुवातीच्या टप्प्यात फळांसाठी ग्राहक नव्हते. त्यामुळे विक्रीसाठी संघर्ष करावा लागला. ग्राहकांना व परिचयातील व्यक्तींना फळांचे महत्त्व पटवून सांगितले. पुढे बाजारपेठांचा शोध घेत विपणन पद्धती सुद्धा अंगीकारली. आपल्या गावापासून सुमारे २५ किलोमीटरवर शिर्डी, राहाता येथे बाजारपेठा आहेत. तेथे मोटरसायकलवर क्रेट बांधून नेण्यास सुरवात केली..त्या वेळी कोणी हसायचे. चेष्टा करायचे. पण हार मानली नाही. या जिद्दी शेतकऱ्याने विक्री व्यवस्था तयार करून दाखवली. आज सिन्नर येथील व्यापारी जागेवर येऊन खरेदी करतात. तर शिर्डी- राहाता येथे अजही मोटरसायकलवरून अंजिरे नेण्याची पद्धत सुरू आहे.ग्राहक थेट शिवारात येऊनही खरेदी करतात. त्यांना प्रति किलो १०० रुपयांनी जागेवर, तर व्यापाऱ्यांना ८० ते ९० रुपये दराने अंजिरांची विक्री होते. या विक्री व्यवस्थेमुळे अर्थकारण सक्षम होण्यात मोठी मदत झाली आहे. शेतकऱ्याने उत्पादक होण्याबरोबर विक्रेता देखील व्हावे असे शेखर सांगतात. आज शेखर यांना ‘अंजीरवाले जाधव’ म्हणून परिसरातील फळ विक्रेते ओळखतात..Fig Orchard Damage: पावसामुळे अंजिर पिकाची अवकळा.अंजीर शेतीतील ठळक बाबीसध्या दीड एकरात बाग. दिनकर वाणाची लागवड.खट्टा बहराचे होते व्यवस्थापन. या बहरातील फळे नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध होतात. या काळात टप्प्याटप्प्याने होतात तोडे.तोडणी झाल्यानंतर एकसारखी आकर्षक फळे निवडून त्यांची हाताळणी, प्रतवारी होते. त्यामुळे दर चांगले मिळण्यास होते मदत.दरवर्षी एप्रिल–मे काळात झाडे पाण्याच्या ताणावर सोडली जातात.पानगळी झाल्यानंतर पुढे जूनमध्ये ‘खट्टा’ बहरासाठी दोन ते तीन डोळे ठेवून खरड छाटणी..जमीन सुपीकतेवर भर देत रासायनिक खतांचा वापर कमी करून शेणखत व सेंद्रिय खतांवर भर.एकरी ८ ते ९ टनांची मिळते उत्पादकता.झाडांमध्ये अन्नसाठा होणे व दर्जेदार फळ निर्मितीसाठी शेंड्याची अतिरिक्त वाट थांबवली जाते.पक्ष्यांपासून फळांच्या संरक्षणासाठी बर्डनेटचा वापर..प्रेरणादायी कामश्रमातून समृद्धीकडे, सोबतीला शास्त्रीय ज्ञान, अनुभवातून प्रगतीकडे असा जाधव कुटुंबाचा संघर्षमय प्रवास आहे. कुटुंबातील सर्व सदस्य शेतात राबतात. गरजेनुसार ३ ते ४ मजुरांचा वापर होतो. शेखर यांचे वडील चांगदेव आता वयाने शकले आहेत. मात्र त्यांचे व आई रत्नाबाई यांचे मार्गदर्शन लाभते. शेखर यांच्या सोबतीला पत्नी पुष्पा खांद्याला खांदा लावून राबतात. कधीकाळी डोक्यावर कर्ज असल्याने आर्थिक परिस्थिती नाजूक होती. मात्र आज जीवनात मोठा बदल घडला आहे. शेखर सांगतात, की माझे शिक्षण कमी झाले. परंतु मुलांना चांगले शिकवायचे असा निश्चय केला होता. थोरली कन्या निकिता विज्ञान शाखेत पदव्युत्तर असून तिचा विवाह झाला आहे..मधली कन्या आकांक्षा वाणिज्य पदवीधर आहे. लहान कन्या भाग्यश्री विज्ञान पदवीधर असून, व्यवसाय व्यवस्थापन शाखेत तिला प्रवेश घ्यायचा आहे. लहान मुलगा गणेश कृषी विद्याशाखेत पदवीचे शिक्षण घेत आहे.जाधव कुटुंबाने आपल्या गुणांमधून व कार्यातून इतरांना प्रेरणा दिली आहे. शेती परवडत नाही असे म्हणणाऱ्यांसाठी जाधव यांनी दाखवून दिले की कष्टाची तयारी असेल तर काहीही अशक्य नाही. आज कुटुंबावर कोणतेही कर्ज नाही. आर्थिक पत वाढली आहे. पाच किलोमीटरवरून पाइपलाइन करून शेती सिंचनाखाली आणली आहे. आवश्यक यांत्रिकीकरण केले आहे.वडिलांच्या दोन मुख्य शस्त्रक्रिया, मुलीचा विवाह यासाठी शेतीतील उत्पन्नच कामी आले..कष्टांचा सन्मानअंजिराच्या प्रयोगशील शेतीची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शेतकरी मेळाव्यात वडील चांगदेव यांना सन्मानित करण्यात आले. तसेच मागील वर्षी नाशिक येथे शेखर यांना एका कृषी प्रदर्शनात प्रयोगशील शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.- शेखर जाधव९३५६९३५४९०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.