आत्मनिर्भर

धोंडिबा पूर्णपणे वैतागला होता. आज आकाश जरा जास्तच भरून आलं होतं. पाऊस आला तर मात्र हातातोंडाशी आलेलं पीक जाईल याची भीती ढगासारखी गडद होत होती. मोबाइल बाजूला ठेवून हताशपणे तो बांधावरच बसला. इतके दिवस मोबाइलच्या नादात सोन्यासारखा वेळ वाया घालवला होता. लोकांनी घाई करून वेळेत कापणी करून घेतली होती. नजर जाईल तिथवरची ज्वारीची कापणी झालेली उघडी शेतं पसरली होती
Farmer
Farmer Agrowon
Published on
Updated on

डॉ. सतीलाल पाटील

आटपाट गावात धोंडिबा नावाचा तरुण शेतकरी (Farmer Dhodiba) राहत होता. धोंडिबाचं घर नदीच्या या काठाला, तर शेत नदीच्या दुसऱ्या काठाला होतं. पूर्वी नदीला (River) बारमाही पाणी असायचं. त्यामुळे घरातून नजरेच्या टप्प्यात असलेल्या नदीपल्याडच्या शेतात जाण्यासाठी, लांबच्या पुलापर्यंत पायपीट करत, पुलावरून नदी ओलांडून शेतात जावं लागायचं. पण गेल्या दोन दशकांत पर्जन्यचक्राचा समतोल ढळला. पावसाचं चालचलन बिघडलं. वर्षभर नेमाने वाहणारी नदीची माया आटू लागली. मग शेतीसाठी, पिण्यासाठी (Drinking Water) वर्षभर नेमाने पाणी हवं, म्हणून लहानमोठे बांध घातले गेले. त्यामुळे नदीचा ओघ आटला. लहानपणी मित्रांबरोबर धावत जाऊन, पुलाचा लाँगकट मारून शेतात जाणारा धोंडिबा, तरुणपणी कोरड्या नदीपात्रातून पाच मिनिटात आपल्या बांधावर पोहोचू लागला.

धोंडिबाला तसं सुपारीचंही व्यसन (Addiction) नव्हतं. गावातल्या पेताड, गंजेडी, नशेडी, जुगारी ग्रुपपासून तो कायम सुरक्षित अंतर राखून होता. नवसागराचा घमघमाट येणाऱ्या गावाबाहेरील वस्तीपासूनदेखील तो लांब राहिला. पण सध्या एका वेगळ्या व्यसनात तो अडकला होता. त्याच्या घरी लँडलाइन फोन होता, त्यामुळे मोबाइलची गरज पडली नव्हती. पण मुलांच्या आग्रहाखातर गेल्या वर्षी त्याने स्मार्टफोन घेतला. सुरुवातीला मोबाइल फोन वापरण्यात अडचणी आल्या. पण एकदा त्याला फोनमधील व्हॉट्सअॅप, फेसबुक, यू-ट्यूब हा खजिना गवसल्यावर फोनची चटक लागली. बांधावर बसून सोशल मीडिया चाळत बसणं हा धोंडिबाचा आवडता छंद बनला. व्हॉट्सॲपमधल्या खऱ्याखोट्या बातम्यांमध्ये तो अडकून राहू लागला. त्या इतरांना शेअर करू लागला. त्यामुळे अनेक मित्र दुरावले. राजकारणाच्या बातम्या शेअर केल्यामुळे त्याच्यावर शिक्के पडले. काही मित्रांच्या मते तो भक्त होता तर काहींच्या मते अभक्त. पण या चक्करमध्ये तो मित्रांपासून विभक्त झाला होता. सोशल मीडियाच्या (Social Media) दलदलीत तो जेवढी हालचाल करायचा तेवढा जास्त रुतू लागला. शेतातली कामं सोडून तासन्‌ तास तो फोनमध्ये अडकून पडू लागला. त्यामुळे शेतीची, घरची कामं वेळेत संपणं दुरापास्त झालं. कामं रखडू लागल्यानं घरच्यांची चिडचिड व्हायची. पण दारुड्याला जशी त्याची चूक कळून येत नाही, तसंच आपलं काही चुकतंय हे काही धोंडिबाच्या गावीही नव्हतं.

Farmer
कलिंगड पीक जोमात

यंदा धोंडिबानं ज्वारीचं पीक (Sorghum crop) घेतलं होतं. आधीच जमीन सुपीक आणि त्यात पाऊस चांगला झाला. त्यामुळे पीक चांगलंच तरारलं होतं. त्याच्या या शेतात (Farming) एका चिऊताईनं घरटं बनवलं होतं. या घरट्यात चिऊताईनं तीन अंडी दिली. कालांतराने त्या अंड्यातून तीन गोंडस पिलं बाहेर पडली. आपल्या पिलांचं पोषण करण्यासाठी चिऊताईची दिवसभर लगबग असायची. चिऊताई सकाळी चारा आणायला शेतभर फिरायची. पिलांसाठी अन्न गोळा करायची आणि संध्याकाळी घरट्यात परत यायची.

धोंडिबाच्या शेतातलं पीक आता काढणीला आलं होतं. टच्च भरलेल्या कणसांवर भोरड्यांचा थवा झेपावयाचा. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी (Farmer) डबा बडवणे, कॅसेट्च्या प्लॅस्टिकच्या पट्ट्या लावणे यासारखे उपाय करत पीक वाचवायचा आटापिटा चालवला होता. पण धोंडिबा मात्र या बाबतीत जास्त गंभीर नव्हता. त्याने शेतात बुजगावणं उभं केलं होतं. शेत बुजगावणेभरोसे सोडून, मोबाइलशी खेळत तो बांधावर दिवसभर बसून असायचा. आजूबाजूच्या शेतात कापणीला जोर आला तेव्हा धोंडिबाला आपल्या कापणीला उशीर झाल्याचं जाणवलं. अधूनमधून आकाशात दाटून येणाऱ्या ढगांच्या काळ्या सावल्या अवकाळीची टांगती तलवार डोक्यावर लटकत असल्याची जाणीव करून देत होत्या. पाण्याने भरलेली ओंजळ घेऊन फिरणारे ढग, आता रोजच आकाशात हजेरी लावू लागले. त्या दिवशी ढगांच्या ओंजळीतून तर काही थेंब ओघळलेदेखील. धोंडिबाला मात्र आता घाई करणं आवश्यक होतं. त्याने मोबाइल काढला आणि कापणीच्या कामाचं कंत्राट घेणाऱ्या सुभान्याला फोन केला. उद्या कोणत्याही परिस्थितीत माझ्या शेतात तुझी टोळी आली पाहिजे असं बजावत, तो बांधावर बसून मोबाइलमध्ये घुसला.

Farmer
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा तीस टक्के भात कापणीला फटका

धोंडिबाचं मोबाइलवरचं (Mobile) बोलणं चिमणीच्या पिलांनी ऐकलं आणि ते घाबरले. आपलं घरटं संकटात असल्याची जाणीव त्यांना झाली. संध्याकाळी चिमणी घरट्यात परतली तेव्हा त्यांनी धोंडिबाचं मोबाइलवरील बोलणं तिला सांगितलं. आपण आजच दुसरीकडं जायला हवं असंही सुचवलं. तेव्हा ‘बाळांनो, घाबरू नका. उद्या हा शेतकरी ज्वारी (Sorghum) कापणार नाही. त्यामुळे आपल्याला आज घाई करायची गरज नाही,’ असं म्हणत चिमणीने पिलांना समजावलं आणि चारा खाऊ घातला.

दुसऱ्या दिवशी धोंडिबा शेतात आला. पण तिथं सुभान्या किंवा त्याची टोळी यापैकी कोणाचाही पत्ता नव्हता. त्याने सुभान्याला फोन केल्यावर ‘धोंडिबा, दुसरं अर्जंट काम आलं बघ आमच्याकडे. पुढच्या आठवड्यात करतो तुझं काम’ असं म्हणत त्याची बोळवण केली. चरफडण्याशिवाय धोंडिबा काही करू शकत नव्हता. आकाशातून मिचकावणाऱ्या ढगांकडं बघत धोंडिबा विचार करू लागला. आता काय करायचं? सध्या सगळेच घाईला येणार. मजुरांची मुजोरी वाढणार. त्यापेक्षा आपल्या भाऊबंदांना साकडं घातलेलं बरं. यापूर्वी कधी तशी गरज भासली नव्हती. पण आता निकड होती. त्याने चुलत भावांना मदतीसाठी साद घालायचं ठरवलं. त्यांच्याकडे प्रत्येकी दोन-तीन गाडीमाणसे आणि त्यांची कुटुंबं आश्रयाला होती. एका दिवसासाठी ती मंडळी कामाला आली तरी धोंडिबाचं काम होणार होतं. त्याने त्याच्या तीनही चुलत भावांना फोन केला. आम्ही गडीमाणसांशी बोलून बघतो आणि उद्या तुझ्या शेतात पाठवतो असं आश्‍वासन तिघांनी दिलं. त्यांच्या आश्‍वासनाने धोंडिबाला दिलासा मिळाला. सुटकेचा श्‍वास सोडत त्याने बांधावर त्याच्या नेहमीच्या जागेवर बसकण मारली आणि तो मोबाइलमध्ये गुंगला.

आज संध्याकाळी चिमणी घरट्यात आली तेव्हा पिलांनी चिवचिवाट करून धोंडिबाच्या प्लॅनबद्दल सांगितलं. आजच आपण आपलं बिऱ्हाड दुसरीकडे हलवायला हवं, असा आग्रह केला. यावर चिऊताईने हसत पिलांना पंखांत घेत म्हटलं, ‘‘बाळांनो, घाबरू नका. इथून आजच आपलं बिऱ्हाड हलवायची गरज नाहीये.’’ तिच्या उत्तरावर पिलांनी जोरात चिवचिवाट करत विरोध दर्शवला. पण तिने पंखांखालील पिलांना दिलासा देत शांत केलं.

पुन्हा दुसरा दिवस उगवला. धोंडिबा शेतात (Farmer) हजार झाला. पण त्याला शेतात एकही गडी दिसला नाही. त्याने शेजाऱ्यांना देखील विचारलं. पण कुणीही त्यांना पाहिलं नव्हतं. धोंडिबाने फोन करून भाऊबंदांना विचारलं. त्यावर ‘या गड्यांचं काय खरं नाही बघ, काल चांगलं सांगितलं की त्यांना. तरी गेली नाईत ती असं म्हणत वेळ मारून नेली.

आता मात्र धोंडिबा वैतागला होता. आज आकाश जरा जास्तच भरून आलं होतं. पाऊस आला तर मात्र हातातोंडाशी आलेलं पीक जाईल याची भीती ढगासारखी गडद होत होती. मोबाइल बाजूला ठेवून हताशपणे तो बांधावरच बसला. इतके दिवस मोबाइलच्या नादात सोन्यासारखा वेळ वाया घालवला होता. लोकांनी घाई करून वेळेत कापणी करून घेतली होती. नजर जाईल तिथवरची ज्वारीची कापणी झालेली उघडी शेतं पसरली होती. फक्त धोंडिबाच्या शेतातील (Agriculture) ज्वारी वाकुल्या दाखवत ढगाळ हवेवर डोलत उभी होती. या डोलणाऱ्या पिकावरून नजर फिरवताना त्याला आपली चूक लक्षात आली. मोबाइलच्या नादात त्याने बहुमूल्य वेळ वाया घालवला होता. त्याला पश्‍चात्ताप झाला. आता हातपाय हलवले नाहीत तर मात्र काही खैर नाही, याची त्याला जाणीव झाली. ‘‘बस्स झालं, उद्या शनिवार आहे. दोन्ही मुलांना दोन दिवस सुट्टी आहे. बायको (Wife) आणि आई-बाबांना देखील घेऊन येतो. आमच्या सहा लोकांचे बारा हात राबले तर दोन दिवसांत काम संपेल,’’ असं म्हणत तो उठला आणि तडक घराकडे निघाला.

धोंडिबाच्या हालचालींकडे चिमणीबाळे आपली चिमणी (Sparrow) नजर ठेवून होते. संध्याकाळी पिलांनी चिमणीला दिवसभराचा वृत्तांत कथन केला. आज देखील घाई करायची गरज नाही, याची त्यांना खात्री पटली होती. पण चिमणी मात्र एकदम सावध झाली आणि तिने आवराआवरील सुरुवात केली. ती पिलांना म्हणाली, ‘‘बाळांनो, चला, सामान आवरा. आजच नवीन जागा शोधायला हवी.’’ पिलांनी आश्‍चर्याने विचारलं, ‘‘आई, गेले दोन दिवस तू या शेतकऱ्याचं म्हणणं सीरियसली घेतलं नाहीस. पण आज मात्र घाई करतेयस. असं का?’’ यावर चिमणी म्हणाली, ‘‘मजूर हे पैशाचे गुलाम. त्यामुळे जिकडे जास्त पैसे तिकडे ते जाणार. आणि सध्या मजूर म्हणजे मनका राजा, त्याच्यावर विश्‍वास ठेवणं म्हणजे पैसे घेऊन मत दिलेल्या उमेदवाराकडून, आश्‍वासनपूर्तीची अपेक्षा करण्यासारखं आहे. दुसरे भाऊबंद. त्यांच्या नावातच बंद असल्याने तुलना करण्यात आणि पाय ओढण्यातच ते पुढे. त्यामुळे गरजेच्या वेळी तिकडूनही अपेक्षा करणे व्यर्थ. शेवटी सगळे रस्ते बंद होतात तेव्हा कुटुंब (Family) कामी येतं. ते ऐनवेळी धोका नाही देणार. आता कुठं या शेतकऱ्याला ‘आत्मनिर्भरते’चं महत्त्व समजलंय. ढगांच्या थंडगार हवेनं त्याला जमिनीवर आणत मोबाइलच्या नशेतून जागं केलंय.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com