डॉ. विलास जाधव, रूपाली देशमुखTribal Women Empowerment: पालघर जिल्ह्यातील प्रयोगशील आदिवासी महिला बचत गटाच्या माध्यमातून एकत्र आल्या. या महिला गटांनी कोसबाड हिल येथील कृषी विज्ञान केंद्रामार्फत अळंबी उत्पादनाचे प्रशिक्षण घेतले. आज पालघर जिल्ह्यातील दीडशे महिला अळंबी उत्पादनातून दरवर्षी पंधरा लाखांची उलाढाल करत आहेत..पालघर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा. बहुतेक आदिवासी महिलांचे अर्थकारण शेती आणि मजुरी तसेच वनउपज गोळा करून विक्री करणे यावर अवलंबून आहे. या कामाचे स्वरूप हंगामी असल्याने त्यांचे उत्पन्न स्थिर नसते. अनेक महिलांकडे स्वतःची जमीन नसल्याने त्यांना आर्थिक सुरक्षेचा अभाव आहे. हंगामी स्थलांतरामुळे मुलांचे शिक्षण खंडित होते..पालघर जिल्ह्यात भात हे मुख्य पीक आहे. ही शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने उत्पादनाची खात्री देता येत नाही. तसेच आदिवासी महिलांच्या कामाला आर्थिक पाठबळ कमी असते. पाण्याची कमतरता, मोकाट जनावरांचा त्रास, लहरी हवामानामुळे पीक उत्पादनाची शाश्वती नसणे, बाजारातील शेतमालाचे तीव्र चढ-उतार यामुळे आदिवासी भागात पर्यायी उत्पन्नाचे मर्यादित स्रोत आहेत. परिणामी, कुटुंबाची प्रचंड आर्थिक ओढाताण होते. शेतीमध्ये महिलांचे मोठे योगदान आहे..पालघर जिल्ह्यातील कृषी आणि पूरक उद्योगाच्या विकासासाठी महिलांना सक्षम आणि स्वावलंबी करणे आवश्यक आहे. काळाची गरज ओळखून कृषी विज्ञान केंद्रामार्फत महिला बचत गट निर्मिती करून त्यांना शेती पूरक व्यवसायांचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले. कमी कष्ट आणि कमी खर्चात व्यवसाय निर्मिती व्हावी यासाठी अळंबी उत्पादन निर्मितीचे प्रशिक्षण घेण्याचे निश्चित झाले. त्यानुसार २०२२ पासून कोसबाड हिल येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये अळंबी उत्पादनाबाबत प्रशिक्षणाचे सातत्याने आयोजित केले जाते. .Mushroom Production: अळंबी उत्पादनातून महिला झाल्या सक्षम.बीज निर्मिती प्रयोगशाळेची स्थापनापालघर जिल्ह्यातील महिला बचत गटांना अळंबी उत्पादनासाठी लागणारे बीज (स्पॉन) पुणे, नाशिक या ठिकाणाहून आणणे परवडणारे नव्हते. तसेच हे बीज वेळेत उपलब्ध होईल याची शाश्वती नव्हती. म्हणून कृषी विज्ञान केंद्रामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या आर्थिक सहकार्याने अळंबी बीज निर्मिती केंद्राची उभारणी करण्यात आली. त्यामुळे अळंबी उत्पादन करणाऱ्या महिलांना वेळेवर आणि माफक दरात बीजपुरवठा करणे शक्य झाले आहे. या प्रयोगशाळेत दरवर्षी एक टन अळंबी बीज निर्मिती केली जाते. महिला गटांना १०० रुपये प्रति किलो दराने बीज विक्री केली जाते..महिलांना तांत्रिक मार्गदर्शनमहिला बचत गटाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्रातील गृह विज्ञान तज्ज्ञ रूपाली देशमुख यांनी अळंबीचे आहारातील महत्त्व, धिंगरी अळंबीचे प्रकार, उत्पादन करण्याच्या पद्धती, रोग नियंत्रण, आद्रता व्यवस्थापन, भात पेंढ्याचे तुकडे करून निर्जंतुकीकरण, पिशव्या भरण्याची पद्धतीविषयी प्रशिक्षण देतात..केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव हे महिला बचत गटांना उद्योजकता विकास, विक्री नियोजनाबाबत मार्गदर्शन करतात. केंद्रातील संगणक तज्ज्ञ अनिल कुमार सिंग हे अन्न सुरक्षा परवाना मिळविण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन करतात. कृषी विज्ञान केंद्रातर्फे आतापर्यंत पन्नासहून अधिक दोन ते तीन दिवस कालावधीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यातून १२०० महिलांनी अळंबी उद्योगाबाबत सविस्तर माहिती घेतली आहे..स्वयंसेवी संस्थांचा सहभागअळंबी उत्पादन करून महिलांना स्वावलंबी बनविणे, महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी जिल्ह्यातील विविध संस्थांचे सहकार्य मिळते. कृषी विज्ञान केंद्रामार्फत प्रशिक्षण घेऊन अळंबी प्रकल्प उभारण्यासाठी महिलांना आर्थिक पुरवठा करणे, ब्रॅण्ड निर्मिती, विक्रीचे नियोजनासाठी स्वयंसेवी संस्था महिला बचत गटांना मार्गदर्शन करतात. यामध्ये नीवजीवन फाउंडेशन, सर नेस वाडिया फाउंडेशन, आरोहन आदी संस्थांचा सहभाग असतो. डहाणूतील भूमी महिला गटाला एकात्मिक आदिवासी विकास विभागामार्फत अळंबी उत्पादन शेड उभारणीसाठी आर्थिक साह्य करण्यात आले आहे. कृषी विभाग आणि प्रकल्प संचालक, आत्मा यांच्यातर्फे प्रशिक्षण देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रास आर्थिक सहकार्य मिळते..Mushroom Production : अळंबी उत्पादनातून मिळाली आर्थिक स्थिरता.महिलांमध्ये झाले परिवर्तन...अळंबी उत्पादन हे कमी जागेत, कमी खर्चात आणि शाश्वत असल्याने जिल्ह्यातील महिला गटांचा ओढा अळंबी उत्पादनाकडे आहे. गावातील महिला एकत्र येऊन अळंबी उत्पादन घेतात. बचत गटाच्या माध्यमातून विक्रमगड तालुक्यात अळंबी उत्पादन केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. सध्या पालघर जिल्ह्यात वीसहून अधिक महिला बचत गटांनी धिंगरी अळंबी उत्पादनास सुरुवात केली आहे..डहाणू तालुक्यातील बांधघर येथील भूमी बचत गट, शिसणे येथील धनश्री बचत गट, राधिका महिला बचत गट, चिंचले येथील पिंका महिला बचत गट, रोशनी स्वयंसाह्यता महिला गट, वाडा तालुक्यातील संजीवनी महिला बचत गट, विक्रमगड सातखोर येथील वंदिता महिला बचत गटासह जव्हार, मोखाडा तालुक्यातील महिला गटांचा समावेश आहे. अळंबी उत्पादन व्यवसायामध्ये पालघर जिल्ह्यातील सुमारे २१५ महिला कार्यरत आहेत..आज प्रशिक्षण घेतलेल्या महिला गटातील सदस्या नवीन तयार झालेल्या बचत गटांना अळंबी उत्पादनाचे प्रशिक्षण देतात. या व्यवसायामुळे महिलांच्या हाताला रोजगार मिळाला आणि कुटुंबाच्या उत्पन्नात भर पडली. काही सदस्यांनी घरासाठी लागणारा खर्च भागवला, काहींनी मुलांच्या शिक्षणासाठी पैसे वापरले. घरगुती निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढला..यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आणि समाजात प्रतिष्ठा निर्माण झाली. शहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन महिला बचत गटांनी अळंबीपासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्याचा संकल्प केला आहे. अळंबी पावडर, लोणची, पापड आणि इतर मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्मितीकडे पाऊल टाकले आहे. भविष्यात स्वतःचा ब्रॅण्ड तयार करून ताजी अळंबी आणि प्रक्रिया उत्पादनांची ऑनलाइन विक्री सुरू करण्याची योजना महिला बचत गटांनी आखली आहे..तयार केला अळंबीचा ब्रॅण्डपालघर जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, वाडा तालुक्यातील महिला बचत गटांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर अळंबी उत्पादनास सुरवात केली. गटातर्फे पहिल्या टप्यांत गाव आणि पंचक्रोशीतील बाजारात अळंबी विक्रीचे नियोजन करण्यात आले. ताज्या अळंबीला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला. त्यामुळे हळूहळू उत्पादन वाढवून आठवडी बाजार, हॉटेल्स आणि कृषी प्रदर्शनांमध्ये अळंबी विक्रीस सुरुवात केली. चांगल्या गुणवत्तेमुळे महिला गटांचे ग्राहकांशी विश्वासाचे नाते तयार झाले..डहाणू तालुक्यातील शिसने गावातील महिलांनी ‘मस्त’ मशरूम या नावाने ब्रॅण्ड तयार केला आहे. या महिला गटाने मुंबईमध्ये अळंबी विक्रीस सुरुवात केली आहे. त्यामुळे उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे. मिळालेल्या नफ्यातून गटाने अळंबी उत्पादनासाठी पुन्हा गुंतवणूक केली. गटाच्या निव्वळ नफ्यातील काही रक्कम गटातील सदस्यांना देण्यात आली..पालघर जिल्ह्यातील विविध महिला बचत गटांच्या माध्यमातून दरवर्षी सरासरी सहा टन अळंबी उत्पादन होते. बचत गटांच्या माध्यमातून जिल्ह्यात वर्षाला अळंबी विक्रीतून पंधरा लाखांची उलाढाल होते. प्रत्येक महिला बचत गटाला दरवर्षी सरासरी ७० हजारांचे उत्पन्न अळंबी उत्पादन व्यवसायातून मिळते. सध्या प्रति किलो ३०० रुपये या दराने ताज्या अळंबीची विक्री होते.- डॉ. विलास जाधव ८५५२८८२७१२(प्रमुख कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, जि. पालघर)- रूपाली देशमुख ८६९८७०११७७(गृह विज्ञान शास्त्रज्ञ, कोसबाड हिल, जि. पालघर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.