बुलडाणा जिल्ह्यातील धामणगावबढे हा भाग खानदेश किंवा जळगावच्या सीमेलगत मोडतो. या भागात भाजीपाल्याची शेती (Vegetable Farming) बऱ्यापैकी विस्तारलेली आहे. मोताळा तालुका मुख्यालयापासून साधारणतः २५ किलोमीटरवर हे गाव येते. येथे काही शेतकरी दरवर्षी मिरची (Chili Production), वांगी उत्पादन (Brijal Production) घेण्यात आघाडीवर राहतात.
उबाळे कुटुंब हे त्यापैकीच एक आहे. या भागात सिंचनासाठी पाण्याची मोठी समस्या आहे. उबाळे यांच्याकडे केवळ जून ते जानेवारी या काळातच सिंचनासाठी पाणी उपलब्ध असते. त्यांनी सुमारे सहाशे फूट खोल दोन कूपनलिका घेतल्या. मात्र त्यातून पुरेसे पाणी मिळत नाही. एक विहीर आहे.
त्याआधारे पावसाळ्यामुळे उपलब्ध होणाऱ्या पाण्यावरच खरे तर मिरची, वांगी पिकांचे हंगामी सिंचन करणे शक्य झाले आहे. पाऊसमान चांगले झाले, तर विहिरीचे पाणी आणखी महिना-दीड महिना पुढे चालते.
उबाळे यांची शेती
कुटुंबाची १३ एकर एकत्रित शेती आहे. सुमारे सात एकर क्षेत्र कोरडवाहू (Dry Lan Agriculture) स्थितीतील आहे. सध्या योगेश सुरेश उबाळे हे आपले उमेश व जितेंद्र या लहान बंधूंसह पूर्णवेळ शेती (Agriculture) करतात. शेजारील काही शेती भाडेपट्ट्याने (Agriculture On Rate) घेण्यात आली आहे.
यंदा त्यात कपाशीची लागवड केली आहे. सुमारे १० एकरांत कपाशी व एक एकरात सोयाबीन असते. खरिपात मिरची व वांगी यांचे प्रत्येकी एक एकर क्षेत्र असते. दोन्ही पिकांची लागवड जूनमध्ये होते. दोन्ही प्लॉट जानेवारीपर्यंत सुरू राहतात. पुढे पाण्याची समस्या येत असल्याने उन्हाळ्यात शेत रिकामे ठेवण्यावरच भर असतो.
मोजकेच पाणी उपलब्ध असल्याने वापर काटकसरीने होतेच. ठिबक सिंचन केले आहेच जमीन मध्यम स्वरूपाची असून चुनखडीचे प्रमाण आहे. शिवाय चोपण प्रकारात मोडते. लागवडीसाठी नर्सरीतून रोपांची खरेदी होते. लागवडीपूर्वी एकरी दोन ते तीन ट्रॉली शेणखताचा वापर होतो.
व्यवस्थापन बाबी
या भागात उठाव असलेल्या वाणांची निवड उबाळे करतात. या भागात लांब मिरचीला बाजारात उठाव राहतो. ती तोडायला सोपी जाते. आकार मोठा, रंग पोपटी स्वरूपाचा राहतो. खाण्यासाठी ती मध्यम तिखट राहते. यंदा एक एकरात पाच बाय दीड फूट अंतरावर मिरचीची लागवड केली आहे.
धामणगाव येथील कृषी पदवीधर रमेश चौरे यांच्याकडून लागवडीसंबंधी नियमितपणे मार्गदर्शन घेण्यात येते. दरवर्षी एकरी २० टनांपर्यंत उत्पादन घेण्यात येते. मिरचीला सरासरी २० ते २५ रुपये दर मिळतो. कमाल दर ४० रुपयांपर्यंतही मिळतो. दोन वर्षांपूर्वी ५५ रुपयांपर्यंत दर मिळाला होता.
ऑगस्टच्या दरम्यान काढणी सुरू झाली की अकोला, जळगाव खानदेश, मलकापूर, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, खंडवा या बाजारांमध्ये मिरची विक्रीला पाठवण्यात येते. गाडी रवाना करण्यापूर्वी व्यापाऱ्यांसोबत संपर्क साधून कोणत्या बाजारात दर काय आहेत त्याची चाचपणी केली जाते.
हिरव्या रंगाच्या मध्यम आकाराच्या आकर्षक वांग्याचे उत्पादन घेण्यात येते. त्याचे उत्पादन एकरी २० टनांपर्यंत होते. सरासरी दर २० ते २२ रुपये व कमाल दर ४० रुपयांपर्यंत मिळतो. मिरचीसोबतच वांगी देखील विविध बाजारपेठांमध्ये पाठवण्याचे नियोजन असते.
...पण हिंमत हरले नाहीत
मिरची, वांगी या पिकांवरच आमचा मुख्य प्रपंच अवलंबून असल्याचे उबाळे सांगतात. दोन्ही पिकांतून दोन एकरांत तीन चे चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. अलीकडे मात्र वातावरण बदलाचा या पिकांना फटका बसतो आहे. उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. मिरचीवर विविध प्रकारचे विषाणूजन्य व बुरशीजन्य रोग येतात. त्यांचे व्यवस्थापन वेळेवर न झाल्यास मोठे नुकसान झेलावे लागले. यासाठी
सुरुवातीपासूनच पिकावर देखरेख ठेवण्यात येते. रोग दिसू लागताच तज्ज्ञांशी बोलून फवारणीचे नियोजन केले जाते. पाण्यासाठी पाइपलाइन करायची आहे, मात्र सध्या तेवढे आर्थिक भांडवल नाही.
एकदा पाणीटंचाईत गावामधून शेतापर्यंत पाणी नेत पीक उत्पादनात खंड पडू दिला नाही. दोन वर्षांपूर्वी योगेश बाजारपेठेत माल घेऊन जात असताना गाडीचा अपघात झाला. त्यामध्ये त्यांच्या पायांना मोठी इजा झाली. या आघातातून सावरत ते पुन्हा जोमाने शेतीत उतरलेले आहेत.
अर्थकारण उंचावले
केवळ शेती हाच उत्पन्नाचा स्रोत असल्याने उत्तम नियोजनातून अधिकाधिक नफा मिळवण्याचा कुटुंबाचा प्रयत्न असतो. घरचे सर्व जण शेतीत राबत असल्याने मजुरांवरील अवलंबित्वही कमी केले आहे. कुटुंबाकडे सुरुवातीला चार एकरच जमीन होती. शेतातील उत्पन्नातूनच
शेतीच विस्तार टप्प्याटप्प्याने करणे शक्य झाले. सन २०१२ मध्ये सहा एकर शेती विकत घेतली. त्यानंतर पुन्हा २०२१ मध्ये तीन एकर क्षेत्र घेतले. एकूण नऊ एकर शेतीखरेदीतून आता क्षेत्र १३ एकरांपर्यंत पोहोचले आहे. अडीच गुंठे प्लॉट घेतला आहे.
जोडीला कपाशीचे एकरी ८ ते १० क्विंटलपर्यंत, तर सोयाबीनचे एकरी १० क्विंटलपर्यंत उत्पादन घेण्यात येते. सोयाबीन काढणीनंतर रब्बीत गहू घेण्यात येतो. त्याचेही एकरी १५ ते १८ क्विंटलपर्यंत उत्पादन घेण्यात येते. सर्व पिकांचे योग्य व्यवस्थापन, आर्थिक नियोजन व एकी यातून कुटुंबाने पंचक्रोशीत नाव तयार केले आहे.
संपर्क ः योगेश उबाळे, ९५५२७९४७८५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.