वारणा नदीच्या काठी वसलेले ऐतवडे खुर्द गावात पाण्याची कमतरता (Water Availability) नाही. उलट सन २०१९ आणि सन २०२१ ला वारणा नदीला (Warana River) आलेल्या पुराने शेती कवेत घेतल्याने नुकसान (Crop Damage) सोसावे लागले. तरीही येथील शेतकऱ्यांनी हार न मानता पुढे जात राहिले. या गावातील प्रमुख पीक ऊस आहे. येथील गावातील अभिजित गणपतराव पाटील हे युवा शेतकरी. वडिलोपार्जित पाच एकर शेती. आजोबांनी (कै. ज्ञानोबा पाटील) सुमारे ३५ वर्षापूर्वी वारणा नदीवरुन शेतीसाठी पाइपलाईन (Irrigation) केली होती. तसेच विहीर घेतल्यामुळे पूर्ण शेती बागायती केलेली होती. मात्र लहान वयातच वडिलांचे छत्र हरपले.
शेतीची जबाबदारी आई नंदिनी, मोठा भाऊ झुंजार आणि अभिजित यांच्यावर आली. आई, आजीसह चार जणांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह ऊस शेतीतून सुरू होता. दोघांनाही शिक्षणाची आवड असली तरी सुमारे ९ वर्षांपूर्वी घर आणि शेतीकडे लक्ष देण्याची जबाबदारी अभिजित यांनी स्वतःच्या शिरावर घेतली. त्यामुळे झुंजार यांना एम.बी.ए.चे शिक्षण पूर्ण करता आले. ते सध्या कोल्हापूर येथे नोकरी करत आहे. शेती करताना अभिजित यांनीही पदवीपर्यंत (बी.ए.) शिक्षण घेतले. अभिजित यांच्यावर शेतीची जबाबदारी आली तरी शेतीचा कोणताही अनुभव नव्हता. विविध पिकांची माहिती व बारकावे जाणून घेत शेतीला सुरुवात केली. शेतीमध्ये धडपडत एकेका अनुभवाने ते समृद्ध होत गेले.
पाटील यांच्याकडे दरवर्षी ३ एकरांपर्यंत ऊस पीक असते. को ८६०३२, को २६५ अशा या वाणाची पूर्वहंगामी लागवड केली जाते. एकरी ८० ते ८५ टनापर्यंत उत्पादन मिळते. शक्यतो खोडवा ठेवत नाही. मात्र ऊस पिकातून उत्पन्न हाती येण्यासाठी अठरा महिने लागतात. त्याला नियमित उत्पन्न देणाऱ्या कमी कालावधीच्या पिकांची जोड देण्याच्या उद्देशाने भाजीपाला पिकाकडे वळले. त्यात त्यांना तीस वर्षांपासून भाजीपाला शेतीमध्ये अनुभवी असलेल्या प्रताप पाटील (नात्याने मामा, राहणार कुरळूप) यांची मोठी मदत झाली. खरेतर वडिलांचे छत्र हरपल्यापासून त्यांचा आधार आणि मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले असल्याचे अभिजित सांगतात.
बाजारपेठेचा अभ्यास
सन २०१४ च्या दरम्यान, कारली पिकाला सुरुवात केली. त्यानंतर मार्केटमध्ये विक्रीही सुरू झाली. भाजीपाला पिकामध्ये दराची चढ-उतार ही मोठी समस्या असते. कधी दर चांगला भेटतो, तर कधी फारच कमी. अपेक्षित दर न मिळाल्यास शेतकरी त्या पिकापासून दुरावतो. ही बाब त्यांच्या लक्षात आली. बाजारपेठेचा अभ्यास करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. कोल्हापूर, मुंबई येथील बाजारपेठेमध्ये सातत्याने जात तिथे कोणत्या हंगामात कारल्याची आवक कमी राहते. कोणत्या काळात दर काय असतात, याची माहिती घेणे सुरू केले. त्यावरून लागवडीचे नियोजन केले. सुरुवातीला कारले पिकच घेतले जायचे.
बाजारपेठेतील विविध पिकांची आवक आणि दराचा पुरेपूर अभ्यास झाला होता. मग एकाच प्रकारच्या पिकावर अवलंबून राहण्यापेक्षा पिकांची फेरपालट करण्याचा निर्णय घेतला. कोबी, टोमॅटो, मिरची आणि पडवळ या पिकांची लागवड सुरू केली. ही पिकेदेखील आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू लागली. सोबतच पिकाच्या फेरपालटीचा फायदा मातीचे आरोग्य सांभाळण्यासाठीही होतो. उत्पादन दर्जेदार येण्यासाठी जमिनीचा सेंद्रिय कर्ब अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे त्यांनी शेतामध्ये शेणखताचा वापर, उसाचे पाचट कुजवणे यावर भर दिला.
...असे असते पिकाचे नियोजन
वर्षातून एकदा कारले, पडवळ ही पिके घेतली जातात. या दोन्ही पिकांची लागवड सामान्यतः एप्रिल महिन्यामध्ये केली जाते. त्याचे उत्पादन ऑगस्टपासून सप्टेंबर महिन्यांपर्यंत चालते.
कारले आणि पडवळ पिकासाठी पॉली मल्चिंग व बेड पद्धतीने लागवडीवर भर. मांडव केला जातो.
कारले पिकात दोन ओळीतील अंतर चाडेचार ते पाच फूट, रोपांमध्ये अडीच ते तीन फूट ठेवले जाते. तर पडवळामध्ये दोन ओळींतील अंतर पाच ते साडेपाच फूट, रोपातील अंतर दहा फूट ठेवले जाते.
दोन वर्षांतून दराचा अंदाज घेऊन एकदा मिरची पिकाचे नियोजन केले जाते.
ऊस पिकामध्ये आंतरपीक म्हणून सुमारे एकरभर कोबी पीक घेतले जाते. कोबीचा उत्पादन खर्च ६० ते ७० हजार रुपये होतो.
ठिबक आणि त्याद्वारे विद्राव्य खतांचा वापर यामुळे पाणी बचतीबरोबरच गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळते.
रोपवाटिकेतून आपल्याला हव्या त्या संकरीत जातीची रोपे तयार करून घेतात. ८० पैसे ते एक रुपया प्रति रोप प्रमाणे रोपे मिळतात. या नव्या संकरित जातींची उत्पादनक्षमता चांगली असल्यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होते.
अधिक उत्पादन घेतानाच त्याचा दर्जा टिकून राहील आणि जास्तीत जास्त ‘ए ग्रेड’चे उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यामुळे बाजारामध्ये दर चांगला मिळण्यास मदत होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मालाचा उठाव लवकर होतो.
कारले व पडवळ या दोन्ही पिकाचा एकरी उत्पादन खर्च २ लाख रुपये इतका होतो. त्यातून दरातील चढ उतारानुसार खर्च वजा जाता तीन ते साडे तीन लाख रुपयांपर्यंत नफा हाती येतो.
पाटील यांची शेती व उत्पादकता
पीक क्षेत्र सरासरी एकरी उत्पादकता मिळणारा सरासरी दर
कारले ४० गुंठे २० ते २५ टन ३० ते ४० रुपये प्रति किलो
पडवळ ४० गुंठे ३० ते ३५ टन १५ ते ३० रुपये प्रति किलो
कोबी ४० गुंठे ३० टन ७ ते २० रुपये
प्रति किलो
ऊस ३ एकर ८० ते ८५ टन ३००० रुपये प्रति टन. (गतवर्षी)
ऊस पिकामध्ये आंतरपीक म्हणून कोबी घेत असल्यामुळे कोबी पिकातून ऊस लागवडीसह व्यवस्थापनाचा खर्च बऱ्यापैकी निघून येतो. उसातून येणारे ठोक रक्कम भांडवल म्हणून अन्य कामांसाठी वापरण्यास मिळते. कुटुंबाला ऊस व भाजीपाला पिकातून वार्षिक सरासरी १० लाखांपर्यंत उत्पन्न मिळते.
शेतीतून मिळणाऱ्या रकमेची खर्चनिहाय विभागणी
शेतीतील ठिबक, पंप, मोटार व अन्य साहित्याची खरेदी, देखभाल १० टक्के
शेतीतील अन्य कामे, मजुरी आणि खते २० टक्के
घरखर्चासाठी २० टक्के
आरोग्यासाठी ५ टक्के
करारावर भाजीपाला क्षेत्र व शेतीपूरक व्यवसाय वाढीचे नियोजन करत आहे. त्यासाठी ४० टक्के
कौटुंबिक शुभकार्यासाठी ५ टक्के
भाजीपाला पिकाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहून योग्य ते नियोजन करत असल्यामुळे फायदा हाती येत आहे. दरातील चढ-उतार हे तर येत राहणार, मात्र पीक आणि दर्जदार उत्पादनामध्ये सातत्य ठेवल्यामुळे बाजारामध्ये ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे दर मिळण्यास फायदा होतो. अर्थात, शेतीमध्ये अजून शिकतच आहे.
- अभिजित पाटील ९०११८०११९९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.