Natural Jaggery : नैसर्गिक पद्धतीच्या गुळाचा ‘राशी’ ब्रॅण्ड

नैसर्गिक पद्धतीने तयार केलेल्या गूळ, गूळ पावडर, काकवी आणि गुळाची साखर या सारख्या उत्पादनांचा ‘राशी’ नावाने ब्रॅण्ड विकसित करत कुरुल (ता. मोहोळ) येथील कृषी उद्योजक अमर लांडे यांनी आज राज्यासह परराज्यांतील काही नामवंत मॉलसह ऑानलाइन प्लॅटफॉर्मवर गुळाला ग्राहकांची पसंती मिळवली आहे.
Natural Jaggery
Natural JaggeryAgrowon
Published on
Updated on

सोलापूर जिल्ह्यात कामती बुद्रुक ते मोहोळ मार्गावर कुरुल येथे अमर लांडे यांची २५ ते ३० एकर शेती (Agriculture) आहे. सुमारे १५ एकरांत ऊस, १० एकर केळी, अन्य पिके आहेत. सुमारे एक एकरांत महामार्गालगतच गूळनिर्मिती प्रकल्प (Jaggery Production Project) उभारला आहे. अमर ‘बीकॅाम’चे पदवीधर आहेत. पूर्वीपासूनच त्यांना उद्योगामध्ये रस होता. घरचे वातावरणही तसेच आहे. वडील जालिंदर शेती पाहतच बांधकाम क्षेत्रातही कार्यरत आहेत. तर दोन्ही भाऊ सीताराम आणि प्रवीणही उद्योग क्षेत्रातच आहेत.

Natural Jaggery
Jaggery Rate : गूळदरासाठी कोल्हापुरात उत्पादक आक्रमक

त्यामुळे शिक्षणानंतर अमर यांनीही नोकरीसाठी प्रयत्न केले नाहीत. कायम उद्योगाचाच विचार करीत आले. सन २००४ मध्ये त्यांनी ‘जलकमल ऑरगॅनिक्स’ हा उद्योग थाटून ‘बायोडिझेल’ उत्पादन सुरू केले. अर्थात, त्या काळात त्यात विपणन व अन्य तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. पुढे निंबोळी खतप्रकल्प सुरू केला. हे व्यवसाय करतानाच त्यांना गूळनिर्मिती व्यवसायाची गोडी लागली. अलीकडील आठ-दहा वर्षांपासून ते पूर्णपणे या व्यवसायात असून, त्यात स्थिरावले देखील आहेत.

गूळ उद्योगाचा ‘टर्निंग पॅाइंट’

सन २००८-२००९ च्या दरम्यान मित्रांबरोबर अमर गुजरातच्या सहलीवर गेले होते. तेथे काही गूळभट्ट्या त्यांच्या पाहण्यात आल्या. तेव्हा त्यांना या व्यवसायाची कल्पना सुचली. आपल्याकडे मुबलक ऊस आहे. तो कारखान्याला पुरवण्यासाठी होणारी दमछाक आणि पुन्हा दरासाठी प्रतीक्षा, या अडचणी डोळ्यासमोर तरळल्या. त्यामुळे गूळ उद्योग अधिक आश्‍वासक वाटला. त्याचा अभ्यास सुरू केला. आणि पुढच्याच वर्षी २०१० मध्ये पूर्वीच्याच म्हणजेच ‘जलकमल ऑरगॅनिक्स’ याच नावाने शेतात छोटे गुऱ्हाळघर सुरू केले.

Natural Jaggery
Jaggery Market : कोल्हापुरात कर्नाटकी गुळाचे अतिक्रमण

गूळ मार्केट, दर हा अभ्यास सुरूच होता. सुट्या पद्धतीच्या गूळविक्रीऐवजी छोट्या पॅकमधील आणि नैसर्गिक पद्धतीने उत्पादित केलेल्या गुळाला चांगले ‘मार्केट’ मिळू शकते हे लक्षात आले. उद्योग विस्तारातील हाच ‘टर्निंग पॅाइंट’ ठरला.व्यवसाय वाढवायचा तर पाठबळ आवश्यक होते. अशावेळी मदतीला निवृत्त कॅप्टन प्रतापसिंह परदेशी पुढे आले. तेही आज यशस्वी शेती करीत आहेत. अमर यांना प्रत्येक कामात, निर्णयात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. किंबहुना, या व्यवसायाचे ते खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरले.

ऊसखरेदी व गाळप पद्धती

सुरुवातीला एकच छोटी भट्टी होती. दररोज जेमतेम दहा टनांपर्यंतचे ऊसगाळप व्हायचे. टप्प्याटप्प्याने त्याची क्षमता वाढवत आज ती ५० ते ७० टनांपर्यंत पोहोचली आहे. दरवर्षी हंगामात साखर कारखान्यांप्रमाणे शेतकऱ्यांकडून उसाच्या नोंदी घेतल्या जातात. ‘एफआरपी’ दर व तोही एक रकमी दिला जातो. कुरुल व परिसरात साखर कारखाने आहेत. परंतु अमर यांनी आपल्या प्रकल्पासाठी ऊस मिळवण्यासाठी स्वतंत्र प्रयत्न केले. त्यामुळे कुरुलसह परिसरातील १० ते १२ गावांमधून ३०० ते ४०० शेतकरी या गुऱ्हाळासाठी ऊस पुरवठा होतो. वर्षातील सहा महिन्यांपर्यंत हंगाम चालतो.

नैसर्गिक पद्धतीने उत्पादन

गूळ उद्योगात अनेक ठिकाणी रंग वा काही रासायनिक घटकांचा वापर केला जातो. पण अमर यांच्याकडे अशा कोणत्याही घटकाचा वापर होत नाही. उसाच्या रसापासूनच थेट गूळ तयार केला जातो. त्यामुळे त्याला विशिष्ट नैसर्गिक चव मिळते. शिवाय आरोग्यासाठीही तो अधिक फायदेशीर असतो.

आवक उसाचे योग्य पद्धतीने वजन आणि नोंदणी प्रक्रिया केली जाते. त्यानंतर थेट ‘क्रशिंग’ला तो घेतला जातो.

गाळप केलेला रस टाकीत साठवला जातो. त्यानंतर कढईत तो विशिष्ट तापमानापर्यंत तापवला जातो.

रस उकळणे व मळी काढणे ही प्रक्रिया दोन ते अडीच तास चालते. या प्रक्रियेदरम्यान काकवी तयार होते.

पुढे रसातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यानंतर गरम गूळ वाफ्यांमध्ये घेतला जातो. पाचशे ग्रॅम, एक किलो, पाच किलो आणि दहा किलो याप्रमाणे ढेपा तयार केल्या जातात.

पावडरही तयार केली जाते. योग्य प्रक्रिया पद्धतीनंतर ती यंत्राच्या साह्याने आकर्षक पॅकिंग केले जाते.

साखरेसाठी रस ‘क्रिस्टलायजर’मध्ये घेतला जातो. त्यात चांगला ढवळला जातो. तेथे साखरेचे खडे तयार होतात. ते यंत्राद्वारे वेगाने फिरवले जातात. त्यावर स्वच्छ पाण्याचा फवारा केल्यानंतर साखरेचे दाणे वेगळे होतात. त्यास पुसटसा पांढरा रंग मिळतो. हीच खांडसरी साखर (कच्ची साखर) आकर्षक पॅकिंगद्वारे विक्री केली जाते.

राशी ब्रॅण्डद्वारे विक्री साखळी

केवळ नैसर्गिक व दर्जेदार उत्पादन करणे महत्त्वाचे नव्हते. तर ‘मार्केटिंग’, ‘ब्रॅण्डिंग’ आणि आकर्षक पॅकिंगही तेवढेच महत्त्वाचे होते. त्यावरही नेमकेपणाने भर दिला. त्यादृष्टीने गुळाचा `राशी` हा ब्रॅण्ड तयार केला. ग्राहकांच्या मागणीनुसार ५०० ग्रॅम ते एक किलोपर्यंत विविध पॅकिंग सादर केली. आज रिलायन्स रिटेल, डीमार्ट यांसारख्या मॉलक्षेत्रातील, ऑनलाइन क्षेत्रातील’ आघाडीच्या कंपन्या व मुंबई, बंगळूर, पुणे आदी मोठ्या शहरांतील किरकोळ आणि घाऊक विक्रेत्यांकडे राशी ब्रॅण्डची सर्व उत्पादने विक्रीस उपलब्ध केली आहेत. त्यास ग्राहकांची पसंतीही आहे.

अमर लांडे ९८२२०२८८२४, ८६६८२६६०९१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com