Baby Corn Cultivation : जलसंधारणासह ‘बेबीकॉर्न’मध्ये नाव मिळवलेला ‘रानमळा’

पुणे जिल्ह्यात रानमळा (ता. राजगुरुनगर) या गावात लोकसहभाग, कृषी व वन विभागाच्या मदतीने जलसंधारणाची विविध कामे झाली. गाव दुष्काळमुक्त झाले. पीकबदल घडला. गावाने बेबी कॉर्न पिकात ओळख तयार केली.
Corn Crop
Corn CropAgrowon

Water Conservation Pune Story : पुणे जिल्ह्यात राजगुरुनगर (खेड) तालुक्यातील रानमळा गाव आहे. क्षेत्रफळ सुमारे ५०६ हेक्टर असून, वर्षाला सरासरी ९००- ९५० मिमी पाऊस पडतो. पूर्वी जलसंधारणाची (Watershed Management) कामे झाली नसल्याने ग्रामस्थांना दरवर्षी पाणीटंचाईला (Water Shortage) सामोरे जावे लागे.

शेती आणि पशुपालन (Animal Husbandry) हेच गावकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन होते. शेतीतील अर्थार्जन पुरेसे होत नसल्याने काही जण शहरात स्थलांतर करायचे.

परिस्थितीत घडवला बदल

गावातील परिस्थिती बदलण्यासाठी गावातील लोकांनीच पुढाकार घेतला. सन २००३-०४ च्या दरम्यान दौंदे बंधाऱ्यावरून साडेपाच किलोमीटरवरून पाइपलाइन करण्याचा निर्णय घेतला. हा उपक्रम यशस्वीदेखील झाला. लोकसहभागातून पुढे जलसंधारणाची विविध कामे झाली.

कृषी व वन विभागाने ३५ हेक्टरवर समतल चर आणि तळी, बांध, बंधारे बांधले. गावच्या पश्‍चिम व पूर्व बाजूने वाहणाऱ्या दोन्ही ओढ्यांवर सिंमेटचे चार बंधारे झाले.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाझर तलाव झाले. पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडविला गेल्याचीही किमया घडली आहे. यादवराव शिंदे, स्वाध्याय परिवार व लोकशक्तीतून गावाशेजारी निर्मल नीर नावाचे साठवणतळे निर्माण झाले आहे.

Corn Crop
Corn Market : जागतिक मका उत्पादन घटल्यानं दर चांगले

शाश्‍वत पाण्याची सुविधा

गावच्या १५८ हेक्टर क्षेत्रावर वनीकरण तर उर्वरित ४०८ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. ऊस, चारा, भाजीपाला, गहू अशी विविध पिकांची गावात विविधता आहे.

शेततळ्यांमुळे पीक-पाण्याची स्थिती चांगली आहे. अनेकांनी भाजीपाला पिकांत मल्चिंग पेपरचा व ठिबक सिंचनाचा वापर केल्यामुळे पाण्याची बचत झाली आहे. भूजल पातळीत वाढ झाली आहे. उन्हाळ्यात भासत असलेली पाणी टंचाई कमी झाली आहे.

बेबी कॉर्न झाले मुख्य पीक

बेबी कॉर्न हे गावचे मुख्य पीक झाले आहे. एकूण ७० ते ८० हेक्टरवर हे पीक असावे. तीन वेळा टप्प्याटप्प्याने लागवड केली जाते. त्यामुळे वर्षभर उत्पादन घेणे सोयीचे होते. मका हे जमिनीतून अधिक अन्नद्रव्ये घेणारे पीक म्हणून ओळखले जाते.

मात्र बेबी कॉर्नमुळे जमिनीतील घटक फार कमी होत नाहीत असा येथील शेतकऱ्यांचा अनुभव आहे. मात्र वर्षातून एक ते दोन वेळा काढणीनंतर शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. एकरी तीन ते चार टनांपर्यंत उत्पादन मिळते.

Corn Crop
Watershed Development : पाणलोट क्षेत्र विकासाचा बट्ट्याबोळ का झाला?

काढणी, विक्री

लागवडीनंतर दोन ते अडीच महिन्यांनी मक्याला छोट्या स्वरूपात कणसे येतात. ती मजुरांकरवी सकाळी काढून घेतली जातात. त्यानंतर गोण्यांमध्ये भरून एका ठिकाणी संकलित केली जातात. खासगी कंपनी किंवा व्यापाऱ्यांना जागेवरच विक्री होते.

काही शेतकरी वाहनांमधून ती विक्रीसाठी पाठवतात. सध्या करार शेतीत प्रति किलो आठ रुपये दर निश्‍चित केला आहे. पंधरा ते वीस हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न चाराविक्रीतून मिळते. वर्षभर उत्पादन घेतल्यामुळे चाऱ्याचा हा फायदा होतो.

‘आत्मा’चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक दिनेश सावंत यांनी ‘विकेल ते पिकेल’ या अभियानामार्फत करार शेतीच्या माध्यमातून वर्षभर हमीभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. वर्षभरात या पिकातून गावात कोट्यवधीची उलाढाल होते.

अर्थकारण सुधारले

चाऱ्यामुळे गावात दुग्ध व्यवसायालाही चालना मिळाली. शेतकऱ्यांकडे दोनपासून ते १५ पर्यंत जनावरे आहेत. एकूण जनावरांची संख्या ४०० ते पाचशेपर्यंत असावी. दररोज दोन हजार ते तीन हजार लिटरपर्यंत दूध संकलन होते. त्यातून एक ते दीड लाख रुपयांची उलाढाल होते.

ग्रामस्थांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. अनेकांकडे चारचाकी वाहन, सुस्थितीतील चांगले घर असून, मुलांचे शिक्षणही चांगल्या ठिकाणी होत आहे.

Corn Crop
Water Management : वनस्पतींकडून शिकले पाहिजे पाण्याचे व्यवस्थापन

शासनाने घेतली दखल

सुमारे १५३ हेक्टरवर दीड लाखाहून अधिक वृक्षारोपण होऊन ८७ टक्के झाडे जगविण्यात आली आहेत. यात आनंद वृक्ष, शुभारंभ वृक्ष, माहेरची झाडी, स्मृती वृक्ष, अतिथी वृक्ष अशा नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात आल्या.

या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने रानमळा पॅटर्न वृक्ष लागवडीसाठी स्वीकारून या नावे दोन ‘जीआर’ प्रसिद्ध करून राज्यात राबविण्याचे निश्‍चित केले. देशपातळीवरही हा ‘पॅटर्न’ पोहोचला आहे. ग्रामपंचायतीला आयएसओ २००८ मानांकन प्राप्त झाले आहे.

रानमळा पॅटर्नचे जनक कै.. पी. टी. शिंदे यांच्यासह गावकऱ्यांनी केलेल्या अथक परिश्रमांचे हे सारे फळ आहे. आदर्श गाव समितीचे पोपटराव पवार यांच्यासह प्रधान सचिव, प्रधान वन संरक्षक आदी वरिष्ठ पदांवरील अधिकाऱ्यांनी गावाला भेट देत कार्याचे कौतुक केले आहे.

गावात झालेली जलसंधारणाची कामे

खोल समतल सलग चर --- ३५ हेक्टर

माती नाला बांध -- २८

सिमेंट काँक्रीट बंधारे -- ४

मजगीकरण -- १५ हेक्टर

लूज बॉर्डर -- १८०

मिळालेले पुरस्कार :

-संत तुकाराम वनग्राम

- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छग्राम

- निर्मलग्राम

- वनश्री

- महात्मा गांधी तंटामुक्त गाव

- व्यसनमुक्ती ग्राम

- पर्यावरण समृद्धग्राम

Corn Crop
Maize Research Center : मका, आले संशोधन केंद्राचे प्रस्ताव अधांतरीच?
जलसंधारणाच्या कामांमधून गावातील जिरायती शेती ओलिताखाली आली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली. शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोगांकडे वाटचाल सुरू केली आहे.
प्रमोद शिंदे, सरंपच, ९९२१९८९८१५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com