Tur Processing Industry : शेतकरी कंपनीची डाळ उद्योगात गगन भरारी

वर्धा जिल्ह्यातील पर्णनेत्र शेतकरी कंपनीने स्वयंचलित पध्दतीचा प्रकल्प उभारून तूरडाळ निर्मिती केली आहे. शेतकऱ्यांनी उभारलेला असा हा विदर्भ किंवा राज्यातील पहिला प्रकल्प असावा. देशभरातील खरेदीदारांशी संपर्क करून देशातील मोठ्या बाजारपेठा मिळविण्याकडे कंपनीने आश्‍वासक वाटचाल सुरू केली आहे.
Tur Processing Industry
Tur Processing IndustryAgrowon
Published on
Updated on

Farmers Company Industry : विदर्भातील वातावरण तुरीला पोषक असल्याने या भागातील तुरीला विशिष्ट चव असते. त्यामुळे त्यास मागणी अधिक राहते. हे लक्षात घेऊन वर्धा जिल्ह्यातील तळेगाव (शामजीपंत) (ता. आष्टी) भागातील शेतकरी एकत्र आले. त्यांनी तुरीवर प्रक्रिया व डाळ तयार करून त्यास मोठी बाजारपेठ देण्याचे उद्दिष्ट ठेवले.

त्यातून पर्णनेत्र शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना २०१७ मध्ये झाली. कंपनीचे अध्यक्ष दिलीप निंभोरकर यांनी कृषी विभागातून स्वेच्छा निवृत्ती घेत पूर्णवेळ कंपनीला देण्याचे ठरविले.

संचालक म्हणून सुधा सुभाष चिकटे, प्रवीण दिलीप निंभोरकर, विक्रांत सुधाकर सालोडे, पुरुषोत्तम आत्माराम कडू आदींची साथ मिळाली. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मेकॅनिकल इंजिनिअर असलेले महेंद्र प्रल्हादराव टेकाडे यांनी जबाबदारी सांभाळली.

स्वयंचलित पध्दतीचा उद्योग

कंपनीच्या समभागाची किंमत १० रुपये असून ५२५ भागधारक आहेत. भागभांडवल ३० लाख ७२ हजार ७४० रुपये आहे.

राज्यात मिनी डाळमिल उद्योग आहेत. मात्र देशातील मोठ्या बाजारपेठा वा कंपन्यांसोबत व्यापार करायचा तर आपला उद्योगही तसाच हवा असा विचार कंपनीच्या संचालकांनी केला.

त्यातून स्वयंचलित, अत्याधुनिक पध्दतीच्या प्लांटची उभारणी झाली. दिलीप निंभोरकर यांनी ३० वर्षाच्या भाडेतत्वावर उद्योगासाठी जागा दिली.

Tur Processing Industry
शेतकरी उत्पादन कंपनी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू

असा आहे स्वयंचलित प्लॅंट

-तूर टॅंकमध्ये आणून टाकणे व पॅकिंग आदी अपवाद वगळता प्लांटचे संपूर्णपणे ऑटोमेशन. केवळ तीन कामगारांची आवश्‍यकता. शेतकरी कंपनीकडून उभारलेला विदर्भातील किंवा राज्यातील हा पहिलाच प्रकल्प असावा.

-प्रक्रिया क्षमता प्रति तासाला दोन टन.

-टॅंकमधून तूर उचलणे, योग्य जागी ती ‘अनलोड’ करणे यासाठी मुख्य डाळमिलसाठी १५ तर पाच एलीव्हेटर्स या ‘कलर सॉर्टिंग’ कामांसाठी.

-ग्रेडर सेपरेटर, सॉर्टेक्स आदींचीही सुविधा.

-तूर पसरून वळविण्याची पारंपरिक पध्दत न वापरता दोन ड्रायर्सचा वापर. शेतकऱ्यांकडून घेतल्यानंतर तुरीतील ओलावा काढून ठरावीक प्रमाणात तो ठेवण्यासाठी पहिल्या ड्रायरचा वापर. तूर प्रक्रियेच्या अंतिम स्थितीत (तेलपाणी केल्यानंतर) दुसऱ्या ड्रायरचा वापर.

-सॉर्टेक्स यंत्रणेद्वारे शिल्लक साल व हिरवा दाणा वेगळे करण्याचे कार्य होते.

-पोखरा प्रकल्पातील तरतुदीनुसार प्रकल्पाची किंमत ९७ लाख ५० हजार रुपये. मात्र

कंपनीने सॉर्टेक्स व अन्य यंत्रणा अधिकची बसविल्याने ही किंमत एक कोटी ७२ लाखांवर पोचली. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोखरा) मधून ५६ लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

-पर्णनेत्र कंपनीच्या भागधारकांपैकी ८० टक्‍के तूर उत्पादक. त्यांच्याकडून खरेदी.

आष्टी बाजार समितीचा शेतमाल खरेदी परवानाही कंपनीने घेतला आहे. आष्टी गाव कंपनीच्या प्रक्रिया उद्योगापासून १२ किलोमीटरवर. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक, अडतीवरील खर्च वाचतो.

Tur Processing Industry
उमरेड येथील महिलांनी स्थापन केली शेतकरी कंपनी

तूरडाळीची विक्री

कोलकता आणि हैदराबाद या डाळींच्या मोठ्या बाजारपेठा आहेत. तेथील घाऊक खरेदीदार व देशभरातील मध्यस्थांशी संपर्क करून त्यांना ५० ग्रॅम नमुना देत मोठ्या कंपन्यांना विक्रीचे प्रयत्न आहेत. आरोग्याप्रति जागरूकता वाढल्याने नॉन पॉलीश डाळीला मागणी अधिक आहे. त्याची किंमत पॉलीश डाळीपेक्षा किलोला ५ ते ७ रुपये अधिक राहते. शिवाय विविध प्रदर्शनांमधूनही विक्री केली आहे. तळेगाव व अमरावती येथे कंपनीची आऊटलेटस आहेत.

नोव्हेंबर २०२२ पासून कंपनीने उद्योगाची सुरवात केली. आजवर ५० टन डाळीची विक्री करण्यात आली. ‘नॉन सॉर्टेक्स डाळ ९६ रुपये तर ही यंत्रणा बसविल्यानंतर तिची विक्री १०५ ते १०७ रुपये प्रति किलो दराने विकली आहे. बाजारातील कच्च्या तुरीच्या दरांत चढउतार झाल्यास डाळींच्यां दरावर परिणाम होतो.

ट्रेडमार्क नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर एक, पाच आणि तीस किलो पॅकिंगमधून प्रकृती ब्रॅण्डनेमने लवकरच डाळ विक्री सुरू होणार आहे. फटका (ग्रेड क्र. १- डाळीचे समान तुकडे व उत्तम गुणवत्ता) तर सव्वा नंबर ( ग्रेड २) असे डाळीचे वर्गीकरण केले जाते.

चुरीचे पशुखाद्य

डाळ प्रक्रियेतून चुरीसारखे उपपदार्थ तयार होतात. त्यास पशुखाद्य किंवा त्याच्या निर्मितीसाठी कच्चा माल म्हणून मागणी असते. खरेदीदार शोधून त्यांना २० ते २२ रुपये प्रति किलो दराने आजपर्यंत १० टनांपर्यंत विक्री केली आहे. पारदर्शी पद्धतीतून कंपनीने अवघ्या तीन महिन्यात एकूण विक्रीतून ५० लाख रुपयांच्या उलाढालीचा टप्पा गाठला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

कंपनीची दूरदृष्टी, व्यावसायिक स्तरावरील प्रकल्प व कामकाज याबाबत समाधान व्यक्त करून वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कंपनीचे कौतुक केले आहे. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर, आर्वीचे तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी सांगळे यांचेही प्रकल्प उभारणीत सहकार्य आणि मार्गदर्शन मिळाले आहे.

महेंद्र टेकाडे- ९८५०२०००३१ (मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘पर्णनेत्र’ कंपनी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com