पुणे -सासवड रस्त्यावर दिवे (ता. पुरंदर) हे साडेसात हजार लोकसंख्येचे गाव आहे. हा पट्टा अंजीर (Fig Production) आणि सीताफळसाठी (Custard Apple) प्रसिद्ध आहे. येथील कृषी पदवीधर सुशील झेडे यांची शेती आहे. फळांवर आधारित पल्प व स्लाइस (Fruit Pulp Slice Production) या पदार्थांना बाजारपेठेत असलेली संधी त्यांनी अभ्यासली. मित्र अक्षय कामठे यांना सोबतीला घेत हाच प्रक्रिया उद्योग (Food Processing Industry) सुरू करण्याचा निर्णय २०१९ मध्ये घेतला. भांडवल किती लागेल यांचा अंदाज नव्हता. अशावेळी कृषी संचालक दिलीप झेंडे, तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव यांनी मार्गदर्शन केले. घरच्यांनी पाठबळ दिले.
उद्योगाची उभारणी
गावात मोठ्या प्रमाणात फळबाग क्षेत्र असल्याने अनेक वेळा दर पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. हाच माल ‘कोल्ड स्टोअरेज’मध्ये असता किंवा त्यावर प्रक्रिया केल्यास भविष्यात त्यास चांगला दर मिळणे शक्य होते. हाच उद्देश सुशील यांच्या उद्योगातून साध्य होणार होता. सुरुवातीला दोघा मित्रांनी प्रत्येकी ती ते चार लाखांची तजवीज केली. तीन गुंठे क्षेत्रावर पत्र्याचे शेड उभारले. उद्योगासाठी लागणारे ‘हार्डनर’, पल्पर, वेईंग मशिन, पॅकिंग आदी सामग्रीची पुण्यातून खरेदी केली. त्यासाठी सुमारे सहा लाख रुपयांचा खर्च आला.
प्रतवारी व ‘कोल्ड स्टोअरेज’
दोघाही मित्रांकडे प्रत्येकी चार ते पाच एकर अंजीर, सीताफळ, पेरू फळबाग आहे. काढणी केल्यानंतर फळांची प्रतवारी होते. आपल्या बागेसह गावातील शेतकरी तसेच बाजार समितीतून विविध फळांची खरेदी केली जाते. वाहतूक क्रेटमधून केली जाते. त्यामुळे फळे खराब होण्याचे प्रमाण कमी होऊन चांगल्या प्रतीची फळे प्रक्रियेसाठी उपलब्ध होतात. सध्या भाडेतत्त्वावर शंभर टन क्षमतेचे कोल्ड स्टोअरेज घेतले आहे. त्यामुळे शेतमाल अधिक काळ टिकवून ठेवण्यास चांगली मदत होते. आता त्याची क्षमता कमी पडत असल्याने नव्याने ५० टन क्षमतेच्या ‘कोल्ड स्टोअरेज’ची उभारणी सुरू केली आहे.
प्रक्रिया निर्मिती
सीताफळ, आंबा, चिकू, पेरू, अंजीर, स्ट्रॉबेरी, जांभूळ, राजबेरी, मलबेरी, लिची आदी फळांसह स्वीट कॉर्न आदी मालावर प्रक्रिया केली जाते. मुख्यतः ‘पल्प आणि स्लाइस’ तयार केले जातात. प्लॅस्टिक पॅकिंग केल्यावर उणे ४० अंश सेल्सिअसला सात ते आठ तास ठेऊन ‘हार्डनिंग’ केले जाते. त्यानंतर तीस किलोच्या बॉक्समध्ये उणे २० अंश सेल्सिअसला ते साठवले जाते.
तयार केली विक्री व्यवस्था
सुशील म्हणाले, की आइस्क्रीम, ज्यूस बार व्यावसायिक, केटरर्स, यांच्याकडून उत्पादनांना मागणी असते. ही मागणी ‘क्रिएट’ करण्यासाठी आम्ही संबंधित व्यावसायिकांना प्रत्यक्ष भेटलो. काहींना ई मेलद्वारे संपर्क केले. इंटरनेटवरील माध्यमांचा आधार घेतला. आज मुंबई, पुणे यासह कर्नाटक, इंदूर, नगर, नाशिक आदी विविध ठिकाणाहून फ्रोझन केलेल्या मालाला मागणी आहे. त्यानुसार एक किलो, पाच किलो, दहा किलो पॅकिगमधून पुरवठा होतो. ऑर्गेनोबाइट फ्रोझन फूड्स असे कंपनीचे नामकरण केले आहे. आवश्यक ते सर्व परवाने घेतले आहेत. सुशील ‘मार्केटिंग’ तर अक्षय उत्पादनाची जबाबदारी सांभाळतात.
उलाढाल
उत्पादनांचे दर शेतीमालनिहाय वेगवेगळे आहेत. तरीही प्रति किलो १०० रुपयांपासून १३०, १६० रुपये अशी त्याची ‘रेंज’ आहे. व्यवसायाच्या पहिल्या वर्षी एकूण १५ टनांची विक्री केली. त्यातून १५ लाखांच्या दरम्यान उलाढाल झाली. दुसऱ्या वर्षी यात चांगलीच वाढ झाली असून २२ टंनाची विक्री झाली. तिसऱ्या वर्षी जवळपास ४० टन मालाची विक्री झाली असून ४३ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. सुमारे १० ते १५ टक्के नफा मिळत आहे.
मागणी मोठी
सुशील म्हणाले, की तीन वर्षांत आम्ही व्यवसायाची चांगली ‘ग्रोथ’ पकडली आहे. सध्या एका ‘व्हेंडर’कडून ७० टन पल्पची तर अन्य एका ठिकाणाहून महिन्याला सात टन चिकू पल्पची मागणी आहे. बाजारपेठेची मागणी व संधी मोठी आहे. येत्या काही वर्षांत उलाढाल अजून वाढवण्याचा आमचा प्रयत्न राहील.
स्थानिकांना मिळाला रोजगार या उद्योगामुळे गाव परिसरातील तरुण व महिलांना रोजगार मिळण्यास मदत झाली आहे. सध्या सुमारे १५ ते २० व्यक्ती येथे कार्यरत असून यात १० महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. महिलांना दररोज ३०० रुपये तर पुरुषांना ५०० रुपये मेहनताना दिला जातो. त्यामुळे कुटुंब चालवण्यासाठी चांगला हातभार लागला आहे.
सुशील झेंडे, ९६८९५२९९२१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.