Agriculture Cold Storage : खरेदी, प्रतवारी ते एक हजार टन क्षमतेचे शीतगृह

Cold Storage Update : आखाती देशांसह जागतिक बाजारपेठेत भारतीय निर्यातक्षम केळ्यांना मागणी वाढली आहे. ही संधी ओळखून सोलापूर जिल्ह्यातील कंदर येथील रंगनाथ शिंदे यांनी केळी खरेदी, हाताळणी, प्रतवारी व साठवणूक या अनुषंगाने एक हजार टन क्षमतेची शीतगृह (कोल्ड स्टोअरेज) यंत्रणा उभारली आहे.
Agriculture Cold Storage
Agriculture Cold Storage Agrowon
Published on
Updated on

Success Story : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या ‘बॅकवॅाटर’ लाभक्षेत्रात कंदर गाव (ता. करमाळा) येते. केळी लागवडीसाठी राज्यातील हा प्रसिद्ध पट्टा आहे. येथील रंगनाथ शिंदे यांचा ‘आरएस कोल्डस्टोरेज’ हा ‘स्टार्टअप’ आता नावारूपाला येऊ घातला आहे. शिंदे यांची वाटचाल अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून झाली. ते केवळ चार महिन्यांचे असताना वडिलांचे अकस्मात निधन झाले.

आजोबांनीच मग त्यांचा सांभाळ केला. शेती केवळ तीन एकर होती. जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर रंगनाथ यांच्याच खांद्यावर शेतीची जबाबदारी पडली. त्या वेळी ऊस, केळी अशी पिके शेतात होती. शेतीचा अनुभव वाढू लागला तसा एखाद्या पूरक व्यवसायाचाही आधार असावा म्हणून ते केळी खरेदी व्यवसायात उतरले. त्यातून शेतकऱ्यांसह छोट्या-मोठ्या केळी व्यापाऱ्यांशी संपर्क वाढला. निर्यातदार कंपन्यांसोबत चांगले संबंध निर्माण झाले. अल्पावधीतच केळीचे व्यापारी म्हणून लौकिक मिळवला. शेतकऱ्यांप्रति कायम मदतीची भावना ठेवताना चोख व्यवहारामुळे विश्‍वासार्हताही मिळवली.

शीतगृह यंत्रणेचे आव्हान पेलले

म्हणता म्हणता रंगनाथ यांचा केळी व्यवसायात दहा वर्षांचा अनुभव तयार होऊन कौशल्यही वाढीस लागले होते. त्या आधारे व्यवसायाचे विस्तारीकरण करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू झाले. आतापर्यंत देशांतर्गत बाजारपेठेवरच सर्व लक्ष केंद्रित केले होते. पण भारतातून परदेशात विशेषतः आखाती देशांमध्ये केळीच्या निर्यातीला मोठी चालना मिळाली होती. भारतातील निर्यातदार कंपन्याहीव्यावसायिकांकडून केळी घेण्यास उत्सुक होत्या. या संधीचा फायदा उठवण्याचे रंगनाथ यांनी ठरवले.

पण त्यासाठी निर्यातक्षम केळीची शेतकऱ्यांकडून खरेदी करणे, या केळीची स्वच्छता, प्रतवारी, प्रीकूलिंग व पुढे बॉक्स पॅकिंगद्वारे कोल्ड स्टोअरेजमध्ये (शीतगृह) केळी ठेवणे अशी संपूर्ण यंत्रणा उभारणे गरजेचे होते. पण धडाडी व हिंमत बाळगून असलेल्या रंगनाथ यांनी हे आव्हान पेलण्याचे ठरवले. परिसरातील केळी बागायतदारांची संख्या, क्षेत्र, निर्यातदार कंपन्यांची गरज या सर्व बाबींचा विचार केला. त्यातून सन २०२३ मध्ये एकहजार टन क्षमतेचे स्वतःचे कोल्ड स्टोअरेज उभे करण्यात त्यांना यश मिळाले. अनेक दिवसांपासून उराशी बाळगलेले स्वप्न सत्यात अवतरले.

Agriculture Cold Storage
Cold Storage Subsidy : ‘एकात्मिक’मधून मिळणार शीतगृहासाठी अनुदान

व्यवसायातील पहिला टप्पा

रंगनाथ यांचे सुमारे ४०० ते ५०० केळी उत्पादकांसोबत ‘नेटवर्क’ तयार झाले आहे. त्यातूनच कंदरसह शेटफळ, वांगी, वाशिंबे, केम, चिखलठाण आदी भागातील शेतकरी त्यांना केळीचा पुरवठा करतात. स्वतः प्रतिकूल परिस्थितीतून आल्याची जाणीव ठेवून एक-दोन रुपये नफा कमी मिळू दे, पण व्यवहार पारदर्शक करण्यावर रंगनाथ यांचा भर असतो.

केवळ केळीची खरेदीच नाही तर केळीच्या व्यवस्थापनावरही त्यांचे लक्ष असते. त्यातील ‘फ्रूटकेअर’ हा महत्त्वाचा भाग आहे. रंगनाथ त्यासाठी मोफत व्यवस्थापन सेवा- सुविधा देतात. काही व्यक्तींची नेमणूक करून त्यांच्याकरवी संबंधित शेतकऱ्यांना फ्रूटकेअर संबंधी मार्गदर्शन केले जाते. प्रति किलो १६, २०, २४ रुपयांपासून ते ३० रुपयांपर्यंतचे दरही केळी उत्पादकांना खरेदीच्या माध्यमातून दिल्याचे शिंदे सांगतात.

Agriculture Cold Storage
Cold Storage : ड्रायव्हर ते ‘फ्रूट कंपनी’चा मालक

यंत्रणेतील पुढचा टप्पा

केळीच्या खरेदीनंतर स्वच्छ धुणे, प्रतवारी अशी प्रक्रिया पार पाडली जाते. त्यानंतर केळीचे तापमान विशिष्ट मर्यादेत येण्यासाठी ती प्रीकूलिंग विभागात ठेवली जातात. शिंदे यांच्याकडे शंभर टन क्षमतेचे प्रीकूलिंग युनिट आहे.

आवश्यक तापमान नियंत्रित करून मग केळी कोल्ड स्टोअरेजमध्ये पाठवली जातात. त्याची एकूण साठवणूक क्षमता एक हजार टनाची आहे. त्यात पाच ‘कोल्डरूम्स’ (शीतकक्ष) आहेत. या विभागणीमुळे केळीच्या आवकेनुसार त्या त्या कक्षेत साठवणूक केली जाते. साधारण प्रत्येकी आठ-दहा दिवसांनी एक ‘लॉट’ बाहेर पडतो.

पुरवठा व विक्री पद्धती

गुजरात तसेच देशातील पाच-सहा कंपन्यांना रंगनाथ निर्यातक्षम केळींचा पुरवठा करतातच. काही निर्यातदार कंपन्यांनाही प्रति किलो एक रुपया याप्रमाणे भाडेतत्त्वावर या शीतगृहाची सुविधाही वापरतात. हा ‘स्टार्टअप’ कंदर परिसरातील शेतकऱ्यांसह निर्यातदार कंपन्यांसाठीही लाभदायक ठरला आहे.

साठवणुकीची उत्तम सुविधा तयार झाल्याने शेतकऱ्यांना चांगले दर मिळू लागले आहेत. कंपन्यांकडून खरेदी झालेली केळी पुढे इराक, इराण, ओमान, अफगाणिस्तान आदी देशात रवाना होतात. मुख्यतः ‘उजनी’ च्या बॅकवॅाटरमुळे पाण्याची मुबलक उपलब्धता, या भागातील पोषक वातावरणामुळे येथील केळीला वेगळीच चव आहे,

रोजगार निर्मिती

कंद पट्ट्यातील अनेक गावांत केळीचे क्षेत्र वाढल्याने शेतमजूर, पर्यवेक्षक यांच्या रूपाने अनेकांच्या हाताला काम मिळाले आहे. रंगनाथ यांनी काही निर्यातविषयक कंपन्यांशी चर्चा करून काही स्थानिक युवकांना प्रशिक्षण देण्याची विनंती केली. त्यातून या भागात अनेक युवकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या. शिंदे यांच्याकडेच सुमारे शंभर व्यक्तींना रोजगार मिळाला आहे.

रंगनाथ शिंदे ९७३०२६८३७२

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com