ज्वारी, बाजरी, नाचणीचे पीठ, पोहे व कुकीज

चारे (जि. सोलापूर) येथील शंतनू पाटील या अभियंता युवकाने ज्वारी, बाजरी व नाचणीपासून पीठ, रवा, पोहे व चविष्ट कुकीज अशा आरोग्यदायी पदार्थांची निर्मिती सुरू केली आहे. विपणन व ‘प्रमोशन’ करीत दर्जेदार उत्पादनांचा ‘ऑल सॉ ग्रेट’ ब्रॅण्ड विकसित करून राज्याच्या विविध भागांत बाजारपेठही मिळविण्यास सुरुवात केली आहे.
Food Processing
Food ProcessingAgrowon

सोलापूर जिल्ह्यात बार्शी शहरापासून दीड-दोन किलोमीटरवर आगळगाव रस्त्यावर गाताचीवाडी येथे शंतनू पाटील (Shantanu Patil) यांनी भरडधान्यांपासून (Coarse Cereals) मूल्यवर्धित उत्पादने (Value Added Products) तयार करण्याचा प्रकल्प उभारला आहे. शंतनू यांचे मूळगाव चारे. आपल्या शेतात दहा एकर ज्वारी, १० एकर ऊस तर प्रत्येकी पाच एकरांत ते सोयाबीन (Soybean) व हळद (Turmeric) घेतात. शंतनू यांना पहिल्यापासूनच पर्यावरण, शेती विषयाची आवड होती. त्यांनी पर्यावरण अभियांत्रिकी विषयात ‘बीई’ची पदवी घेतली. त्यानंतर २०१५ मध्ये ‘एन्व्हायर्न्मेंटल एन्टरप्रिनरशिप’चा स्कॉटलंड येथे एक वर्षाचा अनुभव घेतला. तेथे अन्न प्रक्रिया (Food Processing), उद्योगातील बारकावे घेतले. त्यानंतर यातच करिअर करायचे ठरवले. प्रक्रियेसाठी नक्की काय निवडावं हे अजून ठरायचं होतं. मग काही प्रकल्पांना भेटी दिल्या. पुणे येथे काही खासगी कंपन्यांमध्ये ‘मार्केटिंग’चं काम केले. बाजारपेठेतील संधी व ग्राहकांची आरोग्याप्रति वाढलेली जाणीव पाहता भरडधान्यांना महत्त्व येत असल्याचे लक्षात आले.

ज्वारी प्रक्रियेची निवड

भरडधान्यांमध्ये ज्वारीच समावेश होतो. एकट्या सोलापूर जिल्ह्यात सुमारे साडेसहा लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर ज्वारी (Jowar) घेतली जाते. त्यात मालदांडी (maldandi Jowar), दगडी आदी प्रकार आहेत. विशेषतः बार्शी भागातील शाळू अधिक प्रसिद्ध आहे. आरोग्याच्या दृष्टीने ज्वारीचे महत्त्वही वेगळे आहे. ती पचायला हलकी आणि पौष्टिक आहे. कच्चा माल म्हणून ज्वारीची मुबलक उपलब्धताही होणार होती. ज्वारीबरोबरच जोड म्हणून बाजरी आणि नाचणी उत्पादनांचाही समावेश केला.

उत्पादनांची निर्मिती

गाताचीवाडी येथे शंतनू यांच्या कुटुंबाची पूर्वी काही जागा होती. तेथेच मिलुप फूड्स (Milup Food's Startup) नावाने स्टार्टअप सुरू केला. शंतनू यांचे वडील संजय पाटील कृषी पदवीधर आहेत. आई संगीता गृहिणी आहेत. बहीण ऋतुजा आर्किटेक्ट तर शंतनू यांच्या पत्नी सौ. शुभांगी आहारतज्ज्ञ आहेत. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येकाच्या शिक्षणाचा, ज्ञानाचा, अनुभवाचा उपयोग प्रकल्पात झाला. ज्वारी, बाजरी व नाचणीपासून पीठ, रवा, पोहे, चिवडा, कुकीज, केक आदी पदार्थ तयार केले जातात. प्रकल्पात विविध उत्पादनांच्या निर्मितीसाठी म्हणजे बेकरी, रवा, पोहा, ‘प्रीमिक्स’ आदींसाठी स्वतंत्र यंत्रसामग्री आहे.

उत्पादनातील प्रक्रिया

  • थेट शेतकऱ्यांकडून ज्वारी, बाजरी आणि नाचणीची खरेदी होते. बाजारभावाप्रमाणे दर दिला जातो.

  • गरजेनुसार खुल्या बाजारातूनही कच्च्या मालाची खरेदी होते.

  • विशेषतः हंगामात धान्याची खरेदी करून ते गोदामात साठवून ठेवले जाते.

  • प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी क्लिनिंग, ग्रेडिंग मशिनच्या साह्याने स्वच्छता आणि प्रतवारी होते.

  • प्रति आठवडा ते महिना या काळात बाजारपेठेतील मागणीनुसार ८०० किलोपासून एक टन, दोन टनांपर्यंत उत्पादन घेतले जाते.

पॅकिंग, ब्रॅण्डिंग

उत्पादनांचे पॅकिंग आकर्षक केले आहे. कुकीजमध्ये ज्वारी- नारळ, नाचणी-वेलची अशी विविधता आहे. पॅकिंगवरील लेबलवर उत्पादनाचे आरोग्यदायी महत्त्व नेमक्या शब्दात मांडले आहे. २५० ग्रॅम, ५०० ग्रॅम आणि एक किलो असे पॅकिंग आहे.

दर पुढीलप्रमाणे

  • ज्वारी पीठ- ५० रुपये प्रति किलो

  • ज्वारी रवा- २५० ग्रॅम- ३५ रुपये.

  • नाचणी पीठ- ६० रुपये प्रति किलो. नाचणी रवा- २५० ग्रॅम- ४० रुपये

  • बाजरी पीठ- ६० रुपये व पोहे १६० रुपये प्रति किलो

  • कुकीज- २०० ग्रॅम- ७० रु.

विक्री व विपणन

उत्पादनांचे ब्रॅंडिंग व विक्री ‘ऑल सॉ ग्रेट’ नावाने केली जाते. बार्शी येथे मध्यवर्ती ठिकाणी त्याचे विशेष विक्री केंद्र सुरू केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी, उस्मानाबाद, तसेच पुणे येथे प्रभात रस्ता आदी ठिकाणी दुकानांमधून उत्पादने विक्रीस ठेवली आहेत. ठळक ब्रॅण्ड दशर्वणारे वाहन असून ते ‘डोअर टू डोअर’ फिरवले जाते. कृषी दर्शने आणि व लघू महोत्सवातून सहभाग घेण्यात येतो. कंपनीची वेबसाइटही तयार केली आहे. पूर्वी काही कंपन्यांना उत्पादने तयार करून त्यांची विक्री केली जायची. त्या वेळी उलाढाल कमी होती. मात्र स्वतःच्या ब्रॅंडने विक्री सुरू केल्यानंतर मागील ऑक्टोबर ते यंदाच्या मार्चपर्यंत सुमारे ३० लाख रुपयांची उलाढाल करण्यापर्यंत यश मिळाल्याचे शंतनू सांगतात. या उद्योगातून सुमारे सात ते नऊ जणांना रोजगार दिला आहे. यात निर्मिती, विक्री आदींसाठी स्वतंत्र व्यक्तींची नेमणूक केली आहे.

Food Processing
Food ProcessingAgrowon

प्रकल्पातील यंत्रांसह शंतनु पाटील

भांडवल

या प्रकल्पासाठी सुमारे तीन कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक अपेक्षित होती. केंद्र सरकारच्या योजनेतून सुमारे ५० लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. तर दोन कोटींपर्यंत कर्ज घ्यावे लागले.

ज्वारी, बाजरी, नाचणी आदी धान्याच्या पदार्थांचे आरोग्याच्या दृष्टीनं असणारे महत्त्व आपण अधिकाधिक जाणले पाहिजे. आम्ही त्याचा प्रसार करतो आहोत. या उत्पादनांना शहरी भागात सर्वाधिक मागणी आहे. त्यावर लक्ष दिले आहेच. पण मुळात ग्रामीण व शहरी अशा सर्व भागातूनच त्यांचा वापर वाढणे गरजेचे आहे.
शंतनू पाटील ९६०७०९३७३७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com