परभणी जिल्ह्यातील पेठ बाभळगाव (ता.पाथरी) येथील सेंद्रिय कृषिभूषण बाबासाहेब रनेर यांनी आरोग्यदायी अन्न निर्मितीचे ध्येय ठेवून सेंद्रिय - नैसर्गिक शेती पद्धती अंगीकारली आहे. दहा ड्रम थेअरी तंत्राने सेंद्रिय निविष्ठा. दशपर्णी अर्क निर्मिती, विविध सापळ्यांचा वापर, सेंद्रिय कर्ब वाढवणे, जमीन आरोग्य राखण्यावर भर आदी विविध प्रयत्नांमधून त्यांनी शेती विकसित करण्यास व जमिनीची उत्पादकता वाढविण्यास सुरुवात केली आहे. .परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यातील पेठ बाभळगाव (ता.पाथरी) येथे बाबासाहेब तातेराव रनेर आणि त्यांचे बंधू रामकिशन यांची मिळून पाच एकर शेती आहे. त्यांची शेती पूर्वी टाकळगव्हाण शिवारात होती. मात्र ती हलकी असल्याने बाभळगाव शिवारात भारी जमीन घेतली. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर बाबासाहेबांनी शेती सांभाळून शिवणकाम व्यवसाय सुरू केला. त्या वेळी घरची शेती बटईने देत असत. दरम्यान, रामकिशन बॅंकेच्या सेवेत रुजू झाले. त्यानंतर मात्र (२०१०) बाबासाहेबच शेतीची सर्व जबाबदारी पाहू लागले. सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्याकडे त्यांचा कल राहिला आहे. पाच एकरांपैकी तीन एकरांत ऊस आहे. दीड एकर क्षेत्र शंभर टक्के सेंद्रिय- नैसर्गिक शेतीला दिले आहे. त्यात खरिपात सोयाबीन, तूर तर रब्बीमध्ये हरभरा, ज्वारी ही पिके असतात. त्यात विविध प्रयोग केले जातात. अन्य शेतकऱ्यांसाठी हा प्लॉट मॉडेल फार्म ठरावा यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत..Organic Farming: पीक उत्पादन स्थिरतेमध्ये जैविक घटक बायोमिक्स महत्त्वाचे.तंत्रज्ञान प्रशिक्षणकृषी विभागातर्फे आयोजित प्रशिक्षणांमधून बाबासाहेबांनी सुधारित तंत्रज्ञान, वाण आदी ज्ञान अवगत केले आहे. कृषी विभाग- आत्मा अंतर्गत बाभळगाव येथे २०१२ मध्ये भरतेश्वर शेतकरी गट स्थापन झाला. बाबासाहेब सचीव असलेल्या या गटातील शेतकऱ्यांनी बनसारोळा (जि.धाराशिव) येथे अभ्यास सहल आयोजित केली. तेथे ‘बीबीएफ’ तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतले. गटामार्फत कृषी विभागाच्या योजनेंतर्गत घेतलेल्या बीबीएफ.यंत्राचा वापर गटातील सर्व शेतकरी करतात. गटामार्फत काकडीचेही उत्पादन घेण्यात आले. त्यातून तंत्रज्ञानाची गोडी अजून वाढली..बाबासाहेबांचे सेंद्रिय शेती व्यवस्थापनबहुतांश सर्व निविष्ठा आपल्या शेतावरच तयार करण्याचे तंत्र बाबासाहेबांनी अवगत केले आहे. निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, जिवामृत, बीजामृत, सप्तधान्य स्लरी, जिवाणू स्लरी आदी निविष्ठा ते तयार करतात. नाशिक-मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे घेतलेल्या प्रशिक्षणात दहा ड्रम तंत्रज्ञान ते शिकले. शेतावर त्याचे युनिट उभारले. त्यातील पाच ड्रममध्ये जमीन सुपीकता वाढीसाठी आवश्यक तर पाच ड्रममध्ये कीड- रोग नियंत्रणासाठी आवश्यक निविष्ठांची निर्मिती होते. यामध्ये अमिल (आले, मिरची, लसूण अर्क), वेमिल (वेखंडासह अन्य वनस्पती अर्क) आदींचा समावेश आहे..Organic Farming: सेंद्रिय शेतीस शासनाचे ठोस पाठबळ आवश्यक .घरगुती स्तरावर उत्पादन केल्याने रासायनिक निविष्ठांवरील अवलंबित्व व खर्चात ५० टक्के बचत झाली आहे. बांधावर गिरिपुष्पाची लागवड केली आहे. फुलोरा अवस्थेत अशी हिरवळीची पिके शेतात गाडली जातात. गरजेनुसार मोहरीसारखे सापळा पीक घेणे, हरभरा पिकात गंध सापळे. सौर ऊर्जेवरील सापळा, ट्रायकोकार्ड यांचा वापर केला आहे. पूर्वी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०. २ टक्का होते. आता ते ०.७५ टक्क्यांवर पोहोचल्याचा बाबासाहेबांचा दावा आहे. हरभऱ्याचे एकरी आठ क्विंटलपर्यंत तर सोयाबीनचे १५ क्विंटलपर्यंत उत्पादन साध्य केले आहे. बाबासाहेब आता सेंद्रिय निविष्ठा निर्मितीचे प्रशिक्षकही आहेत..ऊस लागवडपूर्वी उसाची ३.५ फुटी सरी अंतरावर लागवड होती. एकरी २० ते २५ टन उत्पादन मिळायचे. आता चार बाय दीड फूट अंतरावर लागवड होते. सुधारित व्यवस्थापनातून एकरी ६० ते ६५ टन उत्पादन मिळत आहे. हार्वेस्टरने तोड केल्याने पाचटाचा भुस्सा शेतात पडतो. त्याचे नैसर्गिक आच्छादन केले जाते. पाचट कुजविण्यासाठी वेस्ट डिकंपोजरचा वापर होतो. उसात आंतरपीक म्हणून हरभरा, गहू आदींची लागवड होते. यंदा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ज्वारी संशोधन केंद्राने विकसित केलेल्या सुपर दगडी ज्वारीची पेरणी केली आहे..Organic Sugarcane Farming: सेंद्रिय पद्धतीने वाढवली ऊस उत्पादकता .ऑक्सिजन पार्ककोरोना काळात ऑक्सिजनचे महत्त्व अजून अधोरेखित झाले. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून सघन लागवड पद्धतीने सुमारे ५२ प्रकारच्या वनस्पतींची लागवड बाबासाहेबांनी केली आहे. त्यात कडुनिंब, रुई, गुळवेल, सीताफळ, रामफळ, जांभूळ, आंबा (विविध ७ वाण), कढीपत्ता, गवती चहा, ड्रॅगन फ्रूट, शेवगा, अंजीर, पेरू, जास्वंद, कवठ, रक्तचंदन, नारळ, बांबू, कांचन, टणटणी, हादगा, आपटा कण्हेर अशी मिळून ३२५ ते ३५० झाडे आहेत. यातील काही वनस्पतींची पाने दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी वापरण्यात येतात..जैवइंधनाचा वापरजिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या योजनेतून सुधारित प्लॅस्टिक आधारित जैवइंधन निर्मिती यंत्रणा स्थापित केली आहे. या इंधनापासून स्वयंपाक तयार केला जातो. शेण- स्लरीचा वापर पिकांसाठी होते. गीर गाय आणि बैलजोडी आहे. बायोगॅस युनिटला त्यापासून शेण उपलब्ध होते.शेतकरी उत्पादक कंपनीकेंद्र शासनाच्या १० हजार शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना योजनेंतर्गत भरतेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन झाली आहे. त्याचे अध्यक्ष बाबासाहेब तर सचिव दीपक तायनाक आहेत. पाच गावांतील ३१४ शेतकरी सभासद आहेत. कंपनीतर्फे मल्चिंग आणि पशुआहार यावर काम केले जाते. धान्य स्वच्छता व प्रतवारी, डाळ गिरणी स्थापित केली आहे..कार्याचा सन्मान‘आत्मा’चे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण, तत्कालीन संचालक के. आर. सराफ तालुका कृषी अधिकारी गोविंद कोल्हे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे, कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ अमित तुपे आदींचे मार्गदर्शन मिळते. बाबासाहेबांना २०१८ मध्ये सेंद्रिय शेती कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अन्य पुरस्कारही मिळाले आहेत. लोणी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत रासायनिक अवशेषमुक्त भाजीपाला उत्पादनासाठी परसबाग विकसित करण्यासाठी त्यांनी मदत केली आहे. वृक्ष लागवड, स्वच्छता अभियान आदी सार्वजनिक कामांतही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. बाबासाहेबांना पत्नी उज्ज्वला यांची समर्थ साथ असून त्या उमेद अंतर्गत कार्य करतात.बाबासाहेब रनेर ९८९०३४२१३३.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.