Agricultural Development : नवतंत्रज्ञान, पीक वाण प्रसारातून ‘पंदेकृवि’ उभारतेय ‘मॉडेल व्हिलेज’!

Tech in Agriculture : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने लोकसहभाग आणि विविध शासकीय विभागांच्या सामूहिक प्रयत्नांतून अकरा जिल्ह्यात ‘मॉडेल व्हिलेज’ साकारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
Rural Development
Rural DevelopmentAgrowon
Published on
Updated on

Rural Development : विदर्भातील अकरा जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामार्फत प्रत्येक जिल्ह्यात एक गाव ‘मॉडेल व्हिलेज’ उपक्रमासाठी निवडण्यात आले आहे. या ठिकाणी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषी विभाग आणि विविध संलग्न संस्थांच्या माध्यमातून गावकऱ्यांसोबत थेट संपर्क करण्यात येत आहे. गावशिवारातील शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान, पीक वाण तसेच उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले जात आहे. याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. गावशिवारात सोयाबीन, तूर, कपाशी, भात या पिकांचे उत्पादन वाढू लागले आहे.

चेलका गाव विकासाच्या दिशेने...

डोंगरात वसलेले चेलका (ता. बार्शीटाकळी) हे दुर्गम गाव. अकोल्यापासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर हे गाव असूनही तेथे आजही पायाभूत सुविधांची वानवा आहे. मात्र आता या गावातील शेतकरी नवनवीन पिके, तंत्रज्ञानाचा वापर, कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यासाठी सरसावले आहेत. या गावात सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा, कांदा बीजोत्पादन तसेच विविध फळ पीकपद्धतीसाठी शेतकरी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान वापरत आहेत.यामुळे उत्पादनात चांगल्यापैकी वाढ दिसत आहे. तसेच उत्पादन खर्च कमी होण्यास सुरुवात झाली. आता मूल्यवर्धनातून ब्रॅण्डिंगच्या दिशेने काम सुरू आहे.

Rural Development
Agriculture Development : शेती, पूरक उद्योगाला मिळाली नवी दिशा

कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी ‘मॉडेल व्हिलेज’ची संकल्पना मांडल्यानंतर त्यावर आधी अभ्यास झाला. सर्वांगीण विचारातून एक निश्‍चित दिशा ठरवण्यात आली. अकोला जिल्ह्यातील चेलका हे गाव त्यासाठी निवडण्यात आले. चारशे लोकवस्तीच्या गावाला सुपीक जमीन आणि पाण्याची उपलब्धता आहे. शेतकरी आधीपासून पारंपारिक पिके घेत होते. गाव निवडीनंतर शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. गावाची गरज नेमकी काय आहे, हे जाणून घेत त्या स्वरूपाचे तंत्रज्ञान, पीक वाण गावात पोहोचविण्यास सुरुवात झाली. याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत.

वाण देताहेत उत्पन्न वाढीला साथ

चेलका गावात प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यापीठाचे विविध पीक वाण दिले जात आहेत. रब्बी हंगामात ‘पीकेव्ही सरदार’ या गव्हाच्या वाणाचे एकरी २० ते २२ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. विशेष म्हणजे खरिपात लागवड केलेल्या कपाशीच्या क्षेत्रात गव्हाची लागवड करण्यात आली आहे. वाऱ्यामुळे गव्हाचे पीक पडत नसल्याने उत्पादनावर कुठलाही परिणाम झाला नाही. अशाच पद्धतीने खरिपात पंदेकृवि निर्मित तुरीचा आश्‍लेषा, सोयाबीनचा सुवर्ण सोया, पीडीकेव्ही अंबा हे वाण उत्पादनवाढीला फायदेशीर दिसले. काही शेतकऱ्यांनी उडदाच्या पीकेव्ही गोल्ड या वाणाची कपाशीत आंतरपीक म्हणून लागवड केली. याचे एकरी चार क्विंटल उत्पादन मिळाले.

उत्पादन खर्च कमी करण्याचे प्रयत्न

तीन वर्षांत ‘मॉडेल व्हिलेज’ घडविण्याच्या उद्देशाने निवड केलेल्या गावात शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यादृष्टीने शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत विद्यापीठ विकसित तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करीत आहेत. सोबतच शेतकऱ्यांना नवीन पीक वाण दिले जात आहेत. उत्पादित शेतीमालावर प्रक्रिया करून ब्रॅण्डिंग करण्यासाठी तयारी सुरू झाली आहे.

Rural Development
Agriculture Development : प्रकल्प, योजनांद्वारे कृषीक्षेत्र विकासाला चालना

चेलका गावाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संपूर्ण तंत्रज्ञान अंगीकारत नवीन वाण, कृषी निविष्ठांचा वापर सुरू केला. अकोला जिल्ह्यात या प्रकल्पासाठी कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, मुख्य शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. उमेश चिंचमालातपुरे, विस्तार कृषी विद्यावेत्ता प्रा. प्रकाश घाटोळ आणि त्यांच्या सहकारी तज्ज्ञांनी पुढाकार घेतला आहे.

सर्वांच्या साथीने ‘मॉडेल व्हिलेज’

समृद्ध शेती आणि आर्थिक संपन्न शेतकरी हाच विद्यापीठाचा ध्यास आहे. सर्वसंपन्न ग्रामविकासासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासोबतच संबंधित शासकीय, निमशासकीय विभाग, सहकारी, सेवाभावी आर्थिक संस्थांच्या एकात्मिक प्रयत्नांनी हे साध्य होणार आहे. विद्यापीठाद्वारे विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातून अविकसित, दुर्गम, कमी लोकसंख्या असलेल्या एका गावाची निवड करुन चारसूत्री पद्धतीने तीन वर्षांत गावकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. विद्यापीठाचे तांत्रिक पाठबळ आणि ग्रामस्थांची विकासाची तळमळ यातूनच ‘मॉडेल व्हिलेज’ संकल्पना साकारत आहे.
डॉ. शरद गडाख, कुलगुरू

उत्पन्नात हमखास वाढ

कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या संकल्पनेतून विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये साकारत असलेल्या ‘मॉडेल व्हिलेज’ या निवडक गावामध्ये विद्यापीठातील शास्त्रज्ञांसोबत कृषी विभाग आणि संलग्न विभागातील अधिकारी काम करत आहेत. शासकीय योजनांच्या मदतीने शेतकऱ्यांनी आत्मसात केलेले नवे उत्पादन खर्च कमी करणारे तंत्र, त्याप्रमाणे उत्पादित शेतीमालाच्या मूल्यवर्धनामुळे निश्‍चितपणे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात हमखास वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
डॉ. धनराज उंदीरवाडे, संचालक, विस्तार शिक्षण
माझ्या कुटुंबाकडे १४ एकर शेती आहे. त्यांपैकी सात एकर कापूस लागवड करतो. दरवर्षी सात ते आठ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळायचे. या वर्षी एक एकरात सघन पद्धतीने कापूस लागवड केली. त्यामध्ये एकरी १० क्विंटल ८५ किलो एवढा कापूस झाला. या खरीप हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनचे एकरी १० क्विंटल उत्पादन मिळाले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ निर्मित पीडीकेव्ही अंबा आणि सुवर्ण सोया या सोयाबीन वाणांची निवड केली होती. गावशिवारात गांडूळखत निर्मितीला वेग आला आहे. महिला सक्रियपणे काम करीत आहेत. एका चांगल्या बदलाची ही सुरुवात आहे.
विजय उंडाळ, चेलकाडॉ. प्रकाश घाटोळ, ९८२२२१५१११
Summary

(विस्तार कृषी विद्यावेत्ता, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

Rural Development
Agriculture Success Story : फळबागेने दिली आर्थिक समृद्धी...

...असा आहे ‘मॉडेल व्हिलेज’ उपक्रम

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने हाती घेतलेल्या ‘मॉडेल व्हिलेज’ उपक्रमाचे चांगले परिणाम पुढे येऊ लागले आहेत. हा उपक्रम कृषी नवकल्पनांना चालना देण्यासाठी आणि विदर्भातील शेतकऱ्यांचा सामाजिक,आर्थिक दर्जा वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतो आहे. कार्यक्रमांतर्गत विद्यापीठाने विदर्भातील ११ जिल्ह्यांतील ११ गावे दत्तक घेतली आहेत. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात एक गाव ‘मॉडेल व्हिलेज’ म्हणून विकसित करण्यासाठी कृषी विभाग आणि संबंधित विभागांना सोबत घेण्यात आले आहे. यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाच्या दिशेने काम सुरू झाले.

गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचा हा उपक्रम आहे. यासाठी आधुनिक पद्धतींद्वारे उत्पादन दुप्पट करणे, यांत्रिकीकरण आणि सूक्ष्म सिंचनाद्वारे लागवडीचा ५० टक्के खर्च कमी करणे, शाश्‍वत उत्पादन आणि मूल्यवर्धन ते विपणन साखळी तयार करणे, एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करणे या महत्त्वपूर्ण टप्प्यांचा सहभाग आहे.

शेतीला दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, रेशीम शेती आणि मधमाशीपालन युनिट, प्रक्रिया केंद्र, शेतकरी गट, स्वयंसाह्यता गटाची जोड देण्यात येत आहे.

निवडलेल्या गावात पायाभूत आणि सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून ग्राम विकासासाठी कृती आराखडा तयार झाला. यामध्ये गावकऱ्यांना कशाची गरज आहे, हे स्पष्टपणे निश्‍चित करण्यात आले. त्यादृष्टीने यंत्र-तंत्र, वाण, निविष्ठांचा वापर, खर्च कमी करण्यासाठी जैविक, सेंद्रिय घटकांचा वापर यावर भर देण्यात आला आहे.

विविध संस्था, संघटनांचा सहभाग

उपक्रम राबवताना विद्यापीठ यंत्रणेच्या सोबतीला विविध संस्था, खासगी कंपन्या, बँकांचे सहकार्य घेतले जात आहे. यामध्ये रिलायन्स फाउंडेशन, पानी फाउंडेशन, सहकारी संस्था, माफसू, महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग, जिल्हा परिषद, कृषी विज्ञान केंद्रांचा सहभाग आहे. निवडलेल्या गावाचा पहिल्यांदा अभ्यास करण्यात आला. लोकसंख्या आधारित माहिती संकलितकरून त्याचे विश्‍लेषण झाले. त्यानंतर विविध प्रमुख घटकांमध्ये विकासात्मक उपक्रम सुरू करण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी एक व्यापक पथदर्शी प्रकल्प तयार करण्यात आला.

निवडलेल्या गावातील शेतकरी विद्यापीठाच्या पुढाकाराने शिफारस केलेले कृषी तंत्रज्ञान अवगत करू लागले आहेत. विविध पीक उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाते. प्रात्यक्षिकानंतर गावांमधील शेतकरी विद्यापीठाने शिफारस केलेल्या पद्धतींचा अवलंब करतात. यामुळे सोयाबीन, भात, कापूस या पिकांच्या उत्पादनात सरासरी २२ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. शेतकरी एक पीक पद्धतीतून मिश्रपीक पद्धतीकडे वळत आहेत. निवडलेल्या गावातील शेतकरी विविध शासकीय योजनांशी परिचित होत आहेत. रेशीम शेती ही नवीन संकल्पना म्हणून स्वीकारली जात आहे. यांत्रिकीकरण आणि तणनाशकांचा वापर वाढला आहे, यामुळे शेतकऱ्यांना वेळ आणि पैसा वाचण्यास मदत झाली आहे.

उत्साहवर्धक परिणाम

उपक्रमातील सामूहिक प्रयत्नांचे प्राथमिक निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत. दत्तक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नात २२ टक्के वाढ दिसून आली आहे. आता या पुढची पायरी म्हणून ही संकल्पना राज्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावात नियोजनबद्धपणे राबवली जाईल. यामुळे तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढेल आणि सर्वसमावेशक वाढ सुनिश्‍चित होणार आहे.

निवडलेली जिल्हानिहाय गावे

चेलका (अकोला), असोना (अमरावती), मुरादपूर (बुलडाणा), पापडा खुर्द (भंडारा), नाचण भट्टी (चंद्रपूर), हिरापूर (गडचिरोली), किंडगीपार (गोंदिया), सलाई मेंढा (नागपूर), डिघी बोपापूर (वर्धा), शेलगाव घुगे (वाशीम), मोहमदपूर (यवतमाळ)

आदिवासी बहुल सलाईमेंढा बदलाच्या वाटेवर...!

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ राबवत असलेल्या ‘मॉडेल व्हिलेज’ योजनेत नागपूर येथील कृषी महाविद्यालयातर्फे हिंगणा तालुक्यातील जंगल, डोंगराच्या कुशीत वसलेले आदिवासी बहुल सलाईमेंढा हे गाव दत्तक घेण्यात आले आहे. हे गाव नागपूरपासून ३० किलोमीटर असले तरीही विकासापासून कोसो दूर आहे. गावातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञानासह पीक प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच इतर संलग्न विभागांच्या योजनांची माहिती दिल्यामुळे बदलाला सुरुवात झाली आहे.

आदिवासी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती पाहता कमी खर्चात बचत करता येणाऱ्या पद्धतीवर मार्गदर्शन केले जाते. येथे प्रामुख्याने सोयाबीन पीक न घेता कापूस आणि तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब केला. जमिनीच्या हलक्या मगदुराप्रमाणे लवकर येणाऱ्या कमी कालावधीच्या कापूस वाणांची आणि विद्यापीठ निर्मित तूर वाणांची निवड करण्यात आली. कापसाची घन पद्धतीने लागवड करण्यात आली.

या भागात पाऊस अधिक होत असल्याने पिकांची लागवड वरंब्यावर केली. पेरणी अगोदर काळजीपूर्वक बियाण्यास जिवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया करून सरळ खतांचा वापर करण्यात आला. कीड नियंत्रण्यासाठी दशपर्णी अर्काचा वापर करण्यात आला. ग्रामीण कृषी कार्यानुभवातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना कामगंध सापळे आणि ट्रायकोकार्ड वापराबाबत प्रात्यक्षिक देऊन कीड नियंत्रणाबाबत माहिती दिली. नवीन तंत्रज्ञानामुळे खर्चात सुमारे १५ टक्क्यांपर्यंत बचत झाली. कापसाचे उत्पादन एकरी ४ ते ५ क्विंटल वरून ७ ते ८ क्विंटलपर्यंत वाढले. काही प्रयोगशील शेतकऱ्यांना एकरी १० ते १२ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. आंतरपीक असलेल्या तुरीचे उत्पादन पाच ते सहा टक्क्यांपर्यंत वाढले. या व्यतिरिक्त शेतकऱ्यांनी भाजीपाला उत्पादन सुरू केले आहे. शेतकऱ्यांनी गांडूळ खत निर्मिती, रेशीम उद्योगासाठी तुती लागवड, जनावरांच्या खाद्यामध्ये अझोला वापर, सुधारित चारा पिकांची लागवड आणि कोंबडीपालनास चालना दिली आहे.

विनोद खडसे, ९८५००८५९६६

(विस्तार कृषी विद्यावेत्ता,कृषी महाविद्यालय,नागपूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com