
Agriculture Success Story : दिवसेंदिवस जनावरांसाठीच्या चाऱ्याची समस्या गंभीर होत आहे. उन्हाळ्यात तर हिरव्या चाऱ्याची उपलब्धता अत्यंत कमी असते. मात्र अनेक शेतकरी अभ्यासवृत्तीतून वर्षभर संतुलित चारा उपलब्ध होण्यासाठी उत्कृष्ट नियोजन करण्यात कुशल झाले आहेत. नाशिक जिल्ह्याचा विचार करायचा तर अंबासन (ता.बागलाण) येथील राहुल मनोहर खैरनार २०१७ पासून गीर गायींचे संगोपन करतात. त्यांच्याकडे सुमारे ८० गायी आहेत.
यंदा कडक उन्हाळ्याची चाहूल ओळखून पुढील तीन महिने हिरव्या चाऱ्याची उपलब्धता होण्यासाठी त्यांनी आदर्श नियोजन केले आहे. बहुवार्षिक नेपियर गवताची सहा एकर, मका दोन एकर तर ज्वारी एक एकरवर घेतली आहे. कोरड्या चाऱ्यासाठी कोठार बनवले असून तूर, सोयाबीन,गहू, मका व ज्वारी कडबा साठवला आहे.
पूर्वी ते बहुतांश मुरघास खरेदी करायचे. मात्र वार्षिक वैरण गरज ओळखून १०० टन मुरघास निर्मिती स्वतः करतात. चिकात आलेला मका निवडून यंत्राच्या मदतीने त्याचे तुकडे केले जातात. गुणवत्तापूर्ण व जलद मुरघास तयार होण्यासाठी उपयुक्त जिवाणू घटकांच्या मिश्रणाचा वापर होतो. पूर्वी मुरघास खरेदीसाठी वार्षिक सहा लाख रुपये गुंतवणूक होती. आता स्व निर्मितीतून गुणवत्ता वाढविण्याबरोबरच प्रति टन दीडहजार रुपयांपर्यंत बचत होत आहे.
खैरनार यांच्या व्यवस्थापनातील ठळक बाबी
-दररोज सकाळी व सायंकाळी प्रत्येकी ३ किलो मुरघास. हिरवा व कोरडा चाराही दोन वेळा प्रत्येकी ३ किलो. प्र
-प्रति जनावर १८ ते २० किलो चारा वैरणीद्वारे.
-कोरड्या चाऱ्यासाठी ज्वारी कडबा,गहू भुसा, मुरघास ‘टोटल मिक्स राशन’ पद्धतीने एकत्रित करून मिश्रण निर्मिती. खनिजद्रव्यांचाही वापर.
-चाऱ्याचे वार्षिक नियोजन केल्याने महागडा चारा घ्यावा लागत नाही. एकसमान गुणवत्तेत चारा उपलब्ध असल्याने जनावरांचे आरोग्य सुदृढ राहते, दूध उत्पादनात वाढ होते गायीच्या प्रजनन क्षमतेवर चांगले परिणाम दिसून येतात. खर्च कमी होऊन नफा वाढतो.
चाराटंचाईवर मात
गणुर (ता.चांदवड) येथील दत्तू बाबूराव ठाकरे चार वर्षांपासून एचएफ गाईंचे संगोपन करतात. पावसाळ्यात हिरवा चारा मुबलक असतो. उन्हाळ्यात मात्र पाणी टंचाईला सामोरे जातो. खरीप पिकांची काढणी झाल्यानंतर मका, रब्बीत गव्हाचा भुसा उपलब्ध होते. मात्र जनावरांची संख्या व वार्षिक गरज ओळखून ७० टन मुरघास तयार केला जातो.
त्यसाठी परिसरातील शेतकऱ्यांकडून चिकात आलेल्या हिरव्या मक्याची एकरी ४० हजार रुपयांत खरेदी केली जाते. स्वतः मुरघास निर्मिती केली जात असल्याने खरेदी होणाऱ्या मुरघासाच्या तुलनेत किलोमागे दीड ते दोन रुपयांची बचत होते.
याशिवाय निफाड तालुक्यातील सायखेडा, चांदोरी परिसरातून ऊस व बांडीची परिसरातील शेतकऱ्यांसमवेत सामुहिक खरेदी होते. त्यातूनही दोन- चार रुपये वाचतात. शिवाय वाहन स्वतःचे असल्याने खर्च कमी करता येतो. दुग्ध व्यवसायात नफा मिळवण्यासाठी जास्तीत जास्त चारा स्वतःच्या शेतातील हवा असे ठाकरे सांगतात.
चाऱ्यातील यांत्रिकीकरण
नाशिक जिल्ह्यात कोळगाव (ता.निफाड) येथील सूर्यसाक्षी शेतकरी उत्पादक कंपनी, अंबासन (ता.बागलाण) येथील इंडिजीनस ॲग्रोवेट प्रोड्यूसर कंपनी या व्यावसायिक व यांत्रिक पद्धतीने मुरघास उत्पादनात पुढे आल्या आहेत. त्या अनुषंगाने पशुपालकांच्या खळ्यांवर मुरघासाच्या हवाबंद गोण्या पाहण्यास मिळतात.
उन्हाळ्यात सिन्नर, चांदवड, नांदगांव, मालेगाव व येवला तालुक्यातील पशुपालक निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात ऊस खरेदीसाठी येतात. व्यापारीही मागणीनुसार पुरवठा करतात. काही शेतकरी पारंपारिक गहू मळणी यंत्राद्वारे भूस उपलब्ध करतात.
काहीजण हार्वेस्टरद्वारे गहू काढणीनंतर शिल्लक काडापासून भुसा तयार करणाऱ्या स्ट्रॉ रिपर यंत्राचा वापर करतात. असे ट्रॅक्टरचलित यंत्र निफाड भागात उपलब्ध झाले आहे. तयार झालेला भुसा ब्लोअरच्या साहाय्याने मागे जोडलेल्या ट्रॉलीमध्ये वाहून नेण्याचे कामही यंत्र करतो. अलीकडे कंबाईन हार्वेस्टर आल्याने गहू काढणीसोबतच भुसा संकलित करण्याची सोयही उपलब्ध झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे चारा नियोजन
-वर्षभराची गरज ओळखून एकदल- द्विदल, बहुवार्षिक चारा पिकांची लागवड. फेरपालट पध्दतीचा वापर.
-दिंडोरी, पेठ, सुरगाणा भागातून डोंगरावरील वाळलेल्या गवताच्या गाठींची खरेदी.
-बहुतांश पशुपालकांकडे कडबा कुट्टी यंत्र.
-मुरघास व सुका चारा साठविण्यासाठी स्वतंत्र बंकर.
-साठवलेला चारा खराब होणार नाही, काळा पडून जनावरांना अपाय होणार नाही याची शेतकऱ्यांकडून दक्षता.
-सामूहिक पद्धतीने चारा खरेदी करण्यावर भर.
-लसूणघासाची अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी, कोल्हार भागातून वर्षभर खरेदी.
-धरणांच्या गाळपेरा क्षेत्रात चारा पिकांची लागवड. बियाणे वितरणासाठी शासनाचे प्रोत्साहन
- अझोला हा प्रथिनांचा स्रोत असल्याने त्याचेही उत्पादन.
- पाऊस पडणाऱ्या जिल्ह्याच्या पश्चिम भागात भात तणसाचा वापर
संपर्क:
राहुल खैरनार (पशुपालक)- ९९६०९१११९१
दत्तू ठाकरे (पशुपालक)- ७७४१८३११३१
सिंचन पद्धतीचा वापर
नांदूर (ता.जि.नाशिक) येथील प्रयोगशील शेतकरी सुनीता अशोकराव निमसे यांनी उन्हाळ्यात चारा पिकांसाठी काटेकोर सिंचन पध्दतीचा वापर केला आहे. त्यांच्याकडे ७० जनावरे असून सहा एकरांत चारा आहे. विहिरीने तळ गाठण्यास सुरवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मका लागवडीत पाईपला तोटी जोडणी करून गरजेनुसार सरीत पाणी सोडण्याची रचना केली आहे. त्यामुळे कमी पाण्यात गरजेनुसार सरी ओली करता येते. पाण्याची गरजही कमी लागते. पूर्वी तीन एकराला हे पाणी पुरेसे नव्हते. आता सहा एकरांत सिंचन करणे सोपे झाले आहे. ही पध्दत अन्य शेतकरी देखील वापरू लागले आहेत.
सुनीता निमसे- ९३७१६६६११८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.