Agriculture Mechanization : यांत्रिकीकरणाच्या बळावर चारशे एकर शेतीचे व्यवस्थापन

एवढ्या मोठ्या क्षेत्रावरील व्यवस्थापन सुकर होण्यासाठी आठ ट्रॅक्टर्सचा ताफा, विविध यंत्रे व गोदाम असे यांत्रिकीकरण केले आहे. विदर्भात‘शुगरकेन हार्वेस्टर’ खरेदी करून काढणी करणारे उमाठे बंधू एकमेव शेतकरी असावेत.
Sugarcane Harvester
Sugarcane HarvesterAgrowon

Agriculture Equipment : नागपूर येथे वास्तव्य असलेल्या संदीप व सचिन या उमाठे बंधूंची तेथून १८ किलोमीटरवरील परसाड येथे सुमारे २५ एकर शेती आहे. त्यांचे वडील मारोतराव यांची पूर्वी अवघी चार एकर शेती होती.

त्यात ऊस आणि भाजीपाला लागवडीवर (Vegetable Cultivation) त्यांचा भर होता. क्षेत्र कमी असल्याने ३० ते ३५ वर्षांपूर्वी मारोतरावांनी परिसरातील शेतकऱ्यांची शेती कराराने (Contract Farming) कसण्यास सुरवात केली. वडिलांकडूनच शेती व्यवस्थापनाचे (Agriculture Management) धडे घेत उमाठे बंधूंनीही शेतीत प्रयोगशीलता जपण्यास सुरवात केली.

परसाड शिवारात शेती खरेदी केली. गुमथळा, हुडकेश्‍वर, माथनी, परसाड, सोनेगाव हा परिसर नागपूर शहरालगत आहे. या भागात अनेकांची शेती आहे. परंतु नोकरी किंवा व्यवसायानिमित्त त्यांना शेतीचे पूर्णवेळ व्यवस्थापन करणे शक्य होत नव्हते.

अशावेळी तेथे करार शेती करण्याला उमाठे बंधूंनी प्राधान्य दिले. सुमारे सात-आठ वर्षांपासून सुमारे ४०० एकरांपर्यंत शेतीचे व्यवस्थापन ते करतात.

अशी आहे करार शेती

परिसरातील १० ते १२ गावांतील व १० ते १२ शेतकऱ्यांची शेती कराराने घेतली आहे. चारशे एकरांचा विचार केल्यास त्यात फळपिके व भाजीपाला घेणे जोखीमेचे झाले असते. त्यापेक्षा व्यवस्थापनाला सुकर होईल अशा हंगामी पिकांचीच निवड केली.

सुमारे २४० एकरांवर कपाशी आहे. यातील काही भाग बागायती तर काही कोरडवाहू आहे. साठ एकरांत भात ( धान), ३५ एकर ऊस व तेवढ्याच क्षेत्रावर तूर आहे. धान काढणीनंतर रब्बीत सुमारे ६० एकरांवर गहू घेतला जातो.

कोरडवाहू क्षेत्रासाठी ८ हजार रुपये तर बागायती क्षेत्रासाठी १५ ते १८ हजार रुपये प्रति एकर प्रमाणे संबंधित शेतकऱ्याला वार्षिक शुल्क दिले जाते. काही शेतकऱ्यांनी दोन वर्षासाठीचे करार केले आहेत.

Sugarcane Harvester
Agricultural Technology : बदलत्या हवामानानुसार शेतीमध्ये तंत्रज्ञान वापरा

शेतीतील यांत्रिकीकरण

-कापूस वेचणीनंतर त्याचे अवशेष न जाळता जागेवरच त्याचे बारीक तुकडे करून त्याचा खत म्हणून वापर केला जातो. पाच वर्षांपासून या पध्दतीचा वापर सुरू आहे. उसाचे पाचट न जाळता त्याचेही काही प्रमाणात तसेच ताग, धैंच्यासारख्या हिरवळीच्या पिकांचेही बारीक तुकडे या यंत्राद्वारे करून त्याचा खत म्हणून वापर होतो.

-वाहनांचे वायफर ज्याप्रमाणे फिरतात त्यानुसार रचना असलेले ट्रॅक्‍टरचलित फवारणी यंत्र तयार करून घेतले आहे. एक ट्रॅक्टरचालक ते वापरण्यास पुरेसा असतो. तीस फूट क्षेत्रात व दिवसभरात ३५ ते ४० एकर क्षेत्रावर फवारणी यामुळे शक्य होते.

यात मुख्य टाकी चारहजार लिटरची तर द्रावण टाकी ४०० लिटरची आहे. अशा पद्धतीची दोन यंत्रे आहेत. प्रत्येकी ७५ हजार रुपये त्याची किंमत आहे.

-चिखलणीसाठी रोटाव्हेटरचा वापर होतो. यांत्रिकीकरणामुळे वेळ, श्रम आणि पैशांत बचत होते. करार शेतीचे क्षेत्र मोठे असल्याने तब्बल ८ ट्रॅक्‍टर्स ताफ्यात सज्ज ठेवले आहेत.

गोदाम उभारणी

मोठ्या क्षेत्रावर उत्पादनही तेवढे अधिक मिळत असल्याने सात वर्षापूर्वी स्वखर्चातून सुमारे १२ हजार चौरस फूट आकाराचे गोदाम स्वतःच्या शेतात उभारले. टप्याटप्याने निधी उपलब्ध होत गेला तसे त्याचे काम झाले. चार वर्षांत ८० लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागली. बाजारात दर नसताना शेतमाल साठवून मग दर वाढल्याच्या काळात विक्री केली जाते.

Sugarcane Harvester
Agriculture Technology : कृषी तंत्रज्ञान प्रसार, जैवविविधता संवर्धनात ‘स्नेहसिंधु‘ अग्रेसर

पीक उत्पादकता

करारासाठी पीक निवडल्यानंतर पहिला विचार असतो तो एकरी किमान किती उत्पन्न मिळाले पाहिजे याचा. त्यानुसारच व्यवस्थापन व खर्च या बाबी साधल्या जातात. बागायती क्षेत्रातून एकरी १५ ते १७ क्‍विंटल तर कोरडवाहू क्षेत्रातून १० ते ११ क्‍विंटल उत्पादन घेण्यात येते.

गेल्या हंगामात कपाशीला ११ हजार रुपये प्रति क्‍विंटलपर्यंत कमाल दर मिळाला होता. एकरी व्यवस्थापन खर्च किमान ६० हजार रुपये होता. गेल्या हंगामात तुरीचे एकरी १४ क्‍विंटल तर यंदा ११ क्‍विंटल उत्पादन मिळाले.

७८०० रुपये प्रति क्विंटल कमाल दरही मिळाला होता. यंदा दरवाढीच्या अपेक्षेने साठवणूक केली आहे. भाताचे एकरी २२ ते २४ क्विंटल तर उसाचे ५५ ते ६० व कमाल ७५ टनांपर्यंत उत्पादन मिळाले आहे. धानाला मागील हंगामात समाधानकारक दर नसल्याने साठवणूक करून

उशिरा विकण्याचा निर्णय फायदेशीर ठरला. हंगामाअखेरीस दर प्रति क्विंटल ३१०० रुपयांवर पोचले. मागील हंगामात ६० एकरांतून १४०० क्‍विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. काही धान उत्पादक यंत्राद्वारे भातकाढणी करतात.

परंतु या पद्धतीत एक महिन्याचा कालावधी खर्च होतो. गहू लागवडीस विलंब होतो. परिणामी पुढे उत्पादकतेवर परिणाम होतो. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने भात काढणी व पुढे गव्हाची लावणी अशी पद्धती उमाठे वापरतात.

शुगरकेन हार्वेस्टरचा वापर

गेल्या वीस वर्षांपासून ऊस शेतीत सातत्य राखले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मानस समुहाच्या साखर कारखान्याला उसाचा पुरवठा होतो.

यंदा ऊस तोडणी यंत्र अर्थात ‘शुगरकेन हार्वेस्टर’ ची खरेदी उमाठे यांनी केली आहे. ट्रॉली व तत्सम सामग्रीसह त्याची एक कोटी ३० लाख रुपये किंमत आहे. ३० लाख रुपये स्वतःकडील रक्कम व कर्ज घेऊन भांडवल उभारणी कली आहे.

दिवसाला १५० टनांपर्यंत तोडणी या यंत्राद्वारे शक्य होते. मानस समुहाने यंत्रासाठी काही साह्य केले आहे. अन्य शेतकऱ्यांकडील उसाची तोडणी करण्यासाठी कारखान्यातर्फे टनाला ४५० रुपये उमाठे यांना देण्यात येतात.

सचिन उमाठे- ९८२३७७७३०४

संदीप उमाठे- ९३२६७३२३०५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com