
Raisin Success Story : नाशिक येथील महेश द्वारकानाथ भुतडा प्रगतिशील व निर्यातक्षम द्राक्ष बागायतदार आहेत. सन ११९४ मध्ये पुणे कृषी महाविद्यालयातून ‘उद्यानविद्या’ विषयात त्यांनी पदवी घेतली. वर्गमित्र प्रशासकीय सेवेत जाण्याच्या प्रयत्नात असताना महेश यांनी मात्र शेतीतच करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यांची वडिलोपार्जित १० एकर शेती खेडलेझुंगे (ता. निफाड) येथे आहे.
द्राक्षशेतीचा अभ्यास करून शरद सीडलेस, थॉमसन अशा वाणांची लागवड केली. पुढे विस्तार केला. सन २००० मध्ये नफा वाटणी (Profit sharing) तत्त्वावर सुमारे ५० एकर क्षेत्रावर दुडगाव (ता. नाशिक) येथे द्राक्ष लागवड व थॉमसन, क्लोन व नव्याने विकसित आरा-१५ आदी वाणांची लागवड केली.
मोहाडी येथील प्रसिद्ध सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीला ते द्राक्षे पुरवतात. तेथून ती युरोप व अन्य बाजारपेठेत रवाना होतात.
अडचणीतून शोधला मार्ग
महेश एकरी १० टनांच्या सुमारास द्राक्ष उत्पादन घेतात. सन २०२० मध्ये कोरोना काळात द्राक्ष निर्यात व देशांतर्गत विक्री साखळी अडचणीत आली. महेश यांच्या बागेत ५० टक्के काढणी झाली होती. तर सुमारे १०० टन माल वेलीवर होता.
निर्यातक्षम गुणवत्तापूर्ण मालास ७० ते ८० रुपये प्रति किलो दर मिळण्याची क्षमता असताना ७ ते ८ रुपये किलो दराने स्थानिक व्यापारी मागणी करत होते.
महेश हतबल व अस्वस्थ झाले. पण खचून न जाता मार्ग व संधी शोधण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले. द्राक्षात पूर्ण साखर उतरून अतिपक्वता होऊन मण्यांमध्ये अधिक गोडवा आला होता. दरम्यान कॅलिफोर्नियात वेलीवरच नैसर्गिक मनुके बनवण्याची (Direct on Vine) पद्धत त्यांच्या वाचनात आली. ती अभ्यासून प्रत्यक्षात आणण्याचे ठरविले.
...आणि तयार केले मनुके
नाशिक विभागात साखर उतरलेले घड किंवा द्राक्षमणी ताडपत्रीवर वाळवून मनुके तयार केले जातात. त्यासाठी मजूर, भांडवल, जागा आदींची गरज असते. मात्र स्थानिक बाजारात त्यास मिळणारा भाव तुलनेत कमी असतो.
कोरोना काळानंतर आरोग्यवर्धक आहाराकडे ग्राहकांचा कल व मागणी वाढली. मग महेश यांनी ‘रेसिड्यू फ्री’ द्राक्षांपासून मनुके बनविण्याचा निर्णय घेतला. त्यसाठी वेलींवरच माल ठेवला.
तशाच अवस्थेत खरड छाटणी पूर्ण केली. सूर्यप्रकाशाद्वारे वाळवून म्हणजे नैसर्गिक प्रक्रियेतून सुमारे तीन आठवड्यांनंतर वेलीवरच गोड स्वादाच्या मनुका तयार करण्यात यश मिळाले.
उत्पादन प्रक्रियेतील ठळक बाबी
-पूर्ण साखर उतरलेले मणी व २२ ब्रिक्सच्या पुढे साखरेचे प्रमाण गेल्यास मनुके करण्यासाठी योग्य स्थिती.
-मनुके निर्मिती करताना कोणत्याही रसायनांचा वापर होत नाही. या प्रक्रियेत द्राक्षमण्यांची नैसर्गिक चव टिकवून ठेवली जाते.
-वाळलेली द्राक्षांपासून तयार केलेले मनुके मोकळे, रसरशीत असतात.
-दरांतील घसरण व नैसर्गिक आपत्ती काळात प्रभावी उपाय
मनुके निर्मिती केव्हा फायदेशीर?
महेश गेल्या तीन वर्षांपासून या पद्धतीने मनुके तयार करतात. मात्र द्राक्षांचा दर किलोला २० रुपयांच्या खाली आला किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तरच त्याचे अर्थशास्त्र किफायतशीर ठरते असे ते सांगतात. केवळ अशावेळीच मनुके उत्पादन ते करतात. सन २०२१ च्या हंगामात सर्व सुरळीत सुरू असताना काढणीच्या अवस्थेत पाऊस झाला.
द्राक्षमण्यांना बारीक तडे गेले. काही माल निर्यात झाला होता. उर्वरित मालाला मातीमोल भाव मिळत होता. त्या वेळी मग पुन्हा महेश मनुके उत्पादनाकडे वळले. सन २०२० मध्ये ज्या ग्राहकांनी त्यांच्याकडून मनुका घेतला होता त्यांच्याकडूनही विचारणा झाली व विक्रीही झाली.
सन २०२२ च्या हंगामात निर्यातक्षम मालाची विक्री झाल्यानंतर उर्वरित द्राक्षे कमी दराने विकण्यापेक्षा मनुके निर्मिती केली. यंदाही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असून, पुन्हा १० ते १५ रुपये प्रति किलो दराची समस्या उद्भवली आहे. अशावेळी मनुक्यांचीच साथ मिळणार आहे.
मनुक्यांचे उत्पादन दृष्टिक्षेपात
वर्ष. उत्पादन(टन)
२०२० - २०
२०२१- १०
२०२२ - १०
२०२३ - २० (अपेक्षित)
मनुक्यांना ग्राहकांकडून पसंती
रसायन अवशेष मुक्त, नैसर्गिक सनड्राइड मनुका’ अशी ‘स्पेशल कॅटेगरी’ करून महेश आपल्या मनुक्यांचे विपणन करीत आहेत. त्यात त्यांना यश येत आहे. ग्राहकांकडून दरवर्षी चांगली मागणी आहे.
घाऊक १५० रुपये, तर किरकोळ ३०० रुपये प्रति किलो दराने मुंबई, पुणे यांसह स्थानिक नाशिक शहरात विक्री होते. १० टक्के थेट ग्राहक, तर ९० टक्के घाऊक ग्राहक असे विक्रीचे स्वरूप आहे. आपल्या गुणवत्तापूर्ण मालाची किंमत आपल्यालाच ठरवता आली पाहिजे असे ते म्हणतात.
संपर्क : महेश भुतडा, ९८२२९७५४७१
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.