रात्रीच्या काळोखाला चिरत ती करते शेतात जागली

शेतातील रात्रीच्या जागलीचे काम अत्यंत जोखमीचे. त्यामुळे घरातील पुरुष मंडळी ते करतात. मात्र टेंभी येथील महानंदा टोम्पे या रणरागिणी गेल्या १२ वर्षांपासून रात्रीच्या जागलीवर जात आहेत. याद्वारे त्यांनी पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढली आहे.
महानंदा टोम्पे
महानंदा टोम्पेAgrowon

नेर, यवतमाळ : शेतातील रात्रीच्या जागलीचे काम अत्यंत जोखमीचे. त्यामुळे घरातील पुरुष मंडळी ते करतात. मात्र टेंभी येथील महानंदा टोम्पे (Mahananda Tompe) या रणरागिणी गेल्या १२ वर्षांपासून रात्रीच्या जागलीवर (Night work In Farm) जात आहेत. याद्वारे त्यांनी पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढली आहे.

शेतातील निंदणी, खुरपणी, मळणी, कचरा वेचणी, सोंगणे, प्रसंगी डोक्यावर धान्याची वाहतूक, अशी कामे महिलांकडून पूर्वापार करून घेतली जात आहेत. शेतकामातील जड कामे नांगरणी, फवारणे, डवरणे, पाणी देणे व वन्य प्राण्यांपासून शेताचे रक्षण व्हावे म्हणून रात्रीची जागल ही कामे पुरुष करीत आहेत. मात्र महानंदा यांनी पुरुषांची ही मक्तेदारी मोडून काढली आहे. शेतीतील नुसती कामेच नव्हे, तर रात्रीचे अत्यंत जोखमीचे जागलीचे कामही त्या अविरतपणे करीत आहेत, हे विशेष. स्त्रिया शिकून स्वावलंबी झाल्या, हे खरे असले तरी ग्रामीण भागातील कष्टकरी वर्गातील स्त्रियांची अवस्था आजही पूर्वापार आहे. मात्र महानंदा (वय ३६) यांनी शेती व्यवसायात यशस्वी जम बसवीत आशेचा नव किरण निर्माण केला आहे.

महानंदा टोम्पे
यवतमाळ जिल्ह्यातील पाण्यासाठी पायपीट थांबणार

नेर तालुक्यातील चिकणी ते अजनी रोडवर टेंभी हे लहानसं गाव. येथीलच देविदास महादेवराव टोम्पे (वय ७५) व चंद्रकला टोम्पे (वय ७०) यांना तीन मुली आहेत. लहानपणापासून वडिलांनी महानंदा यांना मुलाचा दर्जा देत सर्व क्षेत्राचे ज्ञान दिले. महानंदाचे शिक्षण परिस्थितीमुळे केवळ नववीपर्यंत झाले. लग्नानंतर पतीशी न पटल्यामुळे त्या वडिलांकडे राहायला आल्या. स्वाभिमानी महानंदा यांना वडिलांवर अवलंबून राहणे पटले नाही. त्यांनी वडिलांकडील कोरडवाहू बारा एकर शेती कसण्याचे ठरविले. सुरुवातीची काही वर्षे कोरडवाहू शेतीत काही उरत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी युनियन बँक शिरजगाव येथून ७० हजारांचे कर्ज घेत दोनशे फूट लांब अंतरावरून पाइपलाइन टाकत धरणातून पाणी शेतापर्यंत आणले. शेतात एक झोपडी बांधली. संपूर्ण बाराही एकर शेत ओलिताखाली आणले. या वर्षी त्यांनी कपाशी, तूर, सोयाबीन, गहू, मका, उन्हाळी मूग, लसूण ही पिके घेतली. पाच एकरांतील गहू जोमदार आला आहे. यात ५० क्विंटल गहू होण्याची अपेक्षा आहे.

पहाटे पाच वाजल्यापासून महानंदा यांचा दिवस सुरू होतो. शेतात पिकांना पाणी देणे, घरी गेल्यावर घरची जनावरे व बकऱ्यांचा गोठा स्वच्छ करणे, घरातील इतर कामे करणे, स्वयंपाक आदी कामे त्या करतात. ही कामे आटोपताच त्या तडक शेतात जातात. दिवसभर पूर्ण शेतातील कामे करून सायंकाळी झाक पडताच पुन्हा घरी येऊन सायंकाळचा स्वयपांक करतात. त्यानंतर पुन्हा रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान शेतात जातात.

त्यांनी दरवर्षी बँकेकडून कर्ज घेत त्याची वेळेत कर्जफेड करत भूसुधार केला. केवळ शेतीतून उत्पादन घेऊन न थांबता त्या शेतीमालाच्या विक्रीसाठी नेर किंवा कारंजा बाजारपेठेत जातात. खते, बियाणे व कीटकनाशकांच्या फवारणीच्या खरेदी स्वतः करतात.

आकाशाच्या मांडवाखाली जागल -

शेतात जागलीसाठी रात्री त्यांच्या दिमतीला लकी, राजा, मिस्टी हे ३ श्‍वान असतात. बरेचदा रात्री मोटर बंद किंवा चालू करण्यासाठी रात्रीच्या काळोखाला चिरत धरणाच्या काठावर एकटेच जावे लागते. शेतातील तिच्या झोपडीत विजेचा दिवाही नाही. सोबतीला असतो तो फक्त किऽऽर्र अंधार अन् लुकलुकते चांदणे. आकाशाच्या मांडवाखाली त्यांची जागल सुरू असते.

मला कशाचीही भीती वाटत नाही. शेतात माझ्या परवानगीशिवाय कोणीही पाय ठेवू शकत नाही. एवढा वचक मी या ठिकाणी निर्माण केला आहे. मुळात महिला दुर्बल नाहीत. पुरुषी अहंकाराने तिला दुर्बल केले आहे. शेतातून मिळणारा नफा मी गरजूंच्या मदतीसाठी वापरते. अडल्यानडल्याचे दुःख यामुळे काहीसे कमी होते, याचे समाधान आहे.
- महानंदा टोम्पे : ९५२९९६५५६१

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com