
ज्ञानेश्वर ताथोड, डॉ. संदीप कऱ्हाळे
Rice Update : गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या पूर्व विदर्भातील जिल्ह्यात प्रत्यक्ष पडणाऱ्या पर्जन्यमानाची सरासरी १२०० ते १७०० मिमी. आहे. हवामान बदलामुळे पर्जन्यमानात काहीशी अनिश्चितता आली आहे. पर्जन्यमानाचे प्रमाण जरी तितकेच राहत असले, तरी पाऊस पडण्याचे दिवस कमी होत चालले आहेत.
पावसाळा ४ महिन्यांचा असला तरी प्रत्यक्ष पडणारा पाऊस ४८ ते ५४ दिवसांतच पडून जातो. या प्रदेशात भात (धान) खरिपातील महत्त्वाचे पीक आहे. येथे लागवडीसाठी प्रामुख्याने पारंपरिक पद्धतींचा वापर होतो. त्यामुळे खर्च वाढत चालला आहे, त्या तुलनेत उत्पादकता कमी होत चालली आहे. त्याचा फटका सामान्य शेतकऱ्यांना बसत आहे.
पूर्व विदर्भात भात पारंपरिक आवत्या पद्धती (भात बियाणे फेकून) व पेरीव आवत्या (पेरणी पद्धत) या दोन पद्धतीने घेतला जातो. पारंपरिक आवत्या पद्धतीत पुरेसा पाऊस झाल्यानंतर जमिनीची मशागत करून जमीन वापसा स्थितीत आल्यावर प्रति एकरी ३०-३५ किलो भात बियाणे विखरून टाकले जाते.
जमीन विखरून बियाणे झाकले जाते. साधारणतः एका महिन्यानंतर उगवलेल्या भात रोपांमध्ये हलकी नांगरण केली जाते. या जमिनीच्या मशागतीमुळे पिकास फुटवे फुटतात. तसेच तण नियंत्रणास मदत होते. पूर्व विदर्भात वैनगंगेच्या खोऱ्यात प्रचलित या पद्धतीला स्थानिक भाषेत ‘बासी’ म्हणतात.
मर्यादा : या पद्धतीमध्ये कमी उगवण क्षमता, रोपातील असमान अंतर, आंतरमशागत, खत व पाणी व्यवस्थापन, काढणीमध्ये अडचणी येणे अशा समस्या दिसून येतात. उत्पादकता कमी राहते.
रोवणी पद्धतीत चिखलणी, भाताची रोपवाटिका तयार करणे, रोपांची पुनर्लागवड (रोवणी) करणे या कामांसाठी अधिक मनुष्यबळ लागते. एकूण उत्पादन खर्चाच्या ३० ते ३५ टक्के यावरच खर्च होतो. त्याच सध्या मजुरांची वेळेवर उपलब्धता हा मोठा प्रश्न झाला आहे.
त्यामुळे रोवणीला उशीर होतो. या उशिरामुळे पिकावर कीड व रोगाचे प्रमाण वाढून, उत्पादनात २० ते ३० टक्के घट येत असल्याचे काही प्रयोगांमधून सिद्ध झाले आहे. पिकाचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी भात पिकामध्ये पेरणी यंत्राचा वापर वाढविण्याची गरज आहे.
पेरीव आवत्या (पेरणी पद्धत) : पारंपरिक आवत्या पद्धतीच्या तुलनेमध्ये या पद्धतीमध्ये जमिनीतील ओलाव्याचे अधिक संवर्धन, निविष्ठांचा कार्यक्षम वापर, शेती कामांची वेळेत पूर्तता आणि पर्यायाने उत्पादन खर्चात घट होते. यासाठी वेगवेगळी यंत्रे उपलब्ध असून, त्याद्वारे पेरणीसोबतच खतही देता येते. याद्वारे भाताप्रमाणे गहू, तीळ, जवस, लाखोरी व हरभरा यांचीही पेरणी करता येते.
तिफण किंवा पेरणी यंत्र :
पेरणी शक्यतो तिफनीने किंवा ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राद्वारे करावी. पेरणी करताना दोन ओळींतील अंतर २० सें.मी. व दोन रोपांतील अंतर १० ते १५ सें.मी. ठेवावे. बियाणे २ ते ४ सें.मी. खोल पडेल या बेताने तिफन किंवा पेरणी यंत्र चालवावे. पेरणीसाठी ठोकळ भात ७५ किलो, तर बारीक दाण्याचे वाण ५० किलो बियाणे प्रति हेक्टरी वापरावे.
ड्रम सीडर :
आपत्कालीन पीक नियोजनामध्ये भात संशोधन संचालनालय, हैदराबाद यांनी विकसित केलेले ड्रम सीडर उपयोगी ठरते. यात मोड आलेले बियाणे पेरता येते. यामध्ये दोन ओळींतील अंतर २० × २० सें.मी.तर दोन रोपातील अंतर ५ ते ७ सें.मी. पर्यंत ठेवता येते.
चिखलणी केलेल्या समांतर शेतात याचा वापर करता येतो. या पद्धतीत हेक्टरी २५ ते ३० किलो बियाणे लागते. मजुरीवरील खर्च कमी होतो. मात्र या पद्धतीत भात पीक लागवडीस काही मर्यादा आहेत. त्या पुढील प्रमाणे
-जमीन चिखलणीसाठी आवश्यक पावसाची गरज आहे. सपाट चिखलणीवर पेरणी करावी लागते.
-पेरणी करताना बांधीमध्ये चिखलणीवर पाणी भरलेले असू नये.
-पेरणीनंतर एक आठवडा २ ते ३ सें.मी. पाणी भात बांधीत असणे गरजेचे असते.
-भात बांधीतील तणनियंत्रण वरचेवर करणे आवश्यक आहे.
-कधी कधी पक्षी अंकुर आलेले बियाणे पळवून नेतात. त्यांचा त्रास संभवतो.
भात पेरणी पद्धत (डीएसआर) :
भात पेरणीकरिता लुधियाना येथील पंजाब कृषी विद्यापीठामध्ये विकसित केलेल्या या यंत्राला ११ दाते आहेत. त्यामध्ये दोन ओळींतील अंतर २५ × ३० सें.मी. तर दोन रोपातील अंतर ५ ते ७ सें.मी. पर्यंत ठेवता येते.
भात बियाण्याची पेरणी २ ते ४ सें.मी. खोल पडेल या बेताने करावी. याची रचना पेरणी यंत्रासारखी असून, पेरणीसोबतच खत देण्याचीही व्यवस्था आहे. यामुळे चिखलणी, भाताची रोपवाटिका तयार करणे, जगवणे, रोपांची वाहतूक करणे व पुनर्लागवड (रोवणी) करणे इ. सारखे वेळखाऊ कामे करण्याची आवश्यकता राहत नाही, परिणामी खर्चात बचत होते. एका तासात एक ते दीड एकर या प्रमाणे दिवसभरात ८ ते १० एकर पेरणी करणे सहज शक्य होते.
बियाण्यांची जवळपास २० ते२५ किलो प्रति हेक्टरी बचत होते. दोन ओळींतील अंतर २५ × ३० सें.मी.पर्यंत असल्याने यामध्ये हवा खेळती राहून पिकाची वाढ चांगली होते. आंतरमशागत व कापणीकरिता अन्य अवजारे सहज वापरता येतात.
भात पेरणी पद्धतीवेळी (डीएसआर) घ्यावयाची काळजी
-जून महिन्यात पूर्वमशागतीनंतर एकूण ८० ते १०० मी.मी. पाऊस झाल्यावर या पद्धतीने पेरणी करावी.
-पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करून घ्यावी.
-पेरणीसाठी ठोकळ भात ७५ किलो व बारीक दाण्याचे भात ५० किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. यामध्ये बियाण्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकतो.
-भात लागवडीच्या या पद्धतीमध्ये लागवड खर्च कमी असून उत्पादन चांगले मिळते. भात १० ते १५ दिवस अगोदर कापणीला येत असल्यामुळे रब्बी पिकाची लागवड वेळेत करणे शक्य होते. पुढील पिकासाठी जमिनीतील ओलाव्याचा फायदा घेता येतो.
-रोवणी लागवड पद्धतीच्या तुलनेत यामध्ये नफा, लागवड खर्च गुणोत्तर हे शास्त्रीयदृष्ट्या जास्त आढळून आलेले आहे.
‘डीएसआर’चे फायदे
१. डीएसआरमध्ये रोपवाटिका किंवा अन्य कोणतीही पूर्वतयारी करावी लागते. या बियाणे थेट ट्रॅक्टरद्वारे चालविलेल्या मशिनद्वारे शेतात पेरले जाते.
२. पाण्याची बचत होते. डीएसआर अंतर्गत प्रथम सिंचन (पेरणीपूर्वीचा पाऊस वगळता) पेरणीच्या २१ दिवसांनंतरच पाणी आवश्यक आहे.
३. डीएसआर पेरणी पद्धतीमध्ये फार मजूर लागत नाहीत.
४. रोपवाटिकेची आवश्यकता नसल्याने तो खर्च व वेळ वाचतो.
५. चिखल करण्याची गरज नाही. पुढील रब्बी हंगामातील पिकांसाठी जमीन कडक होत नाही.
६. वेळेत पेरणी होऊन खर्चात बचत होते.
...असे आहे हे यंत्र
- पेरणी यंत्रास जमिनीवर चालणाऱ्या चाकाद्वारा गती दिली जाते.
- यामध्ये ९ आणि ११ दात्यांचे यंत्र उपलब्ध आहे. या दात्यातील अंतर गरजेनुसार कमी जास्त करता येते. भातातील दोन ओळींमधील अंतर समान राखले जाते. या यंत्राला खालील फाळ तीक्ष्ण असून, जमीन फोडत असल्याने त्याचा वापर रब्बी हंगामामध्ये अन्य पिकांच्या पेरणीमध्ये शून्य मशागत यंत्र म्हणूनही वापरता येते.
- या यंत्रामध्ये बियाणे आणि खताची पेटी विविध कप्प्यांसह उपलब्ध आहे. या प्लेटमध्ये एका वेळेला दोन किंवा तीन दाणे एका वेळेस जमिनीत पेरले जातात. दोन बियाण्यातील अंतर समान ठेवले. या यंत्रासोबत भाताप्रमाणेच सोयाबीन, हरभरा, मका, तूर, कापूस अशा पिकांसाठी वेगवेगळ्या प्लेट दिल्या जातात.
- बियाण्याचे प्रमाण कमी जास्त करण्याकरिता यंत्राचा डावीकडे लोखंडी पट्टी दिलेली आहे.
-खताची पेटी विविध कप्प्यांसह असून, यात दिलेल्या हँडलच्या साह्याने खतांचे प्रमाण शिफारशीप्रमाणे कमी जास्त करता येते.
- या यंत्रामध्ये बियाणे विशिष्ट खोलीवर पेरण्यासाठी खोली चक्र (Depth Wheel) दिले आहे. ही खोली कमी जास्त करता येते, त्यामुळे बियाणे योग्य त्या खोलीवर समान अंतरावर जमिनीत सोडले जाते.
संपर्क - ज्ञानेश्वर ताथोड, ९८९०३८०६५४, ९६०४८१८२२०, (कृषी अभियांत्रिकी विषय तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.