Cotton Value Addition : ‘कांचनी’ने केली ३७ कोटींची उलाढाल

Farmer Producer Company : पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्हा हा भातासोबतच कापूस, सोयाबीन उत्पादकांचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो. कापूस मूल्यवर्धनासह शेतीमालाच्या प्राथमिक प्रक्रियेमधील संधी घेण्यासाठी वरोरा येथील कांचनी शेतकरी उत्पादक कंपनी पुढे आली आहे.
Cotton
CottonAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success story : मार्च २०१५ मध्ये वरोरा येथील १४ भाजीपाला उत्पादक शेतकरी एकत्र येऊन ‘अमृतवर्षा’ हा शेतकरी गट स्थापन केला. त्यांनी सेंद्रिय भाजीपाला उत्पादन आणि थेट ग्राहकांपर्यंत घरपोच विक्री या संकल्पनेवर पहिली चार वर्षे काम केले. त्यासाठी मोबाईल ॲपही विकसित करून घेतले होते.

त्यावरून ग्राहकांच्या ऑर्डर्स घेणे आणि मागणीनुसार भाजीपाला पुरविण्याचे काम केले. सुमारे ३५० कुटुंबे प्रकल्पाशी जोडली जाऊन दरमहा अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. सोबतच चंद्रपूर शहरामध्ये गटाने भाजीपाला विक्रीचे दोन स्टॉल उभारले होते. या स्टॉलमधून प्रत्येकी दरमहा ५० हजार रुपये उत्पन्न मिळत होते. एकत्रित आल्यामुळे मिळणाऱ्या या नियमित वाढीव उत्पन्नामुळे त्यांचा हुरूप वाढला.

शेतकरी गट ते कंपनी

गटाच्या उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याने २०१७ मध्ये कांचनी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचे ठरवले. २०१६ सभासद शेतकऱ्यांनी प्रति शेअर १ हजार रुपये या प्रमाणे ३२ लाख रुपये भांडवल गोळा केले. कंपनीसोबत जोडलेल्या १० संस्थात्मक सभासद (शेतकरी कंपन्या) यांनीही प्रत्येकी १० हजार रुपयांचे शेअर घेतले.

या माध्यमातून एकूण ३५ लाख रुपयांचे भागभांडवल कंपनीकडे उभे राहिले. कंपनीच्या संचालक मंडळामध्ये नितीन मुरलीधर टोंगे, कृपाली अजय पंचभाई, संजय धवस, यशवंत सायरे, बालाजी ढोबे (कार्यकारी संचालक), आशा सायरे, अनुप वसाडे, हिरालाल बघेले, रितेश बाठे, सुधीर मत्ते, बळिराम डोंगरकर यांचा समावेश आहे.

शेतीमाल विक्रीसाठी करार

यवतमाळ, वर्धा, गडचिरोली या जिल्ह्यांतील ३९ शेतकरी उत्पादक कंपन्यांशी शेतीमाल विक्रीसंदर्भात सामंजस्य करार केला आहे. देशांतर्गत व्यापाऱ्यांशी सौदे करताना मध्यस्थ म्हणून कांचनी प्रोड्यूसर कंपनी काम करते.

त्यातून या कंपन्यांचा तूर, मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा अशा सुमारे १५ हजार क्‍विंटल शेतीमालाची विक्री केली जाते. यासाठी कोणत्याही प्रकारचे कमिशन किंवा शुल्क आकारले जात नाही. केवळ शेतकरी उत्पादक कंपन्या शेतीमालाच्या विक्रीसाठी स्वतःच्या पायांवर उभ्या राहाव्यात, यासाठी हा उपक्रम राबविला जातो.

Cotton
Cotton Processing Business : कापूस प्रक्रिया व्यवसाय झाला हायटेक

कापूस मूल्यवर्धन प्रकल्पाची उभारणी

चंद्रपूर जिल्ह्यात कापूस लागवडीखालील क्षेत्र अधिक असून, त्यावरील प्रक्रिया उद्योगही आहेत. या व्यवसायामध्ये उतरताना शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने वरोरा एमआयडीसी मार्गावरील चिनोरा परिसरात ९.६ एकर जागा खरेदी केली आहे. २४ रेचे क्षमतेचे जिनिंग, प्रेसिंग यंत्रासोबत ऑइल एक्‍स्पेलरही बसविण्याचे काम सुरू आहे.

या जिनिंगच्या माध्यमातून सभासद शेतकऱ्यांना ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर गाठ बांधून देण्याचे प्रस्तावित आहे. पाच क्विंटल कापसाची एक गाठ बांधली जाते. सामान्यतः १ हजार रुपये प्रति गाठ असा दर आकारला जाईल.

या प्रकल्पाची किंमत बारा कोटी रुपये आहे. कंपनी संचालकांची मालमत्ता गहाण ठेवून बॅंकेकडून एक कोटी ७२ लाख रुपयांचे ‘टर्म लोन’ बांधकामासाठी घेतले आहे. सोबतच पाच कोटी रुपयांची सीसी (कॅश क्रेडिट) घेतली आहे. या प्रकल्पात क्लिनिंग- ग्रेडिंग शेड, जिनिंग प्रेसिंग शेड, सयंत्र या बाबीकरिता स्मार्ट या योजनेतून तीन

कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. उर्वरित खर्च हा कंपनी स्वनिधी व बॅंक कर्जातून करणार आहे.

Cotton
Cotton Cultivation : तेलबिया आणि कापूस लागवडीत पिछाडी

गोदाम आणि कोल्ड स्टोअरेजही

याच जागेवर ४ टन प्रति तास क्षमतेचे क्लिनिंग ग्रेडिंग युनिट, ८२०० चौरस फुटाचे शेड उभारले आहे. त्यात कापूस वगळता अन्य शेतीमालाची स्वच्छता व प्रतवारी केली जाते. कापूस प्रक्रिया प्रकल्पस्थळी ६० आणि १० मेट्रिक टन क्षमतेचे दोन अत्याधुनिक वजनकाटे उभारले आहेत.

त्याद्वारे शेतकरी व कंपन्यांना शेतीमालाचे अचूक वजन व पावती मिळू शकेल. महाराष्ट्र राज्य वखार मंडळाच्या माध्यमातून ३ हजार टन क्षमतेचे गोदामही उभारण्याचे नियोजन आहे.

त्याच प्रमाणे भविष्यात एक हजार टन क्षमतेचे कोल्ड स्टोअरेजही करण्याचे प्रस्तावित आहे. राज्यातील अशा प्रकारचा स्मार्ट योजनेशी संबंधित बाजार संपर्क वाढ अंतर्गत हा पहिला प्रकल्प ठरणार आहे. गुजरात येथील अरविंद मिल यांच्यासोबत कंपनीने स्वच्छ कापूस उत्पादनासंबंधी करार केला आहे. त्या अंतर्गत शेतकऱ्यांना कापूस संकलन बॅग्ज उपलब्ध केल्या जाणार आहेत.

अवजार बॅंकेची उभारणी

कांचनी शेतकरी कंपनीने अवजार बॅंक उभारली आहे. त्या अंतर्गत १४ ट्रॅक्‍टर व त्यावर चालणारी वेगवेगळी अवजारे, संयंत्रे उपलब्ध केली आहेत. तालुक्‍यातील प्रगतशील शेतकऱ्यांना तीन वर्षांच्या करारावर ती उपलब्ध केली जातात. त्यासाठी चार लाख ६० हजार रुपये एकरकमी आकारले जातात. या तीन वर्षांच्या काळात अवजारे भाड्याने देत संबंधित उत्पन्न मिळवू शकतो.

शेतीमाल खरेदीतून उत्पन्न ः

‘नाफेड’साठी २०२२-२३ या वर्षात २२ हजार क्‍विंटल हरभरा खरेदी केला गेला. ‘महाएफपीसी’ करिता खरेदी केलेल्या या शेतीमालासाठी एक टक्‍का कमिशन मिळते. कंपनीने शेतीमाल खरेदीकरिता बाजार परवानादेखील मिळविला असून, कंपनीने गेल्या वर्षभरात ६४ हजार ८०० क्‍विंटल शेतीमाल खासगीरीत्या खरेदी केला आहे.

२७ हजार क्‍विंटल सोयाबीन (सरासरी दर ५,००० रुपये क्‍विंटल) मूल्य १३ कोटी ५० लाख रु., १८०० क्‍विंटल तूर (८००० रुपये क्‍विंटल) १ कोटी ४४ लाख रु., ३६००० क्‍विंटल हरभरा (सरासरी ४७०० रुपये क्‍विंटल) किंमत १८ कोटी रु. याप्रमाणे आहे. एकूण ३२ कोटी ५० लाख रुपयांचा शेतीमाल खरेदी केला.

त्यातून एक टक्का कमिशनप्रमाणे ३२ लाख रुपयांचे उत्पन्न कंपनीला मिळाले. त्यात खर्च वजा जाता १४ लाख रुपयांचा निव्वळ नफा कंपनीला झाला. शेतकऱ्यांच्या थेट खात्यात तीन दिवसांमध्ये खरेदीची रक्‍कम जमा केली जाते. गेल्या वर्षी ५ हजार ८०० शेतकऱ्यांनी कंपनीला शेतीमाल विक्री केला. गेल्या हंगामात शेतकऱ्यांची १० हजार क्‍विंटल ओली हळद विक्री करून देण्यासाठीही कंपनीने मदत केली.

कृषी सेवा केंद्रातून अतिरिक्‍त उत्पन्न

कंपनीने दोन वर्षांपूर्वी कृषी सेवा केंद्र सुरू केले आहे. आजवर ८६१ शेतकरी निविष्ठा खरेदीसाठी या केंद्राशी जोडलेले आहेत. त्याची वार्षिक उलाढाल ६० लाख रुपये असून, सर्व खर्च वजा जाता अडीच लाख रुपयांचा निव्वळ नफा होतो. सूक्ष्म सिंचन व्यवसायाची उलाढाल २१ लाख रुपये असून, यातून २ लाख २० हजार रुपयांचा निव्वळ नफा होत असल्याचे संचालक बालाजी ढोबे सांगतात.

कंपनीचे असे आहेत व्यवसाय

- तूर, सोयाबीन, हरभरा, हळद खरेदी- विक्री

- कृषी सेवा केंद्र

- प्रमाणित बियाण्यांचे उत्पादन

- नाफेडकरिता हमीभावाने खरेदी

- कृषी अवजार विक्री

- इरिगेशन सर्व्हिसेस (तुषार, ठिबक)

शेतकऱ्यांना कमी दरात पुरविलेली अवजारे

ब्रश कटर ५०, रिपर १५०, हळद बॉयलर व पॉलिशर ०८, पॉवर विडर ५०, मिस्ट ब्लोअर १०००, पॉवर टिलर ७८ इ.

नितीन टोंगे (संचालक), ७७४४८४७७४४

बालाजी ढोबे (संचालक), ९८६०११७४३६

(कांचनी फार्मर प्रोड्यूसर कंपनी, वरोरा, जि. चंद्रपूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com