

डॉ. सुमंत पांडे
मागील लेखात आपण जल जीवन मिशन (Jal Jivan Missan) अंमलबजावणीमध्ये आव्हाने यावर चर्चा केली आजच्या लेखामध्ये या आव्हानांवर मात करावयाची असल्यास काय नियोजन करावे लागेल याबाबत चर्चा करत आहोत.
जल जीवन मिशन (Water Life Mission) आणि स्वच्छ भारत मिशन ग्रामीण ही दोन अभियाने आपण एकत्रितपणे पाहणे गरजेचे आहे. जल जीवन मिशनमध्ये (Water Life Mission) प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे पाणी ही घोषणा केलेली आहे. २०२४ पर्यंत संपूर्ण देशातील ग्रामीण भागासाठी हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्धारित करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणीही मोठ्या जोमाने होते आहे. अभियानास निश्चित कालावधी असतो आणि त्या कालावधीतच पूर्ण होणे अगत्याचे ठरते आणि ठरवलेले उद्दिष्ट गाठता येते.
मार्च २०२२ मध्ये झालेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी जल जीवन मिशन (Water Life Mission) ही अभियंत्यांची चळवळ न होता खऱ्या अर्थाने लोक चळवळ झाली पाहिजे ही अपेक्षा व्यक्त केली आहे. याचा मथितार्थ आपण लक्षात घेतला तर अभियंत्यांचे चळवळ म्हणजे निव्वळ तांत्रिक बाबीची पूर्तता करणे. उदा. नळजोड देणे, तांत्रिक आराखडे करणे इ; तथापि, यामध्ये भावनिक जोड देणे हे काम लोकचळवळच करू शकते. नळाद्वारे पुढील तीन ते चार दशके गुणवत्तापूर्ण, शाश्वत पाणी (Eternal water) येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग लागेल. लोकसहभागाविना अनेक योजना फलद्रूप होऊ शकल्या नाहीत हे आपण पहिलेच आहे.
नियोजन महत्त्वाचे
मागील लेखामध्ये आपण स्रोतांवर भर देण्याबाबत चर्चा केली, ग्रामीण भागात एक म्हण प्रचलित आहे “आडात असेल तरच पोहऱ्यात येईल” म्हणजे स्रोत शाश्वत असतील तरच नळाद्वारे पाणी (Tap water) घरात येईल. हे विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक करावयाचे काम आहे. ज्यामध्ये गावातील सर्व घटकांना एकत्र करून जलसंधारणाची कामे करून पिण्याच्या पाण्याचे स्रोत शाश्वत करणे गरजेचे आहे.
१) ५५ लिटर पाणी प्रति व्यक्ती प्रति दिन याप्रमाणे पुरविण्यात यावे, असे मानक आहे. आता नाण्याची दुसरी बाजू बघूयात. जेव्हा आपण पाणी डोक्यावरून वाहून आणतो किंवा अंतरावरून पाणी आणतो, त्या वेळी आपणाला पाण्याचे महत्त्व चांगले समजते. परंतु नळाद्वारे पाणी (Tap water) येईल त्यावेळेस त्याचा अपव्यय होण्याची शक्यताही अधिक आहे. एकूण नळाद्वारे पुरवण्यात आलेल्या पाण्यापैकी सुमारे ६५ टक्के पाणी हे सांडपाणी म्हणून परत प्रवाहित होते,या पाण्यात जैविक, रासायनिक इतर प्रदूषके असतात. या पाण्याची विल्हेवाट लावणे हे जिकिरीचे असते. हेच पाणी द्रव कचऱ्याच्या स्वरूपात परत जलस्रोतात येण्याची संभावना अधिक असते.
१) जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन ग्रामीण ही दोन्ही एकत्रितपणे पाहणे गरजेचे आहे. यासाठी शोषखड्डे करणे, द्रव कचरा खतांच्या स्वरूपामध्ये परिवर्तित करणे, त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. अविघटनशील कचऱ्याचे वेगळे नियोजन करणे गरजेचे आहे. अन्यथा, आपल्या अनारोग्याचे केंद्र (Health Center) तयार होईल. गावाला बकाल स्वरूप प्राप्त होऊ शकेल. यामध्ये प्रशासन आणि ग्रामस्थ किंवा जनता यामध्ये सुसंवाद आणि सुसंगती असली पाहिजे. २) आवश्यक तेवढे पाणी (Water) वापरून जे पाणी कपडे धुणे, भांडी धुणे इत्यादी कामासाठी वापरल्यानंतर ते पाणी इतस्ततः पसरू न देता शोष खड्ड्याच्या माध्यमातून मुरविल्यास या वापरलेल्या पाण्याची समस्या कमी होईल. आवश्यकता असल्यास असे पाणी एकत्र करून ते एका स्थिरीकरण हौदात टाकल्यास आणि त्या पाण्याला योग्य असे उपचार केल्यास त्या पाण्याचा पुनर्वापर देखील योग्य प्रकारे करता येऊ शकेल.
कचऱ्याची मोठी समस्या :
१) राज्यातील काही मोठ्या ग्रामपंचायतीशी पाहणी केली असता नागरी भागातील समस्या आता ग्रामीण भागातही तेवढ्याच प्रकर्षाने जाणवतात. जसे की काही ग्रामीण भागात कचऱ्याचे डेपो करण्यात आलेले आहेत. जेथे केवळ कचरा (Garbage) आणून टाकला जातो. त्यावर
कुठलीही प्रक्रिया केली जात नाही आणि ती आज प्रचंड समस्या मोठी झालेली आहे.
२) घंटागाडीचा स्वरूपातून प्रत्येक ग्रामपंचायत लोकांच्या घरापासून कचरा गोळा करते आणि ती थेट या कचरा डेपोत आणून टाकते. तेथे कचऱ्याचे विघटन न होता डुकरे, कुत्रे, इतर जनावरांचा वावर होतो आणि ते रोगांचे आगर बनते.
३) ज्या ग्रामपंचायतींना कचरा डेपोसाठी जागा नाही. तथापि, घंटागाडीच्या माध्यमातून कचरा (Garbage) गोळा करतात त्यांचे परिणाम तर अत्यंत भीषण आहेत. गोळा केलेला सर्व कचरा महामार्गाच्या दोन्ही बाजूंस विशेषत: नदीकिनारी सर्रास बेजबाबदारपणे टाकून दिलेला आढळतो, हे आपण सर्वांनी पाहिलेले आहेच. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना टाकलेला कचरा (Garbage) हळू नदीपात्रात जातो आणि नद्या प्रदूषित होतात. प्रदूषित नद्या (Polluted rivers) या अनारोग्याचे प्रसारण करणारे केंद्र होतात. नदीला मातेचा दर्जा दिलेला आहे, म्हणजे आपण आपल्या मातेला आजारी करतो, ही बाब अंतर्मुख होऊन विचार करावयाची आहे. म्हणून कचरा (Garbage) निर्माण होतो, त्याच ठिकाणी त्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी फक्त गरज आहे जाणिवेने वागणे, कचरा होऊच न देणे आणि झाला असल्यास तो घरातच कसा विघटित करता येईल हे पाहावे लागेल. ही दोनही आव्हाने सहज निकाली काढता येऊ शकतील.
जलजीवन मिशन आणि स्वच्छता मिशन राबवण्यासाठी प्रशासकीय रचना :
१) राज्य पाणी व स्वच्छता मिशन
२) जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन
३) ग्राम पाणीपुरवठा स्वच्छता आणि आरोग्य समिती
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन :
१) जिल्ह्याच्या जल जीवन मिशनच्या अंमलबजावणीची जबाबदारी या समितीवर आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम ७९ अ नुसार जिल्हा परिषदेतील जिल्हा जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीला मान्यता दिलेली आहे. तथापि, केंद्राच्या सूचनेनुसार पुढील प्रमाणे समिती असेल.
२) जिल्हाधिकारी हे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी हे उपाध्यक्ष असतात. आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, प्रकल्प संचालक, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जलसंपदा विभाग, जलसंधारण विभाग, कृषी विभाग, वन विभाग, माहिती व जनसंपर्क विभाग, या विभागाचे जिल्ह्याचे अधिकारी हे सदस्य असतात.
३) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांचे जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी या मिशनचे सदस्य असतील,कार्यकारी अभियंता ग्रा पा पु हे सदस्य सचिव असतील. आणखी इतरही व्यक्ती लोकप्रतिनिधी यांना मानद सदस्य म्हणून आमंत्रित करता येते.
ग्रामीण पाणीपुरवठा स्वच्छता व आरोग्य समिती
१) ही ग्रामपंचायत क्षेत्रावरील जल जीवन मिशन आणि स्वच्छता अभियान ग्रामीण यासाठी लोक समिती किंवा ग्रामपंचायतीची उपसमिती मानली जाते.
२) जल जीवन मिशनमध्ये त्यांना वैधानिक दर्जा देण्यात यावा असा उल्लेख केलेला आहे. सरपंच या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असून, ग्राम सेवक हे पदसिद्ध सदस्य सचिव आहेत.
३) समितीची रचना आणि त्यांची सदस्य यांचा सारासार विचार करून त्यांचे सातत्याने प्रशिक्षण व क्षमता बांधणी केल्यास ते समर्थपणे या बाबी करू शकतात.
जिल्हास्तरीय पाणीपुरवठा व स्वच्छता समिती ः
१) या दोन्ही समित्या म्हणजे, जिल्हास्तरावर समिती आणि ग्रामपंचायत स्तरावरील समिती यामध्ये नियमित कालावधीमध्ये संपर्क प्रस्थापित झाल्यास आवश्यक ते प्रशिक्षण देणे आणि क्षमता बांधणी चा वर्षभराचा उपक्रम घेण्यात येऊ शकतो. अन्यथा, फक्त सोपस्कार होऊ नये याची काळजी घ्यावी लागते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.