Summer Ragi Cultivation : कसा यशस्वी ठरला उन्हाळी नाचणी लागवडीचा प्रयोग?

मिलिंद पाटील यांनी नाचणी लागवड प्रयोगात यशस्वी होण्यासाठी केलेले प्रयत्न इतर शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक आहेत.
Summer Ragi Cultivation
Summer Ragi CultivationAgrowon

ग्राहकांची आवड आणि मार्केटमध्ये जे विकतं तेच पिकवण्याकडे आजच्या शेतकऱ्याचा कलं असतो. त्यामुळे पीकपद्धतीत बदल करुन काही तरी नविन पिकवण्याच्या भानगडीत अनेक शेतकरी पडत नाहीत.  नाचणी हे भरडन्यापैकी एक महत्वाचं पीक. पण गहू, ज्वारी चा वापर वाढल्यामुळे नाचणी सोबतच इतर पौष्टिक भरडधान्याचा तुमच्या आमच्या सारख्या लोकांच्या आहारातील वापर कमी होत गेला.  

भरडधान्याचं उत्पादन (Millet Production) वाढाव आणि लोकांच्या आहारातही त्याचा वापर वाढावा यासाठी अलीकडेच कोल्हापूरात उन्हाळी नाचणी लागवडीचा यशस्वी प्रयोग झाला. या प्रयोगांतर्गत कोल्हापूरातील १५ शेतकऱ्यांनी नाचणीचं खरीप पीक असूनही उन्हाळी हंगामात (Summer Season) लागवड करुन चांगल उत्पादनही घेतल आहे.

या शेतकऱ्यांपैकी पन्हाळा तालुक्यातील पिसात्रा गावचे  मिलिंद पाटील (Milind Patil) हे प्रयोगशिल शेतकरी. त्यानी उन्हाळी नाचणी लागवड (Ragi Cultivation) प्रयोगात यशस्वी होण्यासाठी केलेले प्रयत्न इतर शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक आहेत. 

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात नाचणी हे पीक खरिपात घेतले जाते. नाचणीचा स्वतःच्या घरातच उपयोग कमी होत गेल्याने आणि व्यापाऱ्यांकडून अत्यंत कमी किमतीत खरेदी होत असल्याने या ठिकाणी नाचणीचा पेरा घटत गेला.

त्यामुळे नाचणी उत्पादक शेतकरी कुटुंबाला नाचणीचं महत्त्व समजाव यासाठी येथील कृषी विभागाने प्रयत्न सुरु केले. यातच कृषी आयुक्तालय स्तरावरून आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमीत्त पौष्टिक भरडधान्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या नाचणी पिकाचे क्षेत्र वाढवण्याचे आदेश आले.

यासाठी नाचणीच्या बियाण्याची गरज लागणार होती. त्यादृष्टीने बीगरहंगामी नाचणीचं बीजोउत्पादन घेण्यासाठी आत्मा, महाबीज आणि राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, शेंडा पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी हंगामात नाचणी बीजोत्पादन प्रकल्प राबवण्याचे ठरले.

Summer Ragi Cultivation
Summer Ragi Cultivation : उन्हाळी नाचणी उत्पादनाच्या यशाचे गमक

नोंदी ठेवल्यामुळे नियोजन झाले सोपे

उन्हाळी नाचणी लागवड प्रकल्पांतर्गत १५ शेतकऱ्यांची निवड केली जाणार होती. येथील बरेसचे शेतकरी ऊस आणि भात पीक घेत असल्यामुळे, नाचणी ला मार्केट नसल्यामुळे तसेच एक हंगाम वाया जाणार असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी या प्रकल्पात सहभागी होण्यास नकार दिला.

मात्र नाचणीचे महत्व पटवून दिल्यानंतर हा प्रयोग राबवण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील १५ शेतकरी तयार झाले आणि १५ एकर क्षेत्रावर नाचणी लागवड करण्याचे ठरले. यापैकीच मलिंद पाटील हे पिसात्रा गावचे प्रयोगशिल शेतकरी आहेत.

मिलिंद पाटील हे इलोक्ट्रॉक इंजीनियर असून त्यांचे स्वतचे वर्कशॉप होते. २००८ साली निसर्गाच्या सानिध्यात राहून निरोगी आयुष्य जगता याव यासाठी मिलींद पाटील यांनी शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला.  यांची एकूण ५ एकर शेती आहे.

एकच पीक न घेता दर वर्षी वेगवगेळी पिके घेऊन  वेगवेगळे प्रयोग करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांना प्रत्येक पिकाची लागवडीपासून काढणीपर्यंतची नोंद ठेवण्याची सवय आहे.  त्यांची ही सवय उन्हाळी नाचणी लागवडीच्या प्रयोगात अत्यंत मोलाची ठरली.

कारण उन्हाळी नाचणी लागवडी बाबत यापूर्वी संशोधन न झाल्याने कुठेही माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे या नोंदीच पुढील उन्हाळी नाचणी लागवड नियोजनात दिशादर्शक ठरल्या. 

Summer Ragi Cultivation
Garlic Cultivation : धानपट्ट्यात होणार लसूण लागवडीचा प्रयोग

उन्हाळी नाचणी लागवडीचा प्रयोग

उन्हाळी नाचणी लागवड प्रकल्पांतर्गत आत्मा विभागाकडून  शेतकऱ्यांना फुले नाचणी या अधिक उत्पादनक्षम नाचणी वाणासह बियाणे, खते, कीडकनाशके देण्यात आली.

मात्र वेळेवर बियाणे न मिळाल्यामुळे  १५ डिसेंबर २०१८ ला गादीवाफ्यावर बियाणाची उशीर पेरणी झाली. पाच ते दहा जानेवारीच्या दरम्यान रोपांची मुख्य शेतात लागवड करण्यात आली. गरजेनुसार पाणी आणि अत्यल्प प्रमाणात वाढीच्या अवस्थेत पिकाला खते दिली गेल्याने पिकाची वाढ खूप चांगली दिसून आली. खरीप हंगामापेक्षा पिकाची अधिक चांगली वाढ झाली.

मे महिन्यात पीक काढणीला तयार होते. पण याच काळात येथे पावसाला सुरुवात होत असल्यामुळे बीयाणे म्हणून वापरता येईल अशी नाचणी हाती लागली नाही.

मात्र खरीपात नाचणीचं प्रति एकरी चार ते सहा क्विंटल पर्यंत मिळणारं उत्पादन उन्हाळी हंगामात मात्र  १६ ते १८ क्विंटल पर्यंत गेलं. बीज उत्पादन म्हणून जरी हा प्रयोग फसला असला तरी उन्हाळी हंगामात ऊस सोडून कमी खर्चात येणाऱ्या एका दुर्लक्षित राहिलेल्या नाचणीचा पर्याय उपलब्ध झाला.नाचणीची काढणी झाल्यानंतर राहिलेले अवशेष जनावरांसाठी चारा म्हणूनही उपयोगी पडले. त्यामुळे उन्हाळ्यातील नाचणी लागवड दुहेरी फायद्याची ठरली.

पुढील वर्षी मिलिंद पाटील यांनी ठेवलेल्या नोंदी चा आभ्यास करुन झालेल्या चुकांमध्ये सुधारणा केल्या.  दुसऱ्या वर्षी  पन्हाळा तालुक्यात ११० एकरांवर उन्हाळी नाचणीची लागवड झाली. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात देखील यानंतर उन्हाळी नाचणीच्या लागवडीबाबत प्रात्यक्षिके राबविण्यात आली. 

नाचणीला खात्रीशिर मार्केट शोधण्याची गरज 

उन्हाळी नाचणी लागवडीचा प्रयोग यशस्वी ठरला असला तरी यापुढे जाऊन नाचणीची विक्री कुठे करायची हा प्रश्न होता. त्यामुळे नाचणीला खात्रीशिर मार्केट शोधण्याची गरज निर्माण झाली.

शहरातील मॉल्स, सुपर मार्केटमध्ये नाचणीला किलोला ६५ ते ७० रुपये भाव मिळतो हे लक्षात घेऊन मिलींद पाटील यांनी इतर शेतकऱ्यांना सोबत घेत शहरी भागातील ग्राहक शोधून त्यांना थेट नाचणीची विक्री सुरु केली. त्यामुळे नाचणीला चांगला भाव मिळवण साध्य झालं.

उन्हाळी नाचणी लागवडीची माहिती इतर नाचणी उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांनाही मिळावी यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी मिलेट असोसिएशन अंतर्गत शेतकरी एकत्र आले आहेत. यातून उन्हाळी नाचणी लागवडीचा प्रसार केला जाणार आहे. 

उत्पन्न वाढीसाठी शेतकरी उसाबरोबर आंतरपीक म्हणून नाचणीची लागवड करतात. उसातील हुमणीचा नाचणीवर फारसा परिणाम होत नाही. त्यामुळे उन्हाळी नाचणी खरीप नाचणीपेक्षा अधिक फायदेशिर आहे. असं कृषी विभागाचे गटतंत्रज्ञान अधिकारी पराग परीट म्हणाले. पुर्वी व्यापारी शेतकऱ्याकडून खराब धान्याच्या बदल्यात  दुप्पट, तीप्पट नाचणी घेऊन जायचे.

शेतकऱ्यालाही नाचणीचं आहारातलं महत्व माहित नसल्यान ते सुद्धा मीळल ते पदरात पाडून घ्यायचे.   पण आता ही पिरस्थिती बदलणार आहे कारण नाचणी पुन्हा शेतकऱ्यांच्या आहारात आली आहे. त्यामुळे उन्हाळी नाचणी लागवड या प्रयोगाचा अहवाल वार्षिक संशोधन सभेत आणि राज्याला सादर केला जाणार आहे.

त्यानंतरच नाचणीला उन्हाळी पीक म्हणून घोषित केले जाईल, अशी माहिती कोल्हापूरच्या राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र, शेंडा पार्क चे नाचणी पैदासकार योगेश बन यांनी दिली. भरडधान्याची आहारातील आवश्यकता आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य झाली आहे.

याचा प्रसार व प्रचार व्हायला अजून थोडा वेळ लागणार असला तरी  त्यानंतर मात्र नाचणीला चांगली मागणी असेल. मागणीच्या तुलनेने पुरवठा कमी असेल त्यामुळे हा उन्हाळी नाचणी लागवडीचा प्रयोग इतर शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरणार हे मात्र नक्की. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com