Sorghum Processing : ज्वारीला श्रीमंत करणारी कंपनी

Bhuseva Farmers Producer Company : ज्वारी गरिबांची असे म्हटले जाते. पण खरे तर सर्व मानवजातीचेच आरोग्य श्रीमंत करणारी अशी ओळख आम्ही ज्वारीला करून देत आहोत. सोलापूर जिल्ह्यात खंडोबाचीवाडी येथील भूसेवा फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीची ही प्रतिक्रिया आहे.
Sorghum Processed Product
Jowar Processing Agrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथील सचिन थिटे यांचा गावातच पशुखाद्यनिर्मितीचा व्यवसाय आहे. त्यासाठी आवश्यक मक्याची खरेदी ते शेतकऱ्यांकडून करायचे. त्या माध्यमातून परिसरातील ५०० हून अधिक शेतकऱ्यांसोबत रोजचा संपर्क यायचा.

ज्वारी हे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख पीक आहे. मग शेतकरी कंपनी स्थापन करून ज्वारीचेही ‘क्लिनिंग-ग्रेडिंग’ सुरू करावे असा विचार त्यांच्या मनात आला. मका पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे त्यांनी ही कल्पना मांडली. त्यातून शेतकरी एकत्र आले आणि २०२० मध्ये भूसेवा फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी आकारास आली.

सुरवातीच्या काळात मका खरेदी-विक्री व्यवसाय कंपनीने केला. पण २०२२ नंतर पूर्ण ज्वारीवरच लक्ष केंद्रित केले. कंपनीच्या अध्यक्षा संध्याराणी विजय मारकड (इंदापूर) असून ऋषीकेश शिंदे (खंडोबाचीवाडी), लक्ष्मण धायगुडे (कोंबडवाडी), रत्नमाला मदने (इंदापूर), विश्वजित मारकड (इंदापूर) हे संचालक आहेत.

Sorghum Processed Product
Jowar Processing : ज्वारीपासून पोहे, लाह्या

ज्वारीला श्रीमंत करण्याचे ध्येय

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन थिटे म्हणतात की ज्वारी गरिबांची असे म्हटले जाते. पण ग्रामीण भागापासून ते महानगरांपर्यंत सर्व नागरिकांचे आरोग्य श्रीमंत करणारी असे ज्वारीचे महत्त्व आहे. आणि जगभरात अशीच ओळख ज्वारीला करून देण्याचे ध्येय ठेऊन आम्ही कार्यरत झालो आहोत. मोहोळच्या अलीकडे हिवरेपाटी नजिक सुमारे साडेसात एकर जागा भाडेतत्त्वावर घेऊन कंपनीने ज्वारी क्लिनिंग-ग्रेडिंग युनिट उभारले आहे.

सोलापूर जिल्हा ज्वारीचे कोठार आहे. मंगळवेढा, मोहोळ, बार्शी, अक्कलकोट, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर हे जिल्ह्यातील पट्टे ज्वारीसाठी प्रसिद्ध आहेत. या जिल्ह्यासह धाराशिव जिल्ह्यातील भूम, परांडा तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड, खर्डा भागातील शेतकऱ्यांकडून ज्वारीची खरेदी होते. सुमारे ८३३ शेतकरी सध्या कंपनीचे सभासद आहेत. त्यातील बहुतांश ज्वारी उत्पादक आहेतच.

त्या शिवाय अन्य शेतकरी व बाजार समितीतूनही ज्वारीची खरेदी केली जाते. बाजारभावांपेक्षा ५० ते १०० रुपयांच्या फरकाने दर शेतकऱ्यांना दिला जातो. ही थेट खरेदी असल्याने वाहतूक, हमाली, तोलाई आदींचा भुर्दंडही शेतकऱ्यांना सोसावा लागत नाही. फेब्रुवारी ते मे या मुख्य हंगामात सर्वाधिक ७० टक्के खरेदी-विक्री होते.

अत्याधुनिक यंत्रसामग्री

कंपनीकडे प्रति दिन १०० मे. टन क्षमतेचे ज्वारीचे क्लिनिंग- ग्रेडिंग यंत्र आहे. ज्वारी स्वच्छतेचे व प्रतवारीचे विविध टप्पे असलेली अत्याधुनिक ‘प्रोसेस लाइन’ अर्थात यंत्रसामग्री आहे. यात प्री क्लीनर, डीस्टोनर, मॅग्नेटिक डीस्टोनर, ग्रॅव्हिटी सेपरेटर, कलर मॉर्टर आदींचा समावेश आहे. ज्वारी साठवण्यासाठी पाचशे टन क्षमतेचे सायलो आहे. कोणतीही रासायनिक प्रक्रिया करण्याची गरज न भासता ती दोन वर्षे टिकण्यासाठी अत्याधुनिक व्हॅक्यूम पॅकिंग यंत्र घेतले आहे.

Sorghum Processed Product
Jowar Processing : पौष्टिक ज्वारी पासून बनतात विविध पदार्थ

सुमारे सव्वातीन ते साडेतीन कोटी रुपयांचा एकूण प्रकल्प आहे. सभासदांच्या माध्यमातून ४६ लाखांचे भागभांडवल जमा झाले. उर्वरित रक्कम बँककर्जाच्या माध्यमातून उभी केली. स्मार्ट प्रकल्पातूनही सुमारे एक कोटी रुपयांचे अनुदान मिळत आहे. प्रकल्पाचे जिल्हा नोडल अधिकारी मदन मुकणे, तालुका कृषी अधिकारी अतुल पवार यांचे त्यासाठी सहकार्य मिळत आहे.

प्लॅटिनम, गोल्ड, स्टार ज्वारी

सन २०२३ आणि २०२४ या कालावधीत कंपनीने प्रगतीकडे चांगल्या प्रकारे वाटचाल सुरू केली आहे. ज्वारीचा ‘न्यूट्रिसोर्घ’ ब्रॅण्ड तयार केला आहे. त्यात ‘सोलापूर मालदांडी’, ‘बार्शी शाळू’, ज्यूट ज्वारी असे प्रकार केले आहेत. सोलापूर मालदांडी रंगाने काहीशी पिवळसर, चमकदार, मध्यम आकाराची आणि चवीला रुचकर असते.

बार्शी शाळू पूर्णपणे पांढरीशुभ्र, चमकदार, आकाराने मोठे दाणे या प्रकारातील असून त्याची भाकरी पांढरीशुभ्र आणि चविष्ट असते. दाण्यांच्या आकारानुसार प्रतवारी करून प्लॅटिनम, डायमंड, गोल्ड, फाइव्ह स्टार, फोर स्टार, थ्री स्टार असे प्रकार तयार केले आहेत.

शहरी ग्राहकांची कुटुंबसंख्या व गरज लक्षात घेऊन ५, १० आणि ३० किलो असे २०० मायक्रॉन जाडीच्या प्लॅस्टिक बॅगेचे आकर्षक पॅकिंग सादर केले आहे. स्टार प्रकारानुसार ज्वारीची एमआरपी४४, ४८ ते ५५ रुपये प्रति किलो अशी आहे.

महाराष्ट्रासह अन्य मार्केट

भूसेवा कंपनीने स्वच्छता, गुणवत्तेच्या जोरावर कोल्हापूर, पुणे, मुंबई, सांगली, सातारा आदी जिल्ह्यांत आपल्या ज्वारी ब्रॅण्डला बाजारपेठ मिळवली आहेच. त्याशिवाय कर्नाटक राज्यातील गुलबर्गा, बंगळूर, आंध्र, तेलंगणातील हैदराबादपर्यंतही ही ज्वारी पोहोचली आहे. राज्यातील एका प्रसिद्ध मॉल कंपनीकडेही ही ज्वारी विक्रीस उपलब्ध झाली आहे. मागील वर्षी ‘भूसेवा’ कंपनीने सुमारे २२०० टनांपर्यंत विक्री करण्यापर्यंत मजल मारली. यंदाच्या हंगामात सहाहजार टन विक्रीचे उद्दिष्ट ठेवले आहे.

बाजारभावापेक्षा जास्त दर देऊन शेतकऱ्यांकडून आम्ही ज्वारी खरेदी करतो. यामध्ये कोणताही अतिरिक्त खर्च लावण्यात येत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांचा आमच्यावर विश्‍वास आहे. केवळ सोलापूरच नव्हे तर अहिल्यानगर, धाराशिव जिल्ह्यातूनही ज्वारी आमच्याकडे येत आहे हे त्याचेच लक्षण आहे.
- विश्‍वजित मारकड, संचालक, ‘भूसेवा’
राज्याबरोबर परराज्यांतील बाजाररपेठही विस्तृत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मागील वर्षी दक्षिण कोरियाला निर्यातदाराच्या माध्यमातून एक कंटेनर ज्वारी निर्यात करण्यात आम्हाला यश आले. कॅनडाकडूनही पाच टन मागणी आली आहे. त्यादृष्टीने कामकाज सुरू आहे.
- सचिन थिटे ९०११४१६९७५, मुख्य कार्यकारी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com