Mango
MangoAgrowon

चव्हाण बंधूंची गुणवत्तेतून आंबा व्यवसायात वृद्धी

शिरगाव आंबेखोल (ता. देवगड. जि. सिंधुदुर्ग) येथील सुनील आणि विवेक या चव्हाण बंधूंनी पूर्वी नुकसानीत असलेला आंबा विक्री व्यवसाय बंद केला. स्वमालकीच्या जागेत उत्पादन घेण्यास सुरुवात केली. थेट ग्राहक विक्रीचे तंत्र आत्मसात केले. तब्बल २२ वर्षांपासून अखंड ही विक्री व्यवस्था सांभाळत व्यवसायवृद्धी साधली आहे.


हापूस आंबा म्हटले, की पहिला नामोल्लेख देवगड हापूसचाच होतो. याच तालुक्यात देवगड-निपाणी मार्गावर शिरगाव आंबेखोल येथे रस्त्यालगत सुनील आणि विवेक या चव्हाण बंधूंचे घर आहे. त्यांचे वडील शांताराम आजूबाजूच्या बागायतदारांकडील बागा कराराने घेऊन आंबा विक्री व्यवसाय करायचे. बागांमध्ये वर्षभर काबाडकष्ट करायचे. आंबा काढणीनंतर वाशी मार्केटला पाठविला जायचा. मध्यस्थांनाही दिला जायचा. पण उत्पादन आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने अनेकदा मोठा तोटा सहन करावा लागला. दरवर्षी नुकसानच होत असल्याचे लक्षात आल्यानंतर हा व्यवसाय करण्याचे बंद केले.

लागवडीचा निर्णय

आता चव्हाण यांनी स्वमालकीच्या जागेत आंबा लागवड करण्याचा निर्णय घेतला. ही जमीन संपूर्ण डोंगराळ आणि जंगली झाडांनी व्यापलेली होती. या कालावधीत शासनाची १०० अनुदानावर फलोद्यान योजना सुरू होती. त्याचा फायदा घेत अनावश्‍यक झुडपे काढणे, खड्डे खोदणे, ते शेणखताने भरून घेणे ही कामे केली. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने यात आपला हातभार लावला.

Mango Farming
Mango FarmingAgrowon

आंबा महोत्सव ठरला ‘टर्निंग पॉइंट’

खरे तर पूर्वीच्या आंबा व्यवसायात नुकसान झाल्यामुळे एक दोन वर्षे तो केलाच नाही. त्यानंतर सुनील आणि विवेक या दोघा भावांनी व्यवसायाची सूत्रे आपल्या हाती घेतली. वडिलांना आलेले कटू अनुभव लक्षात घेऊन विचारपूर्वक पावले टाकण्यास सुरुवात केली. चर्चासत्रे, परिसंवादांना ते हजेरी लावीत. त्यातूनच शिरगावचे माजी उपसरपंच राजेंद्र शेट्ये व माजी खासदार कर्नल सुधीर सावंत यांच्या पुढाकारातून मुंबईत आंबा महोत्सव होणार असल्याचे कळले. प्रयत्नांतून जागाही मिळाली. सुरुवातीला १०० पेटी माल आणला. आठ दिवसांच्या काळात इतका प्रतिसाद मिळाला, की तीनशे पेटी आंब्याची विक्री चांगल्या दराने झाली. दोन ते तीन लाखांची उलाढाल झाली. आलेल्या ग्राहकांनी आपले संपर्क क्रमांक चव्हाण बंधूंना दिले. त्यांचे क्रमांकही घेतले.

थेट विक्रीची कल्पना मुंबईतील चांगल्या अनुभवानंतर चव्हाण बंधूंनी पुणे, औरंगाबाद, ठाणे, सातारा यांसह विविध भागांत होणाऱ्या आंबा महोत्सवात भाग घेण्यास सुरुवात केली. प्रत्येक महोत्सवात स्टॉलवर आलेला ग्राहक आपलासा केला. ग्राहकांना थेट विक्री केली तर नफ्याचे प्रमाण अधिक आहे हे चांगलेच लक्षात आले. महोत्सवाच्या माध्यमातून हजारो ग्राहक जोडले गेले होते. त्यांच्याशी संपर्क ठेवण्यास सुरुवात केली. देवगड-निपाणी राज्यमार्गालगत आपल्या घरूनही थेट विक्री सुरू केली. या मार्गावर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची रेलचेल असल्यामुळे विक्रीही चांगली होऊ लागली.

२२ वर्षांनंतरही ग्राहक टिकून

थेट विक्री उपक्रमाला सुरुवात करून चव्हाण कुटुंबाला आज तब्बल २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र सुरुवातीच्या काळात जोडलेले असंख्य ग्राहक आजही टिकून आहेत, हेच या कुटुंबाच्या प्रयत्नांचे यश आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वीच ग्राहक चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात करतात. मुंबई, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, औरंगाबाद, कराड आदी भागांत मोठ्या प्रमाणात ग्राहक जोडले आहेत. ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातूनही चव्हाण ग्राहकांना कल्पना देतात. व्यवसायात कधीही गुणवत्तेशी तडजोड करीत नाहीत. वातावरण किवा अन्य बाबींमुळे आंबा खराब झाल्यास ग्राहकाला तो बदलून दिला जातो. पिकलेला आंबा देण्यावरच अधिक भर असतो. विक्रीवेळची व विक्रीपश्‍चात सेवा ही बाब आजवर जपली आहे. कोरोना संकटात अनेक बागायतदारांना विक्रीत अडचणी आल्या. नुकसान सोसावे लागले. परंतु अनेक वर्षांपासून विक्री व्यवस्थेची तयार केलेली साखळी चव्हाण यांना मात्र उपयोगात आली. आंबा पिकविण्यासाठी कोणत्याही रसायनांचा वापर करीत नाहीत. क्रेटमध्ये गवताच्या पेंढ्यांमध्ये ठेवून नैसर्गिकरीत्या तो पिकविला जातो. असा आंबा चवीला आणि आरोग्याला देखील चांगला असल्याने ग्राहकांकडून कायम मागणी असते.

आंबा व्यवसाय- ठळक बाबी

-शेती सात एकर. २५० हापूस आंबा झाडे.
-फळाची गुणवत्ता टिकवण्यासाठी मासळी खत, लेंडीखत, गांडूळ खत आदींचा अधिक वापर
-दरवर्षी सरासरी ७०० ते एक हजार पेट्या (४, ५, ६ व दोन डझनांच्या) विक्री.
-प्रति पेटी सुरुवातीचा दर पाच हजार रुपये. त्यानंतर तो एक हजार रुपयांपर्यंत खाली येतो.
-आकार, वजनानुसार ग्रेडिंग व पॅकिंग. ग्रेडिंगसाठी यंत्राचा वापर.
-वार्षिक उलाढाल १५ ते २० लाख रुपयांपर्यंत.
-दिल्ली येथे सुनील यांचे मित्र आहेत. त्यांच्या मदतीने यंदा ५० पेट्या तेथे पाठविल्या. पुढील वर्षापासून त्यात सातत्य ठेवण्याचे नियोजन.

Mango Farming
Mango FarmingAgrowon

संपूर्ण कुटुंबाचा हातभार

आंबा हंगाम मार्च ते मेअखेर पर्यंत चालतो. तत्पूर्वी आंबा तयार झाला तरी तो मोजकाच असतो. या सर्व हंगामात काढणी, प्रतवारी, पॅकिंग, ग्राहकांच्या मागणीनुसार पाठवणी ही कामे करताना वातावरणावर देखील लक्ष ठेवावे लागते. सारे कुटुंब सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत या काळात राबत असते. कधीतरी दिवसच १६ तासांचा भरतो.

संपर्क ः सुनील चव्हाण, ९७६४५९३९९२, ७५८८९०३३८३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com