Red Pumpkin : नवरात्रोत्सवात काशीफळ वेधतेय लक्ष

Kashifal Bhopla : शारदीय नवरात्रोत्सव सध्या सर्वत्र जोमात सुरू आहे. या काळात देवीच्या पूजेसाठी फळे, काही भाजीपाला यासह काशीफळाला (डांगर) विशेष स्थान असते. सध्या सोलापूर बाजार समितीमध्ये हा काशीफळ साऱ्यांचे लक्ष वेधतो आहे.
Kashiphal
Kashiphal Agrowon
Published on
Updated on

Solapur APMC : महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमेवरील महत्त्वाचे शहर म्हणून सोलापूरची ओळख आहे. त्यामुळे सोलापूर बाजार समितीत विविध फळे, भाजीपाला व अन्य शेतमालाची मोठी आवक-जावक सुरू असते. अलीकडे कांद्याचे मोठे मार्केट येथे विकसित झाले आहे.

डाळिंब, केळी, सीताफळ, पेरू आदींचीही उल्लेखनीय उलाढाल या बाजार समितीत पाहण्यास मिळते. सध्या शारदीय नवरात्रोत्सव सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बाजारात डाळिंब, केळी, सीताफळ, पेरू आदी फळांची आवक वाढली आहे. त्यांचे दरही वधारले आहेत. पण त्याबरोबर या काळात देवीपूजेत सर्वाधिक महत्त्व असलेल्या काशीफळाला (डांगर) मोठी मागणी आहे. नवरात्रीच्या उपवासात तो आवर्जून खाल्ला जातो.

Kashiphal
Agriculture Success Story : फळबागेने दिली आर्थिक समृद्धी...

सोलापूरसह धाराशिव, लातूरहून आवक

तसे पाहायला गेल्यास वर्षभर काशीपळ बाजारात असते. हा भोपळा आहारात वेगवेगळ्या ‘रेसिपीं’द्वारे खाल्ला जात असल्याने ग्राहकांकडून त्यास सातत्याने मागणी असते. घटस्थापनेपासून विजयदशमीपर्यंत त्याला असलेली विशेष मागणी लक्षात घेऊन अनेक शेतकरी त्याच्या लागवडीचे पूर्वनियोजन करीत असतात. जिल्ह्यातील बार्शी, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा या स्थानिक भागासह धाराशिव, लातूर, सांगली आदी जिल्ह्यांतून दररोज ४ ते ५ गाड्यांपर्यंत आवक होते.

गावांना मिळाली ओळख

पूर्वी परसबागेत किंवा शेतात कुठेतरी बांधावर, मोकळ्या जागेत एक-दोन वेलींची लागवड केली जायची. पूर्वी हे फळ दुर्लक्षित होते. अलीकडील वर्षांमध्ये मात्र त्याच्या व्यावसायिक शेतीला चालना मिळाली आहे. सोलापूर जिल्ह्यात बार्शी, मोहोळ, अक्कलकोट या भागातील काही गावांनी काशीफळाच्या शेतीसाठी ओळख तयार केली आहे. काही शेतकरी वर्षभर आलटून-पालटून हे पीक घेतात.तर काही जण खास नवरात्रीसाठीच त्याची लागवड करतात.

Kashiphal
Agriculture Success Story : भाजीपाला, दुग्धोत्पादनात ओळख सावरगावतळची!

सुमारे ९० दिवसांमध्ये पदरी पडणारे काशीफळ हे पीक आहे. चांगली मशागत केलेल्या शेतात गादीवाफ्यावर त्याची लागवड केली जाते. ठिबक सिंचन, विद्राव्य खते, खुरपणी, कुळवणी आदी नियोजनातून तसेच हवामान, पाऊस अनुकूल असल्यास एकरी १८ ते २० टनांपर्यंत उत्पादन मिळते. या ५ ते ८ किलो सरासरी तर सर्वाधिक १० ते १५ किलोपर्यंत त्याचे वजन मिळते. सोलापूर बाजारात प्रामुख्याने नगावर त्याची विक्री होते. सध्या प्रति नग ४० ते ७० रुपयांपर्यंत दर मिळतो आहे.

फळांचे ‘मार्केटही’ तेजीत

काही दिवसांपासून डाळिंब, मोसंबी, संत्रा फळांच्या मागणीतही वाढ झाली आहे. साधारण गणेशोत्सवापासून आता नवरात्र आणि पुढे दिवाळीपर्यंत हे ‘मार्केट’ काहीसे वाढण्याची शक्यता आहे. मागील महिन्यात डाळिंबाची २१ टन ८३ क्विंटलपर्यंत आवक झाली होती. प्रति क्विंटल किमान ३५०० रुपये, सरासरी ७००० रुपये आणि सर्वाधिक ८५०० रुपये दर होता. मोसंबीची आवक १५ टनांपर्यंत होती. त्यास प्रति क्विंटल किमान २००० रुपये, सरासरी ३५०० रुपये आणि सर्वाधिक ४५०० रुपये दर मिळाला. संत्र्याची आवक १८ टनांपर्यंत होती. प्रति क्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये दर होता.

जानेवारी, जून आणि सप्टेंबर असे वर्षातून तीन वेळा मी काशीफळाचे उत्पादन घेतो. यंदा अलीकडेच हंगाम संपला. उत्पादनात सातत्य ठेवल्याने कमी कालावधीत हे पीक चांगले पैसे देऊन जाते.
तुकाराम रेळेकर, शेळगाव (आर), ता. बार्शी ९६२३२३२८४४
कोहळा आणि काशीफळाची खरेदी-विक्री करतो. थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करतो, यंदा पावसाने थोडेसे नुकसान झाले आहे. पण बाजार चांगला आहे. प्रति नग ३० रुपयांपासून ७० रुपयांपर्यंत दर आहे.
-सलीम बागवान, व्यापारी, सोलापूर बाजार समिती
बाराही महिने भोपळ्याला बाजार असतो. पण नवरात्रोत्सवात त्यास सर्वाधिक उठाव असतो.
-नितीन नारायणकर, व्यापारी, सोलापूर बाजार समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com