Animal Husbandry Business Ideas: नांदेड जिल्ह्यातील रिसनगाव येथील नरसिंह मोकले यांची केवळ तीन एकर शेती होती. त्याला मोठा आर्थिक आधार देण्यासाठी त्यांनी काही वर्षांपूर्वी शेळीपालन सुरू केले. विविध जातींचे संगोपन, सुविधा- सोई आणि जागेवरच बाजारपेठ तयार करणे यातून वर्षाला लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून शेतीपेक्षा शेळीपालन हाच मोकले त्यांचा मुख्य व्यवसाय तयार झाला आहे. त्या बळावर एकेकाळी सालदार असलेल्या मोकले यांना तीन एकर जागा घेणे व घरच्या आर्थिक गरजा पूर्ण करून शेतीत प्रगती व आर्थिक स्वावलंबी होणे शक्य झाले आहे. .नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात रिसनगाव आहे. कापूस, सोयाबीन आदी या भागातील मुख्य पिके आहेत. येथील नरसिंह मोकले यांची आजमितीला सुमारे सहा एकरांच्या आसपास शेती आहे. वडील शंकरराव, आई मंगलबाई, पत्नी सुनीता असा त्यांचा परिवार आहे. बंधू सूर्यकांत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत..ते आपल्या कुटुंबासमवेत नांदेड येथे राहतात. पूर्वी कुटुंबाची आर्थिक स्थिती कमजोर होती. जेमतेम क्षेत्र आणि मोजक्या शेळ्यांवर कुटुंबाची उपजीविका अवलंबून होती. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी नरसिंह यांनी तीन वर्षे अन्य शेतकऱ्यांकडे सालदार म्हणून काम केले. त्याचवेळी सूर्यकांत यांच्या शिक्षणासाठी मदत केली..Goat Farming Business: भूमिहीन, अल्पभूधारक? नव्हे, या तर शेळीपालनातील उद्योजिका .व्यावसायिक शेळीपालनदुसऱ्यांकडे सालदार म्हणून अनुभव घेत राहण्यापेक्षा घरची शेती विकसित करण्यास नरसिंह यांनी सुरुवात केली. घरगुती स्वरूपाच्या शेळीपालनास व्यावसायिक रूप देण्यास सुरुवात केली. राज्यातील काही शेळीफार्मना भेटी दिल्या. त्यातून शेड, गव्हाण व्यवस्थापन व संगोपनातील अनेक बाबी अभ्यासल्या. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथून संकरित नर विकत घेतले. सन २०१६ मध्ये लोहा (नांदेडपासून ३५ किलोमीटर) बाजारपेठेतून तीन लाख रुपयांत २५ शेळ्या खरेदी केल्या. .बंदिस्त पद्धतीचे शेळीपालन सुरू केले. अनुभव नसल्याने सुरुवातीस खुराक, आरोग्य व्यवस्थापन आदी अनेक अडचणी आल्या. पिल्लांचे वजन वाढत नव्हते आणि मृत्युदरही होता. मात्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण, जंतनियंत्रण, संतुलित आहार आणि पाणी व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले. त्यानंतर व्यवसायात सातत्याने सुधारणा होत गेली..टप्प्याटप्प्याने शेडचा विस्तारव्यवसाय वाढत गेल्याने तीन टप्प्यांत शेडचा विस्तार केला. यात २०१८ मध्ये ४० बाय २० फूट लांबी-रुंदीचे लाकडी पाट्यांचे शेड उभारले. त्यासाठी सव्वा लाख रुपये खर्च आला. सन २०१९ मध्ये ७० बाय ४० फूट आकाराचे पिलांसाठी स्वतंत्र शेड उभारले. त्यासाठी सुमारे दीड लाख खर्च आला. तर २०२० मध्ये सुमारे पावणेदोन लाख रुपये खर्चून शेड अजून वाढवले. दुमजली व लाकडी पाट्यांचे शेड असल्याने जमिनीवर लेंडीखत जमा होण्याची व्यवस्था झाली. एकाच जातीच्या संगोपनापेक्षा बीटल, सोजत, आफ्रिकन बोअर आणि स्थानिक अशा चार जातींची विविधता ठेवली. त्यामुळे बाजारातील मागणीनुसार पुरवठा व दर मिळवणे शक्य झाले. बघता बघता मोकले यांचा दहा वर्षांचा दीर्घ अनुभव तयार झाला आहे..Goat Farming: नावडकरांनी शेतीला दिला शेळीपालनाचा सशक्त आधार.व्यवस्थापनातील बाबीसध्या सुमारे ७५ शेळ्या आणि संकरासाठी तीन उच्च प्रतीचे नर आहेत. शेत व पूरक व्यवसायांमधील बहुतांश कामे नरसिंह व सुनीता हे मोकले दांपत्यच करते. फार्मवरील कामांसाठी कायमस्वरूपी एक कामगार ठेवण्यात आला आहे. सकाळी सातपासून गव्हाण स्वच्छता, खुराक, हिरवा चारा, पिलांना दूध पाजणे आणि संध्याकाळची देखभाल अशी नियोजनबद्ध कामे केली जातात. कपाशी हे मोकले यांचे मुख्य पीक आहे. रब्बीत ते ज्वारी घेतात. .त्यातून घरी धान्य व जनावरांसाठी चाऱ्याची सोय होते. चारा व्यवस्थापनात स्वयंपूर्णता मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. त्यासाठी प्रत्येकी १० ते ३० गुंठ्यांत गाजर गवत, दशरथ गवत, मेथी आदींची लागवड केली जाते. दरवर्षी दीड क्विंटल मका बाहेरून मागवण्यात येतो. मोठ्या प्रमाणात तुरीची गुळी दरवर्षी १० टेंपो या प्रमाणात मागवून ती साठवण्यात येते. त्यासाठी स्वतंत्र गोदाम उभारले आहे. हिरवा चारा यंत्राद्वारे कुट्टी करून शेळ्यांना देण्यात येतो. नियमित आरोग्य व्यवस्थापन, वेळेवर लसीकरण, लिव्हर टॉनिक, पीपीआर आणि अन्य आवश्यक लसींचे नियोजनबद्ध वेळापत्रक तयार केले आहे. पावसाळा आणि हिवाळ्यात विशेष काळजी घेण्यात येते. काटेकोर व्यवस्थापनामुळे शेळ्यांची वाढ, वजन आणि आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली आहे..विक्रीचे नियोजन व बाजारपेठमोकले यांनी बांधावरच शेळ्यांना बाजारपेठ तयार केली आहे. आतापर्यंतच्या एकूण अनुभवातून शक्यतो एकदाही विक्रीसाठी बाहेर जावे लागले नसल्याचे ते सांगतात. व्यापाऱ्यांशी सतत संपर्क ठेवून त्यांनी विक्रीचा ओघ कायम ठेवला आहे. दरवर्षी सुमारे १५० ते १६५ करडे विक्रीसाठी उपलब्ध होतात. नर व पाटी अशा दोन्हींची विक्री होते. १६ ते २० किलो वजनाच्या प्रति नगाची साडेसात हजारांपासून ते साडेआठ हजार रुपये दराने विक्री होते. विक्रीतून दरवर्षी पाच ते कमाल १० लाख रुपयांपर्यंत उलाढाल होते. खर्च वजा जाता काही लाखांची रक्कम हाती येते..उल्लेखनीय प्रगतीशेळीपालनात स्थैर्य आल्यानंतर नऊ महिन्यांपूर्वी दोन जाफराबादी आणि एक मुऱ्हा अशा तीन म्हशी घेतल्या आहेत. यामध्ये सुमारे चार लाखांची गुंतवणूक केली आहे. सुरुवातीला दररोज ३० ते ४० लिटरपर्यंत दूध मिळायचे. डेअरीला प्रति लिटर ६० रुपयांप्रमाणे त्याची विक्री केली. अवघ्या नऊ महिन्यांत सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न त्यातून मिळाल्याचे मोकले सांगतात. आता तीनही म्हशी गाभण आहेत. शेती व शेळीपालनाला या दुग्ध व्यवसायाची जोड झाल्याने आर्थिक उत्पन्नात नक्कीच चांगली भर पडत असल्याचे मोकले सांगतात..त्यामुळेच तीन एकर शेती खरेदी केली. आता एकूण शेती सहा एकरांपर्यंत झाली आहे. मुलीचे लग्न थाटामाटात करता आले. मुलगा कृष्णा बारावीत शिक्षण घेत आहे. कुटुंबातील पुढील पिढीलाही शेती आणि पशुपालनाची आवड निर्माण झाली आहे. शेळीपालनामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात लेंडीखत उपलब्ध होते. त्याचा वापर स्वतःच्या शेतात केल्याने जमिनीचा कस सुधारला आहे. यंदा लेंडीखत मुबलक असल्याने प्रति ट्रॉली चार हजार रुपये दराने विक्री केली. त्यातून सुमारे ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.नरसिंह मोकले ९३०७६३०७१७.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.