Agri Tourism Center : कोकणी संस्कृतीचे दर्शन घडवणारा गणेश कृषी पर्यटन केंद्र

Agritourism Business : रत्नागिरी जिल्ह्यात नाटे येथील गणेश रानडे यांनी चौदा वर्षांपूर्वी समुद्रकिनाऱ्यापासून नजीकच्या ठिकाणी कृषी पर्यटन व्यवसाय सुरू केला.
Agri Tourism Center
Agri Tourism CenterAgrowon

Agri Tourism Update : रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात नाटे गाव आहे. येथील अशोक रानडे यांची शेती व हापूस आंब्याची बाग आहे. गावातील पहिले इलेक्ट्रिशिअन म्हणून त्यांची ओळख आहे. गावात वीज आली तेव्हा घराघरांमध्ये अशोक यांनी इलेक्ट्रिक चे काम केले होते.

शेतीत वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या अशोक यांना २००८ मध्ये उद्यानपंडित पुरस्काराने गौरविण्यातही आले आहे.

पर्यटन केंद्राची सुरवात

घरापासून काही अंतरावर सुमारे ४० एकरांवर अशोक यांनी सुमारे १८०० ते दोनहजार पर्यंत हापूस आंब्याची बाग सेंद्रिय पद्धतीने विकसित केली. त्यांचा मुलगा गणेश यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत शेतीत प्रयोगशील वृत्ती जपत कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्याचे ठरवले. वाणिज्य विषयातील पदवी घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता शेती आणि पर्यटन अशी सांगड घालण्याचा त्यांचा विचार

होता. ‘इंटरनेट’ तसेच पुस्तकांतून राज्यातील कृषी पर्यटन केंद्रांची माहिती घेतली. नेरळ (जि. रायगड) येथे सगुणा बागेत जाऊन प्रगतशील शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांच्याकडून सविस्तर मार्गदर्शन घेतले. सन २००९ मध्ये ‘गणेश ॲग्रो टुरिझम केंद्राची स्थापना केली. नाटे गावाला समुद्र किनाऱ्याचे वरदान आहे.

काही अंतरावर आंबोळगडचा निसर्गरम्य किनारा आहे. समुद्र किनाऱ्यापासून दोन किलोमीटवर केंद्र वसले आहे. सुमारे ६०० मीटर उंचीवर डोंगरात बाग वसली आहे. गेल्या चौदा वर्षांच्या काळात अनुभव, भांडवल, पर्यटकांच्या गरजा यानुसार केंद्राचा टप्प्याटप्प्याने विस्तार केला

Agri Tourism Center
Agri Tourism : शासनाकडून ५४१ कृषी पर्यटन केंद्रांना मान्यता

असे आहे पर्यटन केंद्र

-नाटे गावाची रचना तिन्ही बाजूला समुद्र किनारा अशी आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी उभे राहून समुद्राला न्याहाळता येते. नजीक आंबोळगडला गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे. त्या ठिकाणचे पावसाळ्यातील दृश्य तसेच खाली कोसळणारे पाणी वाऱ्याने पुन्हा वरती उसळताना पाहणं मोठं विलोभनीय असतं.

-एका खोलीत ४ ते ८ व्यक्ती राहू शकतील अशा सामाईक, स्वतंत्र खोल्या. ॲटच टॉयलेट व बाथरुमची सोय. गणेश सांगतात की डोंगरावर ठिकाण असल्याने वर्षभर वाऱ्याची झुळूक असते. त्यामुळे वातानुकूलित यंत्रणा बसविलेली नाही.

पर्यटक इथल्याच वातावरणात रमून जावेत म्हणून टीव्ही ची सोयही केलेली नाही. उंचावर मचाण तयार केले आहे. तेथून संध्याकाळी सूर्यास्त व त्यानंतर चौफेर परिसर अनुभवणे ही पर्वणीच असते.

-आंब्याचा आस्वाद

शहरी लोकांना खेड्यातील जीवन अनुभवता येत नाही ही बाब लक्षात घेऊन पर्यटकांना झाडावर चढून आंबा तोडणे व खाणे या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव दिला जातो. आंब्याची काढणी, ग्रेडिंग, पॅकिंग कसे केले जात याची माहिती दिली जाते. त्यातून बागायतदारांना येणाऱ्या समस्यांचे आकलन देखील पर्यटकांना होते.

-कोरोनाचा दोन ते तीन वर्षांचा कालावधी वगळल्यास दरवर्षी १८०० ते २००० पर्यंत पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. मुंबई, पुणे, अन्य जिल्ह्यातील पर्यटकांची गर्दी असतेच.शिवाय फ्रान्स, अमेरिका, जपान, रशिया येथील परदेशी पर्यटकांनीही या केंद्राला भेट दिली आहे. पृथ्वी प्रदक्षिणेसाठी बाहेर पडलेल्या जय कन्नयन या पर्यटकानेही या ठिकाणी वास्तव्य केले आहे.

-गणेश सांगतात की आम्ही आंबा बागेतच सुमारे २० प्रकारच्या विविध भाज्या आंतरपिके म्हणून पिकवतो. सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यावर भर असतो. आपल्याच बागेत सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली ताजी भाजी पर्यटकांना खाऊ घालणे हा वेगळा आनंद असतो. शुद्ध शाकाहारी जेवण मिळते.

यात केळीच्या पानावर जेवण, उकडीचे मोदक, अळुवड्या, फणसाची भाजी, भाजणीचे थालीपीठ, घारकुटाचे (डाळींचे) वडे, झुणका भाकरी, चुलीवरचे जेवण, कोकम सरबत, कैरीचे पन्हे, आवळा सरबत, आंब्याची (कैरीची चटणी) आंब्याची विविध तसेच करवंदाचे लोणचे वगैरे आदी अनेक पदार्थांचा स्वाद इथे मिळतो. गोशाळेतले निरसे दूध पिण्याचा आनंद घेता येतो.

-मद्यप्राशनाला पूर्णपणे बंदी आहे. शेतात उत्पादित तांदूळ, आंबे. त्यापासून बनविलेले पदार्थ, जवळच्या परिसरातील कोकणी उत्पादने आणि वस्तूंचीही विक्री होते. त्यातून अतिरिक्त उत्पन्न मिळते.

-लहान मुलांसाठी घसरगुंडी, झोपाळे. जवळ प्रचंड मोठे वडाचे झाड. तेथे सूर पारंब्या खेळाचीही सोय. छोटं ट्री हाऊस.

-एक वेळेस येऊन गेलेले कुटुंब पुन्हा आल्याशिवाय राहात नाही. अशा सुमारे ५० कुटुंबे कायम जोडली गेली आहेत.

-सेंद्रिय शेतीबद्दल माहिती सांगणे, गर्दी नसलेले समुद्र किनारे दाखवणे, खेड्यातील जीवन व त्याची ओळख, आंब्याच्या बागेमध्ये फिरण्यास देणे वगैरे अशा काही गोष्टी आहेत त्याची ओळख व माहिती लहानांपासून मोठ्यांपर्यंत करून देणे. कमी दरामध्ये जास्तीत-जास्त सोयी-सुविधा हा आमच्या अ‍ॅग्रो टुरिझमच विशेष आहे.

-व्यवसायातून चार ते पाच जणांना कायम रोजगार मिळाला आहे. आंब्याच्या हंगामात एप्रिल-मेच्या सुट्टीत होतकरू महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या हातालाही हंगामी काम देण्याचा प्रयत्न केला आहे.

कोरोनानंतर सावरतोय व्यवसाय

विविध संकल्पना घेऊन पर्यटन व्यवसाय चालवणाऱ्या गणेश रानडे यांना कोरोनातील दोन वर्षे कठीणच गेली. काही उपक्रम स्थगित करावे लागले. गेल्या वर्षीपासून पर्यटकांची रेलचेल बऱ्यापैकी सुरु झाली आहे. यंदा गेल्या तीन महिन्यांत सहाशेहून अधिक पर्यटकांनी येथे भेट दिली आहे. हा ओघ सुरुच आहे.

कोरोना येण्यापूर्वी काही दिवस आधी साहसी पर्यटनाच्या अनुषंगाने गणेश यांनी शिबीराचे आयोजन केले होते. त्यासाठी गुंतवणूकही केली. पण कोरोनामुळे मोठा आर्थिक फटका बसला. त्यामधून हळूहळू सावरत असल्याचे त्यांनी सांगितले. गणेश यांच्या पत्नी वरदा यांचाही व्यवसायात मोलाचा वाटा आहे.

पर्यटन केंद्रातील ‘किचन’ची जबाबदारी त्यांच्याकडेच आहे. महिला पर्यटकांशी संवाद साधून त्यांच्याशी संपर्क वाढवण्याचे कामही त्या करतात.

पर्यटन केंद्राला मिळालेले सन्मान

-कृषी पर्यटन पुरस्कार (शासकीय)

-कृषी व ग्रामीण पर्यटन महासंघाकडून सन्मान

-'अ‍ॅग्रो टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ कडून प्रमाणपत्र

Agri Tourism Center
Rural Development : ग्रामविकासात भोसे (क) ठरले ‘स्मार्ट ग्राम’ !

विशेष उपक्रम

-काही वर्षांपूर्वी ३२ देशांमधील ३२ पर्यटकांनी मुंबई ते गोवा मार्गावर सायकल सफर केली. त्याच्या आयोजनाची जबाबदारी गणेश यांनी यशस्वी पार पाडली. सफरीतील एक दिवस पर्यटकांनी गणेश यांच्या पर्यटन केंद्रात घालवला. त्याची नोंद पुस्तकात झाल्याने आपसूकच केंद्राची महती सातासमुद्रापार गेली.

-नाटे परिसरात १२० हून अधिक प्रकारचे पक्षी पावसाळा किंवा अन्य हंगामात आढळतात. काहींचे आगमन त्या-त्या हंगामात होते. पक्षी निरीक्षणाची आवड असलेल्यांसाठी येथे पक्षी निरिक्षण करता येते. वर्षाला शंभरहून अधिक गट त्यासाठी येतात.

-कोरोना काळापूर्वी तत्कालीन प्रातांधिकारी सुशांत खांडेकर यांच्या संकल्पनेतून नवरात्रीत नवदुर्गा दर्शनाची जबाबदारी गणेश आणि स्थानिकांनी स्वीकारली. राजापूर तालुक्यातील नऊ देवींचे दर्शन याद्वारे घडवले. तीन वर्षे सलग चाललेला हा उपक्रम कोरोनामुळे थांबला. यापुढे तो पुन्हा सुरू करण्याचा मानस आहे.

-लावणी मळ्यातली, लावणी गळ्यातली लावणी मळ्यातली, लावणी गळ्यातली ही ‘टॅगलाईन’ घेऊन कोरोनापूर्वी पावसाळ्यात हा वेगळा उपक्रम राबवला. त्यास मुंबई, पुण्यातील पर्यटकांचा चांगला प्रतिसाद लाभला. सकाळी नाष्टा केल्यानंतर पर्यटकांना भातशेतात नेण्यात येते.

तेथे भात रोप लावणी संदर्भाने कामे, बैलांचे जोत धरणे आदींचा आनंद दिला जातो. संध्याकाळी बैठकीची लावणी असा प्रयत्न होता. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.

-मचाणावरुन डोंगराच्या पायथ्याशी असलेला परिसर आणि किनाऱ्याचे दर्शन होत असल्याने या ठिकाणी कोजागरी साजरी करण्याची संकल्पना सुरु केली. त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. संध्याकाळी अनेक लोक समुहाने येऊन मनोरंजन कार्यक्रम करतात.

- आंब्याचे विविध प्रकार ग्राहकांना चाखण्यास मिळावेत यासाठी आम्रमहोत्सव सुरु करण्यात आला. यात आमरस, कैरीचे पन्हे, कैरीची चटणी, कढी, तक्कु, लोणचे आदी विविध पदार्थांचा आस्वाद पर्यटकांना घेता येतो. कोरोना काळापूर्वी सुरू असलेला महोत्सव भविष्यात पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. यंदा आंबा कमी असल्याने आयोजन करणे शक्य झाले नाही.

प्रतिक्रिया शहरी लोकांना कोकणातील किनारे, आंब्याच्या बागा याबाबत कुतूहल असते. त्याचाच विचार करून पंचतारांकित हॉटेलपेक्षा नैसर्गिक वातावरणाचा आनंद पर्यटकांना देण्यासाठी आम्ही पर्यटन केंद्र सुरु केले. एकदा येथे येऊन गेलेला पर्यटक पुन्हा येथे येत असल्याचे आम्हाला सर्वाधिक समाधान आहे. पर्यटकांना कौटुंबिक वातावरण देता यावे यासाठी रानडे परिवारातील एक सदस्य प्रत्येकवेळी त्यांच्या संपर्कात राहून संवाद साधत असतो.
गणेश रान डे ,९४२२४३३६७६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com