Indian Agriculture: सांगली जिल्ह्यातील पळशी (जि. सांगली) येथील प्रवीण पाटील यांनी शेतीची ओढ व द्राक्ष बागायतदार मित्रांच्या कामांची प्रेरणा यातून त्यांची पावलेही द्राक्ष शेतीकडे वळली. दुष्काळासोबत संघर्ष करीत वडिलांच्या मार्गदर्शनाखाली पाण्याची शाश्वत व्यवस्था केली. निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाचे आव्हान स्वीकारले. हाच ध्यास घेऊन प्रवीण एकरी १२ टन उत्पादकता व किलोला ८० ते ९० रुपये दर यानुसार दहा एकरांत गुणवत्ताप्रधान द्राक्षांचे यशस्वी उत्पादन घेत आहेत. .सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात दुष्काळी भागाचं प्रतिनिधित्व करणारं पळशी हे सुमारे साडेतीन हजार लोकसंख्येचं गाव कऱ्हाड- विजापूर मार्गावर वसले आहे. शाश्वत पाणीपुरवठ्याची कोणतीच योजना पळशी गावाजवळून गेली नसल्याने शेती किंवा पिण्याच्या पाण्याचा शाश्वत स्रोत नव्हता. कूपनलिकांचाच काय तो आधार होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत पाण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांनी प्रचंड मोठा संघर्ष केला..दहा ते पंधरा वर्षांपूर्वी टॅंकरने पाणी आणून द्राक्षबागा जगविल्या. उत्तम व्यवस्थापनातून त्या निर्यातक्षम बनविल्या. त्यातून परदेशात द्राक्ष निर्यात करणारे गाव अशी पळशीची ओळख त्यांनी तयार केली. चार वर्षात टेंभू योजनेमुळे शिवारात कृष्णा अवतरली. पाण्याची शाश्वत सोय झाली. त्यामुळे येथील युवकांमध्ये उत्साह संचारला. त्यांनी प्रयोगशील द्राक्ष शेतीत पुढाकार घेतला. गावातील प्रवीण भीमराव पाटील हे त्यापैकीच युवा शेतकरी..Grape Farming: वातावरणातील बदलानुसार द्राक्ष बागेतील व्यवस्थापन.संघर्षातून द्राक्षशेतीप्रवीण यांच्या वडिलांची तीस एकर शेती. मात्र ती कोरडवाहू. दुभती जनावरं दावणीला. नव्वदीच्या दशकात त्यांच्याकडे अर्धा एकरात द्राक्ष बाग होत. त्यावर कुटुंबाची सारी भिस्त होती. सारं सुरळीत सुरू असताना दुष्काळाची एवढी तीव्र झळ बसली, की बाग काढून टाकण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्या वेळी प्रवीण यांनी कृषी विषयाची पदवी आणि बीएडचे शिक्षण पूर्ण केले. मोठे बंधू वैभव सैन्यदलात नोकरीस होते. त्यांचा घराला मोठा आर्थिक आधार होता. सातत्यपूर्ण दुष्काळामुळे कुटुंबाची शेतीतील इच्छाशक्ती संपत चालली होती. आपल्या वाट्याला आलेला संघर्ष मुलांच्या वाट्याला येऊ नये अशी भीमरावांची इच्छा होती..त्यामुळे प्रवीण यांनी स्पर्धा परीक्षा देऊन उत्तम नोकरी करावी व सुरक्षित आयुष्य जगावं हा विचार त्यांनी बोलून दाखवला. वडिलांच्या अपेक्षेनुसार प्रवीण यांनीही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. पण मनासारखे यश मिळेना. मग खासगी कंपनीत नोकरी स्वीकारली. तिथे मन रमत नव्हते. अखेर दीड वर्षातच नोकरी सोडली. बीएडची पदवी असल्याने गावातील संस्थेत शिक्षकाची नोकरी मिळाली. पण ती तात्पुरती होती. पुढे काय हा प्रश्न सतावत होता. असुरक्षितता, अस्वस्थता जाणवत होती मन सातत्याने शेतीकडे ओढ घेत होतं..मित्रांच्या साथीनं द्राक्ष शेतीकडेप्रवीण सांगतात, की गावातील अमित गुरव, सुशीलकुमार पाटील, अजित जाधव, दादासाहेब जाधव, देवदास जाधव, पंकज पिसे आणि विजय बाबर हे वर्गमित्र. सगळे उच्चशिक्षित. नोकरीच्या मागे न लागता त्यांनी द्राक्ष शेतीलाच आपलं भविष्य मानलं. निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाचं बाळकडू घेत त्यांनी स्वतःची वाट शोधली. त्यांच्या मेहनतीला यश मिळताना मी प्रत्यक्ष पाहिलं. त्याच वेळी माझ्याही मनात अशी स्वप्नं रुजत गेली. मग हिंमत एकवटून वडिलांशी समजूत घालून द्राक्ष शेतीतच करिअर करायचं नक्की केलं. मोठ्या विश्वासानं वडिलांनीही होकार भरला..पाण्याची शाश्वत सोयपूर्ण वेळ बागेचीच जबाबदारी स्वीकारल्यानंतर पाण्याची शाश्वत सोय करण्याला प्रवीण यांनी प्राधान्य दिले. पहिल्या कूपनलिका होत्या. पण पाणी अपुरे पडत होते. त्यामुळे दरवर्षी एखादी दुसरी कूपनलिका घेतली जात होती. तोपर्यंत मुख्य कालव्यातून टेंभूचे पाणी पुढे आटपाडी तालुक्यात पोहोचले होते. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तेथून पाइपलाइनद्वारे पाणी आणले होते. प्रवीण आणि त्यांच्या काही मित्रांनीही त्याच धर्तीवर २०१७ मध्ये सात किलोमीटरवरून पाइपलाइन करून शेतात पाणी आणले. शेततळ्यात त्याची साठवणूक होऊ लागली चार वर्षांपूर्वी गावात टेंभूचे पाणी आल्याने पाण्याची झळ एकदम कमी झाली..Grape Farming: वातावरणातील बदलानुसार द्राक्ष बागेतील व्यवस्थापन.द्राक्ष शेतीचा प्रवासमित्रांप्रमाणे निर्यातक्षम द्राक्ष शेतीत नाव मिळवायचं असं प्रवीण यांनी ठरवलं होतं. पण बाग उभी करण्यासाठी मोठी अडचण होती ती भांडवलाची. कुटुंबातील सदस्यांच्या पाठबळावर तीही समस्या सोडवली. सन २०१८ मध्ये तीन एकरांत थॉम्पसन वाणाची लागवड झाली. मित्रांसोबत दररोज चर्चा घडू लागल्या. नवे प्रयोग, पिकाचे एकेक बारकावे समजून घेणं हे सगळं जणू रोजचं शिक्षणच बनलं. पहिल्या उत्पादनातच प्रति किलो १०५ रुपयांचा दर मिळाला..त्या क्षणी शेतीचा खरा आनंद प्रवीण आणि कुटुंबाच्या चेहऱ्यावर उमटला. आत्मविश्वास दुणावला. आता अधिक अभ्यास, नियोजन आणि व्यवस्थापनाच्या जोरावर प्रवीण एकेक पाऊल पुढे निघाले. आज तब्बल १० एकरांवर द्राक्ष बागेचा विस्तार केला आहे. निर्यातक्षम गुणवत्तेच्या निकषांनुसार बागेचे व्यवस्थापन केले जाते. पान, देठ आणि माती परीक्षणानुसार अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन होते. लागवड अंतरानुसार प्रति वेलीला २५ ते ३० पर्यंत घडांची संख्या असते. काढणीच्या ५० दिवस आधी घडांना पेपरचे आच्छादन केले जाते..निर्यातक्षम उत्पादनमागील पाच वर्षांत निर्यातक्षम उत्पादनात सातत्य ठेवले आहे. एकरी १२ टन व त्यापुढेही उत्पादन मिळते आहे. मागील दोन वर्षांत सहा एकरांत सुमारे ८० टन उत्पादन घेतले. निर्यातदारांना ते द्राक्षे पुरवतात. त्यातून युरोपला निर्यात होते. उत्कृष्ट गुणवत्ता असलेल्या द्राक्षांना मागील तीन वर्षांच्या कालावधीत प्रति किलो ८५, ९० ते ९५ रुपयांपर्यंत दर मिळाला आहे..प्रवीण महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे सदस्य आहेत. आजपर्यंत आपल्या मालाचे एकही सॅंपल तपासणीत फेल गेले नसल्याचे ते सांगतात. पत्नी प्रीती, मुले पृथ्वीराज, प्रचिती असे प्रवीण यांचे कुटुंब आहे. त्यांच्यासह वडील भीमराव, आई अरुणा, सेनादलातून सेवानिवृत्त बंधू वैभव, त्यांची पत्नी सारिका, त्यांची मुले वेदांत व विनायक या सर्वांचीही मोठी साथ प्रवीण यांना मिळते. वायफळे येथील महेश पाटील, विकास पाटील या सहकाऱ्यांच्या प्रेरणेतून प्रवीण नव्या वाणांकडे वळण्याच्या विचारात आहेत.प्रवीण पाटील ९०११३१३२०३.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.