Young Farmer Success: बी.एस्सी., बी.एड.पर्यंत शिक्षण घेतलेल्या कृष्णा माधवराव शिंदे या तरुणाने आपल्या वडिलोपार्जित पीक पद्धतीमध्ये हळूहळू बदल केले. पपई, टरबूज अशा फळपिकांसोबतच भाजीपाला पिकांवर भर दिला. वर्षभर अशा नगदी पिकांच्या शेतीमुळे कुटुंबाच्या उत्पन्नात चांगली वाढ साधली आहे. .नांदेडपासून सुमारे ५५ कि.मी. अंतरावरील मांजरम (ता. नायगाव) येथील कृष्णा माधवराव शिंदे याने बी.एस्सी., बी.एड.पर्यंत शिक्षण घेतले. बी.एस्सी. पदवी घेतल्यानंतर पुण्यामध्ये सात ते आठ महिने एका खासगी कंपनीत कामही केले. परंतु नोकरीमध्ये मन रमत नसल्यामुळे वडिलोपार्जित शेती करण्याचा निर्णय घेतला. सात एकर शेतीत वडिलांसारखी पारंपरिक पिके घेण्यापेक्षा त्यांनी पपई, टरबूज अशा फळपिकांसह भाजीपाला पिकावर भर दिला. त्यातून वर्षभराचे नियोजन व्यवस्थित लावत चांगला जम बसवला आहे..पारंपरिक शेतीकृष्णा यांचे वडील माधवराव शिंदे यांचे गावातच सिनेमा टॉकीज होते. त्यांना शेतीकडे फारसे लक्ष देता येत नव्हते. त्यामुळे ते प्रामुख्याने खरिपात सोयाबीन, कपाशी, तूर, हळद, तर रब्बी हंगामामध्ये हरभरा, गहू अशी पारंपरिक पिके घेत. मात्र दोन मुली आणि एका मुलाच्या शिक्षणाचा खर्च वाढत चालल्याने अडचणी येत होत्या. त्यांनी ओढाताणीमध्ये मुलाचे शिक्षण आणि एका मुलीचे लग्न केले. वडिलांचे कष्ट आणि आबाळ बघत असलेल्या कृष्णाने बी.एस्सी.चे शिक्षण २०१८ मध्ये पूर्ण केले. काही काळ पुण्यामध्ये नोकरी केली. पण गावी शेतीच करायचे असे ठरवत नायगाव येथे बी.एड. करायचा निर्णय घेतला. .Agricultural Equipment Bank: महिला गटाने उभारली कृषी अवजारे बँक.हे शिक्षण सुरू असतानाच शेतीमध्ये जास्तीत जास्त लक्ष देऊ लागले. आई, आज्जी आणि वडील अशा कुटुंबीयांसोबत काम करताना त्यांनी शेतीचा जवळून अनुभव घेतला. त्यातून पारंपरिक पिकातून फारसे काही हाती राहत नाही, हे लक्षात आले. मग पिकात बदल करण्याचा निर्णय घेतला. २०१९ ते २०२३ या काळात पपई व टरबूज अशी पिके घेतली. सोबतच अन्य शेतात वर्षभर दोडका, कारली, मिरची, कोबी, आवरा (शेंगावर्गीय भाजी) यासारख्या भाजीपाला पिकांची लागवड सुरू केली. त्यामुळे हाती पैसा खेळता राहू लागला..नातेवाइकाकडून घेतली प्रेरणाकृष्णा शिंदे यांनी सांगितले, की बेळी (ता. मुखेड) येथील मारुतराव जुने हे माझे आतेमामा लागतात. त्यांच्याकडे भाजीपाला आणि फळपिके प्रामुख्याने घेतली जातात. त्यांच्याशी केलेली चर्चा, त्यांच्याकडून घेतलेली माहिती ही पीक बदलासाठी उपयुक्त ठरली. पहिल्यांदा दहा गुंठ्यात वांगे पिकाची लागवड केली. त्यातून चांगले उत्पादन मिळाल्याने माझा आत्मविश्वास वाढला..पपईसोबत आंतरपीक टरबुजाचे नियोजनकृष्णा शिंदे यांनी २०१९ मध्ये दोन एकरमध्ये पपई लागवडीचा निर्णय घेतला. एकरी पाच ट्रॉली शेणखत टाकून पलटी नांगरट केली. रोटाव्हेटर मारून आठ फूट अंतरावर बेड टाकले. या बेडवर एकरी १०० किलो डीएपी, ५० किलो पोटॅश, दोन पोते निंबोळी पेंड, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, दहा किलो सल्फर असा रासायनिक खतांचा बेसल डोस दिला. मल्चिंग पेपर अंथरून घेतला. .पपई लागवडीपूर्वी टरबूज रोपांची लागवड आठ बाय सव्वा फूट या अंतरावर एक जानेवारीला केली. या प्रमाणे टरबुजाची एकरी सात हजार रोपे लागली. रोपवाटिकेतून टरबूज रोपे २.३० रुपये प्रति रोप या दराने विकत घेतली. वीस दिवसांनी त्याच बेडवर आठ फूट बाय सहा फूट अंतरावर पपईची एकरी सुमारे ९०० रोपे लावली. ही रोपे १४ रुपये प्रति रोप या प्रमाणे खात्रीशीर रोपवाटिकेतून विकत घेतली. रोपे चांगली सेट झाल्यानंतर ठिबकद्वारे विद्राव्य खते देण्यास सुरुवात केली. वाढीच्या टप्प्यानुसार खतांमध्ये योग्य ते बदल केले जातात..Agriculture Success Story: संघर्षातून ‘यशा’ला घातली गवसणी .पपईची तोडणी सतत सहा महिने सुरूपपईची लागवड २० जानेवारी रोजी लागवड केल्यानंतर पपईची फळे ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये काढणीस येतात. एकरी ३० ते ४० टन उत्पादन हाती येते. पपईला सरासरी आठ ते दहा रुपये प्रति किलो दर मिळाला तरी एकरी अडीच ते चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. टरबुजाच्या पिकासाठी केलेल्या व्यवस्थापन खर्चातच पपईची बरीचशी कामे होऊन जातात. त्या व्यतिरिक्त एकरी ५० हजारांपर्यंत खर्च येतो..वर्षभर भाजीपाला शेतीकृष्णा यांचे माधवराव आणि आई सुरेखा यांचे शेतीमध्ये मोठे पाठबळ आहे. त्यांच्या मदतीमुळेच वर्षभर दोडका (एक एकर), आवरा (अर्धा एकर), कारली (एक एकर), मिरची (एक एकर) अशी पिके सुमारे तीन ते साडेतीन एकरांमध्ये घेतली जातात. या पिकातून त्यांना दरवर्षी तीन ते साडेतीन लाख रुपये उत्पन्न मिळते. या भाजीपाला पिकांचा खर्च एक लाख रुपयांपर्यंत होतो..उत्पन्नांचे गणितच बदलले...पारंपरिक पिकांऐवजी कृष्णा शिंदे यांनी शेतात फळपिके आणि भाजीपाला लागवडीस सुरुवात केल्यानंतर कुटुंबीयांचे उत्पन्न वाढत गेले. मागील तीन वर्षांत त्यांना पपईपासून २५ लाख, टरबुजापासून पंधरा लाख रुपये असे ४० लाख रुपये मिळाले. उत्पादन खर्च बारा लाख रुपये वजा जाता त्यांना २५ ते २८ लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले. या उत्पन्नातूनच त्यांनी आपल्या बहिणीचे लग्न, घराचे बऱ्याच काळापासून अर्धवट राहिलेले बांधकाम पूर्ण केले. याच प्रमाणे शेतीवरील एक लाख कर्जाची परतफेडही केली आहे..मागील दोन वर्षांपासून अतिवृष्टीचा फटका२०१८ ते २३ पर्यंत फळपिके आणि भाजीपाला पिकांचे चांगले उत्पादन मिळाले. पण २०२४ आणि २०२५ मध्ये मात्र त्यांना अतिवृष्टी, गारपीट यांचा मोठा फटका बसला. वादळी वाऱ्यामुळे भाजीपाल्याचा मंडप कोसळून पडला. एप्रिल २०२५ मध्ये लागवड केलेल्या टरबुजाचे तर मे व जूनमधील वादळी वाऱ्यामुळे पूर्ण नुकसान झाले. पण तशीच हिंमत बांधून काम करत असल्याचे कृष्णा यांनी सांगितले..टरबूज एकरी सरासरी २५ टन उत्पादनमागील सतत तीन वर्षांत कृष्णा यांना टरबुजाचे एकरी सरासरी २० टनांपेक्षा अधिक उत्पादन मिळाले आहे. त्याला सरासरी आठ ते दहा रुपये प्रति किलो दर मिळतो. साधारण एकरी ८० हजारांपर्यंत उत्पादन खर्च वजा जाता निव्वळ एक ते सव्वा लाख रुपये उत्पन्न हाती येत असल्याचे कृष्णा सांगतात. कृष्णा यांनी २०२२ मध्ये बिगर मोसमी टरबुजाची लागवड केली. १८ जुलै ला दीड एकरात केलेल्या टरबूज लागवडीत २५ टन उत्पादन मिळाले. उत्पादन कमी मिळाले तरी प्रति टन २२ हजार रुपये दर मिळाल्याने साडेपाच लाख रुपयांचे उत्पन्न हाती आले. हाच माझ्यासाठी ‘टर्निंग पॉइंट’ ठरल्याचे कृष्णा सांगतात.कृष्णा माधवराव शिंदे ७५०७५१५९९१.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.