Rice Mill : ‘राइस मिल’द्वारे शेतकऱ्यांना मोफत सेवा

पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील आदिवासी गोद्रे भागातील शेतकऱ्यांनी हटकेश्‍वर शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली. भागातील आदिवासी शेतकऱ्यांना भात भरडून घेण्यासाठी येणाऱ्या अनेक समस्या लक्षात घेऊन राइस मिल सुरू केली. शेतकऱ्यांना मोफत सेवा देण्यासह प्रक्रियेतून तयार होणाऱ्या उपपदार्थांची विक्री व उत्पन्न मिळविण्यास सुरुवात केली. त्यातून कंपनीची आश्‍वासक वाटचाल सुरू झाली आहे.
Rice Mill
Rice Mill Agrowon
Published on
Updated on

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील डोंगराळ भागातील ग्रोद्रे व नजीकची काही गावे आदिवासीबहुल (Tribal Farmer) आहेत. या भागात सोयाबीन (Soybean), भुईमूग आदी पिके घेतली जातात. मात्र भात (Paddy) हे येथील शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे. येथील शेतकऱ्यांचा विकास होण्याच्या दृष्टीने येथे स्वयंसेवी संस्था ल्युपीन फौंडेशनने (Lupin Foundation) काम सुरू केले. त्यासाठी संस्थेचे जिल्हा प्रकल्पाधिकारी व्यकंटेश शेटे, नीलेश जोंधळे यांचे सहकार्य लाभले. गोद्रे व परिसरातील गावांमधील शेतकरी आज संघटित झाले आहेत. त्याचाच भाग म्हणून त्यांनी हटकेश्‍वर शेतकरी उत्पादक कंपनीची (Hatakeshwar Farmer Producer Company) सन २०१९ मध्ये स्थापन केली.

कंपनीची स्थापना

‘हटकेश्‍वर’च्या उभारणीबाबत अध्यक्ष राजाराम रेंगडे म्हणाले, की आमच्या भागात स्वयंसेवी संस्थेतर्फे सुमारे ९७ एकरांमध्ये फळबाग लागवड वाडी प्रकल्प सुरू झाला होता. त्याला आनुषंगिक १९ महिला बचत गटांची स्थापना झाली. या माध्यमातून महिलांचे संघटन सुरू असताना पुरुषांचाही त्यांना पाठिंबा होता. पुरुषांनीही याच पद्धतीने एकत्र यावे यावर एकमत झाले आणि शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापन झाली. त्यासाठी नऊ वाड्या आणि १० गावठाणांमध्ये शेतकऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या. कंपनी स्थापन करण्याचे महत्त्व व फायदे समजावून सांगण्यात आले.

कृषी निविष्ठा सेवा

आदिवासी बहुल भाग असल्याने येथील शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीडनाशके आदी निविष्ठा आणण्यासाठी जुन्नरच्या बाजारपेठेत जावे लागे. पावसाळ्यात दळणवळणाची वाहने वेळेवर उपलब्ध होत नसायची. मग शेतीत अडचणी व्हायच्या. निविष्ठा आणण्यामध्ये एक दिवस वाया जायचा. पैसेही जास्त खर्च व्हायचे. ही समस्या लक्षात घेऊन कंपनीने सर्वप्रथम भात, सोयाबीन आदी पिकांना लागणाऱ्या निविष्ठांचा व्यवसाय सुरू केला.

Rice Mill
Rice Export : भारताची तांदूळ निर्यात २५ टक्के घटणार?

सुमारे २८६ सभासदांची नोंदणी केली. प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे दोन लाख ८६ हजार रुपयांचे भागभांडवल तयार झाले. त्यातून पहिल्याच वर्षी सुमारे १२ लाख रुपयांचा व्यवसाय करणे शक्य झाले. दोन वर्षांत व्यवसायात वाढ झाली. कंपनीचा हिशेब आणि लेखाजोखा संगणकीकरणाद्वारे तयार केला जातो. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी घोडे यांच्यावर ही जबाबदारी आहे. सचिवपदी संपत सुरकुले असून लालू रेंगडे शेतीमाल संकलन आणि प्रक्रिया तर मिथुन सुरकुले विपणन जबाबदारी पाहतात.

राइस मिलची उभारणी

निविष्ठांच्या व्यवसायातून आत्मविश्‍वास आला. आता पुढची समस्या सोडवण्यासाठी कंपनीने पाऊल उचलले. प्रमुख पीक भातावर प्रक्रिया करण्यासाठी स्वतःची राइस मिल का उभारू नये असा विचार संचालकांनी केला. त्यानंतर नाबार्ड, ल्युपीन आणि आदिवासी प्रकल्प (घोडेगाव, ता. आंबेगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने २० लाख रुपयांचा प्रस्ताव तयार झाला.

Rice Mill
Rice Export : भारत ठरला चीनचा मुख्य तांदूळ पुरवठादार

पैकी साडेसात लाख रुपये आदिवासी प्रकल्प योजना, नाबार्डद्वारे पाच लाख, ल्युपीनद्वारे दोन लाख ५३ हजार व शेतकऱ्यांचे भांडवल सव्वादोन लाख रुपये २५ हजार आणि अन्य निधी संकलन झाले. त्यातून ‘राइस मिल’ची गेल्या वर्षी उभारणी झाली. खर्च कमी करण्यासाठी कंपनीच्या सदस्यांनी श्रमदान करीत त्याचे बांधकाम केले. केवळ ‘फॅब्रिकेशन’ आणि यंत्रणा उभारणीसाठी प्रशिक्षित कामगारांचा वापर करण्यात आला.

शेतकऱ्यांना मोफत सेवा

या मिलद्वारे शेतकऱ्यांकडून कोणतेही सेवाशुल्क न घेता मोफत भात भरडून देण्यात येतो. तालुक्यात सुमारे चार राइस मिल्स आहेत. पूर्वी शेतकऱ्यांना या कामासाठी किमान दहा किलोमीटर अंतरावर जाऊन जुन्नर भागातील मिलमध्ये भात भरडण्यासाठी न्यावा लागत असे. यात वाहतूक खर्च जायचा. वेळेचा अपव्यय व्हायचा.

शिवाय पोत्यामागे ५० ते १०० रुपये द्यावे लागायचे. आता स्थानिक स्तरावरच शेतकऱ्यांचे काम सोपे झाले आहे. केवळ कंपनीच्या सभासदांनाच नव्हे, तर बिगर सभासदांना ही सेवा मोफत दिली जाते. पावणेतीनशेहून अधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे..

मिळवली बाजारपेठ

या प्रक्रियेतून भाताचे तूस व पीठ असे उपपदार्थ तयार होतात. त्यांची विक्री हाच कंपनीचा उत्पन्नाचा मार्ग आहे. ‘हटकेश्‍वर’च्या पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी बाजारपेठ शोधली. पोल्ट्री उद्योगासाठी भाताच्या तुसाचा वापर केला जातो. परिसरातील पोल्ट्री उत्पादकांच्या भेटी घेऊन त्यांच्याकडून मागणी तयार केली. यंदा त्यातून सहा टन विक्री साध्य केली. कोंबडी खाद्य आणि बिस्कीट उद्योगाकडून पिठाला मागणी आहे. संबंधित व्यावसायिक शोधून त्यांच्याकडूनही मार्केट मिळवले. सुमारे दोन टनांपर्यंत त्याची विक्री झाली.

सोयाबीन तेल मिलच्या उभारणीसाठी प्रयत्न

गावपरिसरात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरच सोयाबीन खरेदी आणि प्रक्रियेद्वारे तेल मिल उभारण्याचे कंपनीचे प्रयत्न आहेत.

कंपनीद्वारे देण्यात येणाऱ्या सेवा

-रास्त दरात कृषी निविष्ठांचा पुरवठा.

-बांधावर जाऊन पीक संरक्षण व खते व्यवस्थापन मार्गदर्शन.

-बांधावर जाऊन भात संकलन

अध्यक्ष - राजाराम रेंगडे - ९७३०३०४३१६

सचिव - संपत सुरकुले - ९६६५८३६२९८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com