शेळीपालनातून आर्थिक स्थैर्य अन् स्वयंपूर्णता

गादेगाव (ता. पंढरपूर. जि. सोलापूर) येथील दत्तात्रेय बागल व कुटुंबाने सात वर्षांपूर्वी दोन शेळ्यांपासून बंदिस्त शेळीपालन व्यवसाय सुरू केला. बाजारातील मागणी ओळखून सिरोही, उस्मानाबादी, बीटल, सोजत अशी विविधता ठेवत व उत्कृष्ट व्यवस्थापन, नियोजन करून ५४ शेळ्यांपर्यंत संख्या वाढवत या व्यवसायातून स्वयंपूर्ण होत अर्थकारणही सक्षम केले आहे.
Goat Farming
Goat FarmingAgrowon

सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे सोनके रस्त्यावर कुंभमळा परिसरात दत्तात्रेय बागल यांची साडेसहा एकर शेती आहे. उजनी तसेच अन्य जलस्रोत असल्याने पाण्याची मुबलकता असून ऊस, द्राक्ष, टोमॅटो, वांगी आदी पिके ते घेतात. दत्तात्रेय यांना ३० वर्षांपासून शेतीचा अनुभव आहे. ऊस तसेच भाजीपाला पिकांच्या दरांची स्थिती पाहून सात वर्षांपूर्वी पूरक व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय त्यांनी घेतला. विशेष म्हणजे आई सौ. बबिता, वडील कुमार, पत्नी स्मिता असे संपूर्ण कुटुंब राबत असल्याने तो अविरत व यशस्वी सुरू ठेवणे शक्य झाले. मुलगा प्रतीकचीही मदत होते. मुलगी प्रतीक्षा स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी पुण्यात आहे. शेतीएवढाच शेळीपालनावर कुटुंबाचा मुख्य आर्थिक डोलारा उभा आहे.

दोन शेळ्यांपासून सुरुवात

शेतीला जोड म्हणण्यापेक्षा कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या काहीतरी हातभार लागेल म्हणून दत्तात्रेय यांच्या आई आणि पत्नी यांनी घर-शेती बघत शेळ्याही सहज सांभाळू शकतो असा विचार केला. त्यातून दोन शेळ्या आणल्या. त्यानंतर टप्प्याटप्प्याने शेळ्यांची संख्या वाढत गेली. आज हा कुटुंबाचा मुख्य व्यवसाय झाला आहे. शिवाय दोन म्हशी, एक खिलार गायही आहे. शेळीपालनातून मिळणारे उत्पन्न, स्वावलंबित्व तसेच खात्रीशीर उत्पन्नाचा उत्तम मार्ग या व्यवसायातून असल्याचे कुटुंबाला कळाले. मग दोन वर्षांपूर्वी पंढरपूर येथील संस्थेच्या शेळीपालन वर्गात बागल दांपत्याने भाग घेतला. त्यातून शेळ्यांच्या जाती, वैशिष्ट्ये, आजारपण, व्यवस्थापन आदी तांत्रिक माहिती मिळाली. मग आत्मविश्‍वास अजून वाढला.

Goat Farming
Goat FarmingAgrowon

...अशी आहे शेळ्यांची विविधता

आज एकूण ५४ शेळ्या व त्यांच्यासाठी बंदिस्त शेड आहे. त्यात तीन देशी, काही उस्मानाबादी, मोठ्या सिरोही २२ शेळ्या, सोजत व बीटल आदींचा समावेश आहे. वजन, उंचीला तुलनेने चांगली, कमी आजारी पडणारी, काटक व अधिक मागणी म्हणून सर्वाधिक सिरोही जातीची संख्या आहे. बीटलही उंच आहे. रंग काळा, लांब कान व चेहरा आखूड असून मागणी चांगली आहे.

व्यवस्थापनातील बाबी

पूर्ण बंदिस्त प्रकारातील शेळीपालन. ५० बाय ३० फूट आकाराचे शेड.

-शेळ्या, बकरे यांच्यासाठी स्वतंत्र कप्पे वा व्यवस्था.

-जागेवरच चारा-पाण्याची सोय.

-दररोज सकाळी सहा व दुपारी चार वाजता संपूर्ण शेडची स्वच्छता.

-सकाळी सातच्या सुमारास मका, कंपनीचे खाद्य प्रति शेळी २०० ग्रॅम या प्रमाणात दिली जाते.

-सकाळी आठच्या सुमारास प्रति शेळी एक किलो मुरघास.

-सकाळी दहाच्या सुमारास गवताची कुट्टी. दुपारी साडेबाराच्या सुमारास तूर, सोयाबीन यांचे भुसकट साधारण प्रति शेळी दोन किलो. त्यानंतर दिवसभर कोणता चारा दिला जात नाही.

-सकाळी दहा आणि सायंकाळी पाच तसेच गरजेनुसार पाणी. दर पंधरा दिवसांनी द्रव स्वरूपातील टॉनिक. दर दहा दिवसांनी शेडमध्ये निर्जंतुकीकरण फवारणी.

Goat Farming
Goat FarmingAgrowon

चाऱ्याची संरक्षित व्यवस्था

दीड एकरांत यंदा नव्याने भगवा वाणाचे डाळिंब लावले आहे. ऊस साडेतीन एकरांत आहे. त्याचे एकरी ६५ ते ७० टन उत्पादन घेण्यात येते. दीड एकर क्षेत्र चारा पिकांसाठी ठेवले आहे. शेताच्या बांधावरही चारापीक घेतले आहे. पाणी देण्यासाठी बांधावरच ठिबकची लाइन अंथरली आहे. मका, ऊस व गवत यांच्यापासून मुरघास तयार केले जाते. सुमारे सव्वा टनापर्यंत किंवा पुढील पाच ते सहा महिने पुरेल इतकी चाऱ्याची सोय ठेवली जाते. तूर, सोयाबीन यांचे प्रत्येकी एक टनापर्यंतचे भुसकट उपलब्ध आहे.

विक्री व्यवस्था

सुमारे शंभर किलो वजनाचा देखणा, ताकदवान सिरोही जातीचा तसेच सोजत, बीटल यांचेही पैदाशीसाठी बकरेही आहेत. त्यातूनच पैदास वाढवत व्यवसाय वाढवला. परिसरातील अन्य शेतकऱ्यांनाही या बकऱ्यांद्वारे शेळी पैदास करून देण्यात येते. त्यासाठी सोजत २५०, सिरोही ३०० रुपये, तर बीटलसाठी ५०० रुपये दर आकारला जातो. सुमारे १५ महिन्यांत शेळी दोन वेळा विते. पैदाशीसाठी प्रति किलो ३५० रुपये दराने नर किंवा मादीची विक्री केली जाते. अधिक करून बकऱ्यांचीच व वजन २८ ते ३० किलोच्या दरम्यान असताना विक्री होते. एका वर्षात १५ बकरे आणि २० करड्यांची विक्री होते. एकूण उत्पन्न अडीच लाख रुपयांहून अधिक मिळते.

Goat Farming
Goat FarmingAgrowon

सोशल मीडियाद्वारे विपणन

बागल यांना आजपर्यंत बाजारात नेऊन विक्री करण्याची तसदी घ्यावी लागलेली नाही. याच परिसरातील गादेगावसह सोनके, वाखरी, पंढरपूर, कोर्टी भागांतील ग्राहक थेट जागेवर येऊन खरेदी करतात. फेसबुक पेजवरूनही विक्रीयोग्य शेळी-बकऱ्यांची माहिती देण्यात येते. त्यातूनही ग्राहकांची संख्या वाढली आहे.

ऊस असो वा डाळिंब, विक्रीसाठी व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. तसे शेळीपालनात नाही. शेळ्यांना जागेवर मार्केट आहे. त्यात स्वयंपूर्णता आहे असा आमचा अनुभव आहे.
दत्तात्रेय बागल, ७७०९७७७९५९

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com