काजू प्रक्रियेतून आर्थिक स्वयंपूर्णता
गुहागर (जि. रत्नागिरी) तालुक्यातील आवरे हे स्नेहा मोरे यांचे माहेर आणि शीर हे सासरचे गाव. या ठिकाणी त्यांची केवळ एक एकर भात शेती असल्याने उपजीविकेसाठी स्नेहा आणि त्यांचे पती अनिल हे मुंबईमध्ये नोकरी निमित्त स्थायिक झाले होते. स्नेहाताईंच्या आई आवरे गावातील महिला बचत गटामध्ये कार्यरत होत्या. हा महिला गट (Women's Self-Help Groups) दरवर्षी विविध पदार्थांच्या विक्रीसाठी मुंबईतील बचत गट संमेलनात सहभागी होत असे. त्यावेळी स्नेहा या महिलांना भेटायला स्टॉलवर जात होत्या. त्यावेळी मुंबईतील ग्राहकांच्याकडून कोकणातील विविध प्रक्रिया पदार्थांना असलेली मागणी त्यांच्या लक्षात आली.
बाजारपेठेचा अभ्यासकरून मुंबईमध्ये नोकरी करण्यापेक्षा गावी काजू प्रक्रिया उद्योग (Cashew Processing Business) सुरू करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. २०११ मध्ये गावी परत आल्यावर त्यांनी गावातील महिला बचत गटात सहभाग नोंदविला. शहरी बाजारपेठेचा अभ्यास करून स्नेहाताईंनी २०१२ मध्ये शीर गावामध्ये स्वतःचे छोटे काजू प्रक्रिया (Cashew Processing) युनिट सुरू केले. टप्प्याटप्याने त्यांनी या प्रक्रिया उद्योगाच्या (Processing Industry) उभारणीसाठी २५ लाख रुपयांची गुंतवणूक केली. यासाठी स्नेहाताईंनी सोने, जमीन तारण ठेवून कर्ज घेतले.
प्रक्रिया व्यवसायातून प्रगती ः
पती अनिल यांच्यासह कुटुंबीयांच्या पाठबळामुळे स्नेहाताईंनी काजू प्रक्रिया युनिटचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. काजू बी फोडण्यापूर्वी वाफेवरून काढणे, वाळविण्यासाठी आवश्यक यंत्रणा विकत घेतली. काजू उत्पादनाचा हंगाम मार्च, एप्रिल, मे हा तीन महिन्यांचा. मात्र वर्षभर युनिट चालवण्यासाठी काजू बी घेऊन ठेवण्याशिवाय पर्याय नसतो. स्नेहाताईंना गुहागर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून काजू बी विकत घ्यावी लागते. तेवढी गुंतवणूक करण्यासाठी त्यांच्याकडे पैशांचा अभाव होता. यासाठी मोरे यांनी शक्कल लढवली. डिसेंबर महिन्यात पैसे देण्याच्या बोलीवर शेतकऱ्यांकडून काजू बी खरेदी करण्यास सुरुवात केली. काही शेतकऱ्यांकडून रोखीने बी विकत घेतली जाते. काजू बीवर प्रक्रिया केल्यानंतर गर पॅकिंग करून विक्री केली जाते. यातून पैसे आले की शेतकऱ्यांना काजू बी खरेदी रक्कम दिली जाते.
बचत गटाला प्रोत्साहन ः
स्वतःचे युनिट सुरू असतानाच अन्य महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी स्नेहाताईंनी २०१८ मध्ये उमेद अभियानांतर्गत दहा महिलांना एकत्र करून चंडिका महिला बचत गटाची स्थापना केली. या गटातील महिला शेतकऱ्यांकडील काजू बी विकत घेऊन मोरे यांच्या युनिटमधून प्रक्रिया करून घेतात. प्रतिवर्ष गटातर्फे १० टन काजू बीवर प्रक्रिया केली जाते. स्नेहाताई दरवर्षी ५५ टन काजू बीवर प्रक्रिया करतात. सरस, महालक्ष्मी प्रदर्शनाच्या माध्यमातून चंडिका बचत गटाच्या महिला काजू गराची विक्री करतात.
प्रतवारीनुसार काजू विक्री ः
विक्रीसाठी पाच ग्रेडमध्ये काजू गराची प्रतवारी केली जाते. प्रतवारी आणि बाजारपेठेतील मागणीनुसार ६५० ते १,०६० रुपये प्रति किलो या दराने काजू गराची विक्री होते. पाकळी, तुकडा हे प्रकार देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शीर गावात येणारे चाकरमानी स्नेहाताईंकडून काजूगराची खरेदी करतात. या व्यतिरिक्त मुंबई, पुणे, नागपूर, पनवेल, ठाणे यासह दिल्ली, हरियानामध्येही काजू गराची विक्री केली जाते.गुणवत्तेमुळे दरवर्षी काजूगराची मागणी वाढत आहे.
संपर्क ः स्नेहा मोरे, ७५८८५७३०४७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.