Pomegranate : निर्यातक्षम डाळिंब उत्पादनात जाधव बंधूंचा हातखंडा

नाशिक जिल्ह्यातील सातमाने (ता.मालेगाव) येथील केवळ व प्रवीण या जाधव बंधूंनी विविध संकटांवर मात करून निर्यातक्षम डाळिंब उत्पादन (Export Quality Pomegranate Production) व त्याच्या विक्रीव्यवस्थेत हातखंडा तयार केला आहे. सेंद्रिय, रासायनिक निविष्ठांचा योग्य मेळ, सिंचन, बहार व एकूणच आदर्श शेती पध्दतीचे त्यांचे व्यवस्थापन अनुकरणीय आहे. याच पिकातून कुटुंबाचा उत्कर्ष त्यांनी साधला आहे.
Pomegranate
PomegranateAgrowon
Published on
Updated on

नाशिक जिल्ह्यातील सातमाने (ता.मालेगाव) येथील केवळ व प्रवीण या जाधव बंधूंनी आदर्श व्यवस्थापनातून डाळिंब शेतीत (Pomegranate Farming) वेगळी ओळख तयार केली आहे. त्यांचे वडील कै.घेवर तोताराम जाधव हयात असताना गहू, बाजरी, कांदे (Onion) अशी पीकपद्धती होती. मोठ्या मुलाला (केवळ) डॉक्टर करायचे त्यांच्या मनात होते. पण केवळ दहावीला तर भाऊ प्रवीण सातवीला असताना त्यांचे १९८९ मध्ये अकाली निधन झाले. सर्व काही कोलमडले. दोन्ही भावंडांच्या वाट्याला लहानपणीच संघर्ष आला. वडिलोपार्जित ३२ एकर क्षेत्र होते. वडिलांचे निधन झाल्याच्या काळानंतर सलग दहा वर्षे दुष्काळ सहन करावा लागला. पण शेतीत वेगळे काही करून दाखवण्याच्या ध्येयापोटी प्रतिकूलतेतही बदलांची सुरवात केली. (Export Quality Pomegranate Production)

Pomegranate
खतांच्या अति वापरामुळे डाळिंब बागा धोक्यात

डाळिंबातील वाटचाल

पाण्यापासून सुरवात करताना शिवारात २० कूपनलिका खोदल्या. अपेक्षित पाणी लागले नाही. दरम्यान अभ्यासातून डाळिंब पीक निश्‍चित केले. सन १९९२ मध्ये गणेश डाळिंबाच्या १६० झाडांची लागवड केली. संकटांशी सामना करीत हळूहळू या पिकातही यश मिळू लागले. आत्मविश्वास वाढला. चढ उतार येतच राहिले. पण न खचता जिद्द, प्रयोगशीलतेतून पद्धतशीर काम ठेवले. जमिनी खरेदी करून डाळिंब लागवड वाढविल्या. समस्यांवर उपाय शोधून सिंचन, कीड-रोग, अन्नद्रव्ये व्यवस्थापनातील या बाबी तज्ज्ञांकडून समजून घेतल्या.

सिंचन स्रोतांचे बळकटीकरण

मोसम नदीकाठी वडनेर व वळवाडे येथे क्षेत्र खरेदी करून विहीर खोदली. सात ते नऊ किलोमीटरवरून पाइपलाइन करून पाणी आणले. दीड एकरांत तीन शेततळी उभारून तीन कोटी लिटर संरक्षित पाणीसाठा निर्माण केला. सध्या डबल लॅटरल पद्धतीने इनलाईन व ऑनलाइन ताशी १.५ व ८ लिटर पाणी विसर्ग होतो. उन्हाळ्यात प्रति झाडाला दिवसाआड ५० लिटर पाणी वितरण होते. अधिक ओलावा राहिल्यास पीक अडचणीत येऊ शकते. त्यामुळे वाफसा तपासूनच सिंचन केले जाते.

Pomegranate
शेतकरी पीक नियोजन : डाळिंब

मातीची जपली सुपीकता

सन २०१३ नंतर तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला. अनेकजण बागा काढून टाकत होते. जाधव बंधूंनीही अशावेळी मातीतील सेंद्रिय व जैविक घटकांचे प्रमाण, भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म वाढविण्यावर भर दिला. गांडूळखत, कोंबडीखत, प्रेसमड, मळी, साखर कारखान्याची राख व बोन पावडर तसेच ट्रायकोडर्मा, स्युडोमोनास, बॅसिलस, ई एम द्रावण संतुलित प्रमाणात मिसळून डेपो बनवला जातो. दीड महिना ठेऊन त्यातील ओलावा टिकवण्यासाठी पाण्याची फवारणी होते.

त्यातून तयार होणाऱ्या खताचा मृग बहरावेळी प्रति झाड २० ते २५ किलो प्रमाणात बोदावर वापर होतो. फळांची १०० ते २०० ग्रॅम वाढ झाल्याच्या अवस्थेत एरंडी, शेंगदाणा, सरकी, मोह यांचे मिश्रण असलेली ढेप प्रति झाड ७०० ग्रॅमपर्यंत दिली जाते. त्यामुळे झाडे सशक्त होऊन गुणवत्तापूर्ण फळधारणा होत असल्याचा अनुभव आहे. जमीन ओली असताना हानिकारक बुरशी कमी होण्यासाठी ट्रायकोडर्मा मित्रबुरशी वाढविण्यावर भर असतो.

कुटुंबाला मिळाली ओळख

वडिलोपार्जित ३२ एकर जमीन असताना कुटुंबातील सर्वांनी कष्ट करून सुमारे ६५ एकर जमीन खरेदी केली. आज ७० एकर बागायती असून २० एकरांत सुधारणा सुरु आहे. डाळिंब ५० एकरांत तर तैवान पिंक पेरू पाच एकरांत आहे. ट्रॅक्टर, अत्याधुनिक ब्लोअर यासह यांत्रिकीकरण करून मजूर टंचाईवर मात केली आहे. ३५ मजुरांना वार्षिक रोजगार दिला असून त्यांच्या प्रति कौटुंबिक जिव्हाळा जपला आहे. केवळ हे कुटुंबाचे प्रमुख असून आई कलावती, भाऊ प्रवीण, पत्नी मनीषा व भावजय कविता व घरातील मुलांची मोलाची साथ असते.

सन्मान

-सकाळ माध्यम समुहाकडून ‘गौरव भूमिपुत्रांचा’ व रोटरी क्लब ऑफ मालेगाव यांच्यातर्फे ‘आदर्श शेतकरी पुरस्कार

-नाशिक, नगर, सोलापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून प्रयोग पाहण्यासाठी सातत्याने भेटी.

-एकमेकांशी सल्लामसलत करूनच दोन्ही भाऊ व्यवस्थापन व सुसूत्रता ठेवतात.

डाळिंब बाग

लागवडीचे अंतर- (जमिनीच्या पोतानुसार)

१० एकरांत १४ बाय १० फूट, १५ एकरांत १३ बाय ९ तर २५ एकरांत १२ बाय ८ फूट.

-झाडांची एकरी संख्या- ३०० ते ४००

वाण-

भगवा व सुपर भगवा (१२ एकर)- झाडाला कमी काटे, अन्य वाणाच्या तुलनेत १५ दिवस आधी काढणीयोग्य, अधिक फळधारणा व एकसारखेपणा

व्यवस्थापन- ठळक बाबी

-कंपनी समजूनच व्यवस्थापन. आदर्श शेती पद्धतींचा (गुड ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस) वापर.

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, लखमापूर(ता.सटाणा) येथील डाळिंब तंत्रज्ञान व विस्तार केंद्राचे प्रभारी डॉ.सचिन हिरे यांचे मार्गदर्शन.

-तीन वर्षातील अतिवृष्टीमुळे मररोग, सूत्रकृमी व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला. नियंत्रण आणण्यासाठी विश्रांती काळात खोडे धुणे, अन्नद्रव्य व्यवस्थापन, मातीची सुपीकता आदी सूत्रे महत्त्वाची मानली.

-मृग, हस्त व आंबिया असे तीनही बहर घेतात.

-काढणीपश्चात बागेच्या विश्रांती काळात अन्न साठवणूक प्रक्रिया. त्यासाठी मुख्य व सूक्ष्मअन्नद्रव्यांची

मात्रा

-छाटणीनंतर बोर्डो फवारण्या. त्यानंतर पानगळ. काडी परिपक्वतेवर भर

-सूत्रकृमी नियंत्रणासाठी वरखतांसोबत प्रति झाड एक किलो निंबोळी पेंड.

-सेंद्रिय व रासायनिक कीडनशकांचा संतुलित मेळ. परागीभवन क्रियेसाठी मधमाशी अधिवास. त्यासाठी रसायनांचा मर्यादित वापर.

-रंग, चकाकी व प्रतिकारशक्ती वाढीसाठी फॉस्फरस व पोटॅश स्थिरीकरण जिवाणूंचा वापर

-बागेतील आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी पाचट, गवत यांचे आच्छादन

-जैविक निविष्ठांचा वापर अधिक केल्याने फळांना चकाकी व आकर्षकपणा.

क्रॉप कव्हर तंत्राचा वापर

उन्हाळ्यात फेब्रुवारी ते मे दरम्यान पाच वर्षांपासून १५ एकरांत ‘क्रॉप कव्हर’ तंत्रज्ञानाचा वापर होतो. त्यामुळे ‘सनबर्निंग’ न होता मालाची गुणवत्ता टिकून राहते. तीव्र सूर्यप्रकाशामुळे झाडे अशक्त होत नाहीत. थेट मुळाशी सूर्यप्रकाश जात नसल्याने पांढऱ्या मुळ्या अधिक कार्यक्षम राहतात. फळांना चट्टे पडत नाही.

एकरी उत्पादन:- ८ ते ९ टन. प्रति झाड २५ त ३० किलो (मोठी झाडे)

उत्पादन खर्च- किमान पावणेदोन लाख रुपये.

बाजारपेठ

व्यापरी जागेवर येऊन खरेदी करतात. ते व निर्यातदारांमार्फत बांगलादेश, आखाती देश व युरोप आदी परदेशांत तर देशांतर्गत बंगळूर, चेन्नई, दिल्ली, कोलकता आदी बाजारपेठांत माल जातो.

तीन वर्षांत मिळालेले दर (प्रतिकिलो)

५० रुपयांपासून ७०, ९० ते कमाल १२५ ते १६५ रू.

सर्वाधिक मृग बहरात उत्पादन घेण्यात येते. गुणवत्ता व आकार या दोन बाबीं दरांसाठी महत्त्वाच्या ठरतात. आंबिया बहरात उन्हाळ्यात चकाकी, रंग येणे आव्हानाचे असते. मात्र यशस्वी कामकाजातून ते साधले. ‘रेसिड्यू फ्री’ उत्पादनामुळे व्यापाऱ्यांकडून मागणी राहते. ४०० पासून ७०० ग्रॅमपर्यंत फळांचे वजन असते.

संपर्क: केवळ जाधव-७५८८५५४०६५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com