Beekeeping : शास्त्रीय मधमाशीपालनातून साधला उत्कर्ष

Honey Production : सातेरी मधमाशांच्या संगोपनातील पंधरा वर्षांच्या सातत्यातून वर्षाला दीडशे ते दोनशेपर्यंत मधमाशा पेट्यांची विक्री करण्याच्या व्यवसायात त्यांनी जम बसवला आहे.
Beekeeping
BeekeepingAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : यवतमाळ जिल्ह्यात वणी शहरापासून सुमारे १० किलोमीटरवर मानकी हे मूळ गाव असलेले बंडू कोंडूजी मोहुर्ले यांची पाच एकर शेती आहे. बारा वर्षांपासून ते वणीपासून दोन किलोमीटरवरील चिखलगाव येथे स्थायिक झाले. चिखलगाव हे वणी शहराचाच भाग असला तरी येथे १९ सदस्यीय स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. शहरालगतच असल्याने या भागात शहरीवस्ती झाली. परिणामी, गावाची लोकसंख्या १८ हजारांपेक्षा अधिक आहे.

मधमाशीपालनाची सुरुवात

शेतीचे अर्थकारण बळकट करण्यासाठी बंडू यांनी शेतीपूरक व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. ‘ॲग्रोवन’मधील विविध व्यावसायिक पिकांची माहिती व यशोगाथांच्या वाचनावर त्यांचा भर होता. ॲग्रोवनमधूनच मधमाशी पालनाविषयी कळाले. सन २००९ च्या दरम्यान मधमाश्‍यांच्या दोन पेट्यांची खरेदी करून प्रायोगिक तत्त्वावर मधमाशीपालन सुरू केले. परंतु व्यवसाय अजून वाढवायचा असेल, त्याला शास्त्रोक्‍त दृष्टिकोनाची जोड द्यायची असेल तर प्रशिक्षणाची गरज त्यांना भासू लागली.

खादी ग्रामोद्योगच्या वतीने पुणे येथील केंद्रीय मधमाशी संशोधन प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षणासाठी नोंदणी केली. पाच दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यातून तांत्रिक माहितीत भर पडली. व्यवसायाची गोडी लागली. परागीभवनासाठी शेतकऱ्यांना व संस्थांना मधपेट्यांची गरज भासते हे लक्षात येऊ लागले. त्यादृष्टीने मधमाशीपालन, संवर्धन व त्याआधारे वसाहती व त्यासहित मधपेट्यांची संख्या वाढवण्यास सुरुवात केली.

Beekeeping
Beekeeping : मधाचा ‘मधुबन’ ब्रॅण्ड जगात पोहचला पाहिजे

जंगलातून होते मधमाशांचे संकलन

बंडू सातेरी (सिराना इंडिका) जातीच्या मधमाश्‍यांचे पालन करतात. या मधमाश्‍या जंगलात, झाडाच्या खोडात, दगडाच्या कपारीत, मातीच्या वारुळात देखील मिळून येतात. विशेषतः अंधारी जागेत राहतात, असे बंडू सांगतात. त्या उपलब्ध होण्यासाठी बंडू स्वतः जंगलात भटकंती करतात.

शिवाय गुराखी किंवा तत्सम व्यक्‍तींना काही रक्कम देऊन विशिष्ट नेटच्या आधारे त्यांना गोळा करावे लागते. त्यानंतर त्यांना मधपेट्यात सोडण्यात येते. मधमाश्‍या पकडताना अनेकदा डंखही सहन करावा लागला आहे. सातेरी मधमाश्‍या तीन- पाच किलोमीटरपर्यंत मध संकलनासाठी जातात. त्यासाठी त्यांना मोकळे सोडण्यात येते. त्या पराग घेऊन आपल्या वसाहतीत परततात असेही बंडू सांगितले.

पेट्यांची व्यवस्था व माश्‍यांचे व्यवस्थापन

सुरुवातीच्या दोन पेट्यांपासून आज ९० ते १२० पर्यंत मधपेट्या बंडू यांच्याकडे आहेत. सुरुवातीच्या काळात मधविक्रीवर त्यांनी भर दिला होता. मात्र आता मधमाश्‍यांच्या वसाहती व पेट्या यांच्या विक्रीवरच संपूर्ण भर आहे. लाकडी पेट्या कोल्हापूरहून मागवण्यात येतात. या पेटीत अंडी उबवणीसाठी आठ तर मधासाठी (हनी चेंबर किंवा हनी कोंब) आठ अशा सोळा फ्रेम्स राहतात. पेटी तयार करण्यासाठी आडजात लाकडाचा वापर होतो. सागवानी लाकडाचा वापर केल्यास पेटीचा दर वाढतो.

तापमानवाढ व फुलोरा कमी या कारणांमुळे उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये राणी माशीचे अंडी घालण्याचे प्रमाण कमी होते. अन्य काळात ती दिवसाला एकहजार ते दोन हजारांच्या दरम्यान अंडी देऊ शकते. एका पेटीत दोन राणीमाशा राहू शकत नाहीत. अशावेळी दुसऱ्या राणी माशीची स्वतंत्र वसाहत तयार करावी लागते. एकूणच राणी माशीचे व्यवस्थापन या प्रक्रियेत महत्त्वाचे ठरते असे बंडू सांगतात.

Beekeeping
Beekeeping Management : परागीकरणासाठी मधमाशी पेट्यांचे व्यवस्थापन

कुटुंब झाले समाधानी

बंडू यांनी आपल्या शेतात तसेच घराच्या गच्चीवरही मधपेट्या ठेवल्या आहेत. त्यांना या व्यवसायात पत्नी पूजा, मुलगा मयूर (वय १६), संस्कार (वय १३) यांचीही मोठी मदत होते. याच व्यवसायातून कुटुंबाला समाधानी करता आले. वणी शहरात स्थलांतर करणे व तेथे काही लाखांचे पक्के घर बांधणे शक्य झाले याचे समाधान असल्याचे बंडू सांगतात.

अल्पभूधारक असलेले बंडू आपल्या पाच एकरांत कपाशी, सोयाबीन यांसारखी पिके घेतात. सन २०१६ मध्ये पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने त्यांनी विहीर खोदली. बोअरवेल घेतले. परंतु साडेतीन वर्षांत महावितरणकडे अर्ज करूनही त्यांना शेतीसाठी अद्याप वीजपुरवठा करण्यात आलेला नाही. आज त्यांना अन्य शेतकऱ्यांकडून पाणी घेऊन शेती करावी लागते.

उलाढाल पोहोचली लाखांवर

बंडू सांगतात, की फळबागायतदारांकडून परागीभवनासाठी मधपेट्यांची मागणी राहते. त्यादृष्टीने वर्षाला सुमारे ४० ते ६० पर्यंत पेट्यांची (मधमाशी वसाहतीसह) विक्री होते. त्यास साडेसहा हजार ते काही वेळा सातहजार रुपयांपर्यंत दर मिळतो. जिल्हा खादी ग्रामोद्योगकडूनही सातत्याने मधमाश्‍यांची मागणी असते. त्यांना केवळ वसाहतींचा पुरवठा तीन हजार रुपये दराने होतो.

वर्षाला या संस्थेला १०० ते १५० पर्यंत पेट्यांचा पुरवठा होतो. सध्या शासनातर्फे आदिवासी प्रकल्पांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील अंधारवाडी येथे प्रकल्प राबविण्यात येत आहे. तेथेही मागणीनुसार पुरवठा करण्यात येत आहे. अशा प्रकारे सुरुवातीला छोट्या प्रमाणात सुरू केलेल्या या व्यवसायाची उलाढाल आज पाच लाख वा त्याहून अधिक रकमेपर्यंत पोहोचली आहे.

बंडू मोहुर्ले ९६८९२६१६८७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com