Mix Cropping : सुधारित पीक पद्धतीमुळे साधली आर्थिक प्रगती

Fruit Farming : धुळे जिल्ह्यातील कळगाव येथील नितीन व पृथ्वीराज या ठाकरे बंधू डाळिंब, शेवगा, सीताफळ अशा फळबागांतून गुणवत्तापूर्ण व निर्यातक्षम उत्पादन घेतात.
Agriculture Success Story
Agriculture Success StoryAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : धुळे जिल्ह्यातील काळगाव (ता. साक्री) परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने प्रामुख्याने जिरायती पिके घेतली जात. येथील शेतकरी जयवंत सखाराम ठाकरे हेही सिंचन व्यवस्था नसल्याने मका, कापूस, भुईमूग, बाजरी अशी पिके खरिपात घेत असत. यातून मिळणारे उत्पन्न मर्यादित असल्याने गरिबीच्या झळा या कुटुंबाला सोसाव्या लागत होत्या. त्यात १९९४ मध्ये एकत्रित कुटुंब विभागले गेले. अडचणींमध्ये आणखी वाढ झाली.

भावंडाच्या विहिरीतून मिळणाऱ्या थोड्याफार पाण्यावर पिके घेण्याची त्यांची धडपड असायची. आर्थिक परिस्थिती नसल्याने थोरला मुलगा पृथ्वीराज यांना सातवीलाच शिक्षण सोडावे लागले. तर धाकटा मुलगा नितीन बारावी चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाला. त्याचा सिन्नर येथील डी.एड पदविकेसाठी प्रवेश निश्चित झाला होता. मात्र तिथे राहून शिक्षण घेण्याचा खर्च आपल्याला परवडणार नाही, असे वडिलांचे मत पडले.

त्यामुळे नितीन यांचे पुढील शिक्षणही थांबले. त्या काळात कशाबशा साठलेल्या १० हजार रुपये भांडवलातून ४५ फूट विहीर खोदली. शेतीला सिंचनाची सुविधा निर्माण झाल्याने रब्बी हंगामातही मका, तूर अशी पिके घ्यायला सुरुवात झाली. पुढे पृथ्वीराज व नितीन यांनी शेतीची जबाबदारी स्वीकारली. शेतीतील खर्च व उत्पादन, परिसरातील चांगल्या शेतकऱ्यांना भेटी देत ते नियोजन करू लागले. या परिवाराने शेतीतून चांगले उत्पन्न मिळवत यशाची एकेक पायरी चढायला सुरुवात केली.

जिरायती शेतीतून फलोत्पादनाकडे

२००४ मध्ये नितीन यांनी फलोत्पादन क्षेत्र निवडायचा निर्णय घेतला. त्यातही काटक अशा डाळिंबाला प्राधान्य दिले. सुरुवातीला एक एकर क्षेत्रावर मृदुला वाणाच्या ४०० रोपांची लागवड केली. त्यासाठी कृषिभूषण प्राप्त संजय भामरे, राजेंद्र भामरे अशा प्रगतिशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.

२००६ मध्ये उत्पादनाला सुरुवात झाली. नवे पीक आणि कमी अनुभवामुळे अपेक्षित उत्पादन येत नसल्याचे पाहून गावातील लोक टिंगल करू लागले. मात्र नितीन यांनी खचून जाण्याऐवजी सकारात्मक वृत्तीने डाळिंब पिकातील कामकाज आणि छोट्या छोट्या गोष्टी शिकून घेण्याला प्राधान्य दिले. त्यातून आत्मविश्वास वाढत गेला आणि बदल घडू लागला.

Agriculture Success Story
Agriculture Success Story : फळबागेने दिली आर्थिक समृद्धी...

संकटांनी घेरले, कुटुंबाने धैर्याने तोंड दिले

डाळिंब पिकातून चांगला आधार मिळाला होता. मात्र २००८ दरम्यान दुष्काळासोबतच तेलकट डाग आणि, मर रोगाच्या प्रादुर्भावाने डोके वर काढले. रोगाची तीव्रता वाढल्यामुळे डाळिंबाची सगळी झाडे काढावी लागली. त्यानंतर धाडस करून पुन्हा २००८ मध्ये दुसऱ्यांदा लागवड केली. या सोबतच २०१० मध्ये नितीन यांनी पाच एकर क्षेत्रावर शेवगा लागवड केली. त्यानंतर २०११, १२ व १३ मध्ये सलग तीन वर्षे डाळिंबाचे यशस्वी उत्पादन घेतले.

चांगले उत्पन्नही मिळाले. मात्र मार्च २०१४ मध्ये झालेल्या गारपिटीमुळे काढणी अवस्थेत असलेल्या डाळिंब फळांची व शेवगा झाडांची मोठी नासाडी झाली. अशा एकामागून एक आलेल्या आपत्तींमुळे डोक्यावर कर्जाचा बोजा वाढला. मात्र हातपाय गाळून बसण्याऐवजी नितीन यांनी धैर्याने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, नुकसानग्रस्त शेवगा पिकात रिकट घेत बाग पुन्हा उभी केली. दरम्यान, उन्हाळ शेवगा बहर हा नवीन पर्याय प्रयोगातून पुढे आला. त्यातून बहर धरून ९० दिवसांनंतर गुणवत्तापूर्ण शेवगा बाजारात पाठवला.

मात्र हातपाय गाळून बसण्याऐवजी नितीन यांनी धैर्याने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, नुकसानग्रस्त शेवगा पिकात रिकट घेत बाग पुन्हा उभी केली. दरम्यान, उन्हाळ शेवगा बहर हा नवीन पर्याय प्रयोगातून पुढे आला. त्यातून बहर धरून ९० दिवसांनंतर गुणवत्तापूर्ण शेवगा बाजारात पाठवला. दर्जेदार मालामुळे मागणी वाढलीच, सोबत दरही चांगला मिळाला. संकटातून नव्या संधी येत जातात, हेच खरे. गावामध्ये शेवगा लावणे चांगले मानले जात नव्हते.

ही अंधश्रद्धा आपल्या प्रयोगातून खोडण्यात नितीन यांना यश आले. उलट कमी पाण्यात, उत्पादन खर्चामध्ये चांगल्या उत्पन्नाची हमी देणारे पीक त्यांना गवसले. त्यातून पुन्हा आर्थिक सक्षमता प्राप्त झाली आहे. पुढे आत्मविश्वास वाढल्याने २०१४ मध्ये करार पद्धतीने शेत घेत त्यात ५ एकरांवर शेवगा व त्यात आंतरपीक म्हणून आले लागवड केली. आवश्यक तिथे अरुण पवार यांचे मार्गदर्शन त्यांना लाभते. सोबत त्यांनी केलेले वीज नियोजन, हंगामी व्यवस्थापन, नव्या बाजारपेठेचा शोध यातून त्यांच्या प्रगतीत भर पडत गेली.

जिद्द सोडली नाही...

२००८, २०१४ मध्ये डाळिंब शेतीत दोनदा संकटे आली तरी जिद्द सोडली नाही. २०१८ मध्ये पुन्हा एकदा पाच एकर क्षेत्रावर भगवा वाणाच्या लागवडीचा निर्णय घेतला. प्रयोगशीलता, सूक्ष्म अभ्यासाच्या माध्यमातून २०२१ मध्ये उत्पादन हाती आले. सामान्यतः डाळिंब उत्पादनात मृग, हस्त व आंबिया असे तीन बहर घेतात. मात्र नितीन हे वर्षातून एकच आंबिया बहर उत्पादन घेतात. “या बहरामध्ये उत्पादनाच्या अंगाने उन्हाळ्याच्या दिवसांमुळे अनेक आव्हाने असली तरी बाजारपेठेत मालाची उपलब्धता कमी असल्याने चांगला दर मिळतो. त्याचा परतावा चांगला मिळतो” असा अनुभव नितीन सांगतात.

बहुपीक पद्धतीद्वारे जोखीम कमी

गेल्या वीस वर्षांत फलोत्पादन क्षेत्रात काम करताना नैसर्गिक आपत्तीचा मोठा सामना करावा लागला. यातून धडा घेत शेती उत्पन्नातील जोखीम कमी करण्यासाठी बहुपीक पद्धतीचा अवलंब केला आहे. ज्यामध्ये सुरुवातीला डाळिंब, शेवगा तर अलीकडे सीताफळ लागवड केली आहे. दोन्ही भावंडांनी पहिल्यापासून व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला आहे.

भांडवलाचा अंदाज घेऊन त्यानुसार पीक पद्धतीचा विस्तार हे त्यांच्या कामातील मुख्य सूत्र आहे. सुरुवातीला डाळिंब, शेवगा आणि त्यानंतर सीताफळ लागवड केली आहे. या बहुपीक पद्धतीतून जोखीम कमी झाली. आता पुन्हा नऊ एकर क्षेत्रावर डाळिंब लागवड करण्याचे नियोजन केले असून त्याला सुरुवात झाली आहे. अनेक आव्हाने, संकटे आली तरी दोघा भावंडांनी कधी प्रयत्न सोडले नाहीत. “एकीने पुढे जायचे. एकत्रित कुटुंबाशिवाय शेतीत आर्थिक प्रगती नाही” असे नितीन सांगतात.

Agriculture Success Story
Agriculture Success Story : भाजीपाला, दुग्धोत्पादनात ओळख सावरगावतळची!

कष्टातून निर्माण झाली ओळख

खासगी कर्ज घेत एक एकरपासून सुरू केलेली डाळिंब लागवड आज १४ एकरांपर्यंत पोहोचलेली आहे. एकूण ३५ एकरांवर फळबाग आहे. “नोकरी करण्यापेक्षा आपण आठ तास जबाबदारीने २ ते ३ एकर शेतात राबल्यास दर्जेदार उत्पादन मिळवता येते. मालात गुणवत्ता आणि व्यवहारात व्यावसायिकता जपल्यास बाजारात स्थान मिळतेच” असे नितीन अभिमानाने सांगतात. डाळिंबामुळे सोन्याचे दिवस आल्याचेही ते भावुकपणे सांगतात.

वडील जयवंत, आई अलकाबाई यांचे मार्गदर्शन, भाऊ पृथ्वीराज याची साथ आणि भावजय जागृती व पत्नी गीतांजली यांनी विविध कामांत उचललेला वाटा या एकीमुळेच कुटुंबाची प्रगती झाली. कष्टातून शेतीचा विकास करत नेला. आज टुमदार बंगला बांधलेला असून, त्याला ‘कृषीविस्तारातून समृद्धी’ असे नाव दिले आहे. मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले जाते. शेतीतील या प्रयोगांची दखल घेऊन कृषिथॉन आदर्श डाळिंब पुरस्कार, कृषी विभाग व धुळे कृषी महाविद्यालयाकडून ‘वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्कार’, ग्रामपंचायत कळगाव यांच्याकडून ‘सरपंच कृषी गौरव’, मराठा सेवा संघ (साक्री) यांच्याकडून ‘प्रेरणा पुरस्कार’ त्यांना मिळालेले आहेत.

शेतीचा विस्तार असा :

काळगाव येथे कुटुंबाच्या मालकीची शेती ः १० एकर

काळगाव व कासारे येथील भाडेतत्त्वावर घेतलेली शेती ः अनुक्रमे १५ व १० एकर.

व्यवस्थापन ः

डाळिंबामध्ये प्रामुख्याने आंबिया बहर घेतला जातो. तर शेवग्यामध्ये उन्हाळी बहर घेतात. सीताफळामध्ये मृग बहर पकडला जातो.

बागेच्या विश्रांती काळात अन्न साठवणूक याकडे लक्ष.

छाटणीनंतर लगेच बोर्डो फवारण्या अन् ३ टप्प्यांत पानगळ.

बाग धरल्यानंतर झाडे सशक्त करण्यावर भर.

सूत्रकृमी नियंत्रणासाठी खतमात्रेसोबत प्रतिझाड १ किलो निंबोळी पेंडचा वापर.

छाटणी केल्यानंतर अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा, सेंद्रिय खतांचा अधिक वापर यामुळे बाग सशक्त व रोगप्रतिकारक बनते.

सूक्ष्म अन्नद्रव्यांचे डीएफ व एम द्रावणनिर्मिती; थेट किंवा ठिबकच्या माध्यमातून पुरवठा.

बाष्पीभवन कमी होण्यासाठी पाचट, शेवग्याचे टाकाऊ घटक, भुस्सा यांचे जमिनीवर सेंद्रिय आच्छादन करतात.

डाळिंब उत्पादनाच्या ७५ टक्के निर्यातक्षम तर २५ टक्के मालाची स्थानिक बाजारात विक्री.

रोग नियंत्रणासाठी पावसाळ्यात जैविक घटकांच्या फवारण्यावर भर.

शेती विकास दृष्टिक्षेपात

जमीन सपाटीकरण माती पुनर्भरण करून शेतीविकास.

३ विहिरी, संपूर्ण क्षेत्रावर सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब.

राज्यातील डाळिंब उत्पादक पट्ट्यासह राजस्थान, गुजरात, कर्नाटक भागात जाऊन अभ्यास.

भौतिक सुविधांपेक्षा शेतीतील सुधारणांना प्राधान्य.

फलोत्पादनासाठी आवश्यक सर्व प्रकारची यंत्रे अवजारे घेतली आहेत.

क्रॉप कव्हर तंत्रज्ञानाचा अवलंब. सन बर्निंग टाळून फळांची गुणवत्ता मिळते.

नितीन ठाकरे, ८७८८११३१२७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com