Agriculture Irrigation : जलसंधारणातून कोरडवाहू शेतीला मिळाली शाश्वतता

प्रत्येक शेतकऱ्याने आपले शेत हे लघू पाणलोट क्षेत्र म्हणून विकसित केले पाहिजे. अकोला जिल्ह्यातील काजळेश्वर-वरखेड येथील शेतकऱ्यांच्या सहकार्याने जलसंधारणाचे प्रारूप राबवण्यात आले.
Jalsandharan
JalsandharanAgrowon

डॉ. राजेश पातोडे

कोरडवाहू क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी पाणलोट व्यवस्थापन (Watershed Management) महत्त्वाचे आहे. त्यासाठी पडणारे पावसाचे पाणी अडवणे, त्यांचा वेग कमी करणे, आवश्यक तिथे अडथळे तयार करणे , उपलब्ध नाल्यांचे खोली व रुंदी वाढवणे अशा अनेक जलसंधारणाचे (Water Conservation) उपाय राबवणे आवश्यक असते.

त्या अनुषंगाने अकोला जिल्ह्यातील काजळेश्वर-वरखेड (ता. बार्शी टाकळी) येथील शेतकऱ्यांशी चर्चा करून प्रथम त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नाल्यावर पूर्वी असलेले सिमेंट नाले फोडलेले होते. त्यामागे खोदून विचारणा केली असता जवळपासच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अधिक पाणी होत असल्याचे लक्षात आले.

त्यानंतर संपूर्ण नाल्याचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून त्याची खोली व रुंदी कमी असल्याचे आढळले. हा नाला किमान १०० मीटरपर्यंत तांत्रिक पद्धतीने रुंद व खोल करण्याचा निर्णय घेतला.

सन २०१६-१७ मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या भुवनेश्वर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर मॅनेजमेंट आणि अकोला विद्यापीठातील कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प यांनी एकत्रितपणे प्रकल्प राबविण्याचे ठरविले.

त्यात प्रायोगिक तत्त्वावर १०० मी. नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण आणि व अस्तित्वात असलेल्या सिमेंट नाला बांधाची दुरुस्ती करण्यात आली.

पहिल्याच वर्षी खोल व रुंद केलेल्या नाल्यामध्ये पाण्याची चांगली साठवण झाली. त्यातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यातून शेती शाश्वत होण्यास मदत झाली. तत्कालीन सरपंच महादेव राठोड यांनी ग्रामपंचायत अंतर्गत नाला रुंद व खोलीकरणाचा प्रस्ताव दिला. त्यानुसार कृषी विभागाने ३ नवीन सिमेंट नाला बांध बांधले. आधीचे सिमेंट नाला बांध दुरुस्त केले.

Jalsandharan
Irrigation Projects : अकोला जिल्ह्यात अनेक प्रकल्पांत पाणी असूनही शेतीसाठी उपयोग नाही

कामाचे स्वरूप ः

-काजळेश्वर -वरखेड हे क्षेत्र अक्षांश २० अंश १३’५९’’ ते ७७ अंश १३’२३’’ रेखांशामध्ये असून समुद्रसपाटीपासूनची त्याची उंची ३३७ मी. आहे. या क्षेत्राचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७९५ मि.मि. इतके आहे.

-कठीण दगडी प्रदेशामध्ये मोडणाऱ्या या पाणलोट क्षेत्राचा बराचसा भाग काळ्या मातीने व्यापलेला आहे. भूगर्भात कठीण दगड असल्यामुळे या भागात ३ मीटर खोलीचे शेततळे करणेही कठीण जाते.

या स्थितीमुळे सुमारे पाच कि.मी. नाल्याचे १.२ ते २.० मीटर या दरम्यान खोलीकरण केले असून, त्याची रुंदी ८ मी. ते १२ मी. दरम्यान ठेवण्यात आली.

-यामध्ये साठणारे पावसाचे पाणी लक्षात घेऊन वेगवेगळी पिके सूक्ष्म सिंचनावर घेण्याचा आराखडा आखला. त्यानुसार प्रात्यक्षिके शेतात राबवली.

-या पाणलोट क्षेत्रातील वेगवेगळ्या विहिरींचे सर्वेक्षण करून, भूजल पातळीमधील चढ उताराचा अभ्यास केला.

-सोबतच जी.पी.एस. आणि पाणी मोजणी यंत्राच्या साहाय्याने भूगर्भातील पाणी पातळीची नोंद घेण्यात आली.

- नाला खोली व रुंदीकरण आणि सिमेंट नाला बांधात पावसाळ्यात पाण्याची साठवणूक झाली. भूजलामध्ये वाढ झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातही हरभरा, गहू यासोबतच कांदा, हळद अशी पिके घेता आली.

-सरपंच व शेतकरी यांच्या पुढाकाराने या नाल्यावर सद्यःस्थितीत एकूण १० सिमेंट नाला बांध कृषी विभागाने तयार केलेले आहेत.

भूजल पातळीचे विश्लेषण

या सिमेंट नाला बांधांची पाणी पातळी आणि बांध परिसरातील ५००

मीटर परिघातील एकूण ५१ विहिरीतील पाणी पातळीची नोंद घेण्यात आली.

-सन २०१६ मध्ये विहिरींतील भूपृष्ठापासूनची सरासरी पाणी पातळीची खोली ६.२५ मी. होती.

-सन २०१७ मध्ये ती ४.०७ मी., सन २०१८ मध्ये सरासरी पाणी पातळी ३.७३ मी., सन २०१९ मध्ये सरासरी पाणी पातळी २.८१ मी. व सन २०२० मध्ये सरासरी पाणी पातळी २.१७ मी. इतकी आढळून आली.

वर्षनिहाय विहिरीतील भूपृष्ठापासूनची पाणी पातळीतील वाढ

वर्ष --- सन २०१६ --- सन २०१७ --- सन २०१८ --- सन २०१९ --- सन २०२०

सरासरी पाणी पातळीची खोली (मी.) --- ६.२५ --- ४.०७ --- ३.७३ --- २.८१ --- २.१७

भूजल पातळीमध्ये झालेल्या वाढीमुळे खरीप व रब्बी हंगामात विविध पिकांना पाणी देता आले. त्यामुळे ओलिताखालील क्षेत्र ८ हेक्टर वरून ४२.६ हेक्टर इतके झाले. तर विहिरीतील पाणी वापरातून ओलिताखाली १०५ हेक्टर असलेले क्षेत्र २११ हेक्टर इतके वाढले. एकूण ओलिताखालील क्षेत्र २५३.६ हेक्टर झाले. शेतकऱ्यांना गहू, हरभरा, हळद, कांदा, मिरची, भाजीपाला, चारापिके, उन्हाळी भुईमूग इ. दुबार पिके घेणे शक्य झाले.

१) वर्षनिहाय खरीप हंगामात सोयाबीन पिकाच्या उत्पादनामध्ये बिगर सिंचनाच्या तुलनेमध्ये १६ ते ३२ टक्के वाढ मिळाली.

वर्षनिहाय खरीप हंगामातील सोयाबीन पीक उत्पादन (शेतकऱ्यांकडील माहितीच्या आधारे) सरासरी उत्पादन (क्विंटल /हेक्टर)

वर्ष --- २०१६ --- २०१७ --- २०१८ --- २०२०

सिंचनाशिवाय --- ८.९३ --- ११.१ --- १३.०५ --- १४.१२

एक संरक्षित सिंचन --- ११.१० (२४.३० टक्के*) --- १३.७१ (२३.५१ टक्के*) --- १५.१२ (१५.८६ टक्के*) --- १८.६० (३१.७३ टक्के*)

टीप ः (सिंचनाशिवाय पेक्षा सिंचनामुळे मिळालेली शेकडा वाढ*)

Jalsandharan
Irrigation Projects : अकोला जिल्ह्यात अनेक प्रकल्पांत पाणी असूनही शेतीसाठी उपयोग नाही

२) पाण्याची उपलब्धता निर्माण झाल्याने रब्बी हंगामात हरभरा, कांदा, गहू व हळद यांना सूक्ष्म सिंचनाद्वारे देत आले. हरभरा पिकाला एक संरक्षित सिंचन दिल्याने हरभरा पिकाच्या उत्पादनात बिगर सिंचित हरभऱ्याच्या तुलनेमध्ये १७ ते ३० टक्के वाढ मिळाली. दोन संरक्षित पाणी देणे शक्य झालेल्या ठिकाणी हरभरा पिकाच्या उत्पादनात ३० ते ५२ टक्के वाढ मिळाली.

वर्षनिहाय रब्बी हंगामातील हरभरा पीक उत्पादन (शेतकऱ्यांकडील माहितीच्या आधारे) सरासरी उत्पादन (क्विंटल प्रति हेक्टर)

वर्ष --- २०१६ --- २०१७ --- २०१८ --- २०१९ --- २०२०

सिंचनाशिवाय --- ९.६४ --- १०.२४ --- १७.२५--- १२.७० --- १२.८५

एक संरक्षित सिंचन --- ११.९२ (२३.६४ टक्के)* --- १२.३९ (२०.९९ टक्के )* --- २०.१८ (१६.९८ टक्के)* --- १६.५४ (३०.२३ टक्के)* --- १५.८९ (२३.६६ टक्के)*

दोन संरक्षित सिंचन --- १४.२५ (४७.८२टक्के)* --- १३.३२ (३०.०७ टक्के)* --- २२.४१ (२९.९१ टक्के)* --- १९.४१ (५२.६३ टक्के)* --- १९.२५ (४९.८१ टक्के)*

टीप ः (सिंचनाशिवाय पेक्षा सिंचनामुळे मिळालेली शेकडा वाढ*)

शास्त्रीय आणि तांत्रिक दृष्टीने झालेल्या जलसंधारण कामामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये झालेली वाढ लक्षात घेता असेच नाला खोलीकरण व रुंदीकरणाचे प्रकल्प राज्याच्या कृषी विभागामार्फत जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत केले जात आहेत.

तज्ज्ञांचे आवाहन...

-जास्त पाऊस झालेल्या वर्षामध्ये पावसाच्या अपधावेसमवेत येणारा गाळ सिमेंट नाला बंधाऱ्यात साठतो. पाणी साठवण क्षमता कमी होते. तसेच आजूबाजूंच्या शेतामध्ये पाणी जाऊ शकते. अशा वेळी बांध फोडून पाण्याला वाट करून देण्याची चूक शेतकरी करतात.

त्याऐवजी सामुहिक प्रयत्नातून बांधातील गाळ काढावा. हा गाळ सुपीक असून, शेतात वापरल्यास फायदा होतो.

-जलसंधारणातून कष्टाने साठवलेल्या पाण्याचा विनियोग सूक्ष्मसिंचन पद्धतीद्वारे अत्यंत काटेकोरपणे केल्यास अधिक क्षेत्र ओलिताखाली येऊन सर्वांचा फायदा होऊ शकतो.

- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरदराव गडाख यांनी सांगितले, की केवळ पावसावर अवलंबून असलेल्या कोरडवाहू शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कोरडवाहू शेती संशोधन कार्यालय अशाच प्रकारे प्रयत्नशील राहील.

सहभाग व सहकार्य

हा प्रकल्प २०१६ मध्ये तत्कालीन प्रकल्प समन्वयक डॉ. महेंद्र नागदेवे यांच्या प्रयत्नाने व डॉ. पं.दे.कृ.विद्यापीठातील संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनात कार्यान्वित झाला. २०१७ ते २०२१ या काळात डॉ. राजेश पातोडे यांनी प्रकल्प समन्वयक म्हणून पूर्णत्वास नेला.

या प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यामध्ये डॉ. विजय गाभणे, डॉ. महिपाल गणवीर, डॉ. अरविंद तुपे, डॉ. अनिता चोरे (प्रमख शास्त्रज्ञ), डॉ. अनिल तुरखेडे, डॉ. मोहन खाकरे, डॉ. चैतन्य पांडे, कु. राणी वानखडे, रविकिरण माळी, विशाल पांडागळे, पवन फुकट, सचिन मोरे यांच्यासह काजळेश्वर-वरखेड येथील तत्कालीन सरपंच महादेव राठोड, प्रगतिशील शेतकरी पुंडलिक चव्हाण व अन्य शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे.

डॉ. पी. आर. ओजस्वी (प्रकल्प समन्वयक, डेहराडून), डॉ. जी. रवींद्र चारी (प्रकल्प समन्वयक, हैदराबाद) यांचे प्रशासकीय सहकार्य मिळाले. या प्रकल्पासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली अंतर्गत संचालक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर मॅनेजमेंट, भुवनेश्वर यांनी आर्थिक व प्रशासकीय सहकार्य केले.

डॉ. राजेश पातोडे, ९८२२२०४२७२, (वरिष्ठ शास्त्रज्ञ - मृद व जल संधारण अभियांत्रिकी, कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com