Technology Uses Issue : नवीन तंत्रज्ञान वापरण्यातील अडचणी

New Technology Difficulties : नवीन तंत्रज्ञान प्रत्यक्ष उद्योगामध्ये वापरण्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर अनेक अडचणी असतात. त्यावर मात करण्याची क्षमता असलेले नवे तंत्रज्ञानच यशस्वी होते.
Agriculture Technology
Agriculture TechnologyAgrowon
Published on
Updated on

डॉ. अमित झांबरे

एखादे तंत्रज्ञान चांगले असणे वेगळे आणि यशस्वी असणे वेगळे. एखादे तंत्रज्ञान नावीन्यपूर्ण असून, एखादी किंवा काही समस्या सुटतात. तंत्रज्ञानाचा विकास करत असताना शास्त्रज्ञ हे सामान्यतः सद्यःस्थितीमधील एक किंवा अनेक समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. ते तंत्रज्ञान विकसित झाले तरी अनेक वेळा लोक ते तंत्रज्ञान वापरतच नसल्याची स्थिती प्रत्यक्षामध्ये उद्भवते. असे तंत्रज्ञान चांगले असले तरी यशस्वी नाही, असे म्हणता येईल. त्यामागे अनेक कारणे असू शकतात. एखाद्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यातील विविध टप्पे आणि न वापरले जाण्यामागील कारणे यांचा यांचा विचार या पुढील एक दोन लेखांमध्ये करणार आहोत.

अन्नप्रक्रियेतील कोणतेही तंत्रज्ञान खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी त्यांचा वापर सर्वसामान्यांकडून, त्या क्षेत्रातील उद्योगांकडून केला जाणे गरजेचे असते. उद्योगाद्वारे नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब सुरू होऊन, त्याचा दैनंदिन कामकाजामध्ये समावेश होणे आवश्यक असते. त्यासाठी आलेले नवीन तंत्रज्ञानाचे फायदे हे पूर्वीच्या व अन्य पर्यायी तंत्रज्ञानाच्या तुलनेने अधिक असले पाहिजेत. तसेच असे तंत्रज्ञान हे वापरण्यास सोपे असले पाहिजे. तंत्रज्ञान जर जटिल असेल, तर त्याच्या वापरासाठी अधिक कौशल्ययुक्त कामगारांची आवश्यकता राहू शकते. अशा कर्मचाऱ्यांची उपलब्धता नसल्यास मग ते तंत्रज्ञान चांगले असूनही मोठ्या प्रमाणात वापरणे उद्योजकाला शक्य होत नाही.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोणतेही नवे तंत्रज्ञान उद्योगामध्ये वापरले जाणे ही एक बदलाची मोठी प्रक्रिया असते. त्यामध्ये त्या उद्योगातील प्रत्येक घटकांमध्ये जाणीव निर्मिती करणे, प्रशिक्षण होणे अत्यावश्यक असते. कारण कोणतेही नवे तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे संस्थेतील तांत्रिक आणि सामाजिक प्रणालींवर परिणाम होत असतो.

तंत्रज्ञानाच्या अवलंबामध्ये दोन प्रमुख टप्पे असतात.

सुरुवात (Initiation) - त्याचे तीन उपटप्पे असतात.

अ) नवीन तंत्राची जाणीव (Awareness),

ब) त्या तंत्रज्ञानाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे (Attitude)

क) औद्योगिक दृष्टिकोनातून त्या तंत्रज्ञानाचे मूल्यांकन (Evaluation) करणे.

अंमलबजावणी - त्याचेही साधारणपणे दोन उपटप्पे पडतात.

अ) चाचणी अंमलबजावणी (Trial Implementation) : या टप्प्यात नवीन तंत्रज्ञानाची चाचणी होऊन औद्योगिक गरजांसाठी अनुकूलता निश्चित केली जाते.

ब) शाश्वत अंमलबजावणी (Sustained Implementation). - अनुकूल असलेले तंत्रज्ञान कायमस्वरूपी व संपूर्णपणे वापरले जाण्यासाठी त्या तंत्रज्ञानाचे वेगवेगळ्या पातळीवर पुन्हा मूल्यांकन करावे लागते. त्यातून त्याचे फायदे हे सध्याच्या किंवा पर्यायी तंत्रज्ञानापेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले पाहिजे.

Agriculture Technology
Sugarcane Season 2023 : यंदा सहा लाख टन ऊस गाळपाचे ‘द्वारकाधीश’चे उद्दिष्ट

भारतासारख्या विकसनशील देशामध्ये नव्या तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये प्राथमिक भांडवली खर्च, उत्पादन प्रक्रियेत होणारा बदल आणि त्यासाठी आवश्यक कर्मचारी प्रशिक्षण या तीन बाबी महत्त्वाच्या ठरतात. हा भांडवली खर्च केल्यानंतर भांडवलावरील व्याज व अन्य किमती वजा केल्यानंतरही योग्य परतावा मिळण्याची खात्री व कार्यक्षमतेचे फायदे मूल्यांकनातून पुढे आले तरच तो उद्योग नवे तंत्रज्ञान बसवत असतो.

मूल्यांकनातील आवश्यक बाबी

मूल्यांकन करताना नव्या तंत्रज्ञानाचे संभाव्य फायदे, संबंधित जोखीम, वापराची अनिश्चितता आणि अवलंबनासाठी आवश्यक असलेल्या व्यवस्थापन आणि उत्पादनातील बदलांची किंमत यांच्यावर भर दिला जातो. ठरविलेल्या मुख्य व्यावसायिक उद्दिष्टांचीही स्वतःची एक मागणी असते.एखाद्या उद्योगाद्वारे विशिष्ट तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यामध्ये उद्योगाची व्यवस्थापकीय संरचना, त्याची व्याप्ती व आकार असे संस्थात्मक घटक महत्त्वाचे असतात.

उद्योगाच्या अंतर्गत पद्धती, उपकरणे, उद्योगाला उपलब्ध असलेले बाह्य तंत्रज्ञान यांचाही नव्या तंत्रज्ञानाच्या अवलंबामध्ये मोठा वाटा असतो.पर्यावरणीय घटकांमध्ये उद्योगाचे पर्यावरण (उदा. प्रतिस्पर्धी कंपन्या व त्यांचे धोरण) आणि ज्या भागामध्ये उद्योग उभा आहे, तेथील स्थानिक व राष्ट्रीय पर्यावरणीय धोरणांचाही नव्या तंत्रज्ञानाच्या अवलंबामध्ये प्रभाव पडतो.

Agriculture Technology
Fruit Crop Insurance : खानदेशात फळपीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ

शिवाय मनोवैज्ञानिक, सामाजिक, राजकीय आणि पारंपरिक कारणांमुळे होत असलेल्या समस्यांचा शोध घेऊन त्यांच्या सोडवणुकीसाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करत असतात. लक्षात आलेल्या समस्यांवर नवीन तंत्रज्ञानातून मार्ग निघत असल्यास त्या तंत्रज्ञानाचे व्यापारीकरण वेगाने होते.

- डॉ. अमित झांबरे, ९९२२५९४५२४,

(प्राचार्य, श्रीराम कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, पानीव,

ता. माळशिरस, जि. सोलापूर)

कोणत्याही तंत्रज्ञानाचा औद्योगिक अवलंब हा सहसा खालील व्यावसायिक विचाराने पुढे जातो.

अ) तंत्रज्ञानाची आर्थिक मागणी आणि त्याचे स्वामित्व हक्क.

ब) उद्योगाची आर्थिक गरज किंवा परतफेडीचे वेळापत्रक.

क) नवीन तंत्रज्ञानाची मोजमाप, विश्वासार्हता आणि इतरत्र होत असलेली त्याची अंमलबजावणी.

ड) तंत्रज्ञानाचा संपूर्ण रोड मॅप (उदा. तंत्रज्ञानासाठी येणारा खर्च, लागणारा वेळ आणि त्यासाठी आवश्यक संसाधने इ.). त्यात प्रामुख्याने केली जाणारी गुंतवणूक व त्यातून भविष्यात मिळणारा नेमका परतावा याचा स्पष्ट अंदाज मिळावा लागतो.

इ) विद्यमान उत्पादन सुविधेमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करता येतो का की संपूर्ण प्रक्रिया तात्पुरती बंद करून तो करावा लागतो. यात ते उत्पादन मंदावण्याचा किंवा काही काळ थांबण्याचा धोका असतो. यासाठी व्यवस्थापकांना योग्य ते नियोजन व तात्पुरते किंवा शाश्वत बदल करावे लागतात. या सर्व बाबींचे मूल्य लक्षात घेऊन नवीन तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीसाठी संपूर्ण व्यवस्थापन तयार व्हावे लागते. त्यातील कोणत्याही घटकाने आडकाठी आणल्यास ही प्रक्रिया ठप्प होण्याचा धोका असतो.

ई) नवीन तंत्रज्ञानाची सांस्कृतिक, सामाजिक योग्यता ही देखील त्याचा अवलंबनासाठी मार्गदर्शक ठरते.

तंत्रज्ञानाची स्वीकृती, अवलंबातील महत्त्वाचे...

नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे होणाऱ्या वाढीव फायद्यांचा अंदाज घेतानाच, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या बदलांचा खर्चही लक्षात घ्यावा लागतो. त्या तंत्रज्ञानाच्या भविष्यातील उत्क्रांतीचाही विचार करावा लागतो. शाश्वत व्यावसायिक यशासाठी आपल्या क्षेत्रात येत असलेल्या नवीन तंत्रज्ञानाचा सातत्याने मागोवा घेत त्याचा अवलंब करायचा किंवा नाही, या बाबत सातत्याने निर्णय व्यवस्थापनाला घ्यावे लागतात.

उद्योगाने नवीन तंत्रज्ञान अवलंबल्यानंतर होणारा त्या उद्योगाच्या नफ्यातील वाढ ही अत्यंत महत्त्‍वाची बाब असते. तसेच या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे वाढणारी ग्राहकांची स्वीकृती व त्यातून वाढणारी मागणी नफ्याला काही पटीने वाढवू शकते. त्यामुळे संभाव्य फायदे आणि जोखीम (आरोग्य, आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय) यांचे मूल्यांकन योग्य पद्धतीने करणे गरजेचे असते.

एखाद्या नव्या तंत्रज्ञानाबाबतच्या नैतिक चिंता, नियामक रचना, जोखीम आणि फायद्यांची भिन्नता, सामाजिक-सांस्कृतिक फरक यांचाही परिणाम होत असतो. उदा. अन्न संरक्षणासाठी विकिरण तंत्रज्ञानाचा वापर अन्न आणि कृषी संघटनेने मंजूर केला असला तरी ग्राहक जागरूकता आणि लोकांमध्ये जागरुकतेच्या अभावामुळे या तंत्रज्ञानाचा अवलंब मर्यादित आहे.

त्याच प्रमाणे संसाधनांची उपलब्धता, तांत्रिक कौशल्ये, ग्राहक संबंध, उद्योगाचा आकार, बाजारातील हिस्सा आणि नियामक समस्या असे अनेक घटक नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर परिणाम करत असतात. या व्यतिरिक्त उद्योगाच्या स्पर्धात्मक वातावरणाशी संबंधित घटक आणि त्याची माहिती प्रक्रिया वैशिष्ट्ये देखील नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा प्रकारे या घटकांचे व्यापक वर्गीकरण सामाजिक, पर्यावरणीय, आर्थिक आणि तांत्रिक घटक म्हणून केले जाऊ शकते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com