Onion Seed Production : धाराशिवच्या डाळे कुटुंबाने कांदा बीजोत्पादन तंत्राने वाढवला खात्रीशीर नफा

दोन पिढ्यांपासून कसबे तडवळा (जि. धाराशिव) येथील डाळे कुटुंब कांदा बीजोत्पादनात कार्यरत आहे. सात-आठ वर्षात कुटुंबातील कृषी पदवीधर किशोर डाळे यांनी दीड- दोन एकरांत कांदा बीजोत्पादनात सातत्य ठेवले. तंत्रशुद्ध व्यवस्थापनातून खात्रीशीर, दर्जेदार बियाणे निर्मिती करून ‘ब्रॅण्डिंग’, ‘मार्केटिंग’द्वारे खात्रीशीर नफा मिळवण्यासह हे बियाणे शेतकऱ्यांत लोकप्रिय केले आहे.
Onion Seed Production
Onion Seed ProductionAgrowon

Solapur Onion Seed Story : सोलापूर जिल्ह्यात बार्शी-लातूर महामार्गावर कसबे तडवळा या दहा हजार लोकसंख्येच्या गावाची ऐतिहासिक आणि बाजारपेठेचे गाव अशी ओळख आहे. येथे किशोर डाळे यांची १५ एकर शेती आहे. पैकी सहा एकर शेती गावालगत तर उर्वरित आतल्या बाजूस आहे.

किशोर यांनी १९८१ मध्ये कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर नोकरीऐवजी शेतीलाच प्राधान्य दिले. पारंपरिक हंगामी पिके, १५ एकरांत ऊस असून, कांदा बीजोत्पादन हा त्यांचा दरवर्षीचा मुख्य कार्यक्रम असतो.

आज वयाच्या चौसष्टीतही प्रयोगशील शेतीतील त्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. सिंचनासाठी विहीर, बोअरची शाश्‍वत सोय आहे. शेण-गोमूत्रासाठी दोन देशी गायी आहेत. मुक्तसंचार गोठा आहे. सामाजिक कार्यातही किशोर आघाडीवर असतात.

रांझणी येथील ‘नॅचरल शुगर’ कारखान्याचे संचालक, धाराशिव येथील ‘प्रभात मल्टिस्टेट’ सोसायटीचे अध्यक्ष व ‘एनसाई मल्टिस्टेट’चे उपाध्यक्ष अशी पदे ते भूषवीत आहेत.

Onion Seed Production
Onion Seed Production : खानदेशात यंदा कांदा बीजोत्पादन कमी

कांदा बीजोत्पादन

दोन पिढ्यांपासून म्हणजे आजोबा आणि वडिलांच्या काळापासून १० ते १५ गुंठ्यांवर डाळे यांच्याकडे कांदा बीजोत्पादन व्हायचे. पण किशोर यांनी दीड ते दोन एकरांपर्यंत अलीकडील काळात त्याचा विस्तार केला आहे.

खरीप आणि लेट खरिपासाठी लाल कांदा तर रब्बी, उन्हाळीसाठी पूना फुरसुंगी (डबलपत्ती) कांदा वापरला जातो. या विविध हंगामांतील कांद्याची मागणी लक्षात घेऊन

या दोन्ही वाणांचे बीजोत्पादन घेण्यात येते. दोन्ही वाण चमकदार, गोलाकार, आकर्षक रंगाचे आणि मोठ्या आकाराचे आहेत. बीजोत्पादनासाठी सोलापूर, बार्शी या मार्केटमधून ए ग्रेड कांद्याची खरेदी केली जाते. यंदा हे क्षेत्र साडेतीन एकरांवर आहे.

कांदा बीजोत्पादन-

-दरवर्षी १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान लागवड नियोजन.

-लागवडीआधी एकरी तीन ते चार ट्रॅाली शेणखताचा वापर.

-पांढऱ्या मुळ्यांची वाढ व्हावी आणि कार्यक्षमता वाढावी यासाठी ह्युमिक ॲसिडसह काही सेंद्रिय खतांचा व शेण-गोमूत्र स्लरीचा वापर.

-बेसल डोसमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये एकरी १० किलो, सल्फर १० किलो, २४ः४ः० १०० किलो आणि निंबोळी पेंड अडीच किलो वापर.

-ट्रॅक्टरच्या साह्याने सरी काढण्यात येते. ९ ते १० इंचांवर एक याप्रमाणे बुडकी लावण्यात येते.

-लागवडीनंतर त्वरित व त्यानंतर पाच-सहा दिवसांनी स्प्रिंकलरने व पुढे दर १२ ते १५ दिवसांनी याप्रमाणे चार ते पाच वेळा पाणी.

-सुमारे दोन महिन्यांनी कांदा फुलोऱ्यात येतो. त्या काळात पाटाने पाणी.

-काढणीच्या चौथ्या महिन्यापर्यंत दर आठ-दहा दिवसांनी पाणी.

-बीजोत्पादनात परागीकरण हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी एकरी दोन याप्रमाणात मधपेट्या ठेवल्या जातात.

-प्रत्येक महिन्याला खुरपणी करूनही पुन्हा गवत येतेच. मात्र तणनाशकाचा वापर त्यासाठी केला जात नाही. कारण कांदा बियाण्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो असे किशोर सांगतात.

-सुमारे १३० ते १५० दिवसांनी कांद्याची फुले मळणीसाठी तयार होतात.

-यंत्राद्वारे मळणी करताना बियाण्याचे नाकाडे खराब होतात, अनेकदा तुकडेही पडतात. त्यामुळे पुढे उगवण क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे फुलातून बी योग्य पद्धतीने आणि गुणवत्तापूर्ण काढण्यासाठी पारंपरिक पद्धतीची मळणी योग्य ठरते असा आपला अनुभव असल्याचे किशोर सांगतात.

Onion Seed Production
Onion Subsidy : पाऊण लाख शेतकऱ्यांचे कांदा अनुदानासाठी अर्ज

उत्पादन प्रति एकर

सन उत्पादन (क्विंटल) दर (रु.) प्रति किलो

२०२०- ३.४० १४०० ते १६००

२०२१ २.७५ १६०० ते १८००

०२२ ३ १२०० ते १६००

यंदा चार क्विंटलपर्यंत उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे.

बियाणाचे ब्रॅण्डिंग

मुख्यतः ‘माउथ पब्लिसिटी’ मुळे बियाण्याचा प्रसार झाल्याचे किशोर सांगतात. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, धाराशिव जिल्ह्यातील कळंब, तुळजापूर आणि नाशिकमधील दिंडोरी भागातून किशोर यांच्या बियाण्याला पसंती मिळते आहे. दरवर्षी ठरल्याप्रमाणे बियाणे घेऊन जाणारे शेतकरी आहेतच.

पण काही शेतकरी आगाऊ नोंदणीही करतात एवढी विश्‍वासार्हता किशोर यांनी आपल्या बियाण्याबाबत तयार केली आहे. श्री-लीला ॲग्रो फार्म या नावाने ब्रॅण्डिंग केले आहे. एकरी अडीच ते तीन क्विंटल उत्पादन आणि प्रति किलोला १२०० रुपये दर गृहित धरल्यास खर्च वजा जाता एक- दीड लाख ते त्यापुढे नफा हाती येतो. जो अन्य पिकांच्या तुलनेत फायदेशीर असतो.

संपर्क - किशोर डाळे, ७५८८८७७७१२

कांद्याचे एकरी व्यवस्थापन चांगले मिळण्यासाठी दर्जेदार बियाणे हा घटक महत्त्वाचा असतो. त्या दृष्टीने दरवर्षी डाळे यांच्याकडून कांदा बियाणे घेतो. कांद्याचा रंग, आकार चांगला, बियाणे उगवणक्षमता चांगली आहे. डबलपत्ती असल्याने दरही चांगला मिळतो.
तुकाराम मुठाळ, शेंद्री, ता. बार्शी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com