Red rice variety : रत्नागिरीतील जयंत फडके लाल भातवाणाचे करताहेत संवर्धन, गुणन

Rice Update : अलीकडील काळात शेतीचे मोठ्या प्रमाणात संकरीकरण झाले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील जांभूळआड येथील अभ्यासू व प्रयोगशील शेतकरी जयंत फडके यांनी पारंपरिक, पौष्टिक देशी लाल भाताच्या वाणाचे अत्यंत कष्टपूर्वक संवर्धन, गुणन केले.
Rice cultivation
Rice cultivationAgrowon
Published on
Updated on

Rice variety : जांभूळ आड (ता. जि. रत्नागिरी) येथील जयंत गोपाळ फडके हे अभ्यासू, प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. ते पोलिसपाटीलही आहेत. वडिलोपार्जित जमिनीत शेतीचे बाळकडू त्यांना घरूनच मिळाले. सन १९९२ पासून पूर्णवेळ शेतीच करायला त्यांनी सुरवात केली.

सध्या भाताची सुधारित व संकरित बियाणे उपलब्ध आहेत. मात्र कोकणातील लाल भाताला ग्राहकांकडून पहिली पसंती व प्रचंड मागणी असते. फडके देखील या देशी, पारंपरिक वाणांचे महत्त्व जाणून होते. ठिकठिकाणी फिरून अशा वाणांचे संकलन त्यांनी केले. शोध घेताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला भागातून त्यांना लाल भाताच्या वाणाचे अंदाजे दोन मूठभर बियाणे मिळाले.

त्या भागात ज्योती नावाने हे वाण ओळखले जाते. फडके यांनी आपल्या शेतातील अन्य लाल वाणांच्या संगतीने त्याचेही संवर्धन व गुणन करण्यास सुरवात केली. ज्योती वाणातील अन्य तांदूळ वेगळा करून निवड पद्धतीने त्याची लागवड वाढवण्यास सुरवात केली.

दहा वर्षांच्या अथक परिश्रमातून व सातत्यातून आज संपूर्ण पाच एकर भातशेतीत ते याच देशी लाल वाणाचे (ज्योती) उत्पादन यशस्वीपणे घेत आहेत.

Rice cultivation
Rice Export : तुकडा तांदूळ निर्यातीला सरकारची मंजुरी पण…

कोकणात पारंपरिक चिखलणी फायदेशीर

फडके नांगरणीसाठी पॉवर टिलरपेक्षा बैलांचे जोत वापरून नांगरणी करण्याला प्राधान्य देतात. त्याबाबत ते सांगतात की कोकणातील जमिनी तीव्र उताराच्या आहेत. पॉवर टिलरने केलेल्या नांगरणीमुळे माती अधिक बारीक होते. प्रचंड पावसामुळे तीव्र उताराच्या जमिनीतील माती पावसाच्या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात वाहून जाते.

त्यामुळे नांगरणी- चिखलणीसाठी पारंपरिक पद्धतच फायदेशीर ठरते. अन्यथा जमीन सुपीक राहणार नाही असे फडके आग्रहाने सांगतात. उखळ करण्यासाठी टिलरचा वापर फायदेशीर ठरू शकतो असे ते म्हणतात.

लागवडीतील आदर्श व्यवस्थापन

-पूर्वी जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरु झाल्यानंतर पेरणी व्हायची. परंतु फडके यांनी अलीकडील वर्षांत लागवडीचे वेळापत्रक बदलले आहे. पाऊस नोव्हेंबरपर्यंत राहतो हे लक्षात घेऊन लागवड पंधरा दिवस उशिरा केली जाते.

-२० बाय १० फूट आकाराचे गादीवाफे तयार केले जातात.

-बियाणे पेरून रोपवाटिका तयार केली जाते. २२ ते २३ दिवसांनी रोपे लावणीयोग्य होतात. पुनर्लागवडीसाठी रोपे काढण्यासाठी चार ते पाच मजूर, शाळा तसेच ‘एनएसएस’ चे विद्यार्थी यांची मदत घेतली जाते.

-लावणीवेळी दोनवेळा नांगरणी. गुंठ्याला ५० किलो गांडूळ खत व शेणखत यांचा वापर.

-पुर्नलागवडीनंतर युरिया- डीएपी ब्रिकेटचा वापर गुंठ्याला एक किलो याप्रमाणे.

-वीस दिवसांनी गुंठ्याला ५० ते ६० लिटर प्रमाणात जीवामृताचा वापर पाटाच्या पाण्यातून.

-ताक, दोन केळी, प्रत्येकी दोन किलो गूळ व बेसन, दहा लिटर गोमूत्र, दहा किलो शेण एकत्र करून २०० लिटर पाण्याच्या बॅरेलमध्ये पाच दिवस ठेऊन जीवामृत निर्मिती.

-रानात चिखलाच्यावर एक इंच पाणी राहील याची काळजी घेतली जाते. पाणी कमी झाले तर रान वाढते.

उत्पादन व विक्री

मोबाईलवरील अ‍ॅपमधून हवामानाचे अंदाज अभ्यासले जातात. त्यातून भात काढणीचे नियोजन व्यवस्थित केले जाते. भात वाळवून लगेचच झोडणी करून घेतली जाते. प्रति गुंठ्याला ३५ ते ४० किलो म्हणजेच एकरी १४ ते १६ क्विंटल उत्पादन मिळते.

प्रति किलो ८० रुपये दराने तांदळाची विक्री होते. गावात अनेक मुंबईकर चाकरमानी येत असतात. त्यांच्याकडून खरेदी होते. रत्नागिरी शहरातील दुकानांमध्येही तांदूळ विक्रीस ठेवण्यात येतो. आमच्या तांदळाला इतकी मागणी असते की शिल्लकच राहात नसल्याचे फडके सांगतात.

फडके यांच्या लाल भाताची वैशिष्ट्ये

-चव अत्यंत उत्तम. तूपमिठासोबत खाल्ला तरी चविष्ट.

-साधारण १०० दिवसांत तयार होतो.

-खूप पावसात लोळत किंवा आडवा होत नाही. लोंबीतील धान्यही गळून पडत नाही.

-दरवर्षी त्याचे बियाणे वापरता येते.

-अत्यंत पौष्टिक.

Rice cultivation
Rice varieties: फॉस्फरसी गरज कमी असणाऱ्या भाताच्या जाती विकसित

हापूस, फळबाग व अन्य नियोजन

-घरगुती वापरासाठी सेंद्रिय खतांवर आधारित भाजीपाला उत्पादन.

-हापूस आंब्याची १४००, काजू ६०० तर नारळाची ४०० झाडे. दरवर्षी १५०० पेटी आंबा विक्री.

-सन १९९२ पासून गांडूळखत निर्मिती. वर्षाला ५० टनांपर्यंत उत्पादन. स्वतःच्या शेतात वापरून १२ रुपये प्रति किलोने दराने विक्री.

-वीस जनावरे. (साहिवाल,गीर, खिलार आदी देशी गायी). महिन्याला १५ किलोपर्यंत देशी तूपनिर्मिती. दोन हजार रुपये प्रति किलो दराने विक्री.

-शेणाच्या गोवऱ्यांचीही प्रति पाच रुपये दराने मोठ्या प्रमाणात विक्री. धार्मिक कार्यासाठी त्यास मोठी मागणी.

-टाकी व घुमट अशा दोन पध्दतीचे दोन गोबर गॅस युनिट्स. त्यामुळे सिलिंडरची गरज भासत नाही.

-निसर्गाच्या लहरीपणामुळे आंबा शेती दिवसेंदिवस खर्चिक बनत आहे. खर्चातील बचत हाच उत्पन्न वाढवण्याचा मार्ग आहे. ८० टक्के सेंद्रिय व २० टक्के रासायनिक खतांचा वापर करण्यावर फडके यांचा भर.

संपर्क - जयंत फडके-९४०३४६१७५८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com