चालुक्य कालीन होट्टल गाव विकासाच्या प्रवाहात

नांदेड जिल्ह्यातील होट्टल गाव चालुक्य कालीन शिवमंदिरामुळे प्रसिद्ध आहे. येथील ग्रामस्थांनी एकत्र येत गावातील शेती, जलसंधारण व विकासाच्या अन्य कामांसाठी पुढाकार घेतला. त्यातून आज गावची पाणीसमस्या सुटली आहे. विकासाच्या मुख्य प्रवाहात गाव आले आहे. पूरक व्यवसायांना चालना मिळून रोजगारनिर्मिती होण्यास मदत मिळाली आहे.
Rural development
Rural developmentAgrowon
Published on
Updated on

नांदेड शहरापासून सुमारे ऐंशी किलोमीटरवर होट्टल (ता. देगलूर) गाव आहे. अकराव्या शतकातील चालुक्यकालीन शिवमंदिरामुळे (Chalukya Period Shiva Temple) आज ते जगाच्या नकाशावर आले आहे. अप्रतिम शिल्पांसाठी प्रसिद्ध असलेले होट्टल हे सुमारे दोन हजार लोकवस्तीचे गाव महाराष्ट्र, तेलंगण व कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमेवर आहे. त्यामुळे तीनही राज्यांतील पर्यटक मंदिर परिसराला भेट देत असतात. ग्रामविकासासह (Rural Development) जलसंधारणाच्या (Water Conservation) कामांमुळे मागील काही दिवसांपासून हे गाव विकासाच्या प्रवाहात आले आहे. गावाच्या सांस्कृतिक, सामाजिक विकासाचा पाया नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी रचला. याला उभारी देण्याचे काम जिल्हाधिकारी डॉ. विपिन करीत आहेत.

Rural development
ग्रामविकास आढावा बैठक लांबणीवर

गावकरी आले एकत्र

होट्टल गावाला ऐतिहासिक वारसा असला तरी ते विकासाच्या बाबतीत कोसो दूर होते. गावात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने नागरिकांना पाण्याचे पाणी उपलब्ध होत नव्हते. शेतीसाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागे. पिके हातची जायची. गावातील लोकांना कामाच्या शोधात कर्नाटकातील बिदर, तेलंगणातील निजामाबाद या शहरांत स्थलांतर करावे लागे. ही परिस्थिती बदलण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेतला.

Rural development
पंजाबमध्ये ग्रामविकास कायद्यात सुधारणा

पायाभूत सुविधा उपलब्ध

गावात पूर्वी रस्ते, नाले, वीज आदी सुविधा योग्य प्रकारे नव्हत्या. कालांतराने राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून ग्रामविकासासाठी निधी मिळत गेला. आज गावातील सर्व रस्ते पक्के झाले आहेत. विद्युतीकरण झाल्याने गाव प्रकाशात आले आहे. पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध झाल्याने नागरिकांच्या आरोग्यात सुधारणा झाली आहे. सोबतच सार्वजनिक वाचनालयाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

जलसंधारणासाठी पुढाकार

गाव परिसरात सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळ संस्था २५ वर्षांपासून सूक्ष्म पाणलोट विकासाच्या माध्यमातून कार्यरत आहे. पाणलोट हा घटक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वात महत्त्वाचा असल्याचे गावकऱ्यांनी जाणले. त्यातूनच शेतीचा विकास साधण्यासाठी गावातील शेषराव गणपतराव सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पाणलोट समितीची स्थापना करण्यात आली. यात बसलिंगअप्पा सुलफूले उपाध्यक्ष तर राजू पाटील सचिव झाले. समिती व संस्कृती संवर्धन मंडळाच्या साह्याने होट्टल आणि काठेवाडी अशा दोन गावांतील सुमारे ५९२.९१ हेक्टर क्षेत्रफळात जलसंधारणाच्या कामांचा पाया भरला गेला.

कामे पूर्णत्वाकडे

पाणलोट व्यवस्थापनाची कामे काटेकोरपणे आणि तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण होण्यासाठी गावकऱ्यांना कार्यक्रम व्यवस्थापनात सहभागी करून घेण्यात आले. त्यामुळे कामातील गुणवत्ता आणि गती राखली जाईल असा विश्‍वास संस्थेचे अध्यक्ष प्रमोद देशमुख यांना होता. त्या दृष्टीने नाला रुंदी- खोलीकरण, मोठी आणि लहान ‘ड्रेनेज लाइन’, सिमेंट बंधारे आदी कामे व दुरुस्ती झाली. सलग समतल चर, जल शोषक चर, दगडी बांध, वृक्ष लागवड, बांधबंदिस्ती, दगडी सांडावे, फळबाग लागवड आदी कामे पूर्णत्वाकडे गेली आहेत. आतापर्यंत सुमारे ३०० हेक्टरवर विविध जल आणि मृद्‍संधारणाची कामे करण्यात आली आहेत. या कामांमुळे दरवर्षी परिसरातील जमिनीत १३८.२० लाख लिटर पाणी मुरविले जात आहे. यासोबतच २० हेक्टर पडीक जमीन लागवडीखाली आली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना पीक पद्धतीची घडी बसविणे शक्य झाले आहे.

अन्य ठळक कामे

हवामान बदलाबाबत शेतकरी जागृत झाले आहेत. गावात स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्यात आले आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण लक्षात येण्यास व त्यातून पीकनियोजन करण्यास मदत झाली आहे. गावातील बेरोजगार महिलांना उपजीविकेचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी संस्थेकडून ४० महिलांना प्रशिक्षण देऊन शिलाई यंत्राद्वारे नवा उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे. काही महिलांना परसबागेतील कोंबडीपालनासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. गावात पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची तर आठवी ते दहावीपर्यंत खासगी शिक्षण संस्था आहे. माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याची सुविधा देण्यात आली आहे.

लोकसहभाग

विद्यमान सरपंच हानीफाबी युसूफ शेख, उपसरपंच माधव दासरवाड, अध्यक्ष विनायक पाटील, तानाजी भगनुरे, गंगाराम सूर्यवंशी, माजी पोलिस पाटील विठ्ठलराव पाटील, जगदीश देशमुख, नरसिंगराव देशमुख, माधव वसूरकर, अमजद शेख, प्रभू बंकलवार, अशोक बंकलवार, युसूफ इस्माईल शेख, इस्माईल धनजकर, त्र्यंबक सुवर्णकार, जर्नादन गडकर, बालाजी दासरवाड, अनिल सूर्यवंशी, संग्राम सूर्यवंशी दत्ता कवडेकर, शेख शार्दूल आदींसह सर्व ग्रामस्थांचे योगदान विकासात लाभले आहे.

राज्यस्तरीय होट्टल महोत्सव

चालुक्य कालीन प्रसिद्ध सिद्धेश्‍वर मंदिर जगाच्या पाठीवर यावे यासाठी ‘युनेस्को’च्या माध्यमातून निधी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेतीसोबत पर्यटन विकास झाला तर या भागात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी ‘हम्पी’च्या धर्तीवर विकास करण्याचा संकल्प आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यस्तरीय होट्टल महोत्सवाला पुढे नेण्याचे काम सुरू आहे.

संपर्क ः शेषराव सूर्यवंशी, ९०२१७१४६९९

(पाणलोट समिती अध्यक्ष)

वसंत रावणगावकर, ७३५०१५६३६७

(प्रकल्प समन्वयक)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com