लिंग विनिश्‍चित रेतन तंत्रातून तयार झाल्या उत्कृष्ट कालवडी

‘सेक्स सॉर्टेड सीमेन’, अर्थात लिंग विनिश्‍चित कृत्रीम रेतन तंत्रज्ञानाचा वापर करून केवळ मादी वासरे वा कालवडी जन्माला घालणे आता शक्य झाले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून अकोला जिल्ह्यातील पशुपालकांनी वासरे वा कालवडी जन्माला घातल्या आहेत. कुणाच्या गोठ्यात दोन, कुणाकडे चार, तर काहींकडे दहापर्यंत ही संख्या पोहोचली आहे. अत्यंत सुदृढ तसेच वंशावळ वाढीच्या दृष्टीने हा प्रयोग कमालीचा आशादायी तसेच दुग्ध व्यवसायात महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो असे चित्र तयार झाले आहे.
Artificial Insemination
Artificial Insemination Agrowon
Published on
Updated on

भारत दूध उत्पादनामध्ये अग्रेसर असला तरी जगाच्या ३०.५२ टक्केच गोवंशीय संख्या भारतामध्ये असल्याचे म्हटले जाते. प्रगत देशांशी तुलना करता देशात जनावरांची प्रतिदिन दूध उत्पादन क्षमता तुलनेने कमी आहे. हवामान व भौगोलिक स्थिती पाहता देशात गायी व म्हशींच्या जातींची विविधता पाहण्यास मिळते ही मात्र जमेची बाजू म्हणावी लागेल. आपल्याकडे मध्यम व अल्पभूधारक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय केला जातो. गेल्या दोन दशकांपासून विविध नव्या तंत्रज्ञानाद्वारे दुधाळ जनावरांची दूध उत्पादन क्षमता व आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. यामध्ये विद्यापीठे तसेच संस्था, कंपन्याही संशोधन करीत आहेत. त्याद्वारे दुधाळ जनावरांची आनुवंशिकता, संतुलित आहार, उत्तम आरोग्य, प्रजनन हे घटक महत्त्वाचे मानले जात आहेत.

Artificial Insemination
शेळ्यांच्या कृत्रिम रेतनाच्या निमित्ताने

लिंग विनिश्‍चित कृत्रिम रेतन तंत्राचा वापर

उत्तम व जातिवंत वंशावळ तयार करण्यासाठी पैदास कार्यक्रमात कृत्रिम रेतनाचा (Artificial Insemination) सर्वदूर वापर होत आहे. यात ‘सेक्स सॉर्टेड सीमेन’ (Sex Sorted Semen) हे आजचे आधुनिक तंत्रज्ञान आहे. यालाच लिंग विनिश्‍चित कृत्रीम रेतन असे म्हटले जाते. पारंपरिक पैदास पद्धतीत नर व मादी तयार होण्याचे प्रमाण ५० टक्के असते. परंतु नव्या तंत्रज्ञानात केवळ मादी उपलब्ध करणे आता शक्य झाले आहे. पूर्वी प्रगत देशात हे तंत्रज्ञान उपलब्ध होते. मात्र भारतात विविध संस्था वा कंपन्यांद्वारे शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचले आहे. अकोला जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी त्याचा वापर करीत उत्कृष्ट कालवडी तयार केल्या आहेत.

Artificial Insemination
कृत्रिम रेतनासाठी वळूची निवड कशी कराल?

लिंग विनिश्‍चित रेतन मात्रा तंत्राचे फायदे

-मादी वासरे मिळण्याचे प्रमाण जवळपास ९० ते ९५ टक्के.

-नर वासरे तयार होत नसल्याने त्यांच्यावरील खर्च वाचला.

-उत्तम वंशावळीच्या कालवडी कमी कालावधीत तयार झाल्याने दूध उत्पादनही लवकर काळात सुरू होते.

-गाभण गायींना जास्त किंमत मिळू लागली.

-नवी जनावरे बाजारातून विकत घेण्याची गरज कमी झाली.

-बाहेरील आजारी जनावर कळपात येण्यापासून रोखणे शक्य.

पशुपालकांचे अनुभव

म्हैसपालनामध्ये उत्तम दुधाळ म्हशी हरियाना, उत्तर प्रदेश व गुजरात राज्यांतून आणाव्या लागतात. स्थानिक वातावरणात आल्यानंतर त्या आजारी पडतात व अपेक्षित दूध उत्पादन मिळत नाही. म्हशींची किंमत सध्या ८० हजार ते एक लाख एवढी आहे. लिंग विनिश्‍चित रेतनमात्रा तंत्राचा वापर माझ्या गोठ्यात सुरू आहे. दहा मादी रेडके जन्मास आली आहेत. आपल्या वातावरणात वाढलेल्या उत्तम आनुवंशिकता असलेल्या म्हशी कमी वेळेत जास्त प्रमाणात तयार होतील. दूध उत्पादन वाढीसही पुढील काळात मदत होणार आहे.

- प्रवीण घाटोळ, दूध उत्पादक, कौलखेड, जि. अकोला

माझ्याकडे चार गीर गायी आहेत. मादी वासरे तयार होत असल्याने पुढील वंशावळ निर्माण करण्यासाठी नवे तंत्रज्ञान फायदेशीर आहे. गोठ्यामध्ये दोन कालवडी जन्माला आल्या असून एक गाय गाभण आहे.

-डॉ. नीलेश अपार, उपविभागीय महसूल अधिकारी, अकोला

माझ्याकडे सुमारे ४८ गीर गायी आहेत. पारंपरिक पद्धतीत गोठ्यात तयार होणाऱ्या नर वासरांना मागणी नसल्यामुळे त्यावरील खर्चात वाढ होते. नव्या तंत्रज्ञानाच्या वापरातून पाच कालवडी तयार झाल्या आहेत. चार गाई गाभण आहेत. लिंग विनिश्‍चित रेतनमात्रेचे दर कमी असल्याने पुढील काळात गायींची संख्या व दूध उत्पादन वाढेल याची खात्री आहे.

- विवेक बिजवे, दूध उत्पादक, सराव, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला

सुमारे पंचवीस वर्षांपासून गोपालन करीत आहेत. मागील १२ वर्षांपासून गीर व देवणी शुद्ध वंशावळ जोपासत आहोत. आज रोजी आमच्या फार्मवर लहान मोठया मिळून सुमारे ३० गायी आहेत. यात दूध देणाऱ्या १५ गायींचा समावेश आहे. नव्या तंत्राचा वापर करून आजवर तीन पिलांचा जन्म झाला. यातील दोन वासरे १६ महिन्यांची झाली आहेत तर गोऱ्हा १८ महिन्यांचा आहे. चांगल्या ‘ब्रीड’च्या रेतन मात्रांच वापर केल्याने वंशावळ चांगली राहील. दूध उत्पादन वाढेल याची शाश्‍वती आहे.

-विठ्ठल सूर्यकांत मुळे, वाशींबा, जि. अकोला. ९७६३५४७०७८

लिंग विनिश्‍चित कृत्रिम रेतन मात्रेचा गर्भधारणेवर परिणाम या विषयावर संशोधन प्रकल्प तसेच पदव्युत्तर प्रकल्प आम्ही राबविले. त्यात गर्भधारणेचे प्रमाण ४० टक्के तर मादी रेडके मिळण्याचे प्रमाण ८७.५० टक्के मिळाले आहे. मुऱ्हा म्हशी, गीर गायींमध्ये मादी कालवडी- वासरे जन्मास आली आहेत. पशुपालकांनी तज्ज्ञ पशुवैद्यकामार्फत या तंत्रज्ञानाचा वापर करून फायदा मिळवावा. देशी तसेच संकरित अशा सर्व दुधाळ जनावरांमध्ये त्याचा वापर करता येतो.

-डॉ. महेशकुमार इंगवले, सहायक प्राध्यापक, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला. (९४०५३७२१४२)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com