Urban Farming : गच्चीवर साकारले ‘अर्बन फार्मिंग’ मॉडेल

Rooftop Farming : शेतकरी कुटुंबाची पार्श्‍वभूमी असलेला व्यक्ति जगात कुठेही गेला तरी शेतीशी कायम नातं जपतो. यापैकीच एक आहेत प्रा. स्वानंद डोंगरे.
Rooftop Farming
Rooftop Farming Agrowon

Terrace Farming : शेतकरी कुटुंबाची पार्श्‍वभूमी असलेला व्यक्ति जगात कुठेही गेला तरी शेतीशी कायम नातं जपतो. यापैकीच एक आहेत प्रा. स्वानंद डोंगरे. शेतीच्या आवडीतून त्यांनी नाशिक शहरात चार वर्षांपूर्वी घराच्या गच्चीवर ‘अर्बन फार्मिंग’चे मॉडेल उभारले आहे.

नोकरीच्या निमित्ताने अनेक जण मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित होतात. मात्र शेतीवर असलेले प्रेम व प्रयोगशीलता कायम जिवंत ठेवता येते.

याचे उदाहरण म्हणजे मूळचे निमज (ता. संगमनेर, जि. नगर) आणि सध्या नाशिक येथील के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागात कार्यरत असलेले प्रा. स्वानंद डोंगरे. २०२० मध्ये कोरोना सावटाच्या कालावधीचा सकारात्मक उपयोग करून शेतीचे ज्ञान व प्रयोगशीलता याची त्यांनी सांगड घातली. दैनंदिन कामाबरोबरच शेती संबंधित प्रयोगात स्वतःला गुंतवून ठेवले.

Rooftop Farming
द्राक्ष टेरेस गार्डनला कृषी आयुक्तांची भेट

कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीमधील नवीन तंत्र समजून घेतले. सुरुवातीला शेती व पर्यावरण विषयक समस्यांचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी प्रक्षेत्र भेटी दिल्या. त्यांनतर निमज (ता. संगमनेर, जि. नगर) येथील स्वतःच्या शेतीमध्ये प्रयोग सुरू केले.

सुरुवातीला घरातील ओल्या विघटनशील कचऱ्यापासून खड्डा पद्धतीने कंपोस्ट खताची निर्मिती केली. घरातील टाकाऊ वस्तू जसे की प्लॅस्टिक ड्रम, बादल्या, कुंड्या तसेच ग्रो बॅग यांचा वापर करून विविध फळझाडे, फुलझाडे, औषधी वनस्पती आणि शोभेची झाडे त्यांनी स्वतःच्या शेतीमध्ये तसेच घराच्या गच्चीमध्ये लावली.

बागेमध्ये जपले वैविध्य...

प्रा. डोंगरे हे ‘ॲग्रोवन’चे दैनंदिन वाचक आहेत. यातून वेगवेगळ्या संकल्पनांचा अभ्यास करत घराच्या गच्चीवर ‘अर्बन फार्मिंग’ चे मॉडेल उभे केले. याचबरोबरीने गांडूळ खत, व्हर्मिवॉश, जिवामृत, निंबोळी अर्क अशा सेंद्रिय निविष्ठांची घरगुती निर्मिती करून वापर सुरू केला. २०२१ मध्ये त्यांनी शेती तसेच बागेमध्ये कीड नियंत्रणासाठी चिकट सापळे, कामगंध सापळे आणि सौरऊर्जेवर चालणाऱ्या प्रकाश सापळ्याचा वापर सुरू केला.

विशेष म्हणजे सौरऊर्जेवर चालणारा प्रकाश सापळा त्यांनी स्वतः विकसित केला आहे. कीड, रोग नियंत्रणासाठी जैविक उपायांवर त्यांचा भर आहे. पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी ठिबक सिंचन आणि फॉगर तंत्रज्ञानाचा ते वापर करतात. नाशिक येथील आडगाव शिवारातील घराच्या गच्चीवर त्यांनी विविध रंगी बाग फुलविली आहे. यामध्ये तीन वर्षांपासून त्यांनी सातत्य जपले आहे.

प्रा. डोंगरे हे सातत्याने नवनवीन प्रयोग करत असतात. गेल्या तीन वर्षांत महाविद्यालय, संस्था आणि गावांमध्ये शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती आणि संधी बाबत मार्गदर्शन केले आहे. याचबरोबरीने मधमाशी पालन, एकात्मिक शेती, कृषी रसायन साक्षरता या विषयांचे प्रशिक्षण घेतले आहे. कृषी तज्ज्ञ, प्रयोगशील शेतकरी, यांच्याशी कायम संपर्क ठेवून ते शिवार भेटी देतात.

Rooftop Farming
सिक्कीमचे ‘टेरेस फार्मिंग’ ठरतेय वरदान

फळाफुलांसह औषधी वनस्पती

प्रा. डोंगरे यांच्या टेरेस गार्डनमधील ड्रममध्ये सफरचंद, ड्रॅगन फ्रूट, पॅशन फ्रूट, स्टारफ्रूट, अंजीर, पेरू, डाळिंब, चिकू, जांभूळ, तुती, आवळा, पपई, सीताफळ, लिंबू अशा फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. तसेच चाफा, जास्वंद, गुलाब, निशिगंध, सदाफुली, शेवंती, सोनटक्का, मधुकामिनी, ब्रम्हकमळ अशा रंगीबेरंगी सुवासिक फुलझाडे लावण्यात आली आहे.

यासोबत तुळस, गवती चहा, कोरफड, हळद, पुदिना, ओवा, नागवेलीचे पान अशा औषधी वनस्पतींची लागवड आहे. कोरल वेल, टेक्सास सेज, ॲलामेंडा, डेझी, पीस लिली, लँटेना, स्नेक प्लॅन्ट, थाई अनंत अशी शोभेची झाडेदेखील आहेत. यामुळे हंगामनिहाय फळे आणि फुले वर्षभर उपलब्ध होत असतात. टेरेस गार्डनमधील वर्षभर फळा फुलांचा बहर असल्याने पक्षांनी घरटे बांधले आहे. तसेच बागेत मधमाश्‍यांचा सातत्याने वावर असतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com