Orchard Farming : नियोजनबद्ध फळबाग केंद्रित शेतीचा आदर्श

Orchard Cultivation : तरडगाव (ता. जामखेड, जि. नगर) येथील विष्णुपंत व वसंत या सानप पितापुत्रांनी माळरान विकसित करून सुमारे साडेबारा एकरांवर फळबाग केंद्रित शेतीचे नंदनवन उभारले आहे.
Vishnupant And Vasant Sanap
Vishnupant And Vasant SanapAgrowon

Success Story of Orchard Farming : तरडगाव (ता. जामखेड, जि. नगर) येथील विष्णुपंत व वसंत या सानप पितापुत्रांनी माळरान विकसित करून सुमारे साडेबारा एकरांवर फळबाग केंद्रित शेतीचे नंदनवन उभारले आहे. भौगोलिकता, पाणी, मजूरबळ, गुंतवणूक अशा सर्व बाबी लक्षात घेऊन विचारपूर्वक व नियोजनबद्ध शेती पद्धतीची रचना केली आहे. उत्कृष्ट गुणवत्तेतून आंब्याला थेट ग्राहक बाजारपेठ तयार केली आहे.

नगर-मराठवाड्याला लागून प्रसिद्ध खर्ड्यापासून नजीक व प्रसिद्ध खैरी मध्यम प्रकल्पाच्या जवळ जामखेड तालुक्यातील तरडगाव आहे. येथील विष्णूपंत सानप कुटुंबाने प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळख निर्माण केली आहे. खासगी शिक्षण संस्थेत ३३ वर्षे शिक्षक म्हणून नोकरी केल्यानंतर २००५ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यांना दोन बंधू. शेतीच्या वाटण्या झाल्यानंतर त्यांच्या वाट्याला वडिलोपार्जित हिश्‍शातील नऊ एकर शेती आली. हा सगळा माळरान होता. काही भाग पडीक होता. सेवानिवृत्तीनंतर विष्णुपंत यांनी शेतीतच झोकून दिले.

अडीच हजारांपर्यंत फळबाग झाडे

ओबडधोबड शेतीचे केले सपाटीकरण. दोन विहिरी खोदल्या. पारंपरिक पिकांना फाटा देत फळबाग केंद्रित शेतीची रचना केली.

सन २००६ मध्ये केसर, लंगडा, दूधपेढा, रत्ना, दांडी, तोतापुरी, हापूस, दशहरी, निलम, बदाम, दांडी, बारामाशी अशा डझनभर आंबा वाणांची लागवड.

आजमितीला साडेबारा एकरांवर फळपिकांची विविधता. केसर, दशहरी व लंगडा हे तीन मुख्य वाण. अन्य आंब्यांची ६५० झाडे आहेत. ५० झाडे पुनरुज्जीवित केली.

साई सरबती लिंबू ५००, संत्रा ११५०, बहाडोली जांभूळ १००, नारळाची ६२ (पैकी २२ उत्पादनक्षम), सीताफळ २०, तर चिकू, पेरू व आवळा प्रत्येकी पाच व काही फणस असे एकूण २५०० हून अधिक फळझाडांचे नंदनवन उभारले आहे.

येत्या काळात पाच हजारांपर्यंत झाडांची संख्या नेण्याचा प्रयत्न. प्रति झाड एक हजार रुपये उत्पन्न अपेक्षित धरले आहे. त्यानुसार शेतीचे अर्थशास्त्र तयार केले आहे.

Vishnupant And Vasant Sanap
Orchard Plantation : ‘रोहयो’तून 60 हजार हेक्टरवर फळबाग लागवड

आंब्याला थेट ग्राहक बाजारपेठ

सध्या विष्णुपंत यांचे चिरंजीव वसंत वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शेतीची संपूर्ण जबाबदारी पाहतात. सेंद्रिय पद्धतीनेच आंबा उत्पादन घेण्यावर त्यांनी भर दिला आहे. चोख व्यवस्थापनातून आंब्याची ‘ए ग्रेड’ गुणवत्ता जपत थेट ग्राहक बाजारपेठ तयार केली आहे. त्यांच्या शेतापासून जामखेड सुमारे ४० किलोमीटरवर आहे. तेथून आंबे ग्राहक घेऊन जातात. कच्चे आंबे नेण्यासाठी ग्राहक थेट शेतातही येतात.

यातील काही वाण उत्तर प्रदेशातील आहेत. पुणे शहरात निवास करणाऱ्या या राज्यातील व्यक्ती समुहाने येऊन ‘बल्क’मध्ये खरेदी करतात. स्थानिक व्यापारी बाबूशेठ जमदाडे यांचीही विक्रीत मदत होते. सध्या प्रति किलो १५० रुपये दराने आंब्याला मागणी आहे. केसरसह सानप यांच्याकडील दशहरी आंब्यालाही मोठी मागणी असते. या आंब्याची टिकवण क्षमता अन्य आंब्याच्या तुलनेत कमी आहे. आकार निमुळता व वजन १२५ ते ३९० ग्रॅमपर्यंत असते. गोडी मात्र अप्रतिम असते असे विष्णुपंत सांगतात.

व्यवस्थापन व जपलेली गुणवत्ता

आंब्याची पूर्वीची लागवड ३३ बाय ३३ फूट होती. आता १८ बाय १८ फूट अशी लागवड. अंतर कमी केल्याने झाडांची संख्या वाढली आहे.

सर्व फळझाडांना सतरा वर्षांपासून शेणखत, कंपोस्ट खताचा वापर. त्यासाठी परिसरातून वर्षभरासाठी ३० टन शेणखत, १० टन ऊस वाढ्याची खरेदी. सोबतीला सुपर फॉस्फेट, करडी पेंडींची भुकटी, डीकंपोजर आदींचा वापर करून ९० दिवस खत चांगल्या प्रकारे कुजवले जाते.

गीर गोमूत्र, पाचटाचाही वापर. या सर्वांमुळे आंब्याची गोडी व चकाकी वाढते. फळाच्या सालीतील हिरवेपणा टिकून राहतो. खराब होण्याचे प्रमाण कमी होते. ग्राहकांची मागणी अधिक व २० टक्के दरही अधिकचा मिळतो.

Vishnupant And Vasant Sanap
Orchard Planting : फळबाग लागवडीची पूर्वतयारी

पाणी व्यवस्थापन तंत्रज्ञान

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत २००६ मध्ये एक कोटी लिटर क्षमतेचे शेततळे.

जामखेड तालुक्यातील हे पहिलेच सर्वांत मोठे शेततळे असावे.

दोन विहिरींतून पावसाळ्यात ते भरून घेण्यात येते.

शेजारचे माळरान कोरडेठाक असताना सानप यांच्या शेतात मात्र नंदनवन फुलण्याला आणि टंचाईच्या काळात ही ‘वॉटर बॅंक’ फळबागांसाठी जीवनदायी ठरली आहे.

शेततळ्याच्या भिंतीतून आतील बाजूस पायथ्यापर्यंत चार इंची पाइप (पाणी आत घेण्यासाठी).

‘आउटलेट’साठी तीन इंची पाइप व मोठा नळ. या पद्धतीद्वारे वीज नसतानाही ‘ग्रॅव्हिटी’ तंत्राद्वारे शेतीला पाणी पुरविले जाते.

व्ही.यू. ग्रॅव्हिटी टेक्नॉलॉजी असे त्याचे नामकरण.

या पाण्याला प्रचंड प्रेशर असल्याने ठिबकमध्ये चोकअप होण्याचाही धोका नसल्याचे वसंत सांगतात.

कुटुंबाचे योगदान

कमी होत चाललेले मजूरबळ, वाढता खर्च लक्षात घेऊन वसंत यांनी शेती व्यवस्थापनाची रचना केली आहे. ते सांगतात की घरचे सर्व सदस्य शेतीत राबतो. आंब्याची काढणी व त्यवेळची प्रतवारीची जबाबदारी माझी असते.

काढणीनंतरच्या प्रतवारीची जबाबदारी वडील घेतात. त्यानंतरची प्रतवारी. बॉक्स पॅकिंग या बाबी पत्नी भाग्यश्री, मुलगा पृथ्वीराज, मुलगी श्रावणी समर्थपणे हाताळतात. आई कै. शहाबाई यांचे संस्कार मिळाल्यानेच प्रगतीची दिशा मिळाल्याचे वसंत सांगतात. उत्तर प्रदेशातील सात मजूर कायमस्वरूपी ठेवले आहेत. त्यांचे शेतातच वास्तव्य असते.

सेवानिवृत्तीनंतर शेती समृद्ध करण्याचा घेतलेला निर्णय आज प्रत्यक्षात उतरवला आहे. अठरा वर्षांपासून मुक्काम शेतातच आहे. शेतात, निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यामुळे मिळणारे समाधान अनुभवतो आहे.
विष्णुपंत सानप

वसंत सानप ९८३२१४१४१४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com