भुईमूग विक्रीसाठी चला अमरावती बाजार समितीत

उन्हाळी भुईमूग शेंगा विक्रीचे हब म्हणून अमरावती बाजार समितीने ओळख मिळविली आहे. एकूण हंगामात काही हजार क्‍विंटलपेक्षा अधिक शेंगांची आवक या बाजारात विदर्भातील विविध भागांतून होते. खुल्या लिलाव पद्धतीचा अवलंब असल्याने शेतकऱ्यांना दर्जानुसार दर मिळतो. बाजार समितीकडून खरेदीसाठी शेडची उपलब्धता करून देण्यात आली आहे.
Groundnut
GroundnutAgrowon

सोयाबीन, तूर, भुईमूग (Groundnut) आदी शेतीमालाची आवक होणारी अमरावती बाजार समिती ‘अ’ वर्गात येते. अमरावती व भातकुली या दोन तालुक्‍यांचा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात समावेश होतो. तब्बल २३६ गावे या बाजार समितीच्या अंतर्गत येतात. २७ ऑक्‍टोबर १९५६ रोजी बाजार समितीची स्थापना झाली. बडनेरा, भातकुली, शिराळा, आष्टी, खोलापूर, माहूली जहाँगीर, भातकुली, शिराळा, आष्टी, खोलापूर येथे उपबाजार आहेत. बाजार समितीला ई-नाम प्रणालीला मंजुरात मिळाली आहे. रविवारी धान्य बाजार बंद राहतो. (Groundnut Arrival)

बाजार समितीचा विस्तार

-अमरावती बाजार समितीचा परिसर सुमारे १८ एकर १७ गुंठे.

-फळे व भाजीपाला बाजार आठ एकर १४ गुंठे, बडनेरा जनावरांचा बाजार पाच एकर क्षेत्रावर विस्तारित.

-संपूर्ण परिसराला आवारभिंत.

-धान्य व्यवहारासाठी ३७७, कापूस ८, भाजीपाला व्यवहार २०६, फळे ७४, बडनेरा उपबाजारात ३०, तर जनावरे बाजारात १० याप्रमाणे ७१२ अडते.

-खरेदीदार व्यापाऱ्यांची संख्या ३२४. हमालांची संख्या ४७० पर्यंत.

-खुल्या पद्धतीने शेतमाल लिलावाची प्रक्रिया पार पाडली जाते.

-एसएमएसच्या माध्यमातून बाजारभावांची माहिती देण्याची सुविधा. नोंदणीकृत शेतकऱ्यांना ही सेवा निशुल्क. साडेसात हजारांहून अधिक शेतकऱ्यांकडून नोंदणी. त्यासाठी बाजार समितीद्वारे प्रति एसएमएस १६ पैसे खर्च.

-भाजीबाजाराचे नियंत्रण पूर्वी नगरपालिकेकडे होते. आता ते बाजार समितीकडे आहे. परिसर स्वच्छतेसाठी बाजारातील व्यापाऱ्यांना सुमारे सत्तर कचराकुंड्यांचे वाटप २०० रुपये शुल्कापोटी.

-जागेचे काँक्रिटीकरण करण्यासाठी प्रस्ताव पणन मंडळाकडे.

-बाजार दर गुरुवारी बंद.

भुईमूग क्षेत्र व आवक

अमरावती बाजार समिती भुईमूग शेंगासाठी प्रसिध्द आहे. विदर्भात अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ अशा पाच जिल्ह्यांत भुईमुगाचे क्षेत्र आहे. अमरावती जिल्ह्याच्या दुर्गम, आदिवासी बहूल मेळघाट परिसरातील शेतकरीही भुईमूग घेतात. लगतच्या वर्धा जिल्ह्यातूनही आवक बाजार समितीत होते. प्रातिनिधिक सांगायचे, तर बुलडाणा जिल्ह्यात सरासरी क्षेत्र २१७४.४० हेक्‍टर आहे. सन २०२१-२२ च्या उन्हाळी हंगामात सरासरीपेक्षा तिप्पट लागवड झाली. अमरावती जिल्हयात या पिकाखाली २५७९.२० हेक्‍टर क्षेत्र आहे. यवतमाळ जिल्ह्याची लागवडीत आघाडी राहते. परंतु २०१९-२० मध्ये ऐन काढणीवेळी विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला. परिणामी शेंगा भरल्या नाहीत. त्यामुळे उत्पादन खर्चाची भरपाई होऊ शकली नाही. तत्काळ चुकारे आणि व्यवहाराची पारदर्शी प्रक्रिया असल्याने अन्य बाजारपेठांच्या तुलनेत येथे आवक वाढती असते.

तारण माल योजना

बाजार समितीचा संपूर्ण परिसर ‘सीसीटीव्ही’ कॅमेरा नियंत्रणाखाली आहे. शेतीमाल तारण योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. स्वनिधीतून ही योजना राबविली जात आहे. यंदा ३६७ शेतकऱ्यांद्वारे ४ कोटी २८ लाख रुपयांचा शेतीमाल तारण ठेवण्यात आला. सुमारे १५ हजार क्‍विंटल हा शेतीमाल आहे. शेतमाल किमतीच्या ७५ टक्‍के रक्‍कम दिली जात असून, सहा टक्‍के व्याज आकारले जाते. गोदाम भाडे व अन्य शुल्क आकारले जात नाही. बाजार समितीकडे नऊ गोदामे आहेत. योजनेचा प्रसार अधिकाधिक करण्यासाठी बाजार समिती प्रयत्नशील आहे.

सुविधांची गरज

भुईमुगाची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने परिसरात सिमेंट फरशांची योग्य सुविध असणे गरजेचे आहे. त्याअभावी शेंगांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होते. या संदर्भात बाजार समिती प्रशासनाकडे वारंवार मागणी करण्यात आली. परंतु अजून दखल घेतली गेली नसल्याचे अंतोरा (अमरावती) येथील शेतकरी पंकज बारबुद्धे सांगतात.

उत्पादन व दर

विदर्भात उन्हाळ्यात भुईमुगाची लागवड सर्वाधिक होते. योग्य व्यवस्थापनाच्या बळावर हेक्‍टरी ३५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते. अलीकडील वर्षांत भुईमूग शेंगांना चांगला दर मिळत असल्याने शेतकरी या पिकाकडे पुन्हा वळू लागले आहेत. त्यामुळेच गेल्या हंगामात सरकारी बियाणे कंपनीकडे बियाण्यांची मागणी वाढली होती. मात्र तुलनेत पुरवठा करता आला नाही. शेंगांना पाच हजारांपासून ५८०० ते सहा हजार रुपयांपर्यंत प्रति क्विंटल दर मिळतो. सरळ वाण असल्याने दोन ते तीन वर्षे घरचे बियाणे वापरणे शक्‍य होते अशी माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील तेलबिया संशोधन विभागाचे प्रमुखडॉ. संतोष गहूकार यांनी दिली.

दोन महिन्यांचा हंगाम

विदर्भात सर्वाधिक उन्हाळी भुईमुगाचे उत्पादन होते. जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लागवड करून मेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात काढणी होते. त्यामुळे बाजारात आवक मे व जून अशी दोन महिने राहते. खरिपातही काही भागांत लागवड होते. मात्र अमरावती बाजार समितीत अशा भुईमुगाची ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये किरकोळ आवक होते.

भुईमूग आवक व दर

आवक सरासरी दर (प्रति क्विंटल)

२०२०-२१- १६२५८ क्विं. ५१४५ रु.

२०२१-२२- १२९०४ क्विं. ५७४७ रु.

२०१६-१७- १९२९२ क्विं. ------

२०१७-१८- ३७०६३ क्विं. -----------

मालाचा दर्जा

मालाच्या दर्जानुसार दर ठरतात. ७४ काउंटचा दाणा असेल तर ए ग्रेड गुणवत्ता समजली जाते. एक किलो भुईमूग शेंगा घेऊन त्यातून ७४० ग्रॅम दाणे व उर्वरित ग्रॅम टरफल निघाले पाहिजे. याला दर्जेदार शेंग म्हटले जाते. अशा शेंगांना चांगला दर मिळतो. अमरावती बाजार समितीत आपल्याकडे येणारा माल ६८ ते ६९ काउंटचा राहतो असे व्यापारी सुरेश चोप्रा यांनी सांगितले. ते शेंगांपासून दाणे तयार करून विक्री करतात. त्यांचा अमरावती औद्योगिक परिक्षेत्रात कारखाना आहे. या भागातील अधिकची भुईमूग शेंग प्रक्रियेसाठी गुजरातला पाठवली जाते असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांचे अनुभव

वीस किलो बियाण्यासाठी यंदा ३२०० रुपये मोजावे लागले. मशागत, लागवड सोबतच भुईमूग काढणीसाठी ३५ ते ४० रुपये पिंप असा दर मजूर आकारतात. या पिकात मजुरी खर्च अन्य पिकांच्या तुलनेत अधिक आहे. परंतु हे नगदी पीक असल्याने गावशिवारात मोठ्या संख्येने शेतकरी उन्हाळ्यात भुईमूगाची लागवड करतात.

- किरण डेरे, वाई, यवतमाळ

बाजारात भुईमुगाची आवक मोठ्या प्रमाणावर होते. लिलावा ठिकाणी काँक्रिटीकरण सुविधा करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी सुमारे एक कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रयत्न सुरू आहेत.

- राजेश लव्हेकर, प्रशासक, बाजार समिती, अमरावती

संपर्क-

दीपक विजयकर, ९७६४२४९८५२, सचिव, बाजार समिती, अमरावती

पवन देशमुख, ९१६८४८२०००, निरीक्षक, बाजार समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com