बेंबळे (ता. माढा, जि. सोलापूर) येथील भरतकुमार दत्तात्रेय भोसले यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचे एकरी तब्बल ११६ टन घेण्यामध्ये यश संपादन केले आहे. बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट अंतर्गत कृषी विज्ञान केंद्राकडून त्यांना हे तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन मिळाले. दरवर्षी एकरी ५० ते ५५ टनांपर्यंत साध्य होणाऱ्या उत्पादनात दुपटीने वाढ होण्यासह पाण्यात किमान ५० टक्क्यांपर्यंत बचत झाल्याचा भोसले यांचा दावा आहे. हा प्रयोग परिसरासाठी कौतुकाचा व अनुकरणीय विषय झाला आहे..सोलापूर-पुणे महामार्गावर टेंभुर्णीपासून आत आठ किलोमीटरवर भीमा नदीच्या काठावर बेंबळे हे १० हजार लोकवस्तीचे गाव आहे, हा परिसर पूर्वीपासूनच उसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. गावाच्या चोहोबाजूंनी माढा, माळशिरस, पंढरपूर, मोहोळ आदी तालुक्यांत डझनाहून अधिक साखर कारखाने आहेत. साहजिकच भागात पहिले प्राधान्य उसाला मिळते. त्यानंतर केळी, डाळिंबासह अन्य पिके होतात. बेंबळे गावचे भरतकुमार भोसले यांची आठ एकर शेती आहे. त्यात दीड एकर द्राक्षे व दहा गुंठ्यागत शेडनेटमध्ये भाजीपाला आहे. पाच ते साडेपाच एकरांत ऊस असतो..AI In Sugarcane Farming : ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचे एकरी उत्पादन वाढवा .‘केव्हीके’ची भेट ठरली महत्त्वाचीभरतकुमार (वय ३६) आपले लहान बंधू शत्रुघ्न यांच्यासोबत पूर्णवेळ शेती करतात. त्यांना आई उषा आणि वडील दत्तात्रेय यांचे मार्गदर्शन मिळते. भरतकुमार यांची पत्नी राजश्री व शत्रुघ्न यांची पत्नी पूजा या देखील शेतीत राबतात. भरतकुमार यांचे चुलतभाऊ हर्षल पुणे येथे असून ते सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यांच्या माध्यमातून भरतकुमार यांना बारामती येथील बारामती अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट अंतर्गत बारामती कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) येथे भेट देण्याचा योग आला. तेथे सुरू असलेल्या एआय (कृत्रीम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाआधारे ऊस प्रकल्पाची माहिती व प्रात्यक्षिके पाहता आली. ऑक्स्फर्ड विद्यापीठ, मायक्रोसॅाफ्ट आदी जगप्रसिद्ध संस्थांचा या प्रकल्पात सहभाग आहे. बारामती परिसरासह सोलापूर, नगर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांतील सुमारे पाच हजार शेतकऱ्यांच्या शेतावर हा प्रयोग राबवला जातो आहे. केव्हीकेच्या प्रत्यक्ष भेटीनंतर या प्रयोगाचा आरंभ भोसले यांच्या शेतावर झाला.....असे राबवले एआय तंत्रज्ञानभरतकुमार यांना ऊस शेतीचा पंधरा वर्षांचा अनुभव आहे. को ८६०३२ हे वाण ते घेतात. एआयच्या प्रयोगात त्यांचे एक एकर क्षेत्र निश्चित करण्यात आले. एकूण हे क्षेत्र एक एकर व वरती दोन- तीन गुंठे असावे असे भरतकुमार यांचे म्हणणे आहे. तुलनेसाठी प्रचलित पद्धतीच्या व्यवस्थापनाचा पाच एकर ऊस ठेवण्यात आला. बारामती केव्हीकेच्या साह्याने शेतात काही शुल्क भरून स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आले. त्याला जोडलेल्या सेन्सरच्या माध्यमातून हवामानाचे घटक, पाणी आदींबाबत विविध निरीक्षणे सातत्याने नोंदवण्यात आली. वाण को ८६०३२ हेच ठेवण्यात आले. रोपे केव्हीकेकडून पुरवण्यात आली. दहा ऑगस्ट, २०२४ मध्ये पाच बाय दीड फूट अंतरावर लागवड झाली. सिंचन पूर्णपणे ठिबकद्वारे करण्यात आले. पीकवाढीच्या अवस्था, त्यानुसार घेत असलेल्या नोंदीवरून ॲपद्वारे शास्त्रज्ञांकडून अन्नद्रव्ये, पाणी, कीडनाशके व एकूणच व्यवस्थापनाबाबत सातत्याने सल्ले देण्यात आले..AI In Sugarcane Farming : ‘एआय’च्या वापरासाठी ऊस उत्पादक शेतकरी आले पुढे.व्यवस्थापनातील काही बाबीलागवडीपूर्वी चार डंपिंग शेणखत आणि कोंबडी खत १०० बॅग (प्रति ३० ते ३५ किलो) यांचा वापर केला. बाळबांधणीवेळी १८- ४६- हे खत ५० किलो देण्यात आले. तसेच अमोनिअम सल्फेट २५ किलो, पॉलिसल्फेट, सिलीकॅान ४० किलो, एसओपी २५ किलो, बोरॉन १० किलो आदींचा वापर केला. मोठ्या बांधणीवेळी एकरी युरिया ४५ किलो, एमओपी ५० किलो, ९ : २४ : २४ हे ४० किलो, त्याचबरोबर अन्य काही खते व निंबोळी पेंड ४० किलो यांचा वापर केला. ठिबकद्वारे पहिले दोन महिने आठवड्यातून १० लिटर स्लरी प्रति एकर व त्यानंतर दर १० दिवसांनी युरिया, फॉस्फोरिक ॲसिड व एसओपी यांचा वापर केला. उसात शूट बोरर या किडीचा प्रादुर्भाव झाला होता..त्याच्या नियंत्रणासाठी व तांबेरा रोग प्रतिबंधक म्हणून कीटकनाशक, बुरशीनाशक व अन्नद्रव्य कमतरता भरून काढण्यासाठी खत अशा दोन ते तीन फवारण्या झाल्या. ऊस मोठा झाल्यानंतर अन्नद्रव्य कमतरता व तण नियंत्रण आदींसाठी स्वतंत्र अशा ड्रोनद्वारेही काही फवारण्या घेण्यात आल्या. ऊस साधारण १८ ते २० कांड्यावर आल्यानंतर पाचट काढून तिथेच सरीमध्ये आच्छादित केले. त्यामुळे कायम वाफसा स्थिती राहिली. महत्त्वाचे म्हणजे तणनियंत्रण झाले. लागवडीपासून ५५ ते ६० दिवसांनी जेठाकोंब काढून घेतला. फुटवे एकसारखे येतील व त्यांची संख्या नियंत्रणात राहील असे नियोजन केले..AI In Sugarcane Farming : ‘एआय’ तंत्राने ऊस उत्पादनावाढ शक्य.साध्य उत्पादनएआय प्रयोगात एकरी उत्पादन खर्च सुमारे सव्वा लाख आला. उत्पादन एकरी ११६ टन मिळाले. तर प्रचलित पद्धतीच्या उसासाठी उत्पादन खर्च ८० हजार रुपये, तर उत्पादन ५५ टन मिळाले. साखर कारखान्याकडून सुमारे ३१५० रुपये प्रति टन दर मिळत असल्याचे भरतकुमार सांगतात. प्रति टन तीस हजार रुपये दर गृहीत धरला तरी एआय पद्धतीच्या उसातून एक लाख ३८ हजार रुपयांचा नफा मिळतो हे प्रयोगातून सिद्ध झाले. भोसले कुटुंबाचा हा प्रयोग परिसरासाठी कौतुकाचा व प्रेरणेचा विषय झाला आहे..‘एआय’ तंत्रज्ञानातून झालेले फायदेहवामानाचे अंदाज अचूक मिळाले. किडी-रोगांचा आगाऊ इशारा मिळाला.माती परीक्षणाआधारे खतांचा वापर व वापरण्याची योग्य वेळ सुचवण्यात आली. त्यातून खतखर्चात १५ ते २० टक्क्यांची बचत झाली. पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन झाले. त्यातून किमान ५० टक्के पाण्याची बचत झाल्याचे भरतकुमार सांगतात.उपग्रहाद्वारे ‘इमेजिंग’, ड्रोन सर्व्हे, सेन्सर्स, मोबाईल ॲप आदी सर्वांचा एकात्मिक वापर करून सर्व नोंदी ठेवण्यात आल्या. शेतातील प्रत्येक भागाचा स्वतंत्र डेटा तयार झाला. भरतकुमार भोसले : ९६५७४६८७०७.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.