सीताफळ उत्पादनात ७० वर्षांपासून फाटे कुटुंबाचा हातखंडा 

तीन एकरांवरील सीताफळ बाग.
तीन एकरांवरील सीताफळ बाग.

पुणे जिल्ह्यातील वडकी (तळेवाडी) येथील शशिकांत फाटे यांनी योग्य नियोजन करून कमी पाण्यातही सीताफळ, पेरू आणि चिकू फळबागांतून चांगले उत्पन्न घेतले आहे. गेल्या ७० वर्षांपासून त्यांनी सीताफळ लागवडीत सातत्य ठेवले आहे. पुण्यातील फळ मार्केटमध्ये त्यांच्या सीताफळाला दरवर्षी चांगला दर मिळत असून, सीताफळ उत्पादक म्हणून त्यांची ओळख तयार झाली आहे.  शेतकऱ्यांच्या शेकडो यशोगाथांचा खजिना..करा पुढील लिंकला क्लिक..  अॅग्रोवन अॅप डाऊनलोड आजच डाऊनलाड करा पुणे शहरापासून १५-२० किलोमीटर अंतरावर सुमारे १४ ते १५ हजार लोकसंख्येचे वडकी (तळेवाडी) गाव आहे. हे गाव सीताफळ आणि मस्तानी तलावामुळे राज्यात प्रसिद्ध आहे. या तलावामुळे गावातील शेतीला बारमाही पाण्याची सोय झाली आहे. गावातील एकूण क्षेत्रापैकी जवळपास ७० ते ८० एकरांवर सीताफळाचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये गावातील पांडुरंग भीमाजी फाटे यांच्याकडे एकूण दहा एकर शेती आहे. ते पुण्यातील एएफएमसीमध्ये नोकरी करत होते. बारा वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना शशिकांत व दत्तात्रेय अशी मुले आहेत. दोघांनीही फळबाग शेती करण्याला प्राधान्य दिले आहे. 

सीताफळ लागवडीला सुरुवात  पांडुरंग फाटे नोकरी करत असताना त्यांच्या वडिलांनी १९५० साली अर्धा एकरांवर सीताफळ झाडांची लागवड केली. पांडुरंग यांनी नोकरी करत असताना, १९८३ मध्ये सीताफळ लागवडीमध्ये हळूहळू वाढ करत अडीच एकरांवर सीताफळ बाग वाढविली आहे. सध्या त्यांच्या मुलांनीही बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन सीताफळाबरोबर पेरू अर्धा एकर, चिकू बागेची अर्ध्या एकरावर लागवड केली आहे. त्याच्याकडे पेरू, चिकू आणि सीताफळाची एकूण तीन एकरांवर लागवड असून, ते गेल्या चाळीस वर्षांपासून सीताफळातून चांगले उत्पन्न घेत आहेत. 

कमी पाण्यावर पिकांचे नियोजन  गावात पावसाचे प्रमाण कमी असल्याने दरवर्षी शेतीसाठी पाण्याचा प्रश्न उपस्थित होतो. त्यावर मात करण्यासाठी गावातील शेतकऱ्यांनी अधिक पाणी लागणारी पिके न घेता कमी पाणी लागणाऱ्या पिकांचा अवलंब केला आहे. यात प्रामुख्याने पावसाळ्यात भाजीपाला, कांदा अशी पिके घेतली जातात. तर काही शेतकरी फळबाग लागवडीकडे वळले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पेरू, सीताफळ, चिकू या फळपिकांचा समावेश आहे. यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.  शेतकऱ्यांच्या शेकडो यशोगाथांचा खजिना..करा पुढील लिंकला क्लिक..  अॅग्रोवन अॅप डाऊनलोड आजच डाऊनलाड करा

पिकांना सूक्ष्म सिंचनाचा वापर  फाटे यांच्याकडे दोन विहिरी व दोन बोअरवेल आहेत. पावसाळ्यात पाऊस पडल्यानंतर बऱ्यापैकी पाण्याची उपलब्धता असली, तरी उन्हाळ्यात पाण्याची कमतरता जाणवते. त्यावर मात करण्यासाठी गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत फळबागांना सूक्ष्म सिंचनाचा अवलंब केला आहे. गावात जवळपास ८० -९० टक्के फळबागांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले जाते. त्यामुळे पाण्याची बचत होऊ लागली असून, कमी पाण्यात फळबागांचे उत्पादन घेण्यास मदत झाली आहे. 

मस्तानी तलावामुळे फळबाग टिकून  गावात मोठा तलाव असून तो मस्तानी नावाने ओळखला जातो. हा तलाव १४ एकरांवर विस्तारला आहे. त्यामुळे जवळपास अर्धा ते एक टीएमसी पाणीसाठा तलावात होतो. त्यामुळे पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता असते. तलाव भरल्यामुळे फळबागेचे उत्पादन चांगल्या पद्धतीने घेता येत असून, विहिरींनाही पाण्याची चांगली उपलब्धता असते. याशिवाय उन्हाळ्यात तलावामुळे फळबागांची पाण्याची गरज पूर्ण होते. 

लेंडीखत, शेणखताचा वापर  दरवर्षी फळबागेला बहर धरण्याच्या एक महिना आधी लेंडीखत टाकले जाते. त्यामुळे फळाची प्रत सुधारून फळांचा दर्जा चांगला येण्यास मदत होते. साधारणपणे एका झाडाला तीन ते चार किलो लेंडीखत टाकले जाते. मात्र, लेंडी खत नसेल तर शेणखताचा वापर केला जातो. त्यामध्ये एका झाडाला सुमारे तीन ते चार किलो चांगले कुजलेले शेणखत टाकले जाते. त्यामुळे फळे चांगले येण्यास मदत होते. सीताफळावर रोग, किडीचा प्रादुर्भाव कमी असला तरी, प्रामुख्याने बुरशीचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी बाग स्वच्छ ठेवण्यावर ते अधिक भर देतात. 

बाजारभावानुसार काढणीचे नियोजन  फळे पक्व झाल्यानंतर व मोठ्या आकाराची झाल्यानंतर फळाची काढणी केली जाते. बहार धरल्यानंतर साधारणपणे चार ते पाच महिन्यात फळ काढणीला येतात. त्यातच बाजारभावाचीही माहिती घेऊन फळे काढणीचे योग्य नियोजन केले जाते. जेव्हा बाजारभाव जास्त असतो. चांगला दर असतो त्या वेळेस फळ काढणीचे नियोजन केले जाते. फळांची काढणी करताना लहान व मोठ्या आकाराची फळे काढून ग्रेडिंग करून क्रेटमध्ये विक्रीसाठी पाठविले जातात. त्यामुळे चांगला दर मिळण्यास मदत होते. 

पुणे मार्केटमध्ये विक्री  फळांची काढणी केल्यानंतर ग्रेडिंग व प्रतवारी करून क्रेटमध्ये भरून थेट पुणे बाजार समितीत विक्रीसाठी पाठविली जातात. हंगामात रोज फळाचे ३० ते ३५ क्रेट विक्रीसाठी पाठविले जातात. एक क्रेट साधारणपणे वीस किलो वजनाचे असते. मार्केटमध्ये व्यापारी किरकोळ ग्राहकांना किलोवर फळांची विक्री करतात. 

उत्पन्न  सीताफळाचे आठ ते दहा टन, पेरूचे दोन ते तीन टन उत्पादन मिळते याशिवाय चिकूचे चार टनांपर्यंत उत्पादन मिळते. सीताफळाला प्रतिकिलो दहा ते १८० रुपयांपर्यंत दर मिळतो. सरासरी ७० रुपयांपर्यंत दर मिळतो. पेरूला प्रतिकिलो सरासरी ४० रुपये दर मिळतो. सीताफळातून एकरी जवळपास दोन ते सव्वादोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. तर अर्धा एकर पेरूतून ७० ते ८० हजार रुपये, अर्धा एकर चिकूतून ८० ते एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. सर्व पिकांतून वर्षाला साडेतीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. यामध्ये वर्षाला एक ते दीड लाख रुपयांचा खर्च होतो. खर्च वजा जाता वर्षाला अडीच ते तीन लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळते.    शशिकांत फाटे ः ९८५००४३७३७, ९५११६८९१९३  शेतकऱ्यांच्या शेकडो यशोगाथांचा खजिना..करा पुढील लिंकला क्लिक..  अॅग्रोवन अॅप डाऊनलोड आजच डाऊनलाड करा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com