ऊस, आले ही दीर्घ मुदतीची पिके, त्यास आठ-नऊ एकरांत विविध भाजीपाला पिकांची जोड अशी पीक पद्धती सासपडे (ता. जि. सातारा) येथील चेतन व चिदानंद या विभूते बंधूंनी विकसित केली आहे. विविध पद्धती व तंत्रांचा वापर करून ही शेती सुकर व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर करण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. सासपडे (ता. जि. सातारा) गावाला तारळी धरणातील पाणी उपलब्ध झाले आहे. साहजिकच येथील शेती बागायती होण्यास मदत झाली. गावात ऊस, आले ही नगदी पिके सर्वाधिक घेतली जातात. गावातील चेतन व चिदानंद हे विभूते बंधू पूर्णवेळ शेती करतात. त्यांचे वडील विलासदेखील पूर्वी शेतीच करायचे. त्यांची १७ एकर शेती आहे. पूर्वी पाण्याची टंचाई खूप होती. यामुळे शेती फारशी बागायती नव्हती. दोन ते तीन एकरांतच ठिबक सिंचनाचा वापर व्हायचा. सुधारित तंत्राचा अवलंब पुढील पिढीकडे शेतीची जबाबदारी आल्यानंतर सुधारित तंत्रवापराचा विचार सुरू झाला. चेतन मेकॅनिकल डिप्लोमाधारक आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेती करण्यास सुरुवात केली. त्यातील समस्या समजून घेत प्रथम तारळी धरणातून पाइपलाइन करून पाणी आणले. ताजा पैसा उपलब्ध होत जावा यासाठी भाजीपाला पिके घेण्यास सुरुवात केली. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी, मजूर बचत व उत्पादन वाढीसाठी सर्व क्षेत्र टप्प्याटप्याने ठिबक सिंचनाखाली आणले. पॉलिमल्चिंग व गादीवाफा दरवर्षी ८ ते ९ एकर क्षेत्र भाजीपाला पिकांसाठी राखीव असते. त्यात हंगामनिहाय दोडका, कारली, काकडी, टोमॅटो, हिरवी तसेच ढोबळी मिरची, वालघेवडा अशी विविधता असते. पूर्वी या पिकांत तणांचा त्रास खूप जाणवायचा. वेळेत मजूरही उपलब्ध होत नसायचे. आता पॉली मल्चिंगचा वापर केला जातो. एकदा पेपर अंथरला की पुढची तीन ते चार पिके त्यावर घेतली जातात. पूर्वी भाजीपाला पिकांत पाच फुटी गादीवाफ्याचा (बेड) वापर व्हायचा. मजुरी, वेळ व श्रम याच बचत करण्यासाठी व काम सोपे होण्यासाठी आता ट्रॅक्टरचलित ब्लोअरचा वापर होतो. त्यासाठी बेड सात ते आठ फुटी केला आहे. प्रातिनिधिक उदाहरण द्यायचे, तर दोडक्याचे एकरी १२ टनांपर्यंत, तर टोमॅटोचे ३० ते ४० टनांपर्यंत उत्पादन मिळते. उसात ड्रोनचा प्रयोग सुमारे १४ कांड्यांवर असलेल्या उंच उसात फवारणी सोपी व्हावी म्हणून गेल्या वर्षी सुमारे सव्वाचार एकर ऊस क्षेत्रात भाडेतत्त्वावर आणलेल्या ड्रोनचा वापर करून पाहिला. तो उपयुक्त ठरल्याचे चेतन सांगतात. व्यवस्थापन व तंत्रवापर वैशिष्ट्ये
सुरुवातीपासून ‘ॲग्रोवन’चे वाचक चेतन सन २००६ पासून ‘ॲग्रोवन’चे वाचक आहेत. त्यातील यशोगाथा वाचून ते संबंधित शेतकऱ्यांशी संपर्क करतात. त्यातून आपल्या शेतीत सुधारणा करतात. तांत्रिक लेखही महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे ते सांगतात. संपर्क- चेतन विभूते, ९७६७४९८९६५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.